कबुली
कबुली
खुप दिसानी भेटायाला बोलविले मज तिने कशाला
मन गुंतुनी प्रश्नांमध्ये, पाय लागले त्या वाटेला
शेवटच्या भेटीत बोलली भेटणार न तुला कधीही
शब्द तिचे कानी पडले झाली शरीराची या लाही
उभा शांत मी ऐकत होतो घाव शब्दांचे सोसत होतो
झालेल्या हृदयाचे तुकडे ओंजळीत घेण्या शोधत होतो
निघून गेली अशी अचानक पाहियले न वळून मजला
तिच्याच शब्दासाठी कधी मी रात्रीचाही दिवस केला
खूप दिसांनी पुन्हा भेटली, बोलण्याआधी अशी रडली
मला सोडल्याची ती चूक मला वाटले तिला उमगली
थरथरणाऱ्या ओठांमधुनी बोलू लागली दुःख मनाचे
व्यक्त होऊनी फेडायाचे पाप मला हे या जन्माचे
जसा उभा मी तेव्हा होतो तशी उभी ती आज होती
डोळ्यामध्ये पश्चात्ताप अन ओठांवर कबुली होती
