व्यसन...
व्यसन...
दारू पिण्यासाठी पैसे कमी पडायला लागले म्हणून,माझी इच्छा नसताना पन तु माझे दागिने विकलेस.ते मी सहन केले फक्त तुझ्यासाठी.अशी काय भुरळ घातली रे ह्या दारूने तुझ्यावर की तू इतका बदललास.
पूर्वी तू कामावरून घरी येताना माझ्यासाठी गजरा अन मुलासाठी खाऊ आणायचा.अन आता तुझ्या खिशात शेंगदाणे अन् हातात दारूची बाटली असते. चालताना तुला तुझा तोलही सावरत नव्हता,आमच्याकडे नाही पण किमान तुझ्या म्हातारे झालेल्या आई वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून एकदा तरी पाहायचे ना.तुला त्यांच्या मनातले दुःख कळाले असते,त्यांनाही वाटत असेल की आपण आपल्या मुलावर योग्य संस्कार करायला कुठेतरी कमी पडलो.हेच दिवस पाहण्यासाठी का,त्यांनीं तुला जन्म दिला होता?
तुला आम्ही समजवण्याचा किती प्रयत्न केला,पण तु कोणाचेच ऐकले नाही. तुझी दारू सोडविण्यासाठी मी तुला नशामुक्ती केंद्रात पाठवले,तर तिकडे न जाता तू मित्रांसोबत दारू प्यायला गेला.तुझ्या आजारपणामुळे आपली आर्थिक परिस्थिती पुर्णपणे खालावली होती,तुझ्या वडिलांनी तर त्यांची पेन्शन पण तुझ्या उपचारासाठी खर्च केली.
ती पेन्शनच त्यांचा म्हातारपणीचे उदरनिर्वाहाचे साधन होते.फक्त तू बरा व्हावा. ही एकच त्यांची ईच्छा होती. तुझ्या आजारपणामुळे मला ऑफिसला जायला जमत नव्हते, घरातल्या वातावरणामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष नव्हते; त्यामुळे ती परीक्षेत नापास झाली.
डॉक्टरांनी मला बोलावून सांगितले की, तुमच्या नवऱ्याच्या लिव्हरला सुज आली आहे,ते जास्त दिवस जगु शकणार नाही तुम्ही त्यांना घरी घेऊन जा.पैसे खर्च करण्यात काहीच अर्थ नाहीये,तरी सुद्धा मी तुझ्या उपचारासाठी कधीच पैशाची कमी भासु दिली नाही.अनेक तडजोडी करून मी उपचारासाठी पैसे जमवत होते.
ह्या सर्व गडबडीत आपण कधी हौस-मौज केलीच नाही, प्रेम, आपुलकी, जवळीक हे आपल्याबाबतीत फक्त नावापुरते मर्यादित राहिले. तू आम्हाला वाऱ्यावरती सोडून निघुन गेलास! संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे आता, ह्या संकटांतून कसे उभे रहायचे कळतच नाही. पण मी हार मानणार नाही,माझ्यावर आलेल्या संकटाशी मी खंबीरपणे दोन हात करेन.
मी देवाला हीच प्रार्थना करेन, मला पुढच्या जन्मीसुद्धा हाच नवरा मिळू दे,पण दारूचे व्यसन नसलेला.
