मी मात्र...
मी मात्र...


लख्ख प्रकाश पडलेला असताना,
अचानक आभाळ दाटून आलेलं,
पहिल्याच पावसाच्या स्वागतासाठी,
मी स्वतःला कोंडून घेतलेलं,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण तुझ्या आठवणीने,
मी मात्र मलाच विसरतोय.....
मातीच्या मोहक दरवळाने,
हा सारा आसमंत भारावलाय,
छत्रीसाठी कपाट शोधताना,
मला तुझा जुना रुमाल सापडलाय,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण तुझ्या रुमालाच्या गंधात,
मी मात्र माझ्यातच घुसमटतोय.....
कडेने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात,
ही चिल्ली-पिल्ली कागदाच्या होड्या सोडतायत,
कधीतरी तुझ्यासाठी लिहिलेल्या प्रेम-पत्रातील,
ते शब्दही आज माझ्यावरच हसतायत,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण तुझ्यासाठी शब्द शोधताना,
मी मात्र माझ्यातच हरवतोय.....
विजांवर विजा कडाडतायत,
सरींवर सरी कोसळतायत,
त
ुझ्या स्पर्शाच्या ओढीने,
माझे हात आजही थरथरतायत,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण तुझ्या सोबत नसण्याने,
मी मात्र एकटाच रडतोय.....
खिडकीच्या काचेवर पडणारे थेंब,
पलिकडचं जग धुसर करतायत,
डोळ्यात भरून आलेले अश्रू,
नकळतच गालांवरून ओघळतायत,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण तुझ्या एका सुखासाठी,
मी मात्र माझं सर्वस्व गमावतोय.....
तो येतो आणि निसर्गाला हिरवळ देतो,
तो कोसळतो आणि सगळ्यांना जीवन देतो,
त्याचं येणं चाहूल नव्या ऋतूची,
त्याचं बरसणं कहाणी आपल्या प्रेमाची,
तो आहे म्हणून तुझी आठवण आहे,
तो आहे म्हणून मीही इथेच आहे,
त्याचं असणं हुरहूर तुला पाहण्याची,
त्याचं नसणं सुरुवात पुन्हा एकांताची,
साला, बाहेर काय मस्त पाऊस पडतोय,
पण आजही तुझ्यासाठी,
मी मात्र वेड्यासारखी कविता लिहितोय.....