आभासी तो!
आभासी तो!
साधारण दुपारचे चार वाजले होते.वाफाळलेला चहाचा कप घेऊन मी खिडकीबाहेर बघत होते.बराच वेळ रेंगाळत,आळम-टळम करीत चहाबरोबर बाहेरच्या रम्य दृश्याचा आस्वाद घेत होते.उन्हाचा दाह कमी होऊन वातावरण कमालीचे थंड होण्याच्या मार्गावर होते.पक्षी किलबिलाट करीत आपापल्या घरट्याकडे परतू लागले.ढगांचा निळा रंग बदलून तो पार काळाकुट्टही झाला.जणू त्यांनी काळ्या रंगाची शालच पांघरली होती. शुभ्र,निरभ्र आकाश क्षणार्धात झाकोळले गेले.ढगांचा गडगडाट झाला,विजा चमकू लागल्या आणि पापणी लवताच पाण्याचे टपोरे थेंब खाली झेपावले.अचानक आलेल्या पावसाने लोकांची धांदल उडवली.लोक नि:शस्त्र सेनेप्रमाणे धावू लागले.पुन्हा एकदा वीज लकाकली.ढग गरजले आणि मुसळधार पाऊस येऊ लागला.ज्या वेगात पाऊस येत होता त्याच वेगात मी तो चहाचा कप ठेवला अन् पळत पळत वर गच्चीवर गेले. पहिला पाऊस डोळे भरून पाहण्यासाठी,अंगावर घेण्यासाठी!
चिंब पावसात मी चिंब न्हाले होते.पावसाच्या सरींनी मला परत एकदा त्याची आठवण करून दिली होती.हो त्याची!तो परत आला होता,मला त्याच्या प्रेमळ सरींनी भिजवण्यासाठी.हृदयाचे ठोके चुकवण्यासाठी.त्याच्या येण्याची चाहूल लागताच ह्रदयाची धडधड अधिकच वाढते.का,कुणास ठाऊक पण त्याच्या केवळ असण्याने मन सुखावते अन् मी वेगळ्याच विश्वात रममाण होते.दोन्ही हात खुलवून, आनंदाने त्याच्याबरोबर नाचण्याचा आनंदही काही वेगळाच होता.मनसोक्त पावसात नाचल्यावर, मनाजोगते पावसाळी थेंब अंगावर पडल्यावर पुन्हा एकदा चहा पिण्याचा मोह काही आवरता येईना.तशाच चिंब ओल्या अवस्थेत मी,हातात वाफाळलेला चहाचा कप,गरमा गरम कांदाभजीची तय्यार डिश आणि सोबत तो! बस,और क्या चाहिए?
बराच वेळ पावसाच्या सरी कोसळत होत्या.तशा आमच्या गप्पांना देखील उधाण आलं.तो एक एक करून त्याच्या सगळ्या आठवणी माझ्याशी शेअर करत होता.त्याचे बोलणे मला फक्त ऐकत रहावेसे वाटत होते.तो बोलत होता...बोलत होता...आणि मी ऐकत होते.आज नव्याने पुन्हा मला तो समजला.उमजला होता. एकूण एक गोष्ट त्याला लक्षात होती.त्याच्या बोलण्यातून मी कधी हसले, खुलले.तर त्याच्यासमोर पापण्यांच्या कडाही ओलावल्या.कधी कधी मनोमन त्याचा रागही आला तर कधी त्याला कडकडून मिठीही मराविशी वाटली.आम्ही एकमेकांना खाऊ घातलेल्या भजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळत होती.माझ्या
मनात विचारांचे मळभ दाटून आले. त्यालाही आणि मलाही माहिती होते ही मैफल इथेच संपणारी नव्हती.(कदाचित मलाच ती कधी संपवायची नव्हती.)"भीगी भीगी रातों में,मिठी मिठी बातो में..."तो गुणगुणत राहिला अन् मला डोळे मिटून ते ऐकत ऐकत फ्लॅशबॅक मध्ये घेऊन जाण्यास भाग पाडले.
आज घालवलेल्या दिवसापेक्षा काही वेगळा असा माझा फ्लॅशबॅक नक्कीच नव्हता.तो आधी जसा होता त्यापेक्षा थोडा बदललेला होता. वागणूकीत नव्हे तर अॅपियरन्स मध्ये बदलाव केलेला.तेव्हाही आम्ही पावसात मनसोक्त भिजलेलो.मग तो चहा असो वा भजी या गोष्टी ओघाने आल्याच.तेव्हाही तो खूप बोलायचा आत्ताही बोलतो.फरक एवढाच की माझे मन मला त्याने बोललेल्या गोष्टींची आठवण करून देते.कारण प्रत्यक्षात तरी तो मला भेटणे आता तरी शक्य नव्हते.त्याचा आवाज,त्याचे बोलणे,त्याचे गाणे गुणगुणणे,त्याचे हसणे,आम्ही दोघांनी एकत्र घालवलेले क्षण मी माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवले आहेत.खरे तर ते त्याच जागी मेहफूज राहतील,फक्त माझ्यासाठीच! तो आत्ता नाही माझ्यासोबत यापेक्षा आम्ही सोबतीने काही क्षण व्यथित केले याच जाणिवेने मन सुखावते आणि तो माझा कधीच नव्हता अशी मी माझी समजूत घातली.
घराच्या पत्र्यावर पडणाऱ्या थेंबाच्या आवाजाने मी क्षणभर दचकले आणि फ्लॅशबॅक मधून बाहेर आले.माझे अंग थंड होते.हात थरथरत होते.श्र्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता.हातात चहाचा कप वा जिभेवर रेंगाळणारी भजीची चव संपली होती.पावसाचा वेग मंदावला होता. वातावरण चिंब होते पण मला चिंब करणारा मात्र माझ्यासमोर नव्हता.होते ते फक्त भाजलेल्या धरतीला भिजताना पाहिलेले सुख.चातकाच्या चोचीत पडलेला पहिला पावसाचा थेंब,या सर्वांचा अनुभव.पण नजर मात्र त्यालाच चाचपडत राहिली.तेव्हा मीच माझी समजूत घातली,तो कालही सोबत नव्हता आणि आजही.होता तो फक्त त्याचा आभास! त्याच्या आभासी असण्याचे,वावरण्याचे आणि मनात घर करून राहण्याचे मला नेहमीच अप्रूप वाटते.काही काळासाठी दाटून आलेले मळभ क्षणार्धात शुभ्र,निरभ्र आकाशात परावर्तित झाले.कारण तो फक्त आभास होता.कालांतराने आकाशाने चढवलेला काळा मेकअप उतरला.पाऊसही थांबला होता.पण मनात अजूनही पाऊस कोसळतच आहे.किती वेळ कोण जाणे!