उषःकाल
उषःकाल
रान पोसले माजले …त्याची हिरवाई दाट
वर झिम्माड आभाळ… खाली चिंब थाटमाट...
पान सजले वाजले ... पालवी फुटली नवाट
अंगांगात भरली सळसळ... प्यायला ऊन घटघट...
कळी खुलली फुलली... प्रफुल्लित चित्त इळंसाट
पसरला आसमंती दरवळ... रंगीत पाकळ्यांचे अंतर्पाट..
मूळ रूतले रूजले... धुंडाळून जीवन वाट
दुभंगण्या धरणी उतावीळ... यत्न प्रगतीचा आटोकाट...
पाखरं चिवचिवली उडाली... मंजूळ बघ किलबिलाट
झरा वाहतो झुळझुळ... ओलांडून डेरेदार उंबरघाट...
रवी तांबडा पिवळा... झाली प्रसन्न पहाट
तेजोमय ओजस्वी प्रभावळ... नभ रंगले दाट...
गजबजले स्नानास कल्लोळ... गजबजले नदी घाट
गाभारी आळवली भूपाळी... तल्लीन सारे भाट
