खरंच कुणी मरतं का?
खरंच कुणी मरतं का?
बोलणारे लाख बोलतात,
म्हणे फक्त मड्यावरच लोकं रडतात,
आणि महिन्यानंतर सगळंच विसरतात,
पण त्याच्यावर प्रेम करणारी लोकं आयुष्यभर रडतात,
याचा कुणी विचार करतं का?
मनभर आठवणी मागे ठेऊन कुणी मरतं का?
जीवनभर केलेल्या कामांची दखल,
मेल्यावरती घेतली जाते,
हेच आत्महत्येचं कारण ठरतं का?
नसेल तर जीवनभर कमावलेलं सोडून कुणी मरतं का?
जीवन एवढं स्वस्त नाही ज्याची पैज लावावी,
साधूसंतांनी जी कमावलेली संपत्ती(माणुसकी )ती आज घालावी,
सोबतीला चार निर्लज्ज राक्षस घेऊन,
उद्याची चिमुरडी हिरवळ आज ओसाड करावी,
का रे नालायकांनो हे सगळं करुन तुमचं पोट भरतं का?
आईवडिलांच्या अश्रूमध्ये रोज जगते ती पीडित मुलगी,
खरंच कुणी मरतं का?
हो माहितिय मला, मी काहीच बोलणार नाही,
ही धगधगती विकृत आग अशी विझणार नाही,
ज्यांनी थोर महात्म्यांना डाग लावले,
शत्रूच्या लेकीला बहिणीसम वागणूक देणाऱ्या
माझ्या राजांचे त्या कर्नाटकात पुतळे काढले,
ते माझं काय ऐकणारं?
या सगळ्यामध्ये कवींचं कुणी ऐकतं कां?
साडेतीनशे वर्षानंतरही आज इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मनात राजे जिवंत आहेत,
खरंच कुणी मरतं का?
आता बस्स झाला यांचा खेळ,
माझ्या बहिणींनो आता वेळ आलीये लढण्याची,
स्वतः सशक्त होऊन हा अन्याय मोडून पाडण्याची
हिम्मत नाही झाली पाहिजे या रानकुत्र्यांची, लचके तोडण्याची,
देवा, या जिजाऊंच्या लेकींना सामर्थ्यांचं उधाण येऊ दे,
आणि प्रत्येक गावात स्त्री शक्तीचं चांदणं पडू दे!
एका मृत्यूने सगळं सरतं का?
खरंच कुणी मरतं का?
