अखेर
अखेर
आला अखेरचा तो क्षण
जातोय आता मृत्यूमुखी,
जन्म एक, वेदना अनेक
मृत्यूच करेल पूर्ण सुखी.
वेळ जरी ही आहे आली
सोडून जाण्याची सर्व आता,
तरी मज भासते असे जणू
भेटणार आहे मला मम माता.
कसला प्रकाश हा विलक्षण
ओढतो जो मला त्याच्या कडे,
जातोय वादळातूनी मी कुठे
उभे कोण आहे त्या पलीकडे.
कोण बघते आहे वाट प्रेमाने
घेण्या मज त्याच्या प्रेमळ कवेत,
दुःख ना काही हरवण्याचे आज
तरंगतो आहे मी आनंदी हवेत.
दिव्य ज्योत अशी प्रज्वलित दिसे
जणू अनादी उभा समोर माझ्या,
पाहता तुला संपल्या वेदना सर्व
गारवा आहे किती मिठीत तुझ्या.
