साने गुरुजी
साने गुरुजी
रत्नागिरी जिल्ह्यातील
'पालगड' गावी जन्म
खोत घराण्यात बाळ
पांडुरंग दुतासम..../१/
शिकवण आईची ती
नित्य ध्यानिमनी धरी
उच्च विचारसरणी
शिक्षणाचा लळा उरी..../२/
थोर स्वातंत्र्यसैनिक
समाजसेवक खरा
पेशा शिक्षकी मनाचा
देशसेवा हाच नारा..../३/
राजीनामा देउनिया
सविनय चळवळ
कायदेभंगाची तत्वे
गांधींवादी तळमळ...
कारावास भोगतांना
अलौकिक साहित्यिक
जन्मा आला सर्वार्थाने
कैदी सुधारे कित्येक.../४/
'पत्री' काव्यसंग्रहात
बलशाली भारताचे
विश्वातील स्थान कसे
केले वर्णन तयाचे..../५/
भाषा विविध शिकून
संस्था 'आंतरभारती'
स्थापण्याची इच्छा मात्र
गेली राहून शेवटी.../६/
शोकांतिक अंत झाला
महामानवाचा फार
गोळया झोपेच्या घेऊन
संपवले कथासार..../७/
