वसुधैव कुटुम्बकम्
वसुधैव कुटुम्बकम्
मला आजीचं नेहमी आश्चर्य वाटायचं, लाडू केले शेजारी दोन लाडू देते, दिवाळीचा फराळ शेजारी शेजारी वाटून मगच आम्हाला मिळायचा. संक्रांतीचे हळदीकुंकू फारच मजेत असायचा. काहीतरी आणलेली वस्तू, त्याला म्हणायचं "वाण". आता हल्लीच्या घरी प्लास्टिकच्या वस्तू इत्यादी स्वस्तातल्या वस्तू खूप असतात. मग कशाला द्यायची तीच वस्तू? आजी आणि आई अगदी नटूनथटून हळदीकुंकू समारंभ थाटामाटात करायची.
आई तर इतकी देखणी दिसायचे की नाही, काळी चंद्रकळा किंवा काळी पैठणी, ठळक दागिने, आणि चेहऱ्यावरचं हलव्याच्या सारखं सुरेख हास्य.
झोपाळ्यावरती बसून आजी सगळ्या येणाऱ्या सुवासिनींची चौकशी करायची. आजीचे मोहात टाकणारे हास्य सगळ्यांना खूपच समाधान देऊन जायचंय.
हळदीकुंकू बरोबरच काहीतरी खायचे पदार्थ असायचे, कोबीचे वडे, पिठाचे वडे, चकल्या, तिळाचे लाडू, किंवा खुसखुशीत वडी. आजीच्या हातची खुशखुशीत वडी तोंडात घातल्या घातल्या विरघळवून जायची. आई मुंबईची असल्यामुळे तिथे मात्र तिचे चिक्कीचे लाडू. आम्हाला काय दोन्ही चालत.
आमच्या बंगल्याच्या मोठ्या हॉलमध्ये बायकांचे हळदीकुंकू असे तर गच्चीवर बाबा आणि आजोबा यांच्या मित्र मंडळाचे पार्टी चालत असे. त्यांच्याबरोबर आलेल्या मुलांबरोबर आमचा क्रिकेटचा नाहीतर पत्त्यांचा डाव पडे. एकदा नेमके माझ्या परीक्षेच्या वेळेला आईचे हळदीकुंकू ठरले.
मी जरासा नाराज झालो आणि घरामध्ये कुरकुर केली. आई आणि आजीकडे त्याच्यावरदेखील तोडगा होता. चक्क दुसऱ्या दिवशी हळदीकुंकवाच्या वेळेला मी शेजारच्या घरांमध्ये जाऊन बसलो आणि माझा अभ्यास चालू ठेवला. मात्र मधूनमधून खाऊ खाणे मात्र चालूच. शेजारच्या काकूंनी आणि काकांनी माझी त्यांच्या सुमितसारखीच काळजी घेतली. आमच्या सोसायटीमध्ये हा प्रकार तर नित्यनियमाने चाली. कोणाकडे काही अडचण असेल शेजारपाजारचे धावून येत आणि अडचण हा हा म्हणता नाहीशी होत.
माझी धाकटी बहीण एकदा अशीच कुरकुर करत होती तेव्हा आजीने तिला एक सुरेख गोष्ट सांगितली. एका शेतकऱ्याचे शेत गावाच्या मध्यावर होते, आजूबाजूला बाकीच्यांची पण शेती होती, शेतकरी अतिशय कष्ट करून उत्तम पीक घेत. पण त्या शेतकऱ्याची एक सवय होती, आपल्या शेतासाठी लागणारे खत जंतुनाशक फवारणी आधी तो आपल्या शेजार्यांना द्यायचा आणि जे काही उरेल ते आपल्या शेतावरती वापरायचा. खतं आणि जंतुनाशक फवारे अतिशय महाग असायचे, त्याच्यामुळे एकदा त्याचा तरुण मुलगा त्याला म्हणाला," बाबा, आपल्या शेतावर की फवारणी करायच्या ऐवजी तुम्ही ते शेजार्यांना का देता?" एवढी महाग सामान तुम्ही असे वाटून का टाकतात?"
शेतकरी हसून म्हणाला," किडा, जंतू शेताचे बांध बघत नाहीत, त्यांना काय चांगले दिसेल तिकडे ते उड्या मारतात. बांध हे फक्त आपल्यासाठी आहे. तसेच चांगलं खत हे सगळ्यांनी घातलं तर सगळ्यांची पिके चांगली येतात आणि कोणालाही वाईट वाटत नाही. शेवटी काय तर कीड देखील शेजारूनच आपल्याकडे येत असते, सदर वेळी आपल्या शेजाऱ्याला जंतुनाशक फवारणी दिली तर कीड त्याच्याही पिकावर पडत नाही आणि आपल्याही पिकावर नाही."
श्रीकृष्णाने सांगितलेच आहे ना वसुधैव कुटुम्बकम् सगळे जग आपल्या कुटुंब आहे एकजण जर श्रीमंत झाला तर बाकीचे त्याचा खार खातील, त्याला शिव्या शाप देतील, सगळं वातावरणच एक निराशेने भरून जाईल.पण जर सगळेच श्रीमंत झाले तर सगळेच आनंदी राहतील?"
आजी म्हणाली," शेजारी जेव्हा आनंदात असतो ना तेव्हा आपल्या घरामध्येदेखील चांगले वातावरण तयार होते, पण जर शेजाऱ्याबरोबर भांडणे झाली किंवा शिव्याशाप तंटा बखेडा भांडणे झाली तर कोणीच आनंदी राहत नाही. हळदीकुंकू म्हणजे काय तर छोटेसे संमेलन. सगळ्यांनी एकमेकांना गोडवा द्यायचा कुठेही भांडण नाही तंटा नाही उलट असे समारंभ आपल्या संस्कृती मध्ये आहेत त्याच्यामुळे ज्याच्या बरोबर भांडण झाले आहे तो देखील आपल्या मित्र होतो की नाही? प्रत्येक वेळेला माणसांनी स्वार्थ बघायचा नाही , दुसऱ्या प्रकारे देखील स्वार्थ साधता येतो, दुसऱ्याला आनंदी करून ."
आजीने केवढा मोठा महामंत्र मला सांगितला होता. आजीने माझ्या हातात एक छोटी पिशवी ठेवली आणि म्हणाली," तू पण तुझ्या कॉलेजच्या मित्रांना दे हो."
आता मी मोठा झाल्यावर मला आजीच वागणं-बोलणं, आमच्याकडे होणारे समारंभ स्पष्टपणे डोळ्यासमोरून तरळून गेले. किती सुंदर रीतीने आपल्या संस्कृतीमध्ये रुजवले गेले आहेत याचे महत्त्व पटते. आपल्या देशाने आपल्या देशामध्ये तयार झालेली कोविड -19 शेजारी सगळ्या राष्ट्रांना पाठवलेली आहे बरोबरच आहे शेजारी सुखी तर आपण सुखी, आणि महामंत्र” वसुधैव कुटुम्बकम” हा फक्त आपल्या हिंदुस्तान मध्येच सुरेख रीतीने रुजवल्या गेलेला आहे. आणि सगळ्या राष्ट्रांना भारताची संस्कृती आणि तिची महानता याची किंमत कळत आहे. खरोखर आनंद दुसऱ्याला सुख देऊन मिळणार आहे, पैसे काय कसे पण मिळवता येतात.
आपल्या मित्र राष्ट्रांची पण जनता सुखी निरोगी असावी हा विचार फक्त भारतातलेच लोक करू शकतात आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे.
