रक्ताळलेला हात (भाग-१)
रक्ताळलेला हात (भाग-१)


टिक..टिक..टिक.. सेकंद काट्याने बाराचा आकडा गाठला तसा घडाळ्याने रात्री दोनचा टोल दिला. आणि तेव्हढ्यात शीतलचा फोन वाजू लागला. काही रिंग्ज झाल्यानंतर गाढ झोपेतुन जाग्या झालेल्या शीतलने "कोण इतक्या रात्री फोन करतंय" असा विचार करत जराशा त्रासिक नजरेनेच मोबाईल स्क्रीनकडे बघितलं.
"सानूचा फोन.. ह्यावेळी??" क्षणाचाही विलंब न करता शीतलने फोन उचलला. "बोल बेटा.. ". पलीकडून आवाज आला "काकू, मी मंजुषा.. सानवीची मैत्रीण". "मंजुषा? अगं मग सानवी कुठाय?". एव्हाना शीतलच्या काळजाचा ठोका चुकला होता. मंजुषा शीतलला सांगत होती, "काकू, सानवी खूप घाबरलेली आहे, ती थरथरते आहे, काय झाले ते मात्र काही सांगत नाहीये". शीतल म्हणाली "दे बघू फोन तिला". मंजुषाने सानवीच्या कानाला फोन लावला. शीतल तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती "सानू, काय झालं बेटा, तुला बरं नाहीये का.. कुणी काही बोललं का". "मम्मा, मम्मा..." घाबरलेल्या सानवीच्या आवाजात कंप जाणवत होता. "ममा, तू मला घ्यायला ये.." एवढंच फक्त ती बोलू शकली. नंतर शीतलने मंजुषाला "आम्ही निघतोय पुण्याला यायला, आम्ही येईपर्यंत सानूला एकटी सोडू नकोस" अशी सूचना केली. एव्हाना रोहनलाही शीतलच्या बोलण्याने जाग आली होती आणि सानू कशामुळे तरी घाबरली आहे आणि पुण्याला जायला हवं ह्याची त्याला कल्पना आली. पहाटे लवकर ५ वाजता वगैरे गेलो, तर पटकन पोहोचू असा दोघांनी विचार केला आणि "नेमकं काय झालं असावं ह्या पोरीला एवढं घाबरायला" असा विचार करतच दोघांचा डोळा लागला.
…. आणि शीतलला साधारण ४० वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला. त्यादिवशीही अमावास्याच होती. सुनंदाबाईंचा पारा चढलेला होता. इतक्या वेळा सांगूनही शीतल आणि तिची वानरसेना आजदेखील भरदुपारी गावाबाहेरील नदीवर वडीलधाऱ्यांच्या डोळा चुकवून शिंपले वेचायला जाऊन आली होती. निरागस शीतलला मात्र आईच्या चिडण्याचे कारण समजत नव्हते. सुनंदाबाईची नजर सारखी घराच्या कंपाउंडच्या गेटकडे जात होती, राजपूतसाहेबांची घरी जेवायला यायची वेळ झाली होती….
राजपूतसाहेब सरकारी क्लास-१ ऑफिसर असल्याने नोकरी निमित्त त्यांना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हा/तालुका पातळीवर वरच्या हुद्द्यांवर बदली होऊन जावे लागे. त्यांच्याबरोबर पत्नी सुनंदा व २ मुलं - मुलगा शरद व मुलगी शीतल - ह्यांनाही सर्व संसार आवरून फिरायला लागे. शरद स्वभावाने शांत होता, शीतल मात्र पटकन सर्वांशी आणि नवीन समवयस्क मुलांशी आणि मोठया लोकांशीही मिसळत असे.
१९८० साली राजपूतसाहेबांची बदली नांदूर ह्या तालुक्यात झाली होती. राजपूतसाहेब त्यांच्या स्वभावामुळे आणि धूळ खात पडलेल्या फायलींमधील विविध सरकारी यॊजना वेळेत मार्गी लावण्याच्या सपाट्यामुळे खान्देश आणि जवळील परिसरात आदराने ओळखले जात. कामात कुचराई आणि गलथानपणा करणाऱ्यांना सरळ करण्यात आणि प्रामाणिकपणे झोकून काम करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्याही पाठीशी राजपूतसाहेब नेहमीच उभे राहत. सरकारी मोहिमा राबवताना स्वतः आणि आपली टीम "क्लीन" राहून राजकीय दबावाखाली न येता सगळी जनहिताची कामं तडीस नेताना मात्र राजपूतसाहेबांची बऱ्याचदा तारेवरची कसरत होत असे. पण ते त्यांच्या अंगवळणी पडलं होतं.
नांदूरला आल्यावर राजपूतसाहेब आपल्या कामात व सुनंदाताई घर लावण्यात व दैनंदिनी निभविण्यात रममाण झाले. शरद आपला शाळा, अभ्यास, शिकवणी आणि थोडेफार नवीन मित्रांबरोबर गोट्या-गोट्या, खुपसणी, "कंगणी" इत्यादी खेळात गर्क असे. शीतल मात्र ह्या व्यतिरिक्त फुलपाखरे पकडणे, कॉलनीजवळील टेकडीवर मित्र-मैत्रिणींबरोबर जाणे, शाळेत सहल, स्नेहसंमेलन व इतर कार्यक्रमात अग्रभागी असणे ह्यातही सहभागी होत असे आणि जीवनाचा पुरेपूर आनंद लुटत असे. राजपूत कुटुंबीयांचा बंगला शहराबाहेरील विद्यानगरी ह्या कॉलनीत होता. विद्यानगरीतील बऱ्याच बंगल्यांमध्ये लोक अजून राहायला आलेले नव्हते, बरेच बंगले रिकामे होते. त्यामुळे, रिकाम्या बंगल्याभोवती गवत आणि झुडुपे वाढलेली असत. त्यावर फुलपाखरं वगैरे येत असत. त्यामुळे शीतल आणि तिचे मित्रमैत्रिणींसाठी हे रिकामे बंगले हा खेळायचा अड्डा असे. कधी-कधी ह्या बंगल्यातून किंवा जवळील झुडुपातून साप/नाग वगैरे निघत असत आणि मग (त्याकाळी एवढा पर्यावरणवादी दृष्टिकोन गावागावात हल्ली सारखा न पोहोचल्यामुळे) गावातील मंडळी साप मारीत आणि त्यांचे दहन करीत असत. शीतल आणि मित्रमंडळी मग अशा ठिकाणी आ वासून सगळा कार्यक्रम संपेपर्यंत तिथे पडीक असत. मग अशा प्रसंगी मात्र शीतलला सुनंदाबाईंचा ओरडा आणि प्रसंगी दोन-चार धपाटे खायला लागत. सुनंदाबाई पोरीच्या ह्या धीटपणामुळे कधी चिंतेत असत तर कधी त्या आपल्याच मनाला समजावत आजच्या जमान्यात मुलींमध्येही धीटपणा असावा.
…. राजपूतसाहेब कार्यालयातून घरी येताना शीतलचा मित्र मिलिंद पाटीलचे बाबा भेटले. “काय, कसे चाललेय” अशी एकमेकांची विचारपूस झाल्यावर पाटीलकाकांनी शीतलच्या बाबांना मुलं स्मशानाजवळ नदीत खेळायला गेले होते हे सांगितले. तेव्हा राजपूत साहेबानाही जरा काळजी वाटली कारण स्मशानाजवळच्या विचित्र, रहस्यमय घटना त्यांच्याही कानावर आल्या होत्या.
घरी आल्या-आल्या राजपूतसाहेब हात-पाय धुवून आले आणि सुनंदाबाईंनी त्यांना गरम-गरम जेवावयास वाढले. जेवता जेवता राजपूतसाहेबानी पाटीलकाकांबरोबर झालेल्या विषयाबाबत चौकशी केली. तेव्हा चिंतीत चेहरा असलेल्या सुनंदाबाई त्यांना म्हणाल्या "अहो, मी अगदी हेच तुमच्याशी आता बोलणार होते. शीतलने आणि ह्या मुलं-मुलींनी अगदी उच्छाद मांडलाय. फुलपाखरे पकडणे, टेकडीवर जाणे इथपर्यंत ठीक आहे हो, पण नदीजवळच्या त्या बाधित स्मशानाजवळ आपल्या कुणाला न विचारता-सांगता खेळायला आणि नदीत शिंपले वेचायला जाणे म्हणजे जरा जास्तच झाले." आणि थोड्या कमी आवाजात सुनंदाबाई काळजी आणि भितीयुक्त स्वरात म्हंटल्या "शेजारच्या कुलकर्णी वहिनी मागच्या आठवड्यातच सांगत होत्या की त्यांचा ड्रायवर मागच्या महिन्यात रात्री उशिरा त्या स्मशानाजवळच्या रस्त्याने येत असताना त्याची गाडी स्मशानाजवळ बंद पडली. तो उतरून काय झाले ते बघू या म्हणून गाडीचे बोनेट उघडले असता एक रक्ताळलेला हात बोनेट मधून बाहेर आला आणि त्याने ड्रायवरचा गळा दाबला". शेजारच्या खोलीत अभ्यास करत असलेल्या शीतलला आई-बाबांमधला संवाद अस्पष्टपणे ऐकायला येत होता. स्मशानाबाबतीत काही बोलताहेत कळल्यावर तिचे कान टवकारले. आई-बाबा बोलत असलेल्या खोलीच्या दाराजवळ ती येऊन उभी राहिली व गुपचूप त्यांचे बोलणे ऐकू लागली. सुनंदाबाई हलक्या स्वरात पुढे बोलत होत्या, "बेसावध असलेल्या त्या बिचारऱ्या ड्रायव्हरची अवस्था खूपच वाईट झाली होती. कसाबसा त्याने आपला गळा सोडवून घेऊन तिथून पळ काढला. आरडा-ओरडा करत तो थेट जवळील वस्तीत येऊन बेशुद्ध पडला. त्याच्या ओरडण्याने वस्तीतील काही मंडळी काय झाले बघू या म्हणून बाहेर आले असता त्यांना ड्रायवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्यांना आधी हा दारू वगैरे जास्त पिऊन पडला असावा अशी शंका आली, पण एकदोघांनी त्याच्या तोंडाजवळ नाक नेऊन तपासणी केली असता तसा काही प्रकार नाही आणि हा वेगळाच प्रकार दिसतोय असे लक्षात आले. एका गृहस्थाने पटकन घरातून पाण्याचा तांब्या आणला व त्याच्या तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. जरा वेळाने ड्रायवर शुद्धीवर आला पण तो अतिशय भेदरलेला होता." हे सांगत असताना सुनंदाबाईंचा चेहरा सुद्धा भयभीत दिसत होता. त्या पुढे म्हणाल्या "ड्रायवर शुद्धीवर जरी आला तरी तो अतिशय घाबरलेला होता. आणि “स्मशान.. भूत.. रक्ताळलेला हात माझा जीव घेणार, वाचवा.. मला वाचवा..” असं काहीबाही बरळत होता. मग वस्तीतील चार माणसांनी त्याला धरून घरी पोहोचवले, पण आजतागायत तो त्या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेला नाहीये म्हणे. स्मशानातील त्या अतृप्त आत्म्याने त्याला झपाटलेय म्हणतात. त्याच्या घरच्यांनी त्याला मांत्रिकाकडे नेले, ब्राह्मणाकडून विविध पूजा-अर्चा करून घेतल्या पण काही उपयोग झालेला नाही. हा कुणाशीही बोलायचाच बंद झालाय म्हणे आणि शून्यात नजर लावून असतो, कधी-खातो, कधी काही खात-पित नाही.. रात्री-अपरात्री, “सोड मला, सोड.. वाचवा, वाचवा, भूत, भूत…” असा ओरडून उठतो आणि सुसाट पळत सुटतो. झपाटलाय त्याला स्मशानातील भूतानी हो.. आणि आपली ही पोर तिथे खुशाल जाऊन मित्र-मैत्रिणींबरोबर खेळत असते." आईचा बाबांशी हा सगळा संवाद दाराआडून ऐकत असलेल्या शीतलचा आ वासला गेला, डोळे विस्फारले गेले आणि तिच्या कपाळावर घर्मबिंदु जमा झाले. ती तशीच परत आपल्या अभ्यासाच्या जागेवर परतली पण तिचं मन अभ्यासात लागेना. तेवढ्यात शीतलच्या बाबांनी "शीतल, बेटा इकडे ये जरा" असा तिला आवाज दिला. आता काही आपली खैर नाही, असे वाटून शीतल दबक्या पावलांनी हळू-हळू आई-बाबांजवळ आली आणि मान खाली घालून उभी राहिली. बाबानी तिला प्रेमाने जवळ घेतले व "काय गं बाळा , आज बरं वाटत नाहीये का? आणि हे काय, किती घाम आलाय तुला." तेव्हा बाबांचा ओरडा खायला लागणार अशा अंदाजाने घाबरलेली शीतल चक्रावली की बाबा रागवत कसे नाहीयेत. “नाही बाबा थोडं डोकं दुखतंय”. "अच्छा, आमच्या पिटुकलीला जरा बरं नाहीये होय? सुनंदा जरा पण सुंठ घातलेला चहा दे बघू, बरं वाटेल त्याने तिला." बाबांचा प्रेमळ स्वर व चेहरा बघून शीतलची भिती कमी झाली. बाबानी तिला "आणि कसा चाललाय बाळा तुझा अभ्यास वगैरे? ह्या वेळेस कुठले नाटक बसवताय तुम्ही मुलं?" असे जुजबी प्रश्न विचारून मग मूळ मुद्द्याला हात घातला. बाबा म्हंटले "अगं शीतल ते पाटील काका भेटले होते, ते म्हणाले तुम्ही मुलं घरी न सांगता नदीमध्ये खेळायला जातात?". आता शीतल पुन्हा धस्तावली व हळूच बाबांकडे बघत "कधीतरी जातो बाबा आम्ही तिकडे", एवढंच आवंढा गिळत म्हणाली. पण बाबा न रागावता तिला म्हणाले "बेटा, त्या बाजूला जाणं टाळत जा, ती चांगली जागा नाहीये.. ". तेव्हा शीतलने "बाबा, झपाटणे म्हणजे काय हो?" असा त्यांना उलट प्रश्न केला. तेव्हा चहा घेऊन आलेल्या सुनंदाबाईंना आणि राजपूतसाहेबाना शीतलने आपलं बोलणं ऐकलंय हे लक्षात आलं. तेव्हा जरा सुनंदाबाईकडे एक कटाक्ष टाकत सारवा सारव करत राजपूतसाहेब म्हणाले "अगं काही नाही, काही लोक उगीचच खूप घाबरतात, त्यांना 'झपाटलं आहे' असं म्हणतात.. ". शीतलने मग आईला बालसुलभपणे मोठ्ठाले डोळे करत विचारलं "आई, स्मशानात भुतं राहतात का गं?". सुनंदाबाई काही बोलणार तेवढ्यात बाबानी जवळ घेत शीतलला सांगितले "नाही बेटा, भूत-खेत असं काही नसतंच मुळात, लोकं उगीचच घाबरतात आणि इतरांना घाबरावतात". त्यांनी सुनंदाबाईंकडे "उगीच शीतल असताना विषय काढला", ह्या अर्थाने बघितलं. मग बाबानी शीतलला ऑफिसात न घडलेल्या गमती-जमती सांगत शीतलला हसते करत विषय बदलला.
नंतर रात्री जेवण करून शीतल शांतपणे झोपून गेली व दुसऱ्या दिवशी शाळेत चालत जातांना सर्व मित्र-मैत्रिणींचे बोलणे झाले व त्यांनी ठरवले की नदीकडे जायचे नाही, तिथे काहीतरी वाईट घडते म्हणून. शाळेत जाताना व वर्ग सुरु असताना मुलांच्या मनात मात्र "भूत, झपाटणे, मांत्रिक-तांत्रिक" अशा विचारांचे भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले होते. शाळेतून परत येताना सर्व मुलं गप्प-गप्प होती. मग सचिनने विषय काढलाच "कुणी त्या ड्रायवर काकांना बघितले आहे का रे?". मग सगळ्यांनीच "चक" करत नकार दिला. "त्यांना झपाटले म्हणजे काय झाले असावे", असं कुणीतरी दुसरा मुलगा म्हटला. तेव्हा त्यांच्यापैकी जरा समंजस असलेली बकुळा म्हटली "अरे, झपाटणे म्हणजे अंगात भूत शिरणे.. ". सगळी मुलं "बाप रे" अशा अविर्भावाने बकुळाकडे बघत राहिली आणि “नदीकडे चुकूनही जायला नको आणि आता भूता-बीताचे विषयही काढायचे नाहीत” यावर त्यांचं एकमत झालं.
…. रोहनला मात्र काही गाढ झोप लागली नाही व साधारण ४-४:१५ ला थोड्या वेळात निघावे असा विचार करून रोहन फ्रेश होऊन आला आणि गाढ झोपलेल्या शीतलला उठवावे म्हणून त्याने हळूच तिला हाक मारत तिच्या गाला-डोक्यावर स्पर्श केला. रोहनच्या हाताच्या थंडगार स्पर्शाने शीतल दचकून उठली. "आज अमावस्या आहे ना रे?" तिचा रोहनला अचानक प्रश्न.. त्याकडे दुर्लक्ष करत रोहनने "अगं, चल..आवर, पुण्याला जायला निघायचंय ना?" असं विचारल्यावर तिला एकदम थोड्यावेळापूर्वी आलेल्या फोनची आठवण होऊन सानूची पुन्हा काळजी वाटली. तीही पटकन फ्रेश होऊन आली आणि मग रोहनने गाडी पुण्याच्या दिशेने पिटाळली. शीतलचा पुन्हा थोड्या वेळाने लागला पण गाडीच्या हॉर्नने किंवा इतर गाड्या जवळून जायच्या आवाजाने तिला जाग येत होतीच. दोनेक तासात जरा उजाडलं आणि एका सिग्नलला रोहनने गाडी थांबवली शीतलचेही डोळे उघडले. जांभई देता-देता तिची नजर खिडकीतून बाहेर गेली आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याची म्हातारी "पोरी, चहाला पैसे देती का गं मला, रातच्याला जेवायलाबी भेटलं नाही बग.. " असं केवीलवाणेपणे शीतलला म्हणत होती. अशा नेहेमी येणाऱ्या अनुभवांनी दुर्लक्ष करणाऱ्या शीतलचं लक्ष मात्र म्हातारीच्या चेहऱ्यावरून हटत नव्हतं. तिने दहा रुपयाची नोट म्हातारीच्या हातात आपसूकच सरकवली. तिच्या ह्या कृतीने रोहनलाही आश्चर्य वाटले. शीतलची नजर म्हातारीच्या चेहऱ्यावर-डोळ्यांवर खिळली होती. म्हातारीचे डोळे इतके ओळखीचे का बरे वाटताहेत असा विचार शीतलच्या मनात डोकावला आणि तेव्हढ्यात सिग्नल ग्रीन झाल्याने रोहनने गाडी पुन्हा हाकायला सुरुवात केली. शीतलने डोळे मिटले होते, पण म्हातारीचे डोळे काही तिच्या नजरेसमोरून हटेनात.
……काही महिन्यांनी विद्यानगरीत एके दिवशी सकाळी एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि थोड्याच वेळात ती नांदूर गावातील सर्व रहिवाशांच्या तोंडावर होती. विद्यानगरीतील एक महाले म्हणून सद्गृहस्थ सकाळी फिरावयास निघाले होते. त्यांना एका बंद बंगल्याच्या पायऱ्यांवर धुणी-भांडी करणाऱ्या आनंदीबाईं पडलेल्या आढळल्या. त्यांना आधी वाटले चक्कर येऊन पडल्या की काय म्हणून त्यांनी जवळ जात आनंदीबाईंना आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण अजून जवळ गेल्यावर त्यांना आनंदीबाईंचे डोळे विस्फारलेले आढळले आणि शरीराची काहीही हालचाल होत नाहीये असे जाणवले. घाबरलेल्या महालेनी आसपासच्या बंगल्यातील लोकांना हाक मारून बोलावले, ५-७ माणसं-बायका जमा झाली आणि महालेना काय झालं म्हणून विचारू लागली. महालेनी बंगल्याच्या पायरीकडे उंगलीनिर्देश करीत आनंदीबाई सताड डोळे उघडून पडलेली आहे आणि तिची हालचाल किंवा श्वासोश्वासही जाणवत नाहीये असं सांगितलं. त्यातील एकदोघांनी आनंदीबाईजवळ जात त्यांना दवाखान्यात तत्काळ न्यायला हवे असे ठरवले, व त्यांना लवकर कसे नेता येईल ह्याचा विचारविनिमय सुरु झाला. तेवढ्यात त्यांना राजपूतसाहेबांची गाडी जाताना दिसली, राजपूतसाहेबांनीही त्या बंगल्याजवळ गर्दी बघून ड्रायवरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. आज सकाळी बाबा शाळेच्या वेळेत जाताहेत म्हणून शीतलने त्यांना "मला शाळेत गाडीतून सोडा ना बाबा आज" अशी गळ घातली, आणि राजपूतसाहेबही लेकीचा छोटासा हट्ट पुरवायला लगेच तयार झाले, शीतलला बरोबर घेऊन ते निघाले होते. एका गृहस्थाने राजपूतसाहेबाना काय घडले ह्याची थोडक्यात कल्पना देऊन आनंदीबाईला दवाखान्यात त्यांच्या गाडीतून सोडता येईल का असे विचारले. अर्थात राजपूतसाहेबानी “तात्काळ नेऊ या” म्हणत आनंदीबाईंना दवाखान्यात नेले. जाताना शीतल मागील सीटवरून विस्मयीत नजरेने आनंदीबाईकडे बघत होती आणि ती जरा घाबरलीच होती ते दृश्य बघून. दवाखान्यातील स्टाफने लगबगीने आनंदीबाईंना दवाखान्यात डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी आनंदीबाईंना तपासायला सुरुवात केली, तोपर्यंत राजपूतसाहेबानी हे जरा वेगळे प्रकरण दिसतेय ह्याची कल्पना येऊन दवाखान्यातील फोनवरून पोलिसांना कल्पना दिली. तपासल्यानंतर डॉक्टरांच्या ताबडतोब लक्षात आले की आनंदीबाईंचा श्वास बंद झालाय, त्यांनी ECG टेस्ट करून त्यावर रिपोर्ट फ्लॅट आल्याची खात्री झाल्यावर आनंदीबाईंना मृत घोषित केले. तोपर्यंत इन्स्पेक्टर जाधवही दोन हवालदाराना बरोबर घेऊन आले होते. ते डॉक्टरांशी मृत्यू कशामुळे झालेला वाटतोय ह्याबद्दल बोलत होते पण डॉक्टरांनाही प्रेताची अवस्था बघताक्षणी काही अंदाज बांधता येत नव्हता. नंतर जाधवसाहेब राजपूतसाहेबांशी काही मिनिटं बोलले व त्यांनी महालेंकडून माहिती घेतली. अजूनही भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या महालेनी त्यांना काय घडले ह्याची चाचरत माहिती दिली. शीतल हे सगळं घाबरत बघत होती, हे लक्षात आल्यावर राजपूतसाहेबानी जाधवसाहेब व इतरांचा "मला जायला हवे" असं म्हणत निरोप घेतला.
राजपूतसाहेबानी ड्रायवर भगवानला गाडी शीतलच्या शाळेकडे घ्यायला सांगितली. तेव्हा आनंदीबाई गेल्याचे समजलेला भगवान राजपूतसाहेबांशी बोलू लागला. "साहेब, त्या बंगल्याची जागा काही नीट नाही", तिथे काहीतरी असल्याच्या अनुभवाची कुजबुज त्याने अनेकांकडून कशी ऐकली होती हे तो राजपूतसाहेबाना सांगू लागला. बरोबर असलेली शीतल बाबाना चिटकून बसत सगळं ऐकत होती, आनंदीबाईंचे उघडे डोळे असलेले कलेवरही तिच्या डोळ्यासमोर वारंवार येत होते. शीतलची ही अवस्था लक्षात आल्यानंतर बाबानी भगवानबरोबर विषयांतर केले, पण त्यांनाही आनंदीबाईंच्या गूढ मृत्यूबद्दल काहीतरी रहस्य असल्याचे जाणवत होते. तेव्हढ्यात शीतलची शाळा आली आणि शीतल बाबांचा हात सोडत, त्यांचा निरोप घेत शांतपणे शाळेत गेली. ती गेल्यानंतर राजपूतसाहेबानी भगवान ड्रायवरला "अरे भगवान, लेकरांसमोर काय बोलावे आणि काय नको, हे काही कळते की नाही रे तुला, बघितली नाही का पोर कशी भेदरली होती ते" असे दटावले. भगवान मग ओशाळून "माफ करा साहेब, माझ्या लक्षात नाही आले, बेबी आपल्याबरोबर असताना हे विषय बोलायला नको म्हणून". "बरं ठीक आहे, चल आता पटकन, आपल्याला ह्या एक तास उशीर झालाय", असे राजपूतसाहेब म्हंटले आणि त्यावर "होय साहेब, घेतो लवकर गाडी आडगावला" असं म्हणत भगवान राजपूतसाहेबांचं काम असलेल्या आडगावच्या दिशेने गाडी घेऊन सुसाट निघाला. दोघांच्या मनात मात्र आनंदीबाईंच्या मृत्यूचे काय कारण असावे ह्याबद्दल विचार सुरु होते.
शीतलही शाळेत उशिराच पोहोचली होती, बाईंची परवानगी घेऊन ती पटकन आपल्या बेंचवर जाऊन बसली, पण तिचं काही बाईंच्या शिकवण्याकडे लक्ष लागेना. शेवटी मधली सुट्टी झाली आणि शीतलला तिचे मित्र-मैत्रिणी "चल, डबा खाऊ या" म्हणून घेऊन गेले. आणि "आज उशीर का गं झाला" असं बकुळाने विचारल्यावर शीतलने सकाळी काय घडले ह्याची ईत्तमभूत माहिती मित्र-मैत्रिणींना दिली, तसेच भगवानकाका त्या बंगल्यात असलेल्या अमानवी शक्तींबद्दल काय म्हणत होते, हेही सांगितले. सगळ्या मुलांच्या अंगावर शहारे आले, काही न बोलता एकमेकांकडे ती बघू लागली व घरी गेल्यावर घरच्या मोठ्यांकडून काहीतरी "डेंजर" माहिती आज नक्की मिळेल असे सर्वाना वाटले. शाळा सुटल्यावर मुलं नेहेमीप्रमाणे हसत-खिदळत, एकमेकांच्या खोड्या काढत न जाता जरा शांतपणेच जात होती.
शीतल घरी आली, आईला तिने सकाळी आनंदीबाईंच्याबाबतीत काय झालं, भगवानकाका बंगल्याबद्दल काय म्हणत होते इत्तम्भूत माहिती दिली, एव्हाना सुनंदाबाईंच्या कानावर ही बातमी आली होतीच, तसेच त्या बंगल्यात काहीतरी "बाहेरची शक्ती" असल्याची माहिती देखील ओळखीच्या बऱ्याच बायकांकडून त्यांच्या कानावर आली होती. उगीच मुलीसमोर ही घटना घडली असे त्यांना राहून-राहून वाटत होते. तिने “आनंदीबाई आजारी होती आणि म्हणून देवाघरी गेली”, अशी बळेच शीतलची समजूत काढली आणि तिला जवळ घेत "तू नको काही विचार करत बसू बेटा" असे म्हणून तिला कवटाळले. रात्री शीतल व शरदला त्यांनी लवकर जेवून झोपून घेण्यास सांगितले. शीतलला त्यांनी आपल्या पलंगावर झोप असे सांगितले. शितललाही झोप अनावर झाल्याने ती झोपी गेली.
रात्री उशिरा राजपूतसाहेब आले, जरा फ्रेश झाल्यावर त्यांना सुनंदाबाईंनी जेवायला वाढले. जेवत असताना सुनंदाबाईंनी नवऱ्याला शांतपणे जेवू द्यावे म्हणून काही विषय नाही काढला. राजपूतसाहेबही कामाने आणि प्रवासाने शिणले होते, व त्यांना सडकून भूकही लागली होती, त्यामुळे ते शांतपणे जेवत होते. त्यांचे जेवण झाल्यावर सुनंदाबाईही जेवायला बसल्या, व जेवण झाल्यावर स्वयंपाकघर आवरून झोपायला गेल्या. राजपूतसाहेबही त्यांच्या कामाच्या एक-दोन फायली चाळून ऑफिसमधील उद्याच्या कामाची पूर्वतयारी करून दिवा बंद करून पलंगावर आले. मधे झोपलेल्या शीतलच्या डोक्यावर त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि मग त्यांना एकदम सकाळचा प्रसंग आठवला व त्याबद्दल ते सुनंदाबाईंबरोबर बोलू लागले. सुनंदाबाईंनी शीतलने साधारण सगळी माहिती दिली असल्याचे त्यांना सांगितले, तसेच भगवान आणि कॉलनीतले इतर लोक "त्या" बंगल्यातील बाह्यशक्तीबद्दल काय-काय म्हणत होते ह्याबद्दल त्यांच्यात चर्चा सुरु झाली. मग सुनंदाबाईंनी दिवसभर कॉलनीतील लोकांबरोबर आनंदीबाईंचा मृत्यू आणि त्यास तो बंगला कसा कारणीभूत ठरला असावा ह्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. सुनंदाबाई सांगत होत्या "अहो, तो बंगला म्हणे ४-५ वर्षांपूर्वी शेजारच्या पळोदा तालुक्यात असलेल्या वळवी म्हणून कुटुंबीयांनी विकत घेऊन ठेवला आहे. त्यांना त्यावेळी लवकरच नांदुरला बदली होणार अशी कल्पना देण्यात आली होती. पण एक वर्षाच्यावर काळ झाला तरी बदली काही होत नाही बघून आणि बंगल्याची अवस्थाही नीट राहत नसल्यामुळे त्याची जरा मधून-मधून साफसफाई व्हावी ह्या उद्देशाने शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी बोलून, आनंदीबाई विश्वासू आहे अशी खात्री पटल्यावर तिच्याकडे एक चावी ठेवली होती. आनंदीबाई नित्यनेमाने दर आठवड्याला बंगल्याची छान साफसफाई करीत असे. काही दिवसांनी तिला लक्षात आले की सकाळी बंगल्यातले दिवे सुरूच असतात. आधी तिचा समज झाला की आपण कधी संध्याकाळी उशिरा अंधार झाल्यावर येतो, मग मागच्यावेळी दिवे आपल्याकडूनच बंद करायचे राहिले असावे. पण असे वारंवार होऊ लागल्यावर तिला कुणीतरी बंगल्यात चोरून राहत तर नाही ना अशी शंका आली. ती शंका आनंदीबाईने विद्यानगरीचा रखवालदार असलेला आपला नवरा बबनला सांगितली. बबन इतर रखवालदारांप्रमाणेच संध्याकाळपासून सकाळपर्यंत रात्री नावाला रखवालदारी आणि दिवसा इतर मजुरीची कामं करत कुटुंबाच्या गरजा पुरवत असे. त्यामुळे बहुधा रात्री ११-१२ वाजेनंतर तो कॉलनीतच एका ओट्यावर झोपलेला असे. त्यामुळे त्याच्या लक्षात कधी ह्या बंगल्यातील दिवे सुरु असतात की बंद हे लक्षात आले नव्हते." राजपूतसाहेब पत्नीकडून ही गोष्ट शांतपणे ऐकत होते. सुनंदाबाई पुढे सांगत्या झाल्या "आनंदीबाईने जेव्हा बबनला बंगल्यातले दिवे सुरूच असतात असे सांगितले तेव्हा त्याने ठरवले कुणी बंगल्यात चोरून राहतंय की काय हे बघायचे आणि त्याप्रमाणे वळवी साहेबाना कळवता येईल. दुसऱ्या रात्री बबन लवकर न झोपता ११-११:३० नंतर हातात त्याची नेहेमीची लाठी घेऊन बंगल्याच्या दिशेने गेला. लांबून त्याला बंगल्याचे दिवे बंद असलेले आढळले, जरा जवळ गेल्यानंतर सुद्धा त्याला अंधारच जाणवला. तेव्हा आनंदीबाईंचा उगीच काहीतरी गैरसमज असावा असं मनात म्हणत थोडं बंगल्याच्या अजून जवळ जाऊन थोडा वेळ थांबून मग झोपायला जावं असा विचार करीत बबन बंगल्याच्या दिशेने जात राहिला. अगदी जवळून देखील एकाही खोलीत प्रकाश दिसत नाही हि खात्री झाल्यावर बबनने आनंदी उगीच डोक्याला ताण देते असं मनात म्हणत तंबाखू-चुन्याची स्टीलची डबी काढून तंबाखू हातावर काढून त्यावर चुना मळून, तंबाखूची चिमूट मान वर करून खालच्या ओठाआड सोडली.. आणि त्यानंतर मान खाली पूर्ववत आल्यावर वळून जायला निघणार एवढ्यात बबनला बंगल्याच्या उजव्या बाजूच्या बंद खिडकीच्या काचेतून दिव्याचा अंधुकसा प्रकाश जाणवला. काही सेकंदांपूर्वीच पूर्ण काळोखात असलेला बंगल्याच्या एका खिडकीतून येणारा प्रकाश बघून, बबन चपापला. तंबाखूची “किक” तर नाही बसली ह्या विचाराने त्याने डोकं जोरात हलवून परत प्रकाशाकडे बघितले व प्रकाश खरंच दिसतोय ह्याची त्याला खात्री झाली. बबन तसा शरीर आणि मनानेही धडधाकट होता. हातातील लाठी सावरत तो प्रकाश येणाऱ्या खिडकीच्या दिशेने पावलांचा आवाज येणार नाही ह्याची खबरदारी घेत चालू लागला. खिडकीच्या जवळ पोहोचल्यावर आडोसा घेत काही कुणाचा आवाज वगैरे येतोय का ह्याचा कानोसा बबन घेऊ लागला. त्याला कसलाही आवाज आला नाही, परंतु दिवा नक्कीच सुरु होता. बबन जवळपास अर्धा एक तास थांबून काही आवाज येत नाही, कुणी दिसत नाही म्हटल्यावर दिवा आनंदीबाईकडूनच सुरु राहिला असावा आणि सुरुवातीला आपल्या लक्षात आले नसावे असे स्वतःच्या मनाची समजूत घालत आणि सकाळी आनंदीला घेऊन चावी आणून बंगला उघडून काही लक्षात येत का बघू या असे ठरवत तो आपल्या नेहेमीच्या जागी जाऊन झोपला. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बबन आणि आनंदी बंगल्यावर आले, कुलूप उघडून त्यांनी आत प्रवेश केला तर फक्त उजव्याच नव्हे, तर बंगल्यातील सर्व खोल्यातील दिवे सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले! त्यांनी अजून काही कुणी आहे, किंवा कुणी रात्री येऊन गेल्याच्या काही खुणा दिसताहेत का बघावे म्हणून सर्व खोल्या तपासल्या, पण बंगल्यात तसे काही त्यांना आढळले नाही. बबन आनंदीला म्हणाला चल, दिवे बंद करू या आणि कुलूप लावून बाहेर पडू या, व ते दोघे बाहेर गेले. वाटेत बबन आनंदीला म्हणाला तू काही चिंता करू नकोस आज रात्रीच्या पहाऱ्याला मी अजून डोळ्यात तेल घालून बघतो, कोण बंगल्यात येतात ते. आनंदीने मान डोलावली पण ती मनात भेदरली होती. दुसऱ्या रात्री बबन पुन्हा ११-११:३० च्या दरम्यान बंगल्याजवळ आला. साधारण अर्धा-एक तास त्याला प्रकाश जाणवला नाही, पण जवळपास १२ वाजता दिव्याचा अंधुक प्रकाश काल सारखाच त्याला दिसला. बबन सावध झाला. आज लाठी ऐवजी त्याने चांगला मजबूत लोखंडी गज सोबत आणला होता. कुणी चोरांची टोळी वगैरे असली तर सामना करता यावा म्हणून. बबन बंगल्याच्या खिडकी जवळ जाऊन कानोसा घेऊ लागला, त्याला कसलाही आवाज आला नाही. थोड्या वेळाने दुसऱ्या खिडकीतूनही अंधुकसा प्रकाश आला, त्या खिडकी जवळही बबनला काही आवाज वगैरे आला नाही, असं करत साधारण तासाभरात सर्व बंगल्याचे दिवे सुरु झाले तेव्हा, च्यायला बघतोच कोण आहे आत, असे म्हणत बबन कुलूप उघडून आत गेला. तो सावधपणे लोखंडी गज दोन्ही हातानी गच्च धरत एकेका खोलीत जात होता, पण कुणी त्याला आढळले नाही. तेव्हा काहीतरी विजेच्या तारांचा फॉल्ट आहे, असं मनाला समजावत बबन बाहेर पडला आणि जाऊन झोपला. सकाळी आनंदीबाईला त्याने सांगितले अगं दिवे सुरु होतात पण तू घाबरू नकोस, विजेच्या तारांचा फॉल्ट दिसतोय मी दुपारून वीज कंपनीच्या ऑफिसात जाऊन सांगून येतो चेक करायला. ह्या उत्तराने आनंदीबाईंचे जरी पूर्ण समाधान झाले नाही तरी बबन म्हणतो म्हटल्यावर असू शकते असे तिला वाटले. त्याप्रमाणे बबन वीज कंपनीच्या कार्यालयात जाऊन दुपारी चौकशी केली तेव्हा “विद्यानगरीत कुठल्याही प्रकारचा विजेच्या तारांचा फॉल्ट नाही, तसेच ‘त्या’ बंगल्यात विजेचा वापर बरेच महिने झालेला नाही, जर रात्रभर वापर झाला असता तर मीटर रिडींगमध्ये काहीतरी फरक दिसून आला असता, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय बबनभाऊ”, असं सांगून इंजिनीयरने त्याची बोळवण केली. बबन “तुम्ही नवीन आहेत साहेब, बघा जरा नीट चेक करून” असं पुटपुटत बाहेर पडला. पण आनंदीबाई घाबरू नये म्हणून त्याने तिला इंजिनियर तारा चेक करतो म्हणले असं सांगितलं व तू खूप पहाटेच्या वेळी वगैरे त्या बंगल्यात जाऊ नकोस, दिवस उजेडी जात जा असा सल्ला आनंदीबाईला दिला. त्यानंतर आज त्या बंगल्यात आनंदीबाईंबरोबर काय घडले कुणास ठाऊक." असं म्हणत सुनंदाबाई बोलायच्या थांबल्या. राजपूतसाहेब त्यांना म्हटले, "काळजी करू नकोस, उद्या इन्स्पेक्टर जाधव साहेबांकडून माहिती घेतो आणि आपल्या भागात सर्व नीट होईपर्यंत पोलिसांची गस्त ठेवण्याची त्यांना विनंती करतो". थोड्यावेळाने दोघे झोपी गेले.
आज आनंदीबाईला इतर दोन कामं जास्त आल्याने आणि बंगल्याच्या साफसफाईचंही काम असल्याने ती पहाटेच बंगल्याची साफसफाई पटकन करून मग पुढील कामं करावी ह्या विचाराने ती झपझप पावलं टाकत बंगल्याकडे निघाली. दरम्यानच्या आठवड्यात आनंदी आणि बबन दोघेही बंगल्यातील दिवे आपोआप लागण्याच्या रहस्याबद्दल विसरले होते. आनंदीबाईने कुलूप उघडले आणि अचानक कुणीतरी तिला अतिशय जोरात खसकन ओढले, आनंदी किंचाळणार तेवढ्यात तिचे तोंड कुणीतरी गच्च दाबले. आनंदी डोळे विस्फारून जिवाच्या आकांताने बघत होती व आपली सुटका करायचा प्रयत्न करत होती. आश्चर्य म्हणजे तिला कुणी आपल्याला ओढतय आणि कुणी आपलं तोंड दाबतंय हे सपशेल दिसत नव्हतं. थोड्यावेळाने आनंदीला आपला गळाही दाबला जातोय हे जाणवले आणि गळ्यावरची पकड अतिशय मजबूत हातानी जखडली जातेय हे जाणवले. आनंदीबाईला आता आपले काही खरे नाही हे जाणवले. तेव्हढ्यात तिला गुरगुरल्यासारखा आवाज आला आणि एक विचित्र अशी आकृती तिला दिसली, हळू हळू तिला स्पष्ट दिसू लागले की एक अमानवी शक्ती जिला डोळ्यात काळ्या बुब्बुळांऐवजी लाल बुब्बुळ आहेत, जिचा रक्ताळलेला हात तिचा गळा दाबतोय आणि तोंडातले सुळे तिच्या मानेचा लचका तोडणार आहे. डोळे विस्फारून हे बघणारी आनंदी जिवाच्या आकांताने ओरडते..
“मला वाचवा, हे भूत माझा जीव घेतय, माझा गळा दाबतंय... आई-आई, मेले.. मेले"... आणि शीतलच्या ह्या झोपेत किंचाळण्याने तिचे आई-बाबा तात्काळ उठले आणि "शीतल.. बेटा.. काय होतय तुला... अगं आम्ही तुझ्या जवळच आहोत".. असं म्हणत शीतलच्या बाबानी दिवा लावला आणि शीतलच्या गालावर हळू-हळू चापट्या मारून तिला उठविले. शीतलने हळू-हळू डोळे उघडले पण ती अजूनही अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होती, ती दोन्ही पाय पोटाशी दुमडून पलंगावर बसून अक्षरशः थरथर कापत होती. सुनंदाबाई लेकीची अवस्था बघून अत्यंत अस्वस्थ झाल्या. शरदही ह्या शीतलच्या किंचाळण्याने घाबरून उठला व नंतर शीतलला काहीतरी वाईट स्वप्न पडलंय त्यामुळे ती घाबरून किंचाळत होती हे कळल्यावर जरा सावरून तिच्याजवळ बसला. सुनंदाबाईंनी शीतलला पाणी प्यायला दिले व तिला छातीशी घेत तिच्या पाठीवर हात फिरवीत, “घाबरू नकोस बाळा, तुला काहीतरी वाईट स्वप्न पडलंय, बघ मी, बाबा, दादा सर्व तुझ्या जवळ आहोत”. बराच वेळ रडत, मुसमुसत नंतर शीतल शांत झाली आणि मग आईच्या कुशीत शिरून झोपी गेली. सकाळी सुनंदाबाईंनी लेकीला आज शाळेत जाऊ देऊ नये, आराम करू द्यावा व तिची भिती मनातून काढायचा प्रयत्न करावा असे ठरवून तिला लवकर उठवले नाही. सकाळी राजपूतसाहेब "घाबरू नकोस, अशी स्वप्नं पडतात मुलांना, काळजी घे शीतलची" असं म्हणून कार्यालयात नेहेमीच्यावेळी निघून गेले.
शीतल उशिरा उठली आणि तिने सुनंदाबाईंना विचारले "आज शाळेत जायला का नाही उठावलेस आई?". सुनंदाबाई हलके हसत तिच्या माथ्यावर हात ठेवून म्हटल्या "अगं बाळा रात्री जरा तुला बरं वाटत नव्हतं ना, तेव्हा म्हटलं तुला आराम करू द्यावा, कसं वाटतंय तुला आता बाळा?". शीतल उत्तरली "मी ठीक आहे, काहीतरी भुताचं स्वप्नं पडलं होतं आई मला, म्हणून मला खूप भीती वाटत होती". तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत सुनंदाबाई तिला नेमकं काय स्वप्न पडलं हे जाणून घेण्यासाठी तिला म्हटल्या "अगं भूत वगैरे असं काही नसतं, काय बरं स्वप्नं पडलं होतं तुला, आठवतंय का, सांग बघू". आईने सहज विचारलेल्या ह्या प्रश्नाने शीतलला जरा धीर आला आणि ती सांगू लागली "आई, मला असं वाटलं मी आनंदीबाई आहे आणि मी त्या बंगल्यात जात होते आणि... ", असे म्हणत तिने पडलेले स्वप्न सुनंदाबाईंना विस्ताराने सांगितले आणि सुनंदाबाईंच्या लक्षात आले की आनंदीबाईंच्या मृत्यूबाबतीत लेकीच्या मनाने धसका घेतला आणि काहीतरी काल्पनिक घटना तिला स्वप्नात दिसल्या. परंतु कालपासून विविध चर्चाना विद्यानगरी आणि संपूर्ण नांदूर गावात उधाण आले होते. कारण पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात कुठल्याही प्रकारचा पुरावा "त्या" बंगल्यात आढळला नव्हता आणि आनंदीबाईंचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले होते. पण आनंदीबाईंच्या प्रेताच्या गळ्यावर कुणाच्याही हाताचे ठसे आढळून न आल्याने डॉक्टर आणि जाधवसाहेब व त्यांचे इतर सहकारीही चक्रावले होते. आनंदीबाई गेल्याने बबन अतिशय दुःखी झाला होता, पोलिसांनी संशयाने त्याचीही चौकशी केली होती, परंतु त्याच्याबरोबर बोलल्यावर आणि विद्यानगरीतल्या व बबन-आनंदीबाई राहत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांशीही बोलल्यावर जाधव साहेबाना खात्री झाली की बबनचे आनंदीबाई आणि आपल्या तीन लेकरांवर प्रेम आहे आणि त्याच्या सरळमार्गी आणि प्रामाणिक स्वभावाचीही त्यांना कल्पना आली. बबनने जाधवसाहेबाना बंगल्यातले दिवे आपोपाप सुरु आणि बंद कसे होताना त्याला व आनंदीबाईला आढळले, त्याने त्यावर कसे लक्ष ठेवले, दिवे रोज रात्री सुरु होऊनदेखील विजेचे मीटर रिडींग कसे बदलत नाही, ह्याबद्दल जाधवसाहेबाना सविस्तर सांगितले. जाधवसाहेबानी त्या दिशेने तपास करायचा ठरविले, आणि आनंदीबाईंचा मृत्यू सध्या तरी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवावा लागेल असा विचार त्यांच्या मनात आला. जाधवसाहेब भूत-खेत अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे नव्हते.
त्या रात्रीच जाधवसाहेब स्वतः साडे अकराच्या सुमारास आपल्याबरोबर दोन हवालदाराना घेऊन "त्या" बंगल्यापाशी येऊन काही हालचाली दिसतात का ह्याची टेहळणी करू लागले. अर्धा तास बंगल्याभोवती काळाकुट्ट अंधार होता. त्यानंतर अचानक पुसटसा उजेड उजव्या बाजूच्या खिडकीतून आल्यासारखा वाटला. दोन्ही हवालदारानी आधी एकमेकांकडे आणि नंतर जाधव साहेबांकडे बघितले. तिघेही पावलांचा आवाज न करता थोडे पुढे सरसावले. जाधवसाहेबानी बबनकडून घेतलेल्या किल्लीने हळूच कुलूप आणि बंगल्याचे मुख्य दार उघडले. आत कुठल्याहीप्रकारचा आवाज येत नव्हता, ते आत आल्यानंतर बंगल्यातील सर्व खोल्यांचे दिवे सुरु झाल्याचे त्यांना दिसले. तिघेही बुचकळ्यात पडले, हळू-हळू त्यांनी एक-एक करत सर्व खोल्यांमध्ये जाऊन कुणीही बंगल्यात नाही, ह्याची शहानिशा केली आणि नंतर दीड-दोन तासांनी काही उकल होतेय का ह्याची वाट बघत, शेवटी हाती काही न लागण्याचा अंदाज आल्याने, बंगल्यातून बाहेर पडले. तिघेही शांतपणे जात होते आणि बंगल्यातले दिवे आपोआप सुरु होण्याचे काय गौडबंगाल असावे ह्याबद्दलचे विचार तिघांच्या मनात सूरु होते. शेवटी शांततेचा भंग करीत जाधवसाहेब आपल्या दोन्ही सहकाऱ्यांकडे बघत म्हणाले "बबन म्हणतोय त्याप्रमाणे विजेच्या लाईनीत प्रॉब्लेम वाटतोय. चला, आता चौकीत जाऊ आणि नंतर सकाळी लवकर - सहाच्या आत वगैरे - येऊन पुन्हा बघू या ". पण रात्री साधारण बारा वाजताच हे विजेचे तार कसे बिघडतात हा प्रश्न मात्र त्यांनाही सतावत होताच! चौकीत गेल्यावर तिघांनी चहा घेतला व जाधवसाहेब झुरके मारत विचार करू लागले, ह्यात खरंच काही रहस्य असावे का. पण अर्थात तपास पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही तर्कावर शिक्कामोर्तब करणं त्यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं. दोन-तीन तासांनी जाधवसाहेब सहकार्यांना म्हंटले, "मराठे, पाटील, चला गाडी काढा, काही सुगावा लागतोय का बघू या." पोलीस हवालदार पाटलांनी जीप काढली, आणि जाधवसाहेब व पोलीस हवालदार मराठेंना घेऊन बंगल्याजवळ आले. साधारण साडे-पाच सहाचा सुमार होता, अजून उजाडायचं होतं. त्यांनी हळूच कुलूप उघडून बंगल्यात प्रवेश केला. दिवे सुरूच होते. पुन्हा त्यांनी सर्व खोल्यांची कसून तपासणी केली, काही ठसे, संशयास्पद वस्तू, काही दिसतेय का हे बारकाईने बघितले, परंतु तसे काही आढळले नाही. जाधवसाहेब बाथरूमच्यावर असलेल्या माळ्यावर काही दिसतेय का म्हणून पाय उंचावून बघत होते, मराठे शेजारील खोलीची तपासणी करीत होते आणि पाटील स्वयंपाक खोलीत तपासणी करीत होते. पाचेक मिनिटांनी जाधव साहेबाना व मराठेंना अचानक जोरजोरात पाटलांच्या ओरडण्याचा आवाज आला. ते दोघेही पाटलांच्या आवाजाच्या दिशेने स्वयंपाकखोलीकडे धावले. त्यांना समोरील दृश्य बघून हसावे की रडावे कळेना. एका काळ्या मांजराबरोबर पाटलांची झटापट सुरु होती. जाधवसाहेब पाटलांना मिश्किल चेहऱ्याने म्हणाले, "काय पाटील, आता मांजरालाही घाबरायला लागलात होय.. ". त्यानंतर पाटलांनी आधी त्या काळयाशार मांजरीला मुख्य दार उघडून पिटाळले. पाटील नंतर म्हंटले "अहो साहेब, हे मांजर अचानक कुठून आले कळलेही नाही". नंतर तिघेही विचार करू लागले की सर्व दारं-खिडक्या बंद असलेल्या ह्या घरात हे मांजर कुठून आले असावे? मराठे बाहेरच्या खोलीत जाऊन मुख्य दरवाजा उघडून बघू लागले दिसतेय का ते काळे मांजर कुठे, पण ते दिसले नाही. त्यांना बाहेर उजाडू लागल्याचे मात्र जाणवले आणि तेवढ्यातच अचानक बंगल्याचे सर्व दिवे आपोआप बंद झाले! तिघांनी आधी दिव्यांकडे आणि नंतर एकमेकांकडे बघितले. ह्या बंगल्यात नक्कीच काहीतरी गूढ असावे हा विचार तिघांच्या मनात एकाचवेळी डोकावला. पण तो बोलून दाखवणे तिघांना योग्य वाटले नाही.
थोड्यावेळाने बंगल्याच्या मुख्य दाराला कुलूप लावून तिघेही घरी जाण्यास निघाले. तिघांच्या मनात इथे काय गूढ असावे, आनंदीबाईच्या मृत्यूचे काय रहस्य असावे हे विचार घोळत होते.
दोन-तीन दिवसांनी जाधवसाहेब आणि राजपूत साहेबांची भेट झाली आणि राजपूतसाहेबानी आनंदीबाईंच्या मृत्यूबाबत काही ठोस कारण कळले का म्हणून चौकशी केली. पण "अजून काही नाही" असे म्हणत जाधवसाहेबानी त्यांना स्वतःला बंगल्यात काय अनुभव आला, बबन आणि आनंदीला काय अनुभव आला होता, ह्याचे सविस्तर कथन केले. तेव्हा राजपूतसाहेबही विचारात पडले, व त्यांच्या कानावर आलेल्या एक-दोन गोष्टी जाधवसाहेबाना सांगितल्या. त्या बंगल्याच्या आधीचे मालक देशमाने आपल्या पत्नीसोबत इथे राहत होते. त्या दाम्पत्याला मूलबाळ नव्हते. बरेच उपचार अनेक वर्ष करूनही त्यांना मुलबाळ झाले नव्हते. आणि त्यातच सौ. देशमानेना कँसर झाला. आधीच हताश झालेल्या देशमानेना अजून समोर दुःखाचा डोंगर दिसू लागला. त्यांनी पत्नीच्या उपचारासाठी होता नव्हता तेव्हढा पैसा खर्च केला, पै-पै जोडून हा बंगला घेतला होता तो घाईघाईत ४-५ वर्षांपूर्वी वळवी कुटुंबाला विकला आणि तो पैसाही पूर्णपणे पत्नीच्या उपचारांसाठी वापरला. दरम्यान वळवी कुटुंब लगेच येणार नसल्याने देशमाने स्वतःच्या घरात भाड्याने राहू लागले, व त्यांच्या पत्नीच्या आजारपणाची कल्पना वळवी कुटुंबियांना असल्यामुळे त्यांनी त्यांना "आम्ही लगेच काही शिफ्ट होणार नाही आहोत, त्यामुळे तोपर्यंत तुम्ही निवांत इथे राहू शकता" असे त्यांना सांगितले. देशमानेना जरा दिलासा मिळाला, पण पत्नीवर अनेक नामवंत कँसर स्पेशालिस्टकडून गावात, पुणे-मुंबईत उपचार करूनही ते तिचे प्राण वाचवू शकले नाही. मृत्यूशी झगडत अखेर एक दिवस देशमानेबाई थांबल्या, त्या कायमच्या. पत्नीचा विरह देशमाने सहन करू शकले नाही. ते शांत-शांत राहू लागले, प्रसंगी भ्रमिष्टासारखे वागू लागले. वळवींना जेव्हा त्यांची बदली नांदूरला होण्याची शक्यता कळली तेव्हा त्यांनी देशमानेना घर रिकामे करण्यास सांगितले. पण देशमाने सपशेल "नाही" म्हंटले. "माझी पत्नी इथे एकटी कशी राहील, मी तिला सोडून जाऊ शकत नाही" असं म्हणाले. वळवी चक्रावले, व त्यांनी शेजारील दोघं-तिघांना बोलावून देशमानेना समज देण्याचा प्रयत्न केला. असे ३-४ वेळा झाल्यावर वळवींनी पोलिसात तक्रार केली आणि पोलिसांनीही देशमानेना पोलिसी खाक्याने समजावले. ह्या सगळ्याच्या परिणामाने धास्तावलेलया देशमानेनी पंख्याला स्वतःला लटकावून घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या हातात पोलिसांना "मी ह्या घरातून जाणार नाही... " फक्त एव्हढे पाच शब्द लिहिलेली चिट्ठी मिळाली. वळवी कुटुंबालाही ह्या घटनेबद्दल वाईट वाटले, आणि त्यांच्या बदलीचे पुढे ढकलले जातेय हे कळून त्यांना खरे म्हणजे थोडासा दिलासाच मिळाला. काही महिने-वर्ष निघून गेल्यावर ह्या घरात राहायला यायला लागले तर बरंच, असं त्यांना वाटले. म्हणून नंतर काही काळाने घरात होणारी, धूळ-जाळे, झुरळ, उंदीर ह्यांची घाण, घराभोवती वाढणारी झुडुपे, ह्यापासून घराची मधून-मधून साफसफाई व्हावी म्हणून त्यांनी ते काम आनंदीवर सोपवले होते. अनेक गुंडाना आपल्या पोलिसी खाक्याने आणि दराऱ्याने सरळ करणारे जाधवसाहेबही बंगल्याचा हा इतिहास ऐकून सुन्न झाले. आणि बंगल्यात आपल्याला २-३ दिवसांपूर्वी आलेल्या अनुभवाचा "मी ह्या घरातून जाणार नाही... " ह्या देशमानेंच्या सुसाईड नोटशी काही संबंध तर नसू शकतो ना, हा विचार त्यांच्या मनात तरळून गेलाच....
रात्री घरी परत आल्यावर राजपूतसाहेब आणि कुटुंबीय जेवण करून, थोडावेळ गप्पा मारून झोपावयास गेले. शीतल राजपूतसाहेब आणि सुनंदाबाईंच्या मधेच होती. मुलं झोपलेत ह्याची खात्री झाल्यावर राजपूतसाहेबानी सुनंदाबाईंना इन्स्पेक्टर जाधवांचा बंगल्याच्या बाबतीतला अनुभव, देशमाने दाम्पत्याचा त्या घरातील मृत्यू व देशमानेंची पाच शब्दांची सुसाईड नोट ह्याबद्दल सांगितले तेव्हा सहसा अंधश्रद्धा न बाळगणाऱ्या सुनंदाबाईही विचारात पडल्या. राजपूसाहेब आणि सुनंदाबाईंना हे जाणवलंच नाही की त्यांच्या हळू आवाजातल्या बोलण्यानेही शीतलला जाग आली आहे आणि तिने सर्व ऐकले आहे. दुसऱ्या दिवशी शाळेतुन येताना शीतलने आपले आई-वडील काय बोलत होते ते सर्व मित्र-मैत्रिणींना सांगितले व "त्या बंगल्यापासून लांबच राहू या बाबा" असे सगळ्यांनी ठरवले. त्यानंतर काही दिवस-आठवडे आणि महिने गेले, आनंदीबाईच्या मृत्यूचे गूढ गूढच राहिले, आपापल्या आयुष्यात रमलेले लोक ते विसरले तसेच शीतल आणि त्यांचा ग्रुपही ते विसरले, पण शीतलला आनंदीबाईने आपला मृत्यू कसा झाला हे प्लॅन्चेटवर सांगितले होते... होय! प्रवीण दादाच्या घरी सुटीत गेली असताना. आता तिला तो वाटी फिरणारा प्लॅन्चेटचा पाट डोळ्यासमोर आला.
..... आणि शीतलला अचानक आठवले की मगाशी बघितलेल्या म्हातारीचे डोळे अगदी आनंदीबाईंच्या डोळ्यासारखेच होते.. तेच.. खोल गेलेले.. गूढ, तपकिरी बुब्बुळांचे डोळे.. आणि शीतल किंचाळून जागी झाली व गांगरून इकडे तिकडे बघू लागली. अचानक शीतलची झालेली अवस्था बघून रोहन "काय गं.. काय काय झालं, कशामुळे अशी घाबरून उठलीस तू... ". रोहनच्या ह्या बोलण्याने शीतल जरा भानावर आली. चेहऱ्यावर जमा झालेले घर्मबिंदु तिने रुमालाने हलकेच पुसून, जवळील बाटलीतील थोडे पाणी शीतल प्यायली व नंतर पुन्हा डोळे मिटून घेतले.
… शीतलला तिच्या मावसभावाकडे – प्रविणकडे - केलेल्या "प्लँचेट" बद्दल आठवले. शीतल आणि शरदचे सुट्ट्यांमध्ये मावशी/मामाच्या गावी जाणे अगदी ठरलेले असे. किंवा कधी मावस/मामे बहीण-भाऊ त्यांच्याकडे येत आणि मग ह्या समवयस्क मुलांचा दिवस आणि रात्रभर अतिशय धुडगूस चाले. एके वर्षी शीतल आणि शरद मावशीकडे गेले होते. मावसभाऊ प्रवीण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पुण्याला होता, तो ही गावी आलेला होता. त्यादिवशी रात्री जेवण झाल्यावर गप्पा-जोक्स वगैरे चाललेले असताना प्रवीण त्यांना म्हणाला, चला गच्चीवर जाऊ या, तुम्हाला नवीन काहीतरी दाखवतो. ते सर्व ५-६ मुलं गच्चीवर जायला निघाले तेव्हा प्रवीण एक पाट, एक वाटी, खडू आणि काड्यापेटी असं साहित्य घेऊन आला. शीतल आणि इतर भावंडं "आता हा काय दाखवणार आहे नवीन" ह्या आशयाने त्याच्याकडे बघू लागले. गावी सहसा बैठे बंगलो टाईप घरंच असतात तेही खूप जवळ-जवळ नसतात त्यामुळे एका गच्चीत काय चाललेय हे समोरच्या लांबच्या घातल्याना कळणे तसे शक्य नसते. प्रवीणने आणलेला मोठा पाट ठेवला त्यावर खालच्या भागावर इंग्रगजीतली काही अक्षरं (लेटर्स) लिहिली, मधल्या भागावर "हो" आणि "नाही" असे लिहिले. आणि त्याच्या वरच्या भागात एक वाटी उपडी मारून ठेवली. आणि बऱ्यापैकी अंधार असलेल्या त्या गच्चीत चांदण्यांच्या मंद प्रकाशात तो सांगू लागला. "आपण प्लँचेट करणार आहोत". शीतल आणि इतर भावंडाना प्लँचेट हा प्रकार काही ठाऊक नव्हता त्यांनी तसे त्याला विचारले असता प्रवीण सांगू लागला "आपण प्लांचेटद्वारे आत्म्यांना बोलावणार आहोत आणि त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो. सगळ्यांचे चेहऱ्यावरचे हसू पळाले आणि सगळे एकमेकांकडे बघू लागले. हा प्रकार नक्की थरारक असणार असं त्यांना मनोमन वाटलं आणि ते एकमेकांचे हात घट्ट धरून त्यासाठी तयार झाले. प्रवीण पुढे सांगू लागला "एक काडी पेटवून मी ह्या वाटीखाली टाकीन, आपणापैकी चार जणांनी वाटीवर बोट ठेवायचे आणि कुणा तरी आत्म्याला आपण बोलावू या आणि आपल्या मनातले प्रश्न विचारू या आणि मग तो आत्मा आपल्याला कसे उत्तर देतो ते बघा". त्याप्रमाणे प्रवीणने काडी पेटवून पाटावरच्या वाटीखाली टाकली, चौघांनी आपली तर्जनी त्या वाटीवर हलकेच ठेवली. प्रवीण म्हटला "मी प्रवीण, माझा लहानपणीचा मित्र सतीश जो ऍक्सीडेन्ट मध्ये काही वर्षांपूर्वी गेला, त्याच्या आत्म्याला बोलावतोय.. सतीश तू आला आहेस का.. ". सर्वजण एक थरारक अनुभव घेत होते, कुणीही काहीही बोलत नव्हता. प्रवीणने पुन्हा प्रश्न केला, सतीश तू आहेस का इथे... आणि.. आणि.. वाटी हळू हळू सरकत "हो" लिहिलेल्या जागी गेली. प्रवीण सोडून सर्वांचा आ वासला गेला होता. प्रवीण पुन्हा म्हटला "सतीश, तुझ्या बरोबर ऍक्सीडेन्ट झाला त्या दिवशी कोण होते?". नंतर वाटी "G" ह्या लेटरवर जाऊन थांबली. प्रवीण म्हंटला "गणेश होता ना तुझ्याबरोबर?". त्याबरोबर वाटी पुन्हा सरकून "हो" वर आली. प्रवीण नंतर म्हंटला "मित्रा सतीश आम्ही तुला खूप मिस करतो.. तू जिथे आहेस तिथे आनंदात राहा.. राहशील ना.. ". वाटी पुन्हा गोल फिरून "हो" वर आली. नंतर प्रवीण "सतीश, आता तू कृपया जाऊ शकतोस" असं नमस्कार करून म्हटला. आणि वाटीची हालचाल बंद झाली. प्रवीणने अजून कुणाला कुणा आत्म्याला बोलवायचे आहे का असे विचारले. आणि शीतलला एकदम आनंदीबाईंची आठवण झाली. तिने ट्राय तर करून बघू या, सगळे बरोबर आहेतच, असा विचार करून प्रवीणला "मी बोलावते" असा इशारा केला. प्रवीणने नवीन काडी पेटवून वाटीखाली सरकवली आणि चौघांनी वाटीवर बोट ठेवले . शीतल बोलू लागली "आनंदीबाई, आम्ही तुझ्या आत्म्यास बोलावत आहोत. तू आमच्याबरोबर इथे आहेस का.. ", थोडावेळ भयाण शांतता आणि काहीही हालचाल नाही. शीतल नमस्कार करून पुन्हा बोलली "आनंदीबाई, तू आमच्याबरोबर इथे आहेस का.. ". आणि काय आश्चर्य.. वाटी सरकत-सरकत "हो" वर आली. शीतलने पुढे विचारले "आनंदीबाई, तुझा मृत्यू नैसर्गिक होता का?".. वाटी सरकून "नाही" वर. शीतलचे डोळे आपसूकच मोठे झाले. शीतल पुढे म्हणाली "तुझा गळा दाबून तुला मारले का "... वाटी "हो" वर!.. आणि शीतलने आवंढा गिळून अजून प्रश्न विचारला "कुणी मारले तुला?". वाटी सरकून "D" लेटरवर थांबली. शीतलचा विश्वास बसेना.. तिने पुढे विचारले "देशमानेंचा आत्मा?". वाटी सरकून "हो" वर आली!!! आणि शीतल बघतच राहिली. प्रवीणने बघितले परिस्थिती गंभीर होत चालली आहे. त्याने पटकन आनंदीच्या आत्म्यास जायला विनंती केली व ताण कमी करण्यासाठी म्हणाला, "चला, आता आपल्या आजीच्या आत्म्याला बोलावू या". मग सगळी भावंडं थोडी रिलॅक्स होऊन, "हो.. चला" असं म्हंटली. प्रवीणने मग नवीन काडी पेटवून वाटी खाली टाकली. चार मुलांनी त्यावर बोट ठेवले. प्रवीणने प्रश्न केला "आजी, तू आहे का इथे आमच्यात?". वाटी सरकून "हो" वर आली. पुढचा प्रश्न प्रवीणच्या बहिणीने मनालीने केला "आजी तू बारी आहेस ना ग". वाटी थोडं फिरून परत "हो" वर आली. नंतर शरद म्हंटला "आजी तुला आमची आठवण येते का ग". वाटी सरकत पुन्हा "हो" वर. मुलांनी आजीला अजून तुला हे आठवतं का ते आठवतं का असे काही प्रश्न विचारले आणि वाटी सरकत होती. नंतर प्रवीणने आता आवरते घ्यावे ह्या उद्देशाने विचारले "आजी, तू जिथे आहेस तिथे आनंदी राहा आणि आता जा" असं हणून नमस्कार केला. तेव्हा वाटी जरजोरात सरकून "नाही" वर आली.. प्रवीणने पुन्हा आजीला आता जा म्हणून विनंती केली आणि वाटी पुन्हा "नाही" वर आली. मुलांच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, आजीचा आत्मा मुलांमध्ये रमला होता, आणि जायला तयार नव्हता. प्रवीणने मग "आजी, अगं बाबा तुझ्याशिवाय कसे राहतील.. जा ना आता प्लिज, आम्ही परत बोलावू नंतर तुला " असं नमस्कार करीत सांगितलं तेव्हा वाटी हळू-हळू "हों" वर आली. आणि सर्व मुलांनी नमस्कार केला.
….आजीच्या गोड आठवणीत हरवलेली शीतल रोहनने गाडीला लावलेल्या करकचून ब्रेक आणि त्यापाठोपाठ जोरात हासडलेल्या शिवीने जागी झाली. स्वतःला सावरून तिने रोहनला "काय झाले" विचारले. "अगं ब्रेकच्या ऐवजी चुकून ऍक्सिलरेटर दाबला गेला आणि मला अर्जंट ब्रेक मारायला लागला, सॉरी" असं रोहन उत्तरला. "सावकाश चालव, घाई करू नकोस रोहन" असं काळजीने शीतल रोहनला बोलली. आणि पुन्हा तिचा जरा डोळा लागला आणि ऍक्सिलरेटरच्या प्रॉब्लेममुळे तिच्या बाबांच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचा पट तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला.
एके दिवशी राजपूतसाहेब जवळच्या खेड्यातील शेतावर इन्स्पेक्शनसाठो दुपारी जाऊन संध्याकाळी येऊ म्हणून गेले होते. त्यांच्या इन्स्पेक्शनला जरा वेळ लागला आणि "जेवणाची वेळ आहे साहेब, आता जेवूनच जावा की गरिबाकडे" अशी शेतकऱ्याची विनंती त्यांनी मान्य केली. शेतकऱ्याच्या कुटुंबाने चवदार मटकीची रस्सा भाजी, भाकरी आणि पिठलं भात असा साधासा पण रुचकर बेत केला होता. राजपूत साहेब आणि भगवान ड्रायवर जेवायला बसले. जेवताना अजून गप्पा झाल्या. त्या प्रेमळ शेतकरी कुटुंबाने दिलेल्या चविष्ट जेवणाच्या मेजवानीने तृप्त झालेल्या राजपूतसाहेबानी त्यांचे आभार मानले आणि "आता बरीच रात्र झाली आहे, जायला हवे" असे म्हणून त्या कुटुंबाचा निरोप घेतला. भगवानने जीप जरा वावराच्या टोकाला कच्च्या रस्त्याजवळ लावली होती, तिथपर्यंत ते चालत गेले आणि राजपूतसाहेब गाडीत बसले. गावाबाहेरील शेताचा भाग असल्यामुळे काळाकुट्ट काळोख होता आणि रातकिड्यांचा किर्रर्र-किर्रर्र आवाज रात्रीची भयाणता अधिकच वाढवत होता. राजपूतसाहेब आणि भगवान गाडीत बसले, भगवानने गाडी सुरु केली आणि पहिल्या गिअरवर टाकून जावे म्हणून ऍक्सिलरेटर दिला, पण गाडी पुढे जाईना. भगवानने ऍक्सिलरेटरवर अजून जास्त जोर दिला, पण गाडी काही हालेना. तेव्हढ्यात काय होतेय हे बघणाऱ्या राजपूतसाहेबांचे लक्ष रिअर व्यू मिरर कडे गेलं आणि त्यांना जे दिसलं ते बघून त्यांच्या अंगाला शहाराच आला. त्यांना गाडीच्या रिअर लॅम्पच्या प्रकाशात जीपच्या मागच्या काचेवर एक भयानक आकृती दिसली. त्या आकृतीचा चेहरा अर्धाअधिक जळालेला होता आणि डोळे भेदक होते, त्याने काचेला लावलेल्या हातांवर अनेक जखमा होत्या आणि दोन्ही हात रक्ताळलेले होते. राजपूतसाहेबानी त्याही प्रसंगी भगवानला रिअर व्यूमध्ये बघायचा आणि ते दृष्य बघून विचलित न होण्याचा इशारा केला. तरी त्या अनपेक्षित दृश्याने भगवानची बोबडी वळाली. पण तसच श्री स्वामी समर्थांचा धावा करीत भगवानने गाडी कशीबशी दुसऱ्या गिअरवर टाकून ऍक्सिलरेटर दाबला आणि त्याच्या प्रयत्नांना यश आले. गाडी सुरु झाली आणि ती आकृती मागून धावू लागली, मग भगवानने गाडी अजून पिटाळली. साधारण दीड दोन तास त्यांनी हा काय प्रकार असावा ह्याबद्दल चर्चा करत प्रवास केला. आणि गाडी परत बंद पडली. पण ह्या भागात प्रकाश होता, म्हणून राजपूतसाहेब आणि भगवान दोघांनी उतरून बोनेट उघडून काय प्रकार आहे बघावे म्हणून बघीतले त्यांना काही वेगळं वाटलं नाही म्हणून पुन्हा गाडी चालू करून बघावी म्हणून दोघे गाडीत बसले व भगवानने गाडी सुरु करायचा प्रयत्न केला पण परत तेच.. गाडी काही हलेना. त्यांनी सावधानता म्हणून गाडीच्या खिडक्या बंदच ठेवल्या होत्या आणि दारं लॉक ठेवले होते. आता भगवानने रिअर व्यू मिरर मध्ये बघितले असता ती जळक्या चेहऱ्याची आकृती रक्ताळलेले हात काचेवर ठेवून त्यांच्याकडे खुनशीपणे बघत असताना दिसली, एवढ्यात तांबडे फुटण्याची वेळ झाली होती. स्वामी समर्थांचा जप भगवान अखंडपणे करत होता आणि जरा वेळातच गाडी सुरु करण्यात त्याला यश आले. गाडी चालू होताच ती आकृती आपले रक्ताळलेले हात मागच्या काचेवर आपटत त्यांचा पाठलाग करू लागली. आणि नंतर त्यांच्या बाजूच्या खिडकीपाशी येऊन ते रक्ताळलेले हात त्या खिडकीवर आपटून खिडकी फोडायचा प्रयत्न केला. आपल्या गाडीच्या खिडकीवर रक्ताळलेले हात आपटतात आहेत हे बघून शीतल किंचाळून उठली... तिच्या अचानक अशा भेदरून किंचाळण्याने रोहनला पटकन कळले नाही काय होतेय ते आणि त्याने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. एव्हाना शीतलला कळले की बाबांच्या गाडीच्या काचेवर आपटणारे रक्ताळलेले हात हे आपल्या गाडीवर आपटताहेत असा भास झाला होता आणि ती भेदरली होती. रोहनने तिला जरा पाणी प्यायला दिले. शीतलने रोहनला बाबांबरोबर घडलेल्या प्रसंगाचे कथन केल्यावर "अशा अमानवी शक्ती असू शकतात पण त्या काही माणसांना त्रास देतातच असे नाही... माझ्या मामाचा ह्याबाबतीतला अनुभव सांगतो तुला..." असं म्हणून रोहन सांगू लागला...
रोहनच्या बालपणी त्याचा पळोदा गावी राहणारा दिनकर मामाचं कामानिमित्त वरचेवर बहिणीकडे येणे-जाणे असे. एकदा असाच दिनकर मामा काही कामानिमित्त आलेला होता. रोहनची आई लताबाई आणि दिनकर मामाच्या गप्पा रंगात असत, ते रोहनलाही ऐकायला मजा येई. मामा गावाकडच्या लोकांचे, जंगलाचे एक-एक थ्रिलर किस्से सांगत असत, रोहनही ते ऐकत बसे. लताबाई नी दिनकर मामाचा विषय "अमानवी, वाईट शक्ती" किंवा सामान्य भाषेत भूत वगैरे असू शकते का ह्यावर येऊन थांबला. तेव्हा दिनकर मामा म्हंटलं, "अगं ताई, जशी चांगली शक्ती किंवा देव आहे, जो ह्या जगाचे एवढे मोट्ठे रहाटगाडगे चालवतोय, तशीच अमानवी शक्ती / भूत-खेत हे देखील असतात. फक्त अशा काही शक्ती त्रास देतात आणि काही त्रास देत नाहीत असं मी माझ्या अनुभवानुसार सांगू शकतो". "अनुभवानुसार" असं म्हंटल्यावर रोहनचे कान टवकारले गेले व तो "ए सांग ना मामा तुझा अनुभव", असं मामाला म्हणाला. तेव्हा लताबाईंनी त्याला तिथून पिटाळायचा प्रयत्न केला. पण दिनकर मामा "असू दे ग त्यालाही ऐकायला काही हरकत नाही" असं म्हंटल्यावर लताबाईंच्या परवानगीची वाट न पाहता रोहन तिथे बसून ऐकू लागला. दिनकर मामा सांगू लागला "अगं ताई आमच्या गावाकडे तर तुला माहिती आहेच की कसे जंगल आहे आजूबाजूला आणि आदिवासी वस्ती आहे. एकदा रात्री गावाहून पलोदाला आल्यावर अचानक पाऊस पडू लागला म्हणून मी बस स्टॅन्डपासून घराकडे जाण्याच्या रस्त्यावर झाडाखाली थांबलो होतो. थंडी खूप वाजत होती आणि माझ्या बिडी ओढण्याच्या सवयींबद्दल तर तुला माहिती आहेच. मी खिशातून बिडीबंडल आणि काडीपेटी काढली. एक बिडी काढून बंडल खिशात ठेवले व बिडी पेटवून झुरके मारू लागलो. पाऊस धो-धो पडत होता, वीजांचा गडगडाट होत होता. आणि जरा वेळाने मला कुणीतरी म्हंटले “दादा मला द्या ना जरा एक बिडी”. हा बिडी कुणीतरी मागायचा अनुभव गावाकडे नेहेमी येत असल्यामुळे मी बंडल काढून आजूबाजूला कोण बिडी मागतेय त्याला बिडी द्यावी म्हणून बघितले पण कुणी नजरेस पडले नाही. मी बिडी परत ठेवणार पुन्हा तोच आवाज – “दादा, जरा मला द्या ना एक बिडी”. आणि मी बाजूला बघितले तर विजेच्या लख्खं प्रकाशात मला एक वलयांकित, धूसर मानवाकृती दिसली, तिचा हात माझ्या दिशेने पुढे आला होता. मी खूप घाबरलो व माझ्या ओठातली बिडी गाळून पडली, तेव्हा “घाबरू नका, मला फक्त बिडी हवीय” असं ती आकृती म्हणाली. मी हातातली बिडी व काडीपेटी त्या आकृतीच्या दिशेने पुढे केली आणि त्या आकृतीने ती बिडी घेऊन पेटवली व आकृती झुरके मारू लागली गं! माझी जाम फाटली होती, मी मारुती स्तोत्र म्हणत म्हणत घाईघाईत घर गाठले. घरी काही सांगितले नाही आणि दुसऱ्या दिवशी मित्र मंडळींकडे हा विषय काढला असता आपल्या गावातल्या काही लोकांना हा अनुभव आला आहे, असे समजले आणि ते जे कुणी आहे त्यांनी शक्यतो कुणाला त्रास दिल्याचे ऐकिवात नाही म्हणून सांगितले. असे अतृप्त आत्मे असतात पण त्यांना आपला त्रास झाला/होणार नाही जाणवल्यास ते आपल्या वाटेला जात नाहीत". हे ऐकून रोहन म्हणाला "अरे वा! म्हणजे बिडी शेअर करण्या इतपत भूतं दोस्ती करू शकतात की", आणि मग तिघे खो-खो हसायला लागले.
हा अनुभव ऐकल्यावर शितललाही जरा मोकळे वाटले आणि ती जरा वेळाने ती पुन्हा पेंगाळू लागली. तिच्या मनात विचार सुरु होते, अशी अमानवी शक्ती, भूत-खेत खरंच असेल का.. मांत्रिक-तांत्रिक ह्या बाधा खरंच दूर करू शकत असतील का.. नाही, हे मात्र खरे वाटत नाही.. मांत्रिक-तांत्रिक बाधा झालेल्या (किंवा मानसिक आजारामुळे बांधल्यासारखे वागणाऱ्या) घाबरलेल्या लोकांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गैरफ़ायदाच घेतात हे मात्र तिचं अनेक घटना पेपर मध्ये वाचून, अनेक किस्से बोलून-ऐकून झालेलं ठाम मत होतं. पण ह्या शक्तीचं अस्तित्व असू शकतं असंही तिला वाटे.
शीतलचं लग्न झाल्यानंतर तिला नवऱ्याच्या खेडेगावी सुद्धा जाऊन राहावे लागे. तिथे अशा अंधश्रद्धा अधिक जागरूक असतात असे तिला जाणवत असे. तिथे तिच्या शेजारच्या बाईच्या अंगात येत असे. ती जेव्हा घुमायला लागे तेव्हा मनाचा थरकापही होई आणि हिला नक्कीच काहीतरी मानसिक आजार आहे, किंवा ही काही कारणामुळे कुटुंबीयाना / शेजारपाजारच्या लोकांना घाबरवायला असे करतेय असं तिला ठामपणे वाटे.पण काही घटना लोकांना आणि तिलाही अनुत्तरित करून जात.
पुढे शीतलला एक छान गोंडस मुलगी झाली, शीतल तिचा नवरा रोहन आणि मुलगी सानवी तिघेही रोहनच्या बिझनेससाठी नाशिकला राहू लागले. सानवी चंद्रकलेप्रमाणे मोठी होत होती. ह्यातच सानवीचा नर्सरी ते बारावी हा काळ कसा निघून गेला हे शीतलला कळलेही नाही. आता सानवी इंजिनीरिंगच्या पुढील शिक्षणासाठी पुण्याला शिफ्ट झाली. रोहन आणि शीतलने तिची व्यवस्था एका चांगल्या गर्ल्स हॉस्टेल मध्ये करून दिली आणि ते पुन्हा नाशिकला परतले. पहिलं वर्ष शीतलचं सानवीशिवाय फारच कठीण गेले. सानवी मात्र आपल्या अभ्यासात, क्लासेस आणि सबमिशन्समध्ये अतिशय बिझी झाली होती.
…. आणि आज सानवीच्या फोनवरून मंजुषाने सानवीच्या अचानक घाबरून जाण्याबद्दल कळवले होते, आणि आता रोहन आणि शीतल होस्टेलच्या पार्किंग मध्ये पोहोचले होते. दोघांनी धावतच सानवीची रुम गाठली. रूममध्ये सानवी शून्यात नजर लावून बसलेली त्यांना दिसली आणि दोघांच्या काळजात धस्स झाले. शीतलने सानवीला आधी छातीशी कवटाळले व कुठलाही प्रश्न न विचारता तिच्या डोक्यावर हळुवारपणे हात फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक आईला आपल्या लेकराला काय केल्याने बरे वाटेल ह्याची पुरेपूर कल्पना त्या लेकरांना जीवापाड जपत वाढवताना आलेली असते. शीतलच्या ह्या कृतीने थोड्यावेळाने सानवी हमसाहमशी रडायला लागली. शीतलने तिला पूर्ण रडू दिले आणि मग विचारले "नक्की काय झालं बाळा". मग सानवी शांत झाल्यावर सांगू लागली "ह्या मजल्यावर जिना चढून येताना कोपऱ्यावर एक रूम आहे ती गेले ७-८ महिने बंदच असते कारण तिथे राहणाऱ्या भावना ह्या मुलीने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली होती. भावनाला परीक्षेचे खूप टेन्शन आल्याने डिप्रेशनमध्ये जाऊन तिने स्वतःचा शेवट केला होता. हि वाईटच घटना होती आणि काही आठवडे आमचंही मन लागत नव्हते".पण नंतर अभ्यास, क्लासेस सबमिशन्स हे आमचे रुटीन पुन्हा सुरु झाले. बऱ्याचदा आम्ही ग्रुप मधल्या कुणा एका मुलीच्या रूमवर बसून रात्री एकत्र अभ्यास, प्रोजेक्टवर्क करीत असतो. तसं आज मी सोनियाच्या रूमवर जाऊन अभ्यास करत होते आणि जेवण झाल्यावरपण आम्ही अभ्यास करत होतो. बारा केव्हा वाजले कळलेच नाही आणि मग मी सोनियाला "मी जाते आता माझ्या रूमवर" असे म्हणून माझी बुक्स वगैरे आवरून बॅग घेऊन यायला निघाले. उद्या सकाळी काय-काय करायचे आहे ह्याचे प्लॅनिंग माझ्या मनात दुसऱ्या बिल्डिंगमध्ये असलेल्या सोनियाच्या रूमवरून येताना सुरु होते. मी आमच्या बिल्डिंगपाशी आले, वॉचमन काकांचा नेहेमीप्रमाणे डोळा लागला होता. मी जिना चढून भरभर वर येऊ लागले. आणि दुसऱ्या मजल्याच्या कोपर्यावरून वळणार तेव्हढ्यात भवनाच्या रूममधून एक रक्ताळलेला हात मला बाहेर आलेला दिसला. मी खूप घाबरले आई, मला चक्करच येणार होती आणि मला आधी भास होत असावा असे वाटले आणि मी जरा पुढे गेल्यावर वळून बघितले तर तो रक्ताळलेला हात माझ्या दिशेने उंगलीनिर्देश करीत होता आणि हातातून रक्त ठिबकत होते. मी घाबरले,किंचाळायला लागले, माझ्या आवाजाने मंजुषा बाहेर आली आणि पटकन मला घेऊन ती रूम मध्ये आली.. आणि.. आणि.. आणि मग मला काहीच सुचत नव्हते". असं म्हणून सानवी पुन्हा रडू लागली. तेव्हा आता रोहन पुढे येऊन तिला जवळ घेऊन म्हंटला "शांत हो, शांत हो बेटा. एखादी घडून गेलेली घटना आपल्या Back of the mind असते आणि त्यावर आधारित असे कधीतरी आपल्याला भास होतात, पण आपण घाबरायचं नाही. Be strong!!". मंजुषाने सर्वांसाठी कॉफी आणली आणि ती पिऊन सर्वाना जरा फ्रेश वाटले. रोहन आणि शीतलने सानवीला “आठ दिवस नाशिकला आमच्याबरोबर ये” म्हणून सांगितले. शीतल सानवीला बॅग भरायला मदत करत असताना रोहनने मंजुषाला जरा लांब नेऊन असा अनुभव कुणाला आधी आला नाही ना ह्याची चौकशी करून "नाही" असे मंजुषा म्हंटल्यावर लेक उगीच घाबरली असेल, होईल २-४ दिवसात नॉर्मल असा विचार करून निश्वास टाकला. मंजुषाचा निरोप घेऊन तिघेही निघाले. "त्या" रूम जवळून जाताना रोहन सानवीला समजावत होता, असं काही नसतं, घाबरून जायचं नसतं वगैरे. बघ कुठे काय दिसतंय का वगैरे. सानवीने घाबरून हळूच कटाक्ष टाकून काहीही दिसत नाहीये ह्याची खात्री करून घेतली. रोहन मुद्दाम काही सेकंद तिथे, "त्या" रूमजवळ थांबला, जेणेकरून सानवीला खात्री व्हावी तिथे काही नाहीये आणि तिच्या मनातली भीती जावी. शीतल दोघांच्या मागून येत होती, तिघांना बाहेरपर्यंत सोडायला आलेल्या मंजुषाचे आभार मानावे म्हणून शीतल थांबली आणि "Thank you बेटा" असं म्हणून तिचा हात हातात घेतला. मंजुषा "Welcome Kaku, .. and good bye" असं शीतलला हसून म्हंटली. शीतल वळून रोहन आणि सानवी बरोबर जायचे म्हणून झपझप पावले टाकू लागली, तेव्हढ्यात तिचे स्वतःच्या हाताच्या तळव्याकडे लक्ष गेले.. त्यावर ओले रक्त होते!!! शीतलला दरदरून घाम फुटला व तिने मागे वळून पहिले... मंजुषा मान बरीच तिरकी करत, भेदक डोळ्यांनी, तिला हात उंच करून "bye" करत होती आणि मंजुषाच्या रक्ताळलेल्या हातातून रक्त ठिबकत होते.....