STORYMIRROR

PAWAN TIKTE

Tragedy

3  

PAWAN TIKTE

Tragedy

बाप आणि ताडपत्री

बाप आणि ताडपत्री

1 min
255

बापाचं अन ताडपत्रीचं नातं

अजूनही उलगडत नाही मला

नेमका बाप

घराच गळक छताड ताडपत्री ने झाकतो की...

उपाशी पोटाच्या आतड्यात कळवळणारी भूक


मी बघितलय,

माझ्या बापाच्या कोरड्या डोळ्यात

आयुष्यभर थरथरत वाहणारा

अश्रूंचा झरा..

जशी पापणी हळूहळू लवत जाते

आणि लपवते दुःख बापाचे 

तशीच

ताडपत्री सुद्धा झाकत जाते अंग बापाचं

तळपळत्या उन्हातून...


बाप चुकूनही पाडत नाही भोक

दाभणीने ताडपत्रीला दोरी बांधण्यासाठी...

त्याबदल्यात,

एक बारीक दगड ठेवतो कोपऱ्याला

आणि बाजूने आवळत जातो दोरीने दगडाला... 

न भोक पाडता टाकली जाते ताडपत्री 

तुऱ्हाटीच्या मांडवावर

अगदी कायमस्वरूपी...


यंदा,

बापानं पाल टाकलाय बांधावर

पिकांच्या राखणीसाठी.. 

वानरं- डुकरांपायी

बाप.. पिकाची काळजी घेतो 

अन पाल बापाची...भर पावसात

रात्री आई जेवताना सांगत होती,

पालावरची पिवळी ताडपत्री बापाची आवडती आहे म्हणून...


बापानं सोयाबीनच्या सुगीखाली

नवी कोरी ताडपत्री टाकलीय...

मायने तिच्या आहेराच्या साड्या

सुगीवर टाकून झाकलीय सोयाबीन

पण...

माय अजूनही चिंतेत आहे की,

नव्या कोऱ्या साड्या फाटू नये म्हणून

आणिक

बाप विचार करतोय,

'पुढच्या वेळी ताडपत्री शिल्लक घेऊच'

सोबत मायसाठी एक हिरवा शालू...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy