शहीदांसाठी
शहीदांसाठी
शरीराच्या चिंध्यांनी त्यांच्या
एकीचा झेंडा शिवून घ्या
शहिदांच्या पेटलेल्या चितेवर
प्रचाराच्या भाकरी भाजून घ्या
ओका गरळ निषेधाचा रस्त्यावर
पेटवा मेणबत्त्या चौका चौकात
करा तपास पुरावे पाठवा
शांतीचे शेपूट घालून पायात
फितुरांना पक्षात घ्या
गद्दारांना घरात येउद्या
मरुदेत आणखी काही, फक्त
इशारे आणि धमक्या द्या
किती विधवा होतील आणखी
मुले होतील किती अनाथ
बलिदानाच्या किमतीची
किती होईल त्यांना साथ
सहन किती करायचं अजून
गावागावात पसरलेत ते
एक दिवस घरात शिरून
तुमचा घास घेतील ते
आधीच खूप जीव गमावलेत
माती झालीय शहिदांची
किंमत कशी कळणार तुम्हा
फुकट मिळालेल्या देशाची
पुरे झाले चर्चा, समझोते
घोषणा नको रणशिंग फुंका
सीमेपार घुसून शपथ घ्या
नकाशातून पुसून पार पुसून टाका
