अजून काय होणार... पाऊस पडून गेल्यावर...!
अजून काय होणार... पाऊस पडून गेल्यावर...!


रात्र भिजून जाते चिंब चिंब,
ओंजळीत तुझे अदृश्यसे प्रतिबिंब,
कोरुन जाते जीवघेणी कातरवेळ
तुझ्या आठवणींचे ओरखडे मनावर,
अजून काय होणार
पाऊस पडून गेल्यावर!
अवचित एखादी कागदी नाव
झुंजते अस्तित्वासाठी पाण्यावर,
अचानक चमकते वीज कुठेतरी
दूर मावळत्या क्षितिजावर,
अजून काय होणार
पाऊस पडून गेल्यावर!
मंद हवेतील गार गारवा
थरारतो अलगद या देहावर,
मृत्तिकेच्या अवखळ गंधाला
एक तुझीच ओढ अनावर,
अजून काय होणार
पाऊस पडून गेल्यावर!
घुसमटलेल्या आठवणी जेव्हा
बरसतात माझ्या छतावर,
विस्कटलेले हे आयुष्य सारे
तेव्हा कुठे रूजते जमिनीवर,
अजून काय होणार
पाऊस पडून गेल्यावर...!!!