मी बघतोय...
मी बघतोय...
मी बघतोय
बुद्धाचं करुणेचं साकडं
आणि
देवांवर थुंकणारी माकडं
मी बघतोय
नमाजाचे पवित्र हात
आणि
रक्ताळलेले सावत्र हात
मी बघतोय
शिवरामाचं न्यायी धनुष्य
आणि
दांडकं उगारलेली मनुष्यं
मी पलीकडे बघतोय
कापायला निघालेली माणसं
आणि
'डोकं'च नसलेली शरीरं
मी त्याही पलीकडे बघतोय
धर्मावर चालणारं खुनशी राजकारण
आणि
नेहमीच मरणारा 'सामान्य' निसकारण
आता मी आत बघतोय
हिरव्या-निळ्या-भगव्या दंगलीचे आक्रंदन
आणि
नंग्या गाढवांवर बसून आलेलं माझं 'मरण'
