साठवू दे उराशी
साठवू दे उराशी
त्या कळीच्या परी, गोड वाटे अदा
हसुनी जिवा या, वेडं कर एकदा
नशेने तुझ्या, तुझा होत जाईन
भवरा बनुनी, तुझ्यापाशी राहीन
बस दे जागा मला, तुझ्या कुंपणाशी
अशी ये पुन्हा, साठवू दे उराशी
जरा व्यक्त हो, सोड मौनाची भाषा
प्रेम गाशील मग तू, उरी एक आशा
मंद वारा, तुझे गीत सुराने भरेल
तुझ्या गीताने, धुंद दिवसही सरेल
असे स्वप्न होण्या, तू ये ना घराशी
अशी ये पुन्हा, साठवू दे उराशी
जे मनी ते मुखी, येऊ दे ना जरा
काय ते बोलते, ऐकू दे ना जरा
उभा रोज मी, कान करुनी मनाचे
सोड ना बहाणे, मुके राहण्याचे
मुक्या भावनांना, वाट दे तू जराशी
अशी ये पुन्हा, साठवू दे उराशी