Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,
व्यथा (भाग २)
व्यथा (भाग २)
★★★★★

© Tejashree Pawar

Tragedy

2 Minutes   16.1K    122


Content Ranking

ती झुरते. आयुष्यभर झुरते. आई म्हणून माया लावते. बहीण म्हणून दटावते. मैत्रीण म्हणून काळजी घेते. प्रेयसी म्हणून जीव लावते. मुलगी म्हणून लळा लावते अन् पत्नी म्हणून आयुष्यभर साथ देते. ती सर्वच करते. पण तीचं काय? तिला काय वाटतं, तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं ह्यांचं काय? तिच्या आवडीनिवडी, तिची मौजमजा कोण विचारतं? तिची चिडचिड, तीच रडणं, तिची घुसमट, कोणाला काळजी असते? खरंच कोणालाच नाही?

सततच्या मानमर्यादा, कर्तव्ये आणि अपेक्षा. कितपत आणि कोणाच्या? सतत त्या ओझ्याखाली दबलेलं वाटतं. सर्वकाही करून बघा, कमीच पडतं. कधी घरातून बाहेर पडून बघावं, त्या नजरा खायला उठतात. मन बेचैन करून सोडतात. कपडे पूर्ण घाला, अर्धे घाला अथवा घालूच नका, फरक नाही पडत विशेष. मुलगी कधी पाहिलेलीच नसते ना आम्ही! समोर आली तर न्याहाळलंच पाहिजे. चेहरा नाही हो फक्त, अगदी खालून वरून. अन मिनिटं - दोन मिनिटं कुठे समोर आहे तोवर आम्ही तसंच पाहू शकतो. अगदी तिच्या स्वतःच्या असण्याचीही लाज वाटावी इतपत. कारण लाज फक्त तिलाच असते ना! भर चौकात मध्यभागी एक शोभेची वस्तू ठेवावी अन् येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने मनसोक्त पाहावं, त्यावर हवं ते भाष्य करावं अन् पुढे निघून जावं, यापेक्षा वेगळं ते काय?

तिची सुरक्षा हे आमचं कर्तव्य असतं. घराच्या अब्रुसाठी तिला जपायचं असतं, सांभाळायचं असतं पण स्वतःचं रक्षण कसं करायचं, हे मात्र तिला शिकवायचं नसतं. अन् शिकवूनही उपयोग नक्की कितपत? आठ महिन्याच्या चिमुरडीपासून नव्वद वर्षांच्या म्हातारीपर्यंत बलात्कार सर्वांवरच होतात. यामधल्या काळात येनकेनप्रकारे अत्याचार चालूच असतात. किती जपायचं, कितपत सांभाळायचं, कोणाकोणाला सुधारायचं, कोणाकोणाला शिक्षा करायची? घरात बसा नाहीतर गगनाला भरारी घ्यायला जा, शेतात मजूर म्हणून काम करा, नाहीतर देशाच्या सर्वोच्च पदावर बसा...यापासून सुटका नाही.

लहान असेल तर कोणीतरी नको त्या प्रकारे लाड करून बघतं, कॉलेजचा एखादा मजनू सहजच शिट्टी मारून बघतो, रस्त्यावर चालणाराही घरापर्यंत पाठलाग करून बघतो, सहजच शेजारी उभा असलेला नाव गावाची चौकशी करून बघतो, नोकरीला जावं तर शिपायापासून मॅनेजरपर्यंत कोणी कमी पडत नाही.

मालकीची 'वस्तू' आहे का? पहा आणि सोडून द्या, छेडा आणि निघून जा, उपभोग घ्या आणि सोडून द्या. चुकतंय, काहीतरी चुकतंय... प्रश्न फक्त स्त्रीपणाचा असेल तर बहीण आपल्यालाही आहे, बाजारात आपली आईही जाते, कॉलेजात आपली मैत्रीणपण येते, नोकरीला आपली बायकोपण जाते, शाळेत आपली मुलगीपण जाते... फक्त ह्या जाणीवेची गरज आहे.

नको ती आपुलकी. सांत्वन पण नको. संरक्षण नको अन् काळजीही नको. थोडं स्वातंत्र्य द्या. आत्मविश्वास खूप आहे, फक्त त्याला व्यक्त होण्याची संधी द्या. त्यागाची सवयच आहे फक्त त्याचा गैरफायदा घेऊ नका. ज्ञान भरपूर आहे फक्त त्याला उत्तेजन द्या. प्रेमही आहे फक्त त्याचा गैरअर्थ करू नका. संयम भरपूर आहे फक्त त्याचा अंत पाहू नका. देवी म्हणून पुजू नका, आई म्हणून स्वर्गातही नेऊन ठेऊ नका... फक्त एक माणूस म्हणून स्वीकारा.

आपल्यातलीच एक व्यक्ती म्हणून वागवा. थोडा विचार तिच्या व्यथांचाही करा. जगात स्वर्ग अवतरेल अन् देवताही इथेच नांदायला येतील. फक्त प्रयत्न करून बघा.

व्यथा स्त्रीजन्म देवता

Rate the content


Originality
Flow
Language
Cover design

Comments

Post

Some text some message..