माय
माय
कापसाच्या काळीगत
काळीमोल माय
कीड
लागलेल्या बोरीगत
पोकळ होत गेलीये
आतून...
पानकायातला
काळा इच्चू झुलत
आग तयपायाची सहन करत
दारूड्याचा संसार
पार पडला
मायनं
पिऊन
उताणा पडलेला बापागत
कन्हत ती
चाटूभर माससुद्धा नसलेला देह
रोजनदारीच्या
शे दोनशे टिकल्या करता
फिरते रानभर माय
दारूड्याचं घर...
म्हणून नाही मिळाला
सगा सोयऱ्यात मानपान
टाकलं भाऊबंनकीने
आमचं घर अंगण
पण
मायनं घेतलं शिवून जगणं
अन् मायनं शिकून ही घेतलं जगणं
