स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
तलवारीच्या कडयाची
दुर्भेदय धार आहे
अबला नसे मुळी ती
चतुरस्त्र नार आहे...
उपभोग्य चीज नाही
ना ती तुझी चाकर
अस्तित्व राखणारा
मानी करार आहे...
पाठी तुझ्या सदैव
असते जणू सावली
उदरात स्थान देते
माया अपार आहे...
काटे अमाप मार्गी
पेरुनी ठेवलेले
त्या क्लेशपूर्ण जरीची
रेशीम किनार आहे...
असुनी स्वतंत्र भाव
असुनी महत्त्वकांक्षा
तरीही आजन्म जगणे
तुजला निसार आहे...
भेगाळल्या धरीत्री
उष्मांक सोसवेना
त्या तृप्त तो कराया
रिमझिम मल्हार आहे...
पुरुषार्थ तो अपूर्ण
वांझत्व प्राप्त त्याला
तीजविण तुज सख्या रे
कटू सत्य फार आहे...
म्हणुनी सदैव मान
तु राख स्त्रीमनाचा
तीजविण कवडीमोल
हा जन्म भार आहे...
कधी लक्ष्मी शारदा
कधी काली अन्नपूर्णा
ती विश्वनिर्मितीचे
अवघेच सार आहे...
