आईचे घर
आईचे घर
अजय आणि विजया यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडण एवढं मोठं होतं की, अजयला खूप मोठा आणि महत्वाचा निर्णय घ्यावा लागला. ज्यामुळे त्याचे मन तयार नव्हते पण त्याला तो निर्णय घ्यावं लागलं. विजयाला देखील त्याच्या निर्णयाने आश्चर्य वाटलं. अजय असा निर्णय घेऊ शकतो असे तिला कधीच वाटले नाही. तिला आता आपली चूक लक्षात येऊ लागली होती पण अजय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. तसे पाहिले तर विजयाला तिच्या संसारात कसल्याच बाबतीत कमतरता नव्हती. अजय तिला काय हवे काय नको या सर्व बाबी पुरवित होता. तिला एका राणी प्रमाणे ठेवत होता. पण विजया ला संसारात राजा राणी एवढंच पाहिजे होते. त्यांच्यासोबत आई राहत होती हे तिला वारंवार खटकत असे. छोट्या छोट्या गोष्टीवरून विजयाचे आणि अजयच्या आईचे वादविवाद होत असत. लग्न झाल्यावर तीन-चार महिने तेवढं सुखात गेले असतील त्या नंतर रोजच त्यांचे वाद होत असत आणि हे वाद ऐकून अजयच्या डोक्याला ताप चढत असे. आईला समजावून सांगितले तर बायकोला राग आणि बायकोला समजावून सांगितले तर आई रागात असे. अजय एका कंपनीत चांगल्या पदावर काम करत होता आणि त्याला त्या नोकरीत महिन्याकाठी चाळीस पन्नास हजार रुपये पगार मिळत होता. अजय लहान असतांना म्हणजे सातव्या वर्गात शिकत असताना त्यांचे वडील रस्ते अपघातात वारले होते. तेंव्हापासून ते अजयला नोकरी लागेपर्यंत त्याच्या आईने अपार कष्ट सोसून त्याला शिकविले होते. मिळेल ते काम करत आणि पोटाला चिमटा देऊन तिने अजयला शिकविले. सुट्टीच्या दिवशी स्वतः अजय देखील आईसोबत कामाला जात असे. त्याला कोणते काम करणे कमीपणाचे वाटत नव्हते. कसाबसा दहावी पास झाल्यानंतर त्याने आय टी आय मध्ये प्रवेश घेतला. तेथील दोन वर्षाचे शिक्षण पूर्ण करून एका कंपनीत अर्ज केला होता. ज्यादिवशी कंपनीचा कॉल आला होता त्यादिवशी सर्वात जास्त आनंद आईला झाला होता. आता आईला घरकामात काही जास्त त्रास व्हायला नको म्हणून त्याने विजयाशी लग्न केलं. लग्नापूर्वीच अजयने स्पष्ट करून सांगितलं होतं की, आपणाला आईसोबत राहावं लागणार आहे. विजयाच्या घरच्यांनी बाकी सर्व बाबी चांगल्या होत्या म्हणून लगेच होकार दिला आणि धुमधडाक्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडला.
सुरुवातीचे काही दिवस खूप मजेत आणि आनंदात गेले. सहा महिन्यांनी विजया गर्भवती आहे ही आनंदाची बातमी कळाली. आईला तर खूप आनंद झाला. बापाच्याच रूपाने मुलगा घरात आला. आई त्या लहान बाळाची हवी तशी काळजी घेऊ लागली. मूल हळूहळू मोठे होत होते. तसे त्या दोघांचे भांडण देखील वाढू लागले होते. विजयाला सासूबाई सोबत राहणे त्रासदायक वाटत होते. वास्तविक तिच्यामुळे तिला एकप्रकारे फार मोठा आधार होता. मात्र ती वेगळ्याच विचारसरणीची होती. दररोज भांडण करून ते भांडण अजय पर्यंत घेऊन जात असे. अजय या रोजच्या कटकटीला पुरता कंटाळला होता. काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. त्या दिवशी तर हद्दच झाली. विजयाने सासूबाईवर सरळ अंगठी चोरल्याचा आळ घातला होता. आई अंगठी तरी कशाला चोरेल ? तिला काय कमी आहे ? तूच कोठे तरी ठेवली असशील परत एकदा शोध असे अजय समजावून सांगू लागला पण विजया ऐकायला तयारच होईना. अजयच्या आईला या आरोपामूळे अस्वस्थपणा वाटत होता. तिने अंगठी घेतली नाही असे वारंवार सांगून देखील विजया ऐकायला तयार नव्हती. आईला एक मिनिट देखील तिथे राहावे असे वाटत नव्हते. जावं तरी कोठे जावे हा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर पडला होता. तिने अजयला हुंदके देत देत म्हणाली," बेटा, आता या घरात राहणे मला शक्य नाही. मला जवळच्या कोणत्या तरी वृद्धाश्रमात नेऊन सोड. त्याठिकाणी राहीन मी काही दिवस सुखात." यावर अजयला काय बोलावे हेच सुचेना. हे ऐकून विजया मनोमन सुखावून गेली होती. काही दिवस तरी हिचा पिच्छा सुटेल असे तिला मनोमन वाटू लागले होते. अजयने आईला आपल्या खोलीत जाण्यास सुचविले. आपण काय करत आहोत याची जाणीव अजयने सर्वप्रथम आपल्या मनाला दिली आणि विजयाला म्हणाला, " विजया पॅकिंग कर, आजपासून आपण इथे राहू शकणार नाही. काही दिवस तू माहेरी राहा. तोपर्यंत मी एखादी किरायाची खोली पाहतो. आपण तेथे राहू. हे आईचे घर आहे. तेंव्हा तिच्या घरातून तिला बाहेर करणे, हे माझ्या मनाला पटत नाही. तेंव्हा आपणच घराबाहेर जाणे योग्य राहील. तेंव्हा लवकर आटोप." असे म्हणून अजयने आईला आवाज दिला " आई, विजयाला माहेरी सोडून येतो. तिला माफ कर, तिला हे शेवटपर्यंत कळाले नाही की आईसोबत आम्ही राहतो. त्या वेडीला वाटत होतं, आई आमच्या सोबत राहते." एवढं बोलून अजय विजयाला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि सोडून सायंकाळी परत आपल्या घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय नेहमीप्रमाणे उठला आणि तयार होऊन ऑफिसला गेला. सायंकाळी परत घरी आला, आईच्या हातचे जेवण करून शांत झोपी गेला. अजय दर विकेंडला विजया आणि मुलाला भेटायला जात असे आणि बाकीच्या दिवशी आई सोबत राहत असे. किरायाचे घर शोधतो हा एक त्याचा बहाणा होता. अजयच्या या अजब निर्णयाने विजया चक्रावून गेली. काही महिने लोटले, तिच्या घरच्यांनी तिच्या या वागण्याचा विरोध केला. शेजारी पाजारी लोकं काही बाही बोलू लागले. अजय जवळ किरायाच्या घराविषयी काही गोष्ट काढलं की तो विषय टाळत असे. काही महिन्यांनंतर तिची चूक तिच्या लक्षात आली. सासूबाईवर चोरीचा खोटा आळ घातल्याचा तिला पश्चाताप होऊ लागला. एके दिवशी तिने आपले सारे सामान बांधली आणि थेट आपल्या घरी आली. सासूबाई बाहेर ओट्यावर बसल्या होत्या. विजयाला पाहून तिला आनंद झाला. विजयाने लगेच सासूबाईचे पाय धरले आणि " मी चुकले मला माफ करा " अशी विनवणी केली. सासूबाईने लगेच तिला गळ्याला घेतली, बाळाला कडेवर घेतली आणि दोघे घरात गेले. सायंकाळी अजय ऑफिसमधून आला. पाहतो तर काय विजया घरात दिसत होती. मुलगा खेळत होता. घरात अगदी शांत वातावरण होतं. विजयाने गरम चहाचा कप दिला. सायंकाळी सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि तेंव्हा अजय म्हणाला, आपण सर्वजण आईसोबत आनंदाने राहू या. विजयाने लगेच हसत हसत मानेने होकार दिला. त्यादिवशी अजयला खरी शांत आणि सुखाची झोप लागली.