नको करु रे दूर त्यांना....
नको करु रे दूर त्यांना....


माय-पित्याची सेवा कर तू
जणू त्या पुंडलिकावाणी
नको करु रे दूर त्यांना
सांभाळ कर सुखानी ॥१॥
नऊ महिने उदरात ठेवूनी
वाढविते तुला कष्ट करुनी
जन्म तुला ती देताना
काळजाचं करितसे पाणी
वंगाळ काही बोलूनी तिला, तुझी सांगू नको रडकहाणी
नको करु रे दूर त्यांना, सांभाळ कर सुखानी ॥२॥
घोडा बनूनी बाप तुझा
खेळवितो तुला रातभर जागूनी
सोडितो तुला तो शाळेला
तुझा चिमुकला हात धरुनी
नको हात उगारु तयावर, राहू नको पापी बनूनी
नको करु रे दूर त्यांना, सांभाळ कर सुखानी ॥३॥
तळहाताच्या फोडाप्रमाणे
जपले रे तुजला तयांनी
शुभमंगल तुझं झालं खरं
अन् बायको झाली घरची राणी
जुळे ना तिचं सासु-सासर्यांशी, हाल करते क्षुद्रावाणी
नको करु रे दूर त्यांना, सांभाळ कर सुखानी ॥४॥
वय झालंय रे त्यांचं आता
थरथरलेत ते शरीरानी
उतरत्या काळात त्यांच्या तू
राहा आधारस्तंभ बनूनी
घराबाहेर त्यांना काढू नको रे, नको देऊस लाथाडूनी
नको करु रे दूर त्यांना, सांभाळ कर सुखानी;
नको करु रे दूर त्यांना, सांभाळ कर सुखानी ॥५॥