वृध्दाश्रम : अगतिक मनाची व्यथा
वृध्दाश्रम : अगतिक मनाची व्यथा
थकलेले जीव सारे विसाव्याला परतत होते.......केशरसडे काळोखाच्या पाशात विरत होते......पान्हावल्या गायीसाठी भुके वासरू तडपत होते........विचारात गढलेल्या राधिकाबाईंच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.देवा!अस का केलस?माझी काय चूक झाली?म्हणून हे दैन्य मांडलस...............तेवढ्यात राधिकाबाईंना नीताने जेवणासाठी हाक मारली, "आजी जेवायला चला." आणि त्यांची तंद्री भंग पावली.वृद्धाश्रमातील सगळी मंडळी जेवणास बसली.पण राधिकाबाईंच मन काही लागेना . असंख्य प्रश्न डोळ्यापुढे घिरट्या घालत होते.नीताने ही गोष्ट हेरली व जेवणानंतर ती त्यांच्याशी गप्पा मारायला गेली. राधिकाबाई आपला संसारपट नीतासमोर उधळला.एक एक गोष्ट सांगताना कधी हास्याची लकेर तर कधी डोळ्याच्या कडा पाणावतांनाचा आवंढा त्यांनी बरेचदा गिळला. "सुखःदुखाचे हेलकावे खात आता तर नौका काठावर येत होती गं! मग अस अचानक आपणच आपल्या लेकरांना नकोसे होतोय ही कल्पनाच असहनीय आहे गं!
आपल्या लेकराच थोडसं दुःख जीथे आईवडिलांना सहन होत नाही.जे आईवडिल धडधाकट असतांना आपल्या मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशा आज थकलेल्या आईवडिलांना मुलांनी वृद्धाश्रमात ठेवावे." राधिकाबाई हुंदके देऊन रडू लागल्या. नीताने त्यांची समजूत घातली आणि त्यांना त्यांची औषध देऊन झोपून दिले.मग इकडे नीताला देखील करमेना. तीला आठ दिवसापूर्वी गेलेल्या आजींचा चेहरा डोळ्यासमोर आला किती तडफडल्या होत्या त्या आपल्या मुलांना भेटायला..................दिवाळीत तर तीन दिवस अहोरात्र वृद्धाश्रमाच्या मेनगेटवर मुलाची वाट बघत होत्या की तो मला निदान दिवाळीला तरी आपल्या घरी नेईल. पण..........त्यांची ही साधी ईच्छा कधीच पूर्ण झाली नाही. नीताला समजेचना की अस काय होत असेल जे आई-वडील आपलं आयुष्य आपल्या मुलाबाळांसाठी वेचतात त्या मुलांना आईवडील म्हातारे झाले की इतके नकोशे होतात की अगदी वृध्दाश्रमाच्या उंबऱ्यावर त्यांचा जीव जातो. कोण बरं जबाबदार आहे या समाजास लाभलेल्या शापाला?..........अति प्रेम करणारे आई-वडील की आई-वडिलांच्या प्रेमाचा अवमान करणारी मुलं?
