पाटलांचं स्थळ
पाटलांचं स्थळ
पाटलांचं स्थळ सांगून आलं लेकीला
खूपच आनंद झाला मजुरकराला
चंद्रमाैळी झोपडी वाड्यात नांदणार
नोकरचाकर तिच्या हाती राबणार
तरी आईच्या मनात पाल चुकचुकली
का सव्वा लाखाची मूठ नसेल झाकली ?
म्हणाली धन्याला "जाऊन चाैकशी करा
गुढग्याला नकाे बांशिग, नि पाटील सोयरा"
बाईने शिकवावे पुरूषाला म्हणजे काय ?
अक्कल नको पारजळू गुमान राय !. .
हातचा का सोडायचा सोयरा पैश्यावाला ?."
पुरूषी अहंकाराने तो वदला
दारात लेक लाजत मुरडत दिसली
पर्याय नव्हाता म्हणून ती मूग गिळून बसली
दोघे 'मजुरकर नि पोरं खंडीभर
त्यात तीन लेकी उजवल्या होत्या
दोन जावई दारुडे नि एक बीजवर
न चुकता तुळशीला पाणी घालायची
'चांगलंच होईल माझं' ती मनात बोलायची
हिच्या बापाकडे नव्हती फुटकी दमडी
पाटलानीच सजवली अंगणासहीत झोपडी. .
गावाचे डोळे दिपले,
अन्न शिजले होते ढीगभर
नवरदेव उड्या मारू लागला बोहल्यावर
खरी मेख नवरीला आता समजली
गाय कसायाच्या दावणीला बांधली
गरीबाची लेक झाली नव्हती पाटलाची सून
वेड्याची बायको ती रडायची धुमसून
अधिकार नव्हता मुलगी म्हणून तक्रारीचा
कुंपण झाले होते काळ येथे पिकाचा
निसर्गाने बजावली चोख कामगिरी
दोनदोन पिल्लांची तिच्यावर जबाबदारी
सासूसासरे होते तोवर
नाही पेक्षा दिवस बरे होते तिजवर
म्हातारा पाटील नि पाटलीण म्हातारी
मालमत्तेची वाटणी न करता गेले देवाघरी
शहाण्या पोरांनी हिसकावले वाडा नि सुपीक रान
भांडणारा नव्हता कुणी वाट्याला जमीन माण
नाकर्त्या नवरा नि चिल्लीपिल्ली घेऊन
पाटलीण झाली पडीक गोठ्याची राणी
स्वत:च्या विश्वात ओरडत नाचता पती
पडला विहिरीत आणि शेवटचे पिला पाणी
वेडाखुळा की असेना कुंकवाचा आधार गेला
आयुष्याच्या वाटेत नित्य दु:खाचा सोहळा
पोरं सांभाळायला जीर्ण आईवडील घेऊन आली
पिल्लासाठी पाटलीण मजुरकर झाली
थोरला मोठा झाला आशेच्या कक्षा रुंदावल्या
पण हत् तिचे नशीब, मुलगा अपघातात गेला
धूळ कणासारखी आशा उडून जागेवर स्थिरावली
पाटलीणीच्या दु:खाची पुन्हा मांदियाळी
शेवटी कुठेतरी चमत्कार घडला म्हणायचा
हातात साठा गवसला कुबेराच्या खजिन्याचा
समृद्धी महामार्गाने भव्यदिव्य किमया केली
तिच्या हिस्स्याची माण जमीन ओटी भरून गेली.
