उडून जाताना
उडून जाताना
उडून जाताना पक्ष्याने
एक घरटं करून जावं
आयुष्याच्या या फांदीवर
एकदा तरी प्रेम गीत गाऊन जावं||धृ||
अनोळखी पाखरांसंगं थोडं रमून जावं
जाणिवांच्या खुणा आठवणीत ठेवून जावं
नित्य स्फूर्ती चैतन्याची घेऊनी
चिवचिवाट प्रेमाचा करून जावं
आयुष्याच्या या फांदीवर
एकदा तरी प्रेम गीत गाऊन जावं||धृ||
भर उन्हात भरारी घेताना
वाऱ्याची झुळूक संगं घेऊन जावं
विरह येतील, संकट ओढवतील,
त्या बरोबर येणार्या वेदनांनाही सामोरं जावं
एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत
जयघोष होईल असं नाव कमवून जावं...
आयुष्याच्या या फांदीवर
एकदा तरी प्रेम गीत गाऊन जावं||धृ||

