दरिद्री दिवाळी
दरिद्री दिवाळी
बघा आली ही दिवाळी, आनंदाचा सण मोठा,
बाप माझा कर्जामंदी, हसतोय खोटा खोटा ||१||
दिवे लागले अंगणी,
ज्योत बगा ही जळली,
आग गरिबी नावाची ,
माझ्या बापाला पोळली ||२||
निम्म्या कर्जात बापाच्या,
सारी सोयाबीन गेली,
माय कणखर माझी,
धीर देताना रडली ||३||
मला आठवते माय,
तिची संसाराची गोडी,
स्वतःसाठी तिने कदी,
नाही घेतली हो साडी ||४||
गुरु नाम ती जपते,
माय पावलोपावली,
माय आशा धरी मनी,
येईल गुरुमाऊली ||५||
आई म्हणे कधी कधी,
बाळा शिकून हो मोठा,
पोरा नष्ट कर हा तू,
गरिबीचा वरवंटा ||६||
बाप म्हणतोया माझा,
प्रयत्न तू सोडू नको,
मही आमचं जे झालं,
आता ते तू भोगू नको||७||
निजे आसवांत मी ,
सपान मला पडते,
माझ्या मोठ्या यशामदी,
आई खुशीत रडते ||८||
माय माझी सुगरण,
संसाराची भाजे पोळी,
बाप लपवतो सत्य,
होई आनंदी दिवाळी ||९||
