एकदाच मरावसं वाटलं...
एकदाच मरावसं वाटलं...
पायात नाही चप्पल,
उन्हात होरपळले टक्कल..
घामाने काढला बापावर राग,
घराच्या रस्त्याचा होतो काढतं माग..
आई बोलायची सावलीला पळा,
रस्ता जिथ दिसलं, तसं पुढे पुढे पळा..
साहेब आला पुढं, काठी मोडली पाठीवर,
बापानं सहन केलं, मग धावून आला आईवर...
गरीब आणि गरिबी दोन मोठ्या विहिरी,
मरण आहे पक्क, सुकली तरी भरली तरी...
कुणी अन्न दिले तर कुणी पाणी दिले,
फोटोवाले आले, काही फोटो काढून गेले...
आईला लागली धाप, खाली पडला बाप..
गरिबीचा विळखा मोठा गिळून टाकेल साप..
फोड मोठे पायावर पाहून, गेला निघून सगळा साज
गरीब आहे म्हणून वाटली, माझी मलाच लाज...
बाप गेला आई राहीली,
गरिबीच्या दारी अनाथ सावली,
स्वप्ने पाहून थोड थांबावं असचं वाटलं,
मोकळ मोठ्ठ आभाळ पाहून,
पहिल्यांदा एकदाच मरावसं वाटलं..
एकदाच मरावसं वाटलं...
