खिडकीतून खिडकीबाहेर...
खिडकीतून खिडकीबाहेर...
जेव्हापासून खिडकीत बसायला झालंय तेव्हापासून मी वेगळ्याच विश्वात रममाण होत चालली आहे. जराशी उसंत मिळाली की खिडकीची दारे मला आपसूकच बोलवत असल्याचा क्षणभर भास होतो आणि मी नकळत तिथे ओढली जाते. आजही काहीसे तसेच झाले. खिडकीकडे एक कटाक्ष टाकला आणि ती काहीशी माझीच वाट पाहत होती असे वाटले.
खिडकीजवळ गेले, तिथे बसले अन् चिमण्यांचा चिवचिवाट होऊ लागला आणि मला माझ्या अंतरंगात चालणाऱ्या चिवचिवाटांचा आवाज अधिकच स्पष्टपणे येऊ लागला. कित्येक उलाढाली चालल्या होत्या त्यावेळेस कोण जाणे..! खिडकीजवळ बसले तेव्हा दिसलेले बाहेरचे जग होते ते झाकोळल्या गेलेल्या एका निस्तेज सांजेप्रमाणे! बहुदा मनात चालणाऱ्या अस्वस्थतेमुळे सारे जग तसे भासत होते पण तेव्हा खिडकीच्या त्या खरेपणाचे मला कौतुक वाटले, कारण तिने तिच्याप्रमाणेच स्वच्छ असणाऱ्या काचेतून माझ्या मन:पटलाचे नितळ पण तितकेच क्लेशकारक दृश्य समोर ठेवले. तेव्हा तिचे न राहवून मला अप्रूप वाटले की, खिडकीसारखी एखादी क्षुल्लक गोष्ट सुद्धा मनातले भाव इतक्या खऱ्या अर्थाने दाखवू शकते तर माणसांचे असे का नाही? ती खिडकी तेव्हा माझ्या हिशेबी जरा भावच खाऊन गेली. जेव्हापासून खिडकीत वेळ घालवत आहे तशी ती मला माझ्यातल्या 'मी'ला ओळखण्याची मुभा देतीये आणि ती रोज काहीशी वेगळी मला कळत चाललीये. ती माझ्याशी हितगुज करते. तिच्या स्फटिकाप्रमाणे शुभ्र काचा हे जग शुभ्र आहे असं सांगण्याचा नाहक प्रयत्न करतात पण जेव्हा खिडकीतून खिडकीबाहेर डोकावते तेव्हा जग काहीसे वेगळे भासते, मनाला न पटण्याजोगे!
थोडेसे निवांत क्षण आणि स्वतःच्या मन:पटलावर जमा झालेली धूळ बाजूला करण्यास मिळालेली ही नवी सोबती गरज लागेल तेव्हा माझी वाट पाहतच असेल याची खात्री आहे; कारण तिलाही मोकळे व्हायचे आहे कधीतरी खिडकीतून खिडकीबाहेर..!