शहारे बोचत आहेत हृदयाला
शहारे बोचत आहेत हृदयाला
मुसळधार पावसामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये,
पार्ध्यांची पावलं चिखलाचा सडा, तापलेल्या डांबरावर उमटवत होती.
लखलखत्या विजेमध्ये, सुसाट वाऱ्यामध्ये,
झोपड्यांचे कणे ताठ ठेवत, डोळ्यांमध्ये पावसाचं पाणी साठवत होती.
अंधाराच्या रात्रीबरोबर टेंभ्याच्या ज्योतीने लढा देत होती.
थंडीने कुडकूडणाऱ्या त्या इवल्याश्या जीवाचे शहारे बोचत आहेत हृदयाला.
शरीर झाकणारी कापडं, पोटाच्या बुडाशी असलेली भाकर घेऊन,
शौकिनांच्या दुनियेमध्ये, गरजांचीच गाडगे इथे रिकामी होती.
असहाय्यतेने शापित शब्द, गढूळ पाण्याने अर्धमेली तहान घेऊन,
अस्पृश्यतेच्या भेगांनी विदीर्ण कर निकामी होती.
उच्च-निचतेच्या महापुरामध्ये तुराटीचा आधार शोधत होती.
येणाऱ्या प्रत्येक क्षणाशी लढणारे ते गरजू हात पिळवटून काढत आहेत हृदयाला.
गरिबीच्या अंधारात मिटलेले ते बालिश डोळे जागे झाल्यावर,
शिळ्या आमटीच्या शोधात दारोदार पावलांची कातडी सोडत असतात.
सोळा वर्षांच्या आया लेकरांच्या कपाळावर चुंबन देऊन,
चिंध्यांचा चेंडू फाटक्या साडीतून काढत असतात.
पुलाखालच्या बस्तानाची चाकं नेहमी चालत असतात.
अश्रू संपलेले ते निस्तेज डोळे, जगाचा अन्याय दाखवत आहेत या मनाला.
त्या इवल्याश्या जीवाचे शहारे बोचत आहेत ह्रदयाला.