Anil Sonar

Horror

4.0  

Anil Sonar

Horror

वो आ गयी है...

वो आ गयी है...

14 mins
1.7K




सुधीर खरं तर मेकॅनिकल इंजिनीरिंग करत असतो आंध्र प्रदेश युनिव्हर्सिटी मधून पण आंध्र मधल्या अनेक नातेवाईक आणि स्नेही कुटुंबातील इंजिनीयर्सचे IT मधील यश, बऱ्याच जणांचे फटाफट अमेरिकेला जाणे, गाड्या-घोडे घेणे बघून त्यालाही BE च्या शेवटच्या वर्षाला असताना वाटले की आपणदेखील IT मधेच करिअर करावे. मग त्याने हैद्राबादला एका IT ट्रेनिंग इन्स्टिटयूटमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंगचे ट्रेनिंग घेणे सुरु केले आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग मध्ये त्याला विशेष रस देखील वाटू लागला. बेसिक सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचे ट्रेनिंग, नंतर प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट छान केलाच, शिवाय तिथल्या सरांबरोबर गट्टी जमवून सुधीरने जमेल तितके अधिकाधिक शिकून घेतले. मग सुधीर BE मेकॅनिकलच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास, सबमिशन्स वगैरे नीट सांभाळून,मेहनत करून रात्री उशिरापर्यंत सॉफ्टवेअरचे छोटे-छोटे प्रोजेक्ट्स करू लागला. BE च्या शेवटच्या सेमिस्टरपर्यंत सुधीरने सॉफ्टवेअर कोडींगमध्ये चांगलीच प्रगती केली होती. सुधीरने कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्यू कोऑर्डिनेटरला त्याच्या सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग ट्रेनिंग कोर्स व केलेल्या प्रोजेक्ट्स बद्दल माहिती देऊन त्याचा इम्प्रेसिव्ह रिजूमे व्यवस्थित बनवून देऊन ठेवला होता.


काही दिवसातच सुधीरला एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू देण्याची संधी मिळाली. कॅम्पस इंटरव्यूसाठी साधारण ३००-३५० मुलं-मुली होते आणि ४ ते ६ लोकांना कंपनी सिलेक्ट करणार होती. ३००-३५० पैकी ४५ मुलं लेखी परीक्षा (टेस्ट) ही पहिली पायरी पास झाली, त्यात सुधीर देखील होता! पुढच्या ग्रुप डिस्कशन राऊंडमधे देखील सुधीर सिलेक्ट झाला. पुढच्या फायनल टेक्निकल राऊंडसाठी साधारण दीड तास वाट बघितल्यावर सुधीरचे नाव पुकारण्यात आले. सुधीरने मुलाखतकार मॅडमना उत्साहाने त्याच्या प्रोजेक्ट्स विषयी माहिती दिली, ते प्रोजेक्ट्स करताना त्याला काय अडचणी आल्या आणि त्याने त्यावर कसे सोल्युशन शोधून काढले, किती झपाटून गेल्यासारखे त्याने हे प्रोजेक्ट्स केले आणि हे सॉफ्टवेअर पुढे एन्हान्स कसे करता येईल वगैरे ह्याची छान माहिती मॅडमना दिली. त्याची प्रोग्रामिंग मध्ये असलेली निपुणता आणि पॅशन बघून हा मुलगा आपल्या कंपनीसाठी चांगला असेट होईल ह्याची मॅडमना खात्री झाली.


पुढे २ आठवड्यातच प्लेसमेंट डिपार्टमेन्टकडून "त्या सॉफ्टवेअर कंपनीकडून सिलेक्ट झालेल्या ५ लोकात तू आहेस, अभिनंदन!" अशा आशयाची ई-मेल सुधीरला आली. सुधीरचा आनंद गगनात मावेना. त्याने सर्वात आधी ही बातमी आपल्या आईला दिली जिने शाळेत असताना सुधीरबरोबर जागून त्याचा अभ्यास घेऊन त्याच्या शिक्षणाचा पाया भक्कम केला होता. पुढचा फोन त्याने वडलांना केला, ज्यांचा त्याचा अभ्यास घेण्यात जरी फारसा वाट नव्हता तरी शिक्षण कसे महत्वाचे आणि एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी झोकून देणे कसे महत्वाचे ह्याचे बाळकडू त्यांनी त्याला वेळोवेळी दिले होते, जे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग शिकताना त्याला विशेष कामास आले.


पुढे BE ला डिस्टिंक्शन मिळवून सुधीरचे इंजिनीरिंग झाले, व महिन्याभरातच तो त्या सॉफ्टवेअर कंपनीत जॉईन झाला. चांगल्या मार्कानी BE, चांगली कंपनी, भरपूर स्टार्टींग सॅलरी आणि आता चांगला प्रोजेक्ट ह्यामुळे सुधीर खुश होता. त्याच्या मेहनत करण्याची आणि नवीन गोष्टी अतिशय आवडीने शिकायची तयारी ह्या गुणांनी सुधीरने पहिल्या ३ वर्षातच चांगली प्रगती करून सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर ह्या पदापर्यंत वाटचाल केली. त्याला अमेरिकेतल्या क्लायंटबरोबर इंटरॅक्शन करण्याची संधी मिळाली व त्या संधीचे सुधीरने सोने केले. क्लायंट साईडचा मॅनेजरही सुधीरचे नेटके काम, टेक्निकल स्किल्स बघून इम्प्रेस झाला होता. त्याने पुढे एका महत्वाच्या लॉंगटर्म प्रोजेक्टसाठी सुधीरला अमेरिकेला येऊ शकतोस का म्हणून विचारले. टिपिकल मिडल क्लास कुटुंबातून आलेल्या सुधीर आणि त्याच्या आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले.


२ महिन्यातच सुधीर अमेरिकेला रवाना झाला. आयुष्यातील पहिल्यांदाच केलेला विमानाचा प्रवास आणि तेही लाखोंचे स्वप्न असलेल्या अमेरिकेला.. सुधीर मनोमन खूप खुश झाला होता. विमानातून उतरल्यापासून ते पुढील काही महिने अमेरिकेच्या भव्यदिव्यतेने सुधीर सुखावला होता. तिथेही त्याने आपल्या चांगल्या कौशल्य आणि कामाची चुणूक सतत दाखवली. अमेरिकेत येऊन सुधीरला दोन वर्षं कशी निघून गेली कळलेही नाही. एव्हाना सुधीरचे वय २७-२८ वर्ष झाले आणि त्याच्या आई-वडिलांकडे त्याच्या लग्नाविषयी विचारणा होऊ लागली. सुधीरच्या वडिलांनी एका वीकएंडला बोलता-बोलता सुधीरला लग्नाविषयी काय विचार असं विचारलं. सुधीरनेही ह्या बाबतीत विचार केला होता व योग्य वयात लग्न केलेले बरे हा त्याचा विचार त्याने आई-वडलांना सांगितला. पुढील ३-४ महिन्यात त्यांनी ५-६ व्यवस्थित घरातल्या सुशिक्षित मुली सुधीरसाठी योग्य असू शकतील अशा दृष्टीने बघून ठेवल्या व वेळोवेळी त्या मुली आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सुधीरला माहिती देत राहिले. त्यातील सीमाचा फोटो आणि बायोडाटा बघून ही आपल्यासाठी योग्य राहील असे सुधीरला वाटले व तिला भेटून पुढे ठरवता येईल असे आई-वडिलांना कळवले.

डिसेंबरमधे सुधीर हैदराबादला गेला आणि २-३ दिवसांनी सीमाच्या आई-वडिलांनी सुधीरच्या आई वडिलांना सुधीरसोबत आमंत्रित केले. त्याप्रमाणे सुधीर आणि त्याचे आई-वडील सीमाच्या घरी गेले, दोन्ही कुटुंबियांच्या औपचारिक गोष्टी झाल्या. सुधीर आणि सीमाने एकमेकांना बघितले, व सुधीरने बोलावयास सुरुवात करत त्याच्या गप्पिष्ट स्वभावाने सीमालाही बोलते केले. दोघांनी एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी, स्वभाव जाणून घेण्यासाठी सुधीरच्या त्या सुट्टीत २-३ वेळा तरी भेटायला हवे असे ठरवले आणि तसे दोघे ४-५ वेळा वेगवेगळ्या कॅफे, मंदिर इत्यादी ठिकाणी भेटले व एकमेकांना अजून जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला व हाच आपला योग्य जोडीदार / हीच आपली योग्य जोडीदारीण असे त्यांना दोघांना मनोमन वाटले, व त्यांनी लग्नास होकार दिला. त्यांच्या आई वडिलांनाही आनंद झाला व मे महिन्यात लग्न करायचे असे ठरले.


दरम्यान सुधीर आणि सीमा ह्यांच्यात फोन, चॅट ह्यावर रेग्युलर संवाद सुरु झाला. दोघे एकमेकांशी तासंतास बोलत असत व त्यांच्या संवादाला मिळालेल्या प्रेमाच्या कलाटणीमुळे लग्नासाठी असलेल्या ४ महिन्यांचा कालावधी त्यांना जीवघेणा वाटू लागला. सीमा बरोबर होणाऱ्या गप्पांमध्ये सुधीरला सीमाच्या घरची परिस्थिती विशेष नसल्याची कल्पना आली. आणि लग्नामुळे तिला नोकरी सोडावी लागून आई-वडिलांना होणारी आर्थिक मदत थांबणार ही तिला होणारी बोचणी त्याला जाणवली. सुधीरने तिला आपल्यावतीने होईल तशी मदत करू असे सांगून तिची समजूत काढली.


शेवटी सुधीर आणि सीमा आतुरतेने वाट बघत असलेला मे महिना उजाडला आणि सुधीर लग्नासाठी भारतात आला व दुसऱ्या आठवड्यात सुधीर आणि सीमाचे लग्न आनंदा पार पडले. पुढील १ आठवडा स्वित्झर्लंडला व त्यानंतरचा एक आठवडा अमेरिकेत मायामी बीचेसवर हनिमून असे सुधीरने आधीच प्लॅन करून ठेवले होते. त्याप्रमाणे लग्नानंतर उत्कट प्रेमाचा स्वर्गीय आस्वाद घेत सुधीर आणि सीमा एका वेगळ्याच अनुभूतीने तृप्त झाले.


त्यानंतर सुधीरने ऑफिस जॉईन केले. सीमा अमेरिकेच्या जीवनाशी सुधीरच्या मदतीने रुळत होती. वर्क व्हिसा तिला मिळणार नसल्यामुळे ती पूर्णवेळ गृहिणी झाली होती. सुरुवातीचे काही महिने वीकएंडला अमेरिकेत भटकणे, तिथले वेगवेगळ्या देशांचे कुजिन्स ट्राय करणे, मुव्हीज बघणे आणि डेली रुटीन असा सीमाचा वेळ बरा जात होता. दरम्यान लग्नाआधी दिलेल्या शब्दाप्रमाणे सुधीर सीमामार्फत जमतील तसे पैसे तिच्या आई-वडिलांना पाठवीत होता. अजून काही महिन्यांनी सुधीरला खूप महत्वाचा पण कमी कालावधीत - काही महिन्यातच - पूर्ण करायच्या प्रोजेक्टची जबाबदारी दिली गेली त्यामुळे त्याला घरी यायला खूप उशीर होत असे व बऱ्याचदा वीकएंडलाही ऑफिसला जावे लागे. त्या दरम्यान सिमाला खूप एकटे वाटू लागले. ती सुधीर एवढी गप्पिष्ट वगैरे नव्हती आणि म्हणून तिच्या खूप ओळखी अमेरिकेत झाल्या नव्हत्या. बराच वेळ ती टीव्हीवर सिरीयल, मुव्हीज बघण्यात घालवत असे. सीमाला त्यातल्या त्यात हॉरर सिरीज, मुव्हीज विशेष आवडू लागल्या होत्या. सुरुवातीला ती सुधीर नसताना त्या हॉरर सिरीज, मुव्हीज बघणे टाळत असे, पण नंतर तिला त्या बघण्याचा छंदच लागला.


एकदा रात्री उशिरा काम करून सुधीर पहाटे साधारण २ च्या सुमारास आला व स्वतः जवळील किल्लीने त्याने अपार्टमेंटचे दार उघडले. सीमाची झोपमोड होऊ नये म्हणून तो शक्यतो बेडरूममधला दिवा लावत नसे. त्याच्या हातातील किल्ल्यांच्या जुडग्याच्या होणाऱ्या "छम-छम" आवाजाने अर्धवट जाग-अर्धवट झोपेत असलेली सीमा अचानक उठली व स्वतःच्या दोन्ही कानांना हात लावून, पाय पोटाशी गच्च धरून जोरजोरात ओरडायला लागली. तिच्या अचानक झालेल्या ह्या स्थितीने प्रोजेक्टच्याच विचारात असलेल्या बेसावध आणि अतिशय घाबरलेल्या सुधीरला काय झाले आणि काय करावे हे पटकन सुचलेच नाही. कसाबसा सावरत त्याने बेडरूमचा दिवा लावला. आणि तो सीमाला "काय झाले, काय झाले" असे विचारू लागला. सीमाचे भेदरलेले डोळे, तिचे ओरडणे, "वो आ गयी, मुझे बचाओ... " वगैरे बरळणे हे बघून सुधीरची हालत खराब झाली. कसंबसं स्वतःला सावरत तो सीमाला समजावू लागला "कुणी नाहीये, मी आलोय ऑफिस मधून". सीमाला भानावर यायला बराच वेळ लागला, आणि जेव्हा तिला सुधीरच आहे ह्याची खात्री झाली तेव्हा ती हमसाहमशी रडून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. सुधीरने तिला पाणी प्यायला दिले व थोड्या वेळाने सीमा पूर्ण भानावर आली. थोड्या वेळाने दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सुधीरने सुट्टी घेतली व सिमाला ह्यापुढे हॉरर सिनेमे बिलकुल बघू नकोस अशी ताकीद दिली. कालचा प्रसंग आठवून सुधीरला अजूनही हादरायला होत होते.


त्या दिवशी झालेल्या प्रसंगाने व सुधीरने दिलेल्या ताकिदीने सीमाचं टीव्हीवर सिनेमे वगैरे बघणंही साधारण बंदच झालं. कामात जाईल तेव्हढा तिचा वेळ जात असे आणि नंतर तिला खूप कंटाळा येत असे. इथे अमेरिकेत नोकरी करायचीही सोया नव्हती. एकीकडे सुधीरकडून पैसे घेऊन आई-बाबाना पाठवणे तिला फारसे रुचत नसे. त्यामुळे सीमाची घालमेल वाढली व अमेरिकेत असल्याचे नावीन्य आणि महत्व तिच्या स्थानी नगण्य झाले. तिला स्वतःचे काही लाईफ राहिले नाही असे वाटू लागले, आणि लग्नानंतर अमेरिकेला आल्यामुळे असे झाले असा तिचा ग्रह झाला. वरचेवर सुधीर बरोबर सीमांचे खटके उडू लागले. कधी भाजीत थोडे मीठ जास्त झाले असे जरी सुधीर सहज म्हटला तरी तिला ते सहन होत नसे आणि खटका उडायला तेव्हढे कारण पुरत असे. तिच्या एकटेपणामुळे तिचे वागणे असे होतेय असं सुधीर स्वतःला समजवायला लागला. परंतु ऑफिसची टार्गेट्स व घरचे सीमाचे वागणे ह्यामुळे त्याचा स्ट्रेस वाढू लागला. त्याने सिमाला त्याच्या मित्र/कलिग्ज च्या बायकांबरोबर वेळ घालत जा, लायब्ररीत जाऊन / किंडलवर पुस्तकं वाचत जा असे अनेक उपाय सुचवून बघितले, पण सीमा कशातच रमत नसे व त्यांचे वाद काही कमी होईनात. तेव्हा अमेरिकेत स्थायिक व्हायचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या सुधीरने भारतात परत जायचा निर्णय घेतला, जेणेकरून तिथे तरी थोड्या सोशल वातावरणात सीमाचं मन लागेल.


सुधीरने त्याप्रमाणे आपला भारतात परत जायचा निर्णय आधी क्लायंट मॅनेजरशी बोलून मग भारतातल्या त्याच्या कंपनीतील मॅनेजरला कळवला. दोघांनीही सुधीर करत असलेला प्रोजेक्ट २ महिन्यात संपल्यावर भारतात जाण्यास परवानगी दिली. कंपनीतल्या मॅनेजरने २ आठवड्यानी सुधीरला पुढचा प्रोजेक्ट भारतात हैदराबादला न मिळता पुण्याला मिळेल ह्याची कल्पना दिली. सुधीरने विचार केला, अमेरिकेत राहून सीमाची मनस्थिती अजून बिघडण्यापेक्षा पुण्याला गेलेले बरे, त्याने होकार कळवला.


पुढील काही आठवडे सुधीर व सीमा भारतात परतण्यासाठी आवराआवर करत होते. सुधीरने पुण्यातील मित्राला कळवून ऑफिसपासून फार लांब नसलेल्या एका सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेतला. सुधीरने ऑफिसमध्ये प्रोजेक्ट संपवून भारतात परत जाण्याआधी आठवडाभर जरा फिरावे आणि फायनल आवराआवर करून सामान शिप करावे म्हणून एक आठवडा अमेरिकेत सुट्टी घेतली व पुण्याला गेल्यावर सगळे सेट करण्यासाठी म्हणून १०-१२ दिवस सुट्टी घेतली. त्याप्रमाणे लग्नानंतर २ वर्षे अमेरिकेत राहून आधीच्या गोड आणि नंतरच्या थोड्या कडू होत गेलेल्या आठवणी घेऊन सुधीर आणि सीमा भारतात परतले.




पुण्यातली सोसायटी बरीच नवीन होती आणि फारसे लोक राहायला आले नव्हते. तो एरियादेखील डेव्हलपिंग असल्यामुळे जरा एकांतात असल्यासारखा होता. संध्याकाळी आणि रात्री तर सोसायटीत रातकिड्यांचा आवाज वगैरे अजूनही भयाण वाटत असे..पण सीमाचा वेळ भारतात परतल्यावर घर लावणे, त्यासाठी करावी लागणारी खरेदी इत्यादी गोष्टींमुळे सुरुवातीला जरा नीट जाऊ लागला. सुधीरही त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये हळू हळू बिझी झाला. सोसायटीत तीन-चारच कुटुंब पाहायला आली होती आणि सोसाटीच्या साफसफाई व इतर कामासाठी बिल्डरने एका गावाकडच्या जोडप्याला ठेवले होते. त्यापैकी बाई सोसायटीतील घरांमध्ये धुणे-भांडीवाली म्हणून काम करीत असे. सीमाने तिला आपल्याकडेही कामास येत जा म्हणून सांगितले.  


सोसायटीतल्या एका कुटुंबातील मध्यम वयीन काकूंनी सीमाशी ओळख झाल्यावर तिला सांगितले की कामवाल्या आनंदीबाईंबरोबर कामापुरते काम ठेव. ती गावाकडची अंधश्रद्धाळू बाई आहे आणि जादू-टोणा भेट-खेताच्या गोष्टी करीत असते. त्यांच्या त्या सल्ल्याने सीमाने त्यांना धन्यवाद दिले खरे परंतु तिला एकप्रकारे आनंदीबाईंबरोबर "त्या" गप्पां करण्याची हुरहूर देखील वाटू लागली. त्याप्रमाणे सीमा कधी संधी मिळते ते बघत होती. शेवटी एकदा अमावास्येच्या रात्री ती संधी समोरूनच चालून आली. त्यादिवशी कॅलेंडर बघून सीमा सहज म्हंटली की अरे आज अमावस्या आहे. जवळच झाडझूड करत असलेली आनंदीबाई काम करायचे थांबून मक्ख चेहऱ्याने सिमाला बजावू लागली. "ताई, आज अमावस्या आहे. तुम्हाला कुणी बोललं कि नाही माहिती नाही, पण आपली ही सोसायटी अशी आड-नीड आहे. तिकडे पलीकडे चिंचेच्या झाडाला म्हणे कुणी बाईने फास लावून आत्महत्या केली होती, आणि तीचा आत्मा सोसाटीच्या जवळपासच्या एरियात फिरत असतो. सहा महिन्यापूर्वीच्या अमावास्येला म्या माझ्या डोळयांनी बघितली होती तिला बघा". मोठं-मोठे डोळे आणि विचित्र हातवारे करून हे सांगणाऱ्या बाईकडे सीमा बघत होती आणि एक प्रकारचा रोमांच ती ह्या गप्पांनी अनुभवत होती. खूप दिवसांनी तिला काहीतरी हॉरर विषय ऐकायला मिळत होता. तिने आनंदीबाईला अजून खोदून-खोदून विचारण्यास सुरुवात केली. बाई कुठली होती, तिने का आत्महत्या केली, आनंदीबाईला ६ महिन्यापूर्वी दिसली ती कशी होती, आनंदीबाईने मग काय केले वगैरे.


पुण्यात आल्यानंतर काही महिन्यांनी सीमाने नोकरी शोधायचे ठरवले. सुधीरची त्यासाठी संमती होतीच. सीमा वेगवेगळ्या जॉब पोर्टल्स वर जॉब शोधात होती, सुधीरही ओळखीतल्यांकडे सीमासाठी नोकरी करता चौकशी करत होता. परंतु काही महिने प्रयत्न करून देखील सीमाला नोकरी करण्यात यश आले नव्हते.  भारतात आल्यानंतर सुधीरला अमेरिकेत असताना करता यायची तेव्हढी आर्थिक मदत सीमाच्या कुटुंबियांना करता येत नव्हती कारण सुधीर सीमांचे खर्च वाढले होते आणि अमेरिकेतल्यासारखे भरघोस इनकम भारतात सुधीरला मिळत नव्हते. शिवाय सीमालाही नोकरी मिळत नव्हती. ह्या सर्व गोष्टीमुळे सीमा चिडचिडी झाली होती आणि सुधीरवर चिडायची कुठलीही संधी ती सोडत नसे. सुधीरही ऑफिसमधला स्ट्रेस आणि सीमाचं असं वागणं ह्या गोष्टींनी कावला होता, आणि त्यामुळे दोघांमध्ये वरचेवर खटके उडत असत.


एका अंवसेच्या रात्री सुधीर ऑफिसमधून आला, सुधीर आणि सीमा दोघे जेवले व जरा वेळ TV बघून रात्री ११ च्या सुमारास झोपायला गेले. थकलेल्या सुधीरला चटकन झोप लागली. साधारण २ वाजता सुधीरला तहान लागल्यामुळे तो उठला आणि पाणी पिऊन आला. बेडरूममध्ये आल्यावर समोरचे दृष्य बघून सुधीरची बोबडीच वळली. बेडवर सीमाच्या जागी एक पांढरी साडी घातलेली बाई मोकळे सोडलेले केस चेहऱ्यावर सोडून काहीतरी बरळत "घुमत" होती. अतिशय घाबरलेल्या अवस्थेतल्या सुधीरने दिवा लावला आणि दिव्याच्या प्रकाशात सुधीरला जाणवले की ही बाई दुसरी कुणी नसून सीमाच आहे. तो "सीमा, काय करतेहेस.. काय चाललंय तुझं हे.. " असं म्हणत घाबरत हळू-हळू सीमा जवळ जात होता. सीमाच्या बऱ्याच जवळ आल्यानंतर सीमा अचानक गुडघ्यांवर उठून बसली व तिने चेहऱ्यावरचे केस मानेला जोरात हिसका देत मागे केले. सीमाने मोठ्ठा लाल कुंकू कपाळावर लावला होता. तिचे दोन्ही बुब्बुळ अगदी वर गेले होते, जणू तिच्या डोळ्यात बुब्बुळंच नाहीत असे भासत होते. तिच्या चेहऱ्यावर खुनशी भाव होते आणि गुडघ्यावर उठून बसताना तिने सुधीरच्या गळ्याला तिच्या हाताच्या पंजाने जोरात धरले आणि विचित्र आवाजात ती गुरगुरत होती. तिचे ते भयानक रूप आणि आवेश पाहून आधीच घाबरलेल्या सुधीरचे पार अवसान गळाले व गळ्यावरच्या सीमाच्या पंज्याला जोर लावून काढीत सुधीरने तिला मागे ढकलले व तिला घट्ट धरून ठेवले. नंतर तिच्या चेहऱ्यावर चापट्या मारीत सुधीरने सीमाला शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला. जरा वेळाने सीमा शुद्धीवर आल्यासारखी सुधीरला जाणवली. सुधीरने सीमाला पाणी आणून प्यायला दिले. सीमा अजून जरा भानावर आल्यानंतर सुधीरने तिला आधी तिचे कपडे बदलून येण्यास व चेहरा धुऊन येण्यास सांगितले. ते करून सीमा आल्यानंतर हा काय प्रकार होता असे सुधीरने तिला विचारले असता ती जे म्हटली ते ऐकून सुधीर गर्भगळीत झाला. सीमा म्हटली की तिच्या अंगात ‘त्या’ आत्महत्या केलेल्या बाईचा आत्मा शिरतो आणि तो सर्व काही असे विचित्र करवून घेतो. हे सगळं ऐकून सुधीरचं डोकं सुन्न झालं. तो सीमाला म्हटला सगळ्यात आधी तू शांतपणे झोप, आपण उद्या बोलू या. सीमा झोपी गेली, परंतु सुधीरला काही केल्या झोप येईना.


दुसऱ्या दिवशी सुधीरने ऑफिसातून आपल्या आई-वडिलांना फोन करून रात्री घडलेला प्रसंग सांगितला. त्याच्या आई-वडिलांना वडिलांनाहीही खूप चिंता वाटली. आपण ह्यावर काही उपाय शोधून कळवू असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. सुधीरच्या आई-वडिलांनी ही गोष्ट सुधीरच्या मामाच्या कानावर घातली. मामाला एक मांत्रिक माहिती होता जो अशा गोष्टींवर हमखास तोडगा देतो म्हणून प्रसिद्ध होता. मामा त्याला जाऊन भेटला व सीमाबद्दल त्याने मांत्रिकाला माहिती दिली व ह्यावर तोडगा द्यावा म्हणून विनंती केली. मांत्रिक डोळे मिटून काहीतरी पुटपुटु लागला व काही मिनिटांनी दीर्घ श्वास घेत म्हटला की पुन्हा असं सीमाच्या अंगात आत्म्याने प्रवेश केल्यास सुधीरला तिच्या अंगावर काळे तीळ टाकण्यास टाकण्यास व त्यानंतर सिमाला चामड्याच्या चपलेने  बडवून काढण्यास सांगितले. मामा मांत्रिकास नमस्कार करून व त्याची "फीज" देऊन बाहेर पडला व तडक सुधीरला फोन करून मांत्रिकाने दिलेला तोडगा सांगितला. त्याप्रमाणे सुधीरने ऑफिस मधून संध्याकाळी घरी जाताना काळे तीळ विकत घेतले व घरातील एक चामड्याच्या चपलेच्या जोडाबरोबर सीमाच्या लक्षात येणार नाही अशा जागी ठेवल्या.

नंतर काही दिवस जरा नीट गेले . एके रात्री सुधीरला जाग आली तेव्हा पुन्हा सीमा त्याच्याकडे पाठ करून, मोकळे केस सोडून खिडकीत टक लावून बघत बसलेली आढळली. सुधीरला दरदरून घाम फुटला पण त्याने जरा धीर करून हळूच काळ्या तिळाची पुदी काढून चटकन तीळ सीमाच्या अंगावर टाकले व लगोलग चामड्याच्या चप्पलेने सीमाला बडवायला बडवायला सुरुवात केली. सीमाही चवताळून भयानक ओरडत सुधीरच्या अंगावर धावून गेली व त्याला जोरात मारू लागली. काही वेळाने चपलेच्या फटक्यांनी सीमाचा / तिच्या आतल्या आत्म्याचा आवेश निवळला. सुधीर वेळ डोक्याला हात लावून आपल्या चांगल्याचुंगल्या चाललेल्या आयुष्यात हे काय घडतंय ह्या विचाराने दुःखी झाला. सीमा झोपी गेली होती.


ऑफिसमधल्या जवळच्या मित्रांना हसतमुख असलेल्या सुधीरमध्ये झालेला बदल जाणवला. त्यांनी सुधीरला विचारणा केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली पण मित्रांना ती कारण पटली नाहीत. तेव्हा सुधीरने आपल्या मनावरचे ओझे मित्रांसमोर उतरवले आणि सीमाबरोबर काय घडतेय आणि रोज आपण कुठल्या आणि किती चिंतेत असतो ह्याची कहाणी आपबिती सांगितली. एका मित्राने सुधीरला सल्ला दिला कि सिमाला सायकिऍट्रिस्टकडे दाखवावे व एका नामांकित सायकिऍट्रिस्टचे नाव देखील सांगितले. त्याच शनिवारी सुधीरने सीमासाठी सायकिऍट्रिस्टकडे अपॉइंटमेंट घेतली व सीमाला घेऊन गेला. सीमा व सुधीरशी बोलून डॉक्टर म्हंटले की सीमाच्या हॉरर फिल्म्स वगैरेच्या अतिआवडीमुळे सिमाला कसलेसे हलुसीनेशन (भास) होत असावेत आणि त्यामुळे ती तिच्या वेगळ्याच दुनियेत जाऊन कपडे वगैरे बदलून असे प्रकार करत असावी. त्यांनी तिला २ आठवड्याची औषध लिहून दिली व त्यानंतर पुन्हा घेऊन येण्यास सांगितले. सीमाच्या मनाविरोधात सुधीरने तिला सायकिऍट्रिस्टकडे नेल्यामुळे ती चिडली. औषध घेण्याचं ती नाटक करीत असे व गोळ्या सुधीरचं लक्ष नसताना डस्टबिनमध्ये टाकून देत असे. वीकएंडला डस्टबिनमध्ये कचरा टाकत असताना सुधीरला सीमाची औषध त्यात आढळली. तो सिमला काही बोलला नाही, व दुसऱ्या दिवशीपण त्याने पाळत ठेवून खात्री करून घेतली कि सीमा औषधं ना घेताच डस्टबीनमधे फेकून देते. त्यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरात वाद आणि बाचाबाची झाली. सीमा सुधीरला विनवणीच्या सुरात म्हटली की ती औषध तिला बिलकुल सूट होत नाहीये आणि तिला आता त्रासही होत नाहीये. काही आठवडे खरोखर त्यानंतर चांगले नॉर्मल गेले. सीमा आध्यात्मिक पुस्तकात मन रमवू लागली, घरातली कामं चोख करू लागली. झोपेत पुन्हा काही विचित्र प्रकार झाला नाही. सुधीर व सीमांचे बाहेर फिरणे, जेवायला जाणे छानपणे सुरु झाले.


एक दिवस डिनर करून सुधीर व सीमा स्कुटरवरून घरी परतत होते. रात्री साधारण साडे दहाची वगैरे वेळ असावी. में रोड वरून सुधीरने स्कुटर आपल्या सोसायटीकडे जाणारया आतल्या रोडकडे वळवली. सुधीर छान मूडमध्ये शिटी वगैरे वाजवत स्कुटर चालवीत होता. आणि अचानक सीमा सुधीरच्या कानाजवळ काही तरी कुजबुजली. सुधीरला नीट ऐकायला नाही आले म्हणून त्याने स्कुटर थांबवून सीमाला काय म्हणतेस म्हणून विचारले आणि त्या सुनसान रस्त्यावर भयाण शांततेत समोरच्या चिंचेच्या झाडाकडे बघत आणि उंगलीनिर्देश करीत सीमा पुन्हा सुधीरच्या कानात कुजबुजली "... वो आ गायी है.. ". सीमांचे ते थंडगार शब्द, ती भयाण शांतता, ते चिंचेचे झाड आणि सीमाच्या चेहऱ्यावरचे गूढ हास्य बघून सुधीरला त्या थंडीच्या दिवसातही दरदरून घाम फुटला. सीमाने सुधीरला मागून घट्ट आवळले आणि सुधीरचे प्राण कंठाशी आले. "अब काही जायेगा", "अब तू नाही बच सकता" वगैरे दात-ओठ खात ओरडत, डोळ्याचे बुब्बुळ पूर्ण वर गेलेली, मान वाकडी केलेली सीमा सुधीरला मृत्युसमान भासली. तिला ढकलत कशी-बशी त्याने स्वतःची सुटका करून घेत घराकडे धूम ठोकली. थोड्या वेळाने वोचमन व शेजारच्या काकांना सर्व हकीकत थोडक्यात सांगून व त्यांना घेऊन सुधीर चिंचेच्या झाडासमोर आला. त्यांना तिघांना सीमा तिथे बसलेली रडताना आढळली. ते तिला समजावून घरी नेतात.


सुधीरला कळून चुकते की हे सगळे उपाय आणि सायकिऍट्रिस्ट कडे नेऊन ही सीमावर परिणाम होत नाही, शेवटी कंटाळून सुधीर डिवोर्सचा निर्णय घेतो आणि सिमाला तिच्या आई-वडिलांकडे सोडून येतो


पुढे काही दिवस मित्राबरोबर राहत सुधीर त्याचे राहते घर सोडायचे देखील ठरवतो, पण एकटा जाऊन सामान काढायची त्याला भीती वाटते. तो मित्राला - आशिष ला - घेऊन जातो, घाबरलेल्या सुधीरला आधार आणि ह्या सर्व अंधश्रद्धांवर विश्वास नसणारा आशिष ऑफिसनंतर संध्याकाळी सुधीरबरोबर जाण्यास लगेच तयार होतो.


अमावास्येचा दिवस असतो, दोघे आठ वाजता घरी पोहोचतात, कुलूप उघडून घरात जातात, लाईट लावतात आणि काही वेळातच अचानक लाईट जातात.

मोबाइलला च्या बॅटरीच्या प्रकाशात दोघे बेडरूम मध्ये जातात, थोडी हवा यावी म्हणून आशिष खिडकी उघडतो तेवढ्यात रूममध्ये कसला तर "खट-खट-खट" असा आवाज सुरु होतो आणि एक बॉल (साधारण बास्केट बॉल साईझचा पण फुग्यातून थोडा जाड असतो तो) बेडरूम मध्ये गोल गोल फिरू लागतो. सुधीरला दरदरून घाम सुटतो आणि आशीषचीही तीच अवस्था झालेली असते.. दोघेही जिवाच्या आकांताने दरवाजा उघडून पळत सुटतात...


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror