मोहाचे पाऊल
मोहाचे पाऊल
मी इथे आहे का..?
का तिथे आहे
का कुठेही नाही
हे गूढ कोणते मला कळत नाही
आवाज देते मी माझी मलाच
पण या जगात दिसत नाही
येऊन गेली असेन
इथेही कधीतरी
त्या तरूतळी, त्या नदीच्या काठी
असतील माझ्या जाणीवा
रेंगाळत हितगुज करत
त्या कलत्या संधीप्रकाशाशी
उमटली असेल
एखादी थरथरती लहर
ह्या ओल्या रस्त्यावर
अजूनही असेल निनादत
तुझ्या कानात माझा
हळवा स्वर...
तुझ्या चौकटीत असतील
अजूनही माझ्या हळदखुणा
लपवला असशील
तू माझा रुमाल जुना
वाऱ्यावर रेंगाळत असेल
माझा तो चिरपरिचित गंध
आता सारे वाटते परके परके
माझी मला खूण ना पटते
तरी मोहाचे पाऊल
उंबऱ्यात पुन्हा पुन्हा
का अडखळते....?
