तू आणि मी!
तू आणि मी!
तू विधात्याला सुचलेली एक सुंदर कविता,
आणि मी त्या कवितेतला न जुळलेलं यमक...
तू चंद्राच्या किरणा इतुकी शीतल,
आणि मी भर दुपारचा रखरखीत पारा...
तू नसूनही असल्यासारखी,
आणि मी असूनही नसल्यासारखाच...
तू मृगाचा पहिला वाहिला पाउस,
आणि मी कोरडा वाळवंटासारखा....
तू कडाडणाऱ्या विजेसारखी लख्ख,
आणि मी विझलेल्या राखेसारखा निस्तेज...
तू सुंदर एका अप्सरेसारखी,
मी शापित एका यक्षासारखा.....
तू रातराणीचा दरवळणारा सुगन्ध,
आणि मी कागदाच्या फुलासारखा अलिप्त...
तू फुलपाखरासारखी स्वच्छंद,
आणि मी कोशात गुरफटलेला पतंग...
तू मला पडलेले एक सुंदर स्वप्न,
आणि मी रात्रीच्या उदरातला अंधार...
तू माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण,
आणि मी माझेच अस्तित्व शोधणारा बैरागी...
तू देव्हाऱ्यात तेवणारी ज्योती,
आणि मी सैरभैर रानातला वणवा...
तू मधुराणी उमलणाऱ्या फुलांची
आणि मी याचक निष्ठुर काट्यांचा...
तू पहाट गारव्याची भूपाळी,
आणि मी कातर वेळेची भैरवी...
तू मनस्वी कलाकाराची रंगलेली मैफिल,
आणि मी अर्ध्यावर संपलेला डाव...
तू गणितातील संख्यांसारखी अगणित,
आणि मी माझ्यातच हरवलेला शून्य....
