तू विचारू नकोस तुझं गावपण...
तू विचारू नकोस तुझं गावपण...
गावा, तू विचारू नकोस
तुझं 'गावपण किंवा गावंढळपणा'
कितीतरी विश्वासानं
ठेवला आहे तुझ्या वेशीत पाय
शहराच्या बाहेर निघताना
प्रत्येक सणात नव्या को-या
कपड्यांचा गंध आला देहाला
तरी मुलाबाळांना सोबत घेऊन
सांगाव लागत गावाचं गावपण.
वेळ एक असायची तांबड फुटण्याआधी
सगळ्यांना जाग यायची,
अन् शुभंकरोती सातच्या आत व्हायची
घड्याळ आता बदलले आहे,
सोयीस्कर उठणं बसणं होतयं
लाईटला उशिरापर्यंत प्रकाश पाहतोय.
बांधावरची कांदाभाकर,
आज चायनीजवर खूश झालीय,
तर मंदिराच्या घंटेने सुध्दा,
पाश्चिमात्यांचा सूर आळवळाय.
आजकाल आगोटी-सुगी,
नारदाच्या पंगतीत बसतात
अन् सख्खेपणाला सुतक चिकटलयं,
तुला सांगण आहे आज,
विश्वासला पानिपतमध्ये शोधू नकोस
तो कधीच हरवलाय,
त्याची जागा कुबेराने पटकावलीयं.
म्हणून म्हणतो आता विचार करू नकोस.... काहीही.... शांत रहा....फक्त.
