अब्रूची लक्तरं
अब्रूची लक्तरं
समयास पावला नाही कायदा
आयुष्याची धिंड निघाली
न्यायापीठाच्या वेशीवरती
अब्रूची लक्तरं टांगली
शिवबाचा हा देश आमुचा
परी नारीची होई दैना
लांडग्यांनी उच्छाद मांडला
तरी मावळे शांत कसे ?
आज राम – कृष्ण घेती न जन्म
उरले इथे दुर्योधन फक्त
तया दंड द्यावया कुणी न उरला
बसले शासनही सुस्त इथे
न्यायाचा उपहास जाहला
अश्रूंचा सागर दाटला
तरी उभीच मी आशेने अजुनी
पदरी पडण्या ते न्यायदान
आरोपी फिरती राजरोस
मजला झाला कष्टांचा सोस
साऱ्या नजरांचे तीक्ष्ण डंख
मजला बसताहेत रोज रोज
असली कसली रे वासना ?
केली जगण्याची विटंबना !
का केला मजवरी अत्याचार ?
का भुलला तुझ्या घराचे दार ?
ना समज मला तू एक अबला
मीच दुर्गा – काली – चंडिका
न मिळेल न्याय तर शस्त्र घेउनी
एकटीच करील तुझा संहार
अजुनी गेली रे नाही वेळ
थांबव पुरुषत्वाचा हीन खेळ
कर नारीत्वाचा उचित सन्मान
जगू दे मजलाही तुझ्या समान !
