मळभ
मळभ
दडले डोंगर भिजली झाडे तरी शांत हा सारा परिसर..
चिन्ह कशाचे म्हणायचे हे धुकेच आले उन्हा अगोदर
काळे काळे मेघ अंबरी गोळा होता मळभ दाटले
वीज चमकली कडकड झाली अशी जणू आकाश फाटले
आंबा काजू गळून पडती काय पाहतो वरून ईश्वर
शेतकऱ्यांच्या घोर जिवाला जीवन झाले अवघे नश्वर
अंगोपांगी बाळे घेउनी फणस उभारी कर कमरेवर
पाउस पडता अश्रू ढाळी बाळ कोवळे बघ झाडावर
पशुपक्षीही पहा संभ्रमित म्हणे भरवसा ठेवु कुणावर
सूर्य तापतो पुष्कळ दिवसा रात्री असते थंड धरोहर
रंग बदलते सृष्टी नित्यच जन भासवती भोळा वरवर
फळ कर्माचे मिळे मानवा जंगल तोडे उभे निरंतर
पुण्यापेक्षा पाप कर्मही करण्यासाठी अनेक तत्पर
तरी विठ्ठला सर्व पाहुनी शांत उभा का तूंचि विटेवर
