ग्रामगीता
ग्रामगीता
*।।ग्रामगीता।।*
*।। अध्याय १ ला - देवदर्शन ।।*
*।।ओवी क्रमांक ११ ते२०।।*
*।।श्रीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज।।*
ज्यासि तुझें दर्शन घडलें । त्यास कैंचे परके राहिले ? ।
सर्व विश्वचि झालें आपुलें । दिव्यपणीं ॥११॥
परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखें आनंद कुठला आम्हांसि ?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥
दुसर्याची उणीव पाहतां हसणें । दुसर्याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥
कष्टासाठी कोणी मरो । प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों । होतें ऐसें ॥१४॥
हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥
दुजा कोणा शरण जावें । तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥
उजेडाकरितां काजवे धरावे । भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें । निर्भयपणे ? ॥१७
तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥
तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥
यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन । ध्येय - प्राप्तिरूपाने ॥२०॥
*अर्थ* -
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढील ओव्यांमध्ये सांगत आहेत ज्या भक्तांना भगवंताचे खरे स्वरूप आत्मज्ञानाने सद्गुरू कृपेने दर्शन झाले. त्याला या विश्वामध्ये काहीही परके राहत नाही. त्याला सर्व आपलेसे वाटू लागते. कारण त्याचा दृष्टिकोन सद्गुरूंनी आत्मज्ञानाने व्यापक केलेला असतो. त्या व्यापक दृष्टिकोनाने त्याला सर्व विश्वचि माझे घर असे वाटू लागते. काही दृष्ट वृत्तीचे लोक त्या व्यापक स्वरूपा पासून अलिप्त असतात कारण त्यांचा तो दुष्ट विचार त्यांना त्या विश्व व्यापक स्वरूपाचे दर्शनापासून दूर ठेवतो. हे त्यांचे दोष असतात ते दोष कोणते ते पुढीलप्रमाणे तुकडोजी महाराजांनी सांगितले आहेत. जो दुसऱ्याचे सुख पाहून दुःख करतो हेवा करतो. जो आपल्या स्वार्थासाठी अल्पसंतुष्ट असतो. आपल्या स्वार्थासाठी काहीही करण्यास तयार होतो. दुसऱ्याची उणीव पाहून हसतो. दुसऱ्यांवर कधी संकट आले तर मदत न करता पळवाट काढून पळतो. दुसऱ्याचे वैभव संपत्ती धन बघून जळत राहतो. अशा दुष्ट विचारांनी तो भगवंत स्वरूपा पासून वंचित राहतो. आपले स्वतःची प्रतिष्ठा उंचावण्याकरिता कुणाकडून काहीही कष्ट करून घेतो. आपल्या लोभासाठी कुणाचेही पाय धरायला गुलामी करायला तयार होतो. हे जेव्हा आमच्या ध्यानात आले तेव्हा असे लोक किती अल्पज्ञ असतात. त्यांना कसलेही आत्मज्ञान नसते त्यामुळे ते या दुष्ट विचारात गुरफटून जातात. असे विचार सोडून मग आम्ही तुझ्या नामामध्ये तल्लीन होण्याचे ठरवले तेही सर्वतोपरी. मी कोणा शरण जाऊ हे मला समजत नाही. मला जेणेकरून सर्वतोपरी शक्ती प्रदान करा की ती समाजासाठी उपयोगी पडेल. पण मला इथे सर्व योग्यच वाटत आहेत मग मी कोणाचे पाय धरू. आपणास उजेड मिळावा म्हणून काजवे धरतो आणि चुकीच्या मार्गाला जातो हे चुकीचे आहे. कारण काजवा आपणास किती उजेड देईल त्यापेक्षा ज्ञानरूपी सूर्य आपणासाठी योग्य आहे. त्याच्या प्रकाशात निर्भयपणे जगत राहावे. विश्वरूप भगवंता तु विशाल आहेस. तू खरा निश्चयी अविनाशी आहेस. तू अनेक काळापासून येथे आहेस. तू सतत येथे आहे. आणि तू सर्व गुणांचा अधिपती आहे. तुझ्याकडे सर्व गुण आहे. आणि तू ज्ञानाचे भांडार आहे तुझ्या पाशी सर्व गुण आणि ज्ञानही आहे. म्हणून आम्हास तुझ्यापाशी जे मागेल जे हवे ते मिळते.तु दाता आहेस. एकदा का सूर्य उगवला की संपूर्ण जगातील अंधार नष्ट होतो त्याप्रमाणे सूर्य उगवला की दूरवरूनच लांबलांबचे रस्ते दिसायला लागतात. तसा तु ज्ञानरूपी सूर्य आहेस तुझी कृपा आमच्यावर झाली रे झाली की आमचा अज्ञान रुपी अंधकार दूर होऊन. आम्हाला तू अनेक सत्कर्माच्या वाटा दाखवतो. आणि ते आपोआपच दिसायला लागतात.
