सोनेरी पान
सोनेरी पान
बागलाण तालुका, सटाणा नगरी
जिजामाता गर्ल्स स्कुल, तेथील शान
वाण घेतले शिक्षणाचे, तेथेच आम्ही
आठवते शाळेचे, ते 'सोनेरी पान ' |
मौज -मजा -मस्ती, सोबत ज्ञानगंगा वाहती
समाधान असायचे, फक्त झाले तरी पास
टक्केवारीसाठी कधी, शिकवणी नव्हती
गुरुजन आणि मैत्रिणींचा, मात्र सहृदय सहवास |
चिंच -आवळा -बोरं, खाऊ असायचा हाच
मधल्या सुट्टीत जेवायला, घरचा रस्ता धरायचा
पॉकेटमनीचा फ़ंडा, तर नसायचा ध्यानी -मनी
मोबाईल, टीव्ही नसतानाही, दिवस मजेत जायचा |
दफ्ताराचे ओझे, नसायचे पाठीवर
रबरबँडमध्ये वह्या -पुस्तकं कैद व्हायचे
निबंध वहीसाठी, असायचे पांढरे कव्हर
आई -वडिल तर कधी, अभ्यासही नाही घ्यायचे |
पुढील इयत्तेची पुस्तके, घ्यायची अर्ध्या -पाऊण किमतीत
कंपास -पेटी, पेन, परंपरेने वाट्याला यायची
गणवेशाला सुट्टी, असायची गुरुवारी
रंगीत कपडे घालण्याची हौस, ह्याच दिवशी भागवायची |
हुतुतू, लंगडी, आट्यापाट्या, खेळ असायचे मैदानी
खेळण्यांवर खर्च करायची, नाही यायची वेळ
मैत्रिणींशी कट्टी -बट्टी झाली, तरी अबोला संपे पट्कन
अंगतपंगत असेल तर खायला मिळायची भेळ |
पंधरा ऑगस्ट -सव्वीस जानेवारीच्या फेरीत, खुप मजा यायची
कवायतीचा आठवा तास, असायचा बुधवारी
शिकवायच्या आणि शिक्षेच्या पद्धती आजही आठवती
अजुनही शाळेच्या आठवणी, ताज्या आहेत ऊरी |
शेवटी हेच म्हणावेसे वाटते,
"गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी "
