Anil Sonar

Others

3.6  

Anil Sonar

Others

अनु

अनु

24 mins
306


“ऑल द बेस्ट बेटा!”अनुच्या पप्पांनी अनुला विश केलं.


अनुच्या फर्स्ट-जॉब-फर्स्ट-डे जॉइनिंगला तिला ऑफिसात सोडायला मम्मी-पप्पा आणि तिचा लाडका छोटा भाऊ सोडायला आले होते. पवईच्या त्या पॉश एरियातल्या बिल्डिंगच्या आवारात निलने गाडी पार्क केली. अनुच्या चेहऱ्यावर फर्स्ट-जॉब-फर्स्ट-डेचा उत्साह, मम्मी-पप्पांच्या चेहऱ्यावर लेक मोठ्या कंपनीत जॉईन होतेय हे समाधान झळकत असते. स्मितहास्याने सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. आज एका आगळ्याच आत्मविश्वास आणि उत्साहाने चालत जाणाऱ्या आपल्या लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत असताना वासंती आणि निलला खूप समाधान वाटत होते!  


थोड्या वेळाने अनुचा फोन “पप्पा निघाला नाहीत ना अजून, निघा बरं आता. किती वेळ थांबणार आहात?” पप्पा आपला फोन आल्याशिवाय निघणार नाहीत ह्या अंदाजाने अनु बोलली.


“निघतच आहोत बेटा, तुझ्या फोनची वाट बघत होतो. ऑल द बेस्ट अगेन!”

“थँक्यू पप्पा, मी ब्रेकमधे फोन करीन. ड्राईव्ह सेफली, बाय!”

“बाय बेटा!”


एव्हाना पप्पांच्या उत्साही स्वराचे सुस्काऱ्यात रूपांतर होते. लेक आता रोजच्या रोज डोळ्याला नाही दिसणार या विचाराने निल थोड्या उदासीने गाडी पवईकडून मानखुर्दच्या दिशेने हाकायला सुरुवात करतो. अनुला पुण्याहून मुंबईला शिफ्ट व्हायच्या शॉपिंग पासून पॅकिंग पर्यंत निलने अगदी बारीक-सारीक गोष्टींचेही प्लॅनिन्ग करून दिले होते. आणि आज तिला सोडायला उत्साहात आलेल्या निलच्या मनात अनुला सोडून निघताना भूतकाळ तरळला.... 


…. “ती मुलगी अनु पोहे अगदी व्यवस्थित एकही कण न सांडता खात होती, नाही? फारच छान, हसऱ्या चेहऱ्याची आणि गोड पोर आहे.” निलचे वडील अण्णा गाडीत बोलत होते. निलच्या पुनर्विवाहासाठी वासंतीला बघून निल, त्याची आई, पुष्पा मावशी-काका, त्यांचे मुलगा-सून राजेश-सुवर्णा ही सर्व मंडळी घरी जात होती. अण्णांच्या बोलण्याला सगळ्यांनी मान डोलावून दुजोरा दिला.

“काय निल, पसंत आहे ना वासंती?” काकानी अंदाज घ्यायला प्रश्न केला. 

“हो काका!” निलचं उत्तर.

“अरे वा! होकार पटकन आला की!” आणि मग सगळ्यांच्या हास्याचा फवारा उडाला.

“अनुच्या स्कूल ऍडमिशनचं वगैरे तुला बघायला लागेल” काकांनी नेक्स्ट स्टेप सुचवली.

“हो, घेऊया की कल्याणीनगर मधल्या बिशप्स मध्ये वगैरे” आनंदात असलेला निल उद्गारला.

“एकांतात काय विशेष बोलणं मग?”

“काही विशेष नाही. दोघांचं दुसरं लग्न, त्यामुळे एकमेकांच्या अपेक्षा समजावून घेत होतो.”

“मग?”

“लग्नानंतर अनुष्का आपल्या बरोबरच राहील ना?” वासंतीचा निलला प्रश्न होता.

"बरं. रास्त आणि माफकच अपेक्षा आहे एका आईची".

"हो ना!" मी म्हणालो “अगं, असं मुलीला आईपासून वेगळं कसं करू शकीन मी? तुला बघायला यायच्या आधी ती अर्थातच आपल्या बरोबरच राहील हे ठरवलेच होते मी”. वासंतीच्या चेहऱ्यावरचे समाधान तिच्या स्मितहास्यात निलला जाणवलं.


पुढे दोन्ही कुटुंबात लग्नासाठी होकारांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर वासंती आणि कुटुंबीयांनी निलच्या पुण्यातील (भाड्याने घेतलेल्या) घराला भेट दिली. कुरळ्या केसांची, हसरी, पिटुकली, गोड अनु सगळ्यांचं आकर्षण केंद्र होतं. सगळ्यांना अनु खूपच समजूतदार आहे ह्याचं कौतुक वाटत होतं. पुढे निलने पुण्याची कंपनी सोडून नवी मुंबईतील दुसरी एक सॉफ्टवेअर कंपनी जॉईन केली. निल व आई-अण्णा वाशीला राहायला गेले. निल वासंतीला भेटायला कल्याणला वीकेण्डला वगैरे जात असे. निलने आणलेला खाऊ अनु पटकन घेत नसे. तसंच निल व वासंतीबरोबर अनु सहसा जायला तयार होत नसे. ‘आई ह्या परक्या माणसाबरोबर फिरायला का जाते’, हे अनुच्या बालमनाला खटकत असावं. पप्पाबाबा अनुला मधून-मधून “अगं हे तुझे पप्पा आहेत”, असं समजावत. पण पूर्वी स्वतःचे पप्पा जवळपास कधीच न बघितल्याने अनुला "पप्पा" ह्या नात्याची जाण किंवा प्रेम तरी कुठे मिळालं होतं. तेव्हा साहजिकच तिला वेळ लागणार होता. अनुचे पप्पा ती चार महिन्यांची असताना देवाघरी निघून गेले होते! वासंतीवर जणू आभाळच कोसळलं होतं. त्या धक्क्यातून बाहेर यायला तिला खूप वेळ लागला. तिचे अनुकडे सुरुवातीला लक्षही नसे. साधे अनुला फीड करणेही तिला सुचत नसे. त्या छोटुश्या, गोंडस बाळाची किती कुचंबणा झाली असावी? 

जावयाच्या अकाली निधनानंतर वासंतीच्या पप्पांचा वासंती व अनुला कल्याणला त्यांच्या घरी घेऊन जायचा विचार होता. पुढे त्यांचे आयुष्य मार्गी लावून द्यावे ह्यासाठी. परंतु संसारात सासरी रुळलेली वासंती नवऱ्याच्या अचानक जाण्याच्या धक्क्यातून बाहेर येऊ न शकल्याने तिची माहेरी जायची तयारी होत नव्हती. पप्पा व इतर नातेवाईकांनी तिला समजावले व वासंती व अनु पप्पांबरोबर त्यांच्या घरी आल्या. काही दिवसात-महिन्यात काळ अनेक संकट-दुःखातून मार्ग काढतो, तसा वासंतीला अकाली गेलेल्या तिच्या नवऱ्याच्या दुःखातून सावरायला काळानेच यथावकाश मदत केली. आता अनुला चांगले शिक्षण आणि जीवन देणे हे वासंतीचे ध्येय बनले!


सावरल्यानंतर वासंतीने सगळ्यात आधी अनुची “होली क्रॉस” ह्या चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतली. वासंतीच्या पप्पांचा साधारण पन्नाशीच्या वयात गेलेल्या जॉबमुळे त्यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. अनेक छोटे-मोठे उद्योग करायचा प्रयत्न करून पप्पा शेवटी रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. वासंतीच्या सासरकडून आलेल्या थोड्या-फार पैशात वासंतीचे आणि अनुचे भागत असले तरी वासंतीचा ब्युटी पार्लर कोर्स, भरत काम कोर्स करून व त्यातील छोटे-मोठे काम करून कुटुंबाला, प्रामुख्याने अनुष्काच्या शिक्षणाला, हातभार लावायचा प्रयत्न होता. चिमुकल्या अनुचं आजी-आजोबा, काका आजोबा-काकू आजी, आत्या आजी-मामा आजोबा, सगळ्या मावश्या व मामा अतिशय कौतुक करत. अनु होतीच तशी गोड आणि समजूतदार! 

वासंतीचं वय फारसं नसल्याने पप्पानी यथावकाश तिच्या लग्नासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण काही स्थळं नीट नव्हती, तर अनेकांना मूल असलेली बायको नको होती. अशा काही कारणांनी जमत नव्हतं. काही काळानंतर डिवोर्स झालेल्या निलचं स्थळ नातेवाइकांकडून पप्पांना कळलं. निल आयटी इंडस्ट्रीत चांगल्या कंपनीत होता आणि आधीच्या लग्नाबाबतीत काही अपरिहार्य कारणांमुळे त्याला बायकोला वर्षभराच्या आतच डिवोर्स द्यायची वेळ आली होती!

एरव्ही “डिव्होर्स” हा शब्द स्वप्नातही न आलेल्या निलला आधीच्या बायकोच्या पोटात त्याचं मुल वाढत असताना डिवोर्स द्यायचा निर्णय घ्यायला लागला होता!! देव कुणाला जीवनात कशी वेळ आणेल, हे त्याचे तोच ठरवतो त्यातून बाहेर यायचा मार्गही यथावकाश दाखवतोच! कसरतीचे जीवन जगून जरा स्थिरस्थावर झाल्यानंतर जीवनात आलेल्या ह्या बिकट प्रसंगाने निल पुरता कोलमडला होता. ह्यातून बाहेर यावे म्हणून तो कंपनीत मिळेल ती असाइनमेंट घेऊन अमेरिकेला गेला आणि जाताना “हिला - त्याच्या आधीच्या बायकोला - डिलिव्हरीसाठी तिच्या आई-वडिलांकडे पाठवा आणि परत आणू नका” असं तो आपल्या मनावर दगड ठेवून आई-अण्णांना सांगून गेला होता. निलच्या स्वप्नवत आनंदी जीवनाचा वर्षभरात चक्काचूर झाला होता. निल कसाबसा अमेरिकेत काही महिने सेटल झाला. पुढच्याच वर्षी आपल्या आई-वडिलांनी कठीण परिस्थितीत दिलेल्या शिक्षणाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना अमेरिकेत भरपूर फिरवावे हे त्याचे स्वप्न निलने पूर्ण केले. अमेरिकेत आई-अण्णांच्या सहा महिन्याच्या वास्तव्यात त्यांना वेगवेगळ्या शहरातील पर्यटनस्थळं आणि मित्र-मंडळींकडे फिरविणे, विविध देशांचे कुजीन्स ट्राय करवणे, अनेक प्रकारचे आईस्क्रीम खाऊ घालणे, यात सहा महिने मजेत पण अगदी भुर्रकन निघून गेले. आई-अण्णा भारतात परत गेल्यानंतर मात्र निलला भविष्याची चिंता पोखरू लागली.


एव्हाना निल एका गोड मुलीचा बाप झालेला होता. आपल्या मुलीचा ताबा आपल्याला मिळेल का? मिळाल्यास तिचे संगोपन आपण नीट करू शकू का? की तिला (तेव्हा) मूलबाळ नसलेल्या आपल्या मावस बहिणीला दत्तक घेतेस का, म्हणून विचारून बघावे, अशा नानाविध विचारांनी त्याची झोप उडालेली होती. तसेच भारतीय न्यायव्यवस्थेत डिवोर्स इत्यादी केसेसमधे स्त्रियांना सहानुभूती असते, जे भारतातील डोमेस्टिक व्हायोलेन्सचे प्रमाण बघता योग्यच आहे. परंतु ह्या कायद्यातील तरतुदींचा लग्नासाठी लायक नसलेल्या, व्यभिचारी असलेल्या काही स्त्रिया आणि त्यांचे वकील कायद्यातील तरतुदींचा - actually लूपहोल्सचा - सर्रास गैरफायदा घेताना आढळतात. (सगळी माणसं धुतल्यासारखी असतात असं नाही. पण दोघांपैकी एक असं असलं तर त्या नात्यात अविश्वास धुमसत राहतो. मग असे नाते जन्मभर पुढे रेटण्यात काही अर्थ नसतो. गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी तर व्यभिचारास कायद्याने मान्यता मिळाल्याने अशा प्रकारात काय आनंदी आनंद झाला असावा ह्याची कल्पनाच बरी!).


निलच्या पूर्वाश्रमीच्या बायकोने ह्या तरतुदींचा पुरेपूर गैरफायदा घेतला. निलला वकिलाकरवी वेड्यावाकड्या नोटिसेस पाठवणे, पुढे मुलगी थोडी बोलण्या इतपत मोठी झाल्यावर तिला फोनवरूनही बोलू न देणे, भेटणे तर दूरच, त्याच्या त्यावेळच्या ऑफिसातही तक्रार करणे असा छळ तिने सुरु केला होता. त्याला निल स्वतः उत्तर ड्रॅफ्ट करून त्याच्या वकिलांकडे सज्जड पुराव्यानिशी देत असे. पण एकीकडे उध्वस्त झालेले आयुष्य, मुलीची चिंता आणि कोर्ट केसचं बांडगूळ ह्यामुळे निलचे मानसिक स्वास्थ्य उध्वस्त झाले. विकेंडला शुक्रवार ते रविवार मुव्हीज लावायच्या, ड्रिंक करायचं हा त्याचा नित्यक्रम झाला होता. चित्रपटातील भावुक सीन्स बघतानाही त्याला रडायला येत असे. आपले दुःख मोकळेपणे कुणाशी शेअर करता येत नसल्याने अनेकदा तो बाथरूममधे, शॉवर सुरु ठेवून त्या आवाजात ओकसाबोक्शी रडून घेत असे!


त्यातल्या त्यात ऑफिसमध्ये मात्र कामामध्ये मन रमत असल्याने निलची करियरमधे चांगली प्रगती होत होती. कंपनीच्या ‘रिलेशनशिप मॅनेजरचा राईट हॅन्ड’ म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. परंतु सततच्या चिंतेने घेरलेल्या आणि कोलमडलेल्या निलला शेवटी डिप्रेशनने ग्रासले! त्यानंतर त्याचे आयुष्य पुरते बदलले. डिप्रेशनच्या औषधांच्या परिणामापेक्षा दुष्परिणाम सुरुवातीला खूप जास्त होते. भयंकर झोप येणे, गाडी चालवताना, मीटिंगमधे वगैरे डुलकी येणे, अतिशय उदास वाटणे, चिंता असे चालले होते. ऑफिसात व इतर वेळी मित्र असले तर वेळ जरा नीट जात असे, पण घरी आल्यावर त्याला अतिशय भकास वाटे.

शेवटी निल भारतात परत आला. त्याची बदली चेन्नईला झाली. तेथेही त्याच्या डिप्रेशनमधे फारसा फरक पडला नव्हता. चेन्नाईला कंटाळून काही महिन्यांनी प्रयत्न करून निलने पुण्याला ट्रान्सफर घेतली. त्यानंतर मात्र चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट आणि बरोबर असलेले आई-अण्णा ह्याने निलच्या तब्येतीत वेगाने चांगला फरक पडला. त्याला बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वाटायला लागले. औषधं आणि त्यांचे दुष्परिणामही हळू-हळू कमी झाले. आई-अण्णानी योग्य वेळ बघून त्याच्या पुनर्विविहाचा विचार निलकडे काढला. एव्हाना पुढील आयुष्य एकटे कसे घालवायचे या विचाराने निलचं मनदेखील पुनर्विवाहासाठी तयार होत होतं. त्यानंतर पहिलेच स्थळ वासंतीचे आले. तिला पहिल्या लग्नाचे मूल आहे ही बाब आयुष्यात तोवर मोठ्ठाले धक्के खाल्लेल्या निलसाठी गौण होती. किंबहुना आपल्याबरोबरच आणखी दोन जीवांचे भले होत असले तर चांगलेच इथपर्यंत त्याच्या विचारांना प्रौढता आली होती. परिस्थिती माणसाला पक्के बनवते त्याचे हे उदाहरण म्हणता येईल. वासंतीला पसंत केल्यानंतर मित्रांशी वगैरे बोलताना “एक मुलगी देवाने एका हाताने घेतली, तर दुसरी दुसऱ्या हाताने दिली बघ” असे निल आनंदाने म्हणत असे!

वासंती आणि निलचे लग्न झाल्यानंतर निलच्या घरी जाताना वासंतीपेक्षा सात वर्षांच्या अनुला आजी-बाबांना सोडून जायला लागत असल्यामुळे जास्त रडायला येत होते. तो इवलासा जीव कावरा-बावरा झालेला होता. लग्नाच्या वेळी अनुला गालाला कसलासा फोड आलेला होता. त्याचे ड्रेसिंग डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे निल हळुवारपणे रोज करून देत असे. त्यामुळे तिला पप्पांचा लळा लागला .तसेच निलच्या भावा-बहिणीच्या मुलांमधे खेळण्यात आणि त्यांच्याबरोबर दंगा करण्यात छोटी अनु पटकन रुळली. ती मुलंही तिची चांगली काळजी घेत असत. ह्या सगळ्याने काही दिवसातच परकेपणाची भावना अनुच्या मनातून पळून गेली - आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम मिळालं, तर ते नातं रक्ताचं आहे किंवा नाही ह्याचा फरक पडत नसतो!


लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी पूजा झाल्या-झाल्या निल आणि वासंती - निलने बघून ठेवलेल्या वाशीतल्या चांगल्या स्कूलमध्ये - अनुची ऍडमिशन घ्यायला गेले. हळू-हळू अनु नवीन घर, आई-आजी, अण्णा-बाबा, पप्पा, नवीन, स्कूल, नवीन फ्रेंड्स ह्या सगळ्यात छान रुळली!


एकदा मुंबईत मुसळधार सतत पावसाने हाहा:कार माजला होता. शाळेत गेलेल्या अनुच्या चिंतेत असलेला निल शाळेत जाऊन बघावे या विचाराने कमरेवर पाण्यात बाहेर आला तेवढ्यात त्याला अनुची बस हळूहळू येताना दिसली. निलचा जीव भांड्यात पडला. देवाचे आभार मानत अनुला बसमधून आपल्या खांद्यावर बसवून निलने पाण्यात बॅलन्स करत घरी आणले. सगळ्यांना अनु सुखरूप परत आली ह्याचं हायसं वाटलं.


अनुचा नवीन घरातील पहिला बर्थडे निलला छान साजरा करायचा होता. अनुसाठी त्याने नवी सायकल गिफ्ट म्हणून आणली होती. आई आजी-अण्णा बाबांनी तिला छान रेड-अँड-ब्लॅक कलरचा ड्रेस आणलेला होता. आजी-पप्पाबाबा, मामा, काकाबाबा - काकूआजी ह्यांना आवर्जून अनुच्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलेलं होतं. सोसायटीतले तिच्या फ्रेंड्सनाही बोलावलेलं होतं. सर्वांच्या उपस्थितीत बर्थडे छानच साजरा झाला. अनु पहिले दोन वर्ष सगळ्या परीक्षांमध्ये वर्गात पहिली येत असे. त्यामुळे तिला पप्पांकडून प्रत्येक परीक्षेनंतर छानसं गिफ्ट मिळत असे. तिची प्रगती बघून पप्पाबाबाही “म्हणजे अनु छान रुळली म्हणायची!” असं समाधानाने म्हणत.


एव्हाना निलही चांगलाच सावरलेला होता. ऑफिसात देखील त्याची चांगली प्रगती होत होती. पुण्यात त्याने एक फ्लॅट पूर्वीच घेतलेला होता. आता वाशीत फ्लॅट बघावा हा विचार डोकावायला लागला होता. त्याप्रमाणे वाशीत फ्लॅट शोधणे सुरू होते. वाशीत किमती जरा जास्त असल्याने निलने ठाण्यात फ्लॅट बघायचं ठरवलं. पहिल्यांदा ठाण्यात २-३ फ्लॅट्स बघून त्यातला एक त्याला आवडला होता. त्याच दिवशी वासंती आणि आई दोघींनाही फ्लॅट दाखवला. त्यांनादेखील फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स आवडल्याने लगेच बुकिंग करूनही टाकले. नवीन फ्लॅटचा ताबा जुलैत मिळणार होता त्यापूर्वी निल आणि वासंतीने ठाण्याला अनेकदा चकरा मारून अनुची ऍडमिशन चांगल्या स्कूलमधे घेतली. स्कूल जूनमधे सुरु होणार म्हणून निलने दुसरा एक फ्लॅट भाड्याने घेतला. सहा महिन्यानंतर ते आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. नवीन फ्लॅट टू-अँड-हाफ बीएचके असल्याने अनुला छोटी सेपरेट रूम मिळाली होती, त्यामुळे ती देखील खूष होती. नवीन घरात, मोठ्या कॉम्प्लेक्समधे आणि नवीन शाळेत अनु अजूनच छान रुळली. तिचा निहारिका, ऐश्वर्या, अद्विती आणि सबा या मैत्रिणींबरोबर चांगला ग्रुप जमला होता. गणपतीत डान्स वगैरेमध्ये अनु मैत्रिणींबरोबर हिरीरीने भाग घेत असे…


....”पप्पा कुठवर पोचलात?” लंच टाइममधे जेवताना तोंडात असलेला घास गीळत अनु फोनवर विचारते.

“ठाण्याला!” भूतकाळात गेलेल्या निलच्या तोंडून निघून गेलं.

“ठाण्याला??” अनुने आश्चर्याने विचारलं.

“अगं नाही… म्हणजे… आम्ही पहिला टोल क्रॉस केलाय!”.

“पप्पा मग ठाण्याला काय म्हणालात हो? तुम्ही पण ना पप्पा…” अनु हसून म्हंटली.

“ते जाऊ दे. कॅफेटेरियातलं जेवण कसं आहे गं?”.

“छान आहे पप्पा!”.

“आणि हे बघ, रोज जॉगिंग आणि सूर्यनमस्कार, “टू-मिल्स-अ-डे” डाएटमधे लो कार्ब्ज, हाय प्रोटीन फुड, स्प्राऊट्स, नॉन व्हेज.. सगळं लक्षात आहे ना बेटा. कर हा सगळं नीट. दर वीकएंडला तू येशील तेव्हा मी सगळ्यात आधी वेईन्ग स्केलवर तुला उभं करत जाणार आहे, लक्षात आहे ना?”. स्वतःचे १० वर्षांपूर्वी ९७ किलो पर्यंत वर गेलेले वजन ८-९ वर्षात अधे-मधे जिम/सायकलिंग/सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम करून निलने ८१-८२ वर आणले होते आणि गेल्या १४ महिन्यात डॉ.जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल मॉडिफिकेशन प्लॅन - “टू-मिल्स-अ-डे”डाएट (त्यात सलाड, लो कार्ब्ज, हाय प्रोटीन फुड) आणि साधारण तासभर सायकलिंग आणि १२-२४ सूर्यनमस्कार करून अजून १५ किलो वजन कमी करून निलचे वजन आता ६६ किलोपर्यंत कमी झालेले होते! ओव्हरवेटमुळे जडलेल्या डायबेटिसची १२ वर्षं घ्यायला लागत असलेली आणि हळू-हळू वाढतच जाणारी औषधं त्याची गेल्या १४ महिन्यात हळू-हळू कमी होत बंद झाली होती! तसेच बीपीचीही औषधं कमी झाली होती. शिवाय गेले काही वर्षं असलेले फॅटी लिव्हर ह्या वर्षी तपासणीत नॉन-फॅटी आले होते! ह्या सगळ्यामुळे निल अगदी घरातल्यांपासून इतरांपर्यंत वाईट लाईफस्टाईलमुळे जडलेल्या व्याधी लाइफस्टाइल सुधारणाच कशा बऱ्या होऊ शकतात, हा डॉ.जगन्नाथ दीक्षितांचा मंत्र व स्वतःचा अनुभव शेअर करत असे. त्यामुळे अनेकांच्या जीवनात चांगले आरोग्य आणण्याच्या डॉ. दीक्षितांच्या पूर्णपणे मोफत असलेल्या सामाजिक कार्याला त्याचा थोडा हातभार लागत होता. स्वतः व्यायामाची आणि व्यवस्थित आहाराची शिस्त थोडीशी उशिराने का असेना, बाणवल्याने झालेल्या ह्या खूप चांगल्या बदलांनी प्रेरित झालेल्या निलने अनुलाही तिच्या १२वीच्या सुट्यांपासून सूर्यनमस्कार आणि वॉक करत जा म्हणून सुरुवात करून दिली होती. अनुही बऱ्यापैकी ते आचरणात आणत असे.


“हो पप्पा, अगदी नक्की करीन.”  

दॅट्स लाईक पापाज गर्ल!” समाधानाने म्हणत निलने वासंतीकडे फोन दिला.

“बरं आहे का गं जेवण अनु? घरी नीट जात जा.. आणि रोज फोन करत जा बरं का. पप्पानी सांगितलेलं एक्सरसाइज आणि डायटचं लक्षात ठेव गं बाई.” वासंतीने अनुला एका दमात बजावले.

“हो गं आई, तू भाईला फोन दे बरं!”.

“वेदांत.. बघ ताईचा फोन आलाय. उठ! बोल बेटा तिच्याशी”. प्रवासात नेहमी झोपणाऱ्या वेदांतला उठवत वासंती बोलली. वेदांतने आळोखेपिळोखे देत फोन घेतला.

“भैय्या, काय करतो आहेस? झोपला आहे का आमचा चीटोज?” अनुने हसत तिच्या लाडक्या पिल्लूभाईला विचारले.

"हो गं ताई!" आळसावलेल्या वेदांतचे उत्तर.

“अभ्यास करत जा बरं का रोजच्या रोज आणि आईला त्रास देत जाऊ नकोस!” अनुताईची सुचना!

“हो गं! ठेवतो मी आता, झोप येतेय ताई” म्हणून वेदांतने वासंतीकडे फोन दिला.

“काळजी घे गं आणि जेवण बनवायला मावशी लावून घ्या. तिला आधी हॅन्डवॉश वगैरे करायला सांगत जा.”

“हो गं आई, तुझं सुरू झालं! माझा लंच टाईम संपत आलाय, ठेवते मी आता. बाय आई, बाय पप्पा, बाय भाई!”

“बाय!” तिघेही अनुला बाय करतात…


…. “अरे वा! आई, आपल्याकडे बाळ येणार?” घरात अचानक अधिकच आनंदमय झालेले वातावरण आणि त्याचं कारण आई आजी आणि आईच्या बोलण्यातून कळल्याने उत्साहित झालेली अनुने आईला विचारलं. तिच्या डोक्यावर हात फिरवत स्मितहास्याने “हो बेटा, तुला बहिण किंवा भाऊ मिळणार” वासंती म्हंटली आणि तेव्हढ्यात “याहूSSS, येस्स!” असं म्हणत, त्या दोघींच्या आनंदात सहभागी होत, दोघींना कवेत घेत निल आनंदाने जवळपास ओरडलाच!!


तेव्हापासून घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. बाळ येणार म्हणून सगळेच हरखून गेले होते. मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं, मुलगा झालं तर काय. त्याला अनुताई कसं खेळवणार, इत्यादी उत्साहभरीत चर्चा होत असत. अक्षयतृतीयेच्या दिवशी बाळाचा जन्म झाला. “मुलगा झालाय” असा निरोप आणणाऱ्या नर्सला निलने ताबडतोब पाचशे रुपये बक्षीस दिले. ‘अनु मुलगी आहे म्हणून मुलगा झाला तर छानच, नाहीतर मुलगी झाली तरी उत्तम!’ असं वासंती आणि निलचं मत होतं. बातमी ऐकून अनु हसत-हसत टाळ्या वाजवल्या. ‘मला कधी बघायला मिळेल माझा पिटुकला भाऊ’ हे भाव तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरून ओसंडत असतात. थोड्या वेळाने डॉक्टरांनी एकदाची बाळाला बघायची परवानगी दिली. सगळ्यांनी बाळाला बघितलं, "किती गोड आहे" असं कौतुक केलं. सगळं वातावरण अगदी आनंद आणि उत्साहाचं झालं होतं. निलने बाळाकडे वात्सल्यपूर्ण नजरेने बघत अगदी अलगदपणे आपली तर्जनी त्याच्या हातात दिली. बाळानेही त्याच्या छोटुश्या हाताने निलचे बोट पकडून ठेवले. निलला त्या प्रसंगातील आनंद आयुष्यभर पुरणार होता! थोड्या वेळाने बाहेर आल्यावर निल एकाच वेळी दोन मोबाईल फोनवरून सगळ्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना ही आनंदाची बातमी देत होता! अनु बाळाला बघून हरखून गेली होती. सगळ्यांनी नंतर वासंतीला भेटून तिची चौकशी केली. बाळ जरा प्रिमॅच्युअर झाल्याने काही दिवस हॉस्पिटलमधे ऍडमिट होतं.


अण्णांनी दवाखान्यातच बाळाच्या जन्माआधी एक चिट्ठी "बाळाच्या जन्मानंतर वाच" म्हणून निलला दिलेली होती. त्यात "मुलगा होणार आहे, ‘वेदांत’ नाव ठेवू या!" असं अण्णांनी लिहिलेलं होतं. त्याप्रमाणे बाळाचं नाव “वेदांत” ठेवलं होतं. वेदांतच्या कौतुकात मग्न झालेल्या कुटुंबाला बघता-बघता एक वर्षं कसं गेलं कळलं देखील नाही. वासंतीला डॉक्टरांनी काही महिने बेडरेस्ट सांगितलेली होती. काही आठवड्यातच अनु आपल्या आईला अगदी बाळाचे दुपटे बदलायलाही मदत करू लागली! दोघी माय-लेकींचं वेदांत बरोबर खेळ, त्याचे कोड-कौतुक कर, त्याचे विविध पोजेसमधे फोटो-व्हिडिओ काढ असं चाललेलं असायचं. वीकेंडला निलही त्यांना जॉईन होत असे. वेदांतला कडेवर घेऊन टीव्हीवर गाणी लावून डान्स कर, त्याला फिरायला घेऊन जा असं त्याचंही चालू असे.


वेदांतचा पहिला वाढदिवस जवळ आला होता. निल आणि वासंतीने अनेक वर्षांनी आयुष्यात आलेल्या आनंदामुळे वेदांतचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा असं ठरवलं होतं. ठाण्यात एका हॉटेलमधील बँके हॉल बुक करून साधारण पावणे दोनशे आप्तेष्ट आणि मित्रमंडळींना आमंत्रित केलं होतं. लहान मुलांपासून सिनियर सिटिझन्सपर्यंत सर्वांसाठी विविध गेम्स, मुलांचे-मोठ्यांचे डान्स, सगळ्या वयोगटातील "गर्ल्स"चा कॅट वॉक, मॅजिक शो, टाटू कॉर्नर अशा नानाविध कार्यक्रमांची तसेच स्टार्टर्स आणि जेवणात उत्तम खाद्यपदार्थांची रेलचेल! असं सगळं इव्हेंट मॅनेजरने निलच्या सूचनांनुसार प्लॅन केलेलं होतं. जेवणाच्या वरच्या मजल्यावरच्या हॉलमधे वेदांतच्या मागील एक वर्षातील विविध फोटोज आणि विडिओ क्लिप्सचा वापर करून एक-दीड तासाची एडिट केलेली एक मुव्ही प्रजेक्टरवर लावलेली होती. अनुताई तर पूर्ण ४-५ तास अगदी एक्ससायटेड होती. तासंतास डान्स करून देखील ती नाचायची थांबली नव्हती. खूप एन्जॉय करत होती ती - इन फॅक्ट, वासंती आणि निलच्या आयुष्यात अनेक वर्षांनी आलेला हा आनंद ओसंडून वाहतानाचा अनुभव सर्व निकटवर्तीयांना येत होता!


अनुताई वेदांतपेक्षा १० वर्षांनी मोठी असल्याने अगदी आईच्या मायेने त्याला जपत असे! त्याला काही लागले, पडला वगैरे तर तिचे डोळे पाणावत. वेदांतच काय, पाहुण्यांच्या लहानग्यांनाही अनु अतिशय काळजीने खाली खेळायला नेणे, आणणे, त्यांच्याकडे लक्ष ठेवणे असं अगदी न सांगता करत असे. तिच्या ह्या वागण्याने निलला अनेकदा "she is too mature to her age!" असं वाटत असे. छोट्या वेदांतला भेटायला येणाऱ्या वेदांतसह सगळेजण अनुचंही खूप कौतुक करत.

वेदांत दीडेक वर्षांचा असताना एकदा अनुला बरं नव्हतं - ताप आला होता. रात्री ताप उतरायचा आणि दिवसा पुन्हा चढायचा असं चाललं होतं. सुवातीला डॉक्टरनी नॉर्मल वायरल फीवरची औषधं दिली, पण ताप काही उतरेना! नंतर ज्युपिटर ह्या नामांकित हॉस्पिटल मधे अनुला MD डॉक्टरकडे आता न्यायला हवं म्हणून निल व वासंतीने अनुला नेलं. तापाची लक्षणं आणि तेव्हा मोठ्या प्रमाणात आलेली स्वाईन फ्लूची साथ बघून डॉक्टरनी टू बी ऑन सेफ साईड, स्वाईन फ्लू साठीची ब्लड टेस्ट जुपीटरच्याच पॅथलॅब मधे करून घेण्यास निलला सांगितले. निल आणि वासंतीच्या पोटात गोळाच आला! तरी मन घट्ट करीत निल अनुला व वासंतीला घेऊन तळमजल्यावरच्या पॅथलॅबमधे गेला. स्वाईन फ्लूची टेस्ट डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेली असूनही MD पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरने निलला "मी तुमच्या मुलीची टेस्ट करू शकत नाही, त्याने माझ्या हेल्थला रीस्क आहे" चक्क असं सांगितलं!! हे ऐकून निलची तळपायाची आग मस्तकाला गेली. निलने पॅथॉलॉजिस्टला दरडावत "If you are scared about performing tests on patients, why the hell have you got in this profession?" असा जाब विचारला. पण निलाजरा पॅथॉलॉजिस्ट काही तयार झाला नाही. निलने तडक टेस्ट ज्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केली होती त्यांना फोन करून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला व "ताबडतोब खाली येऊन पॅथॉलॉजिस्टला समज द्या नाहीतर हे प्रकरण मिडिया वगैरे पर्यंत पोहोचवायची मी सोय करीन आणि मग हे प्रकरण फार ताणलं जाईल" ही समज त्यांना दिली. MD डॉक्टर प्रसंगाचं गांभीर्य ओळखून लगबगीने खाली आले. त्यांनीही पॅथॉलॉजिस्टची चांगलीच कान उघाडणी केली. त्याने शेवटी नाईलाजाने टेस्ट सॅम्पल घेतलं.

दोन दिवसांनी हॉस्पिटलकडून "तुमच्या मुलीला स्वाईन फ्लू झालाय, तिला घरातच आयसोलेटेड रूम मध्ये ठेवा आणि तुम्ही सर्वांनीही प्रेकोशनरी मेडिसिन्स घ्या" म्हणून कळवले. हा फोन आला तेव्हा निल ड्राईव्ह करत होता, त्याला हे ऐकून काही सुचेनासेच झाले. पण घरापर्यंत येताना सावरून त्याने सर्वाना एकत्र बोलावून अनुला स्वाईन फ्लूची लागण झालीय आणि आपणा सर्वांनाही काळजी घ्यायला हवी हे शांतपणे समजावून सांगितले. अनुला ४-६ दिवस तिच्या रुममधेच राहायला लागेल. सर्वानी वारंवार हॅन्डवॉश करायचे इत्यादी सूचना दिल्या. निल डॉक्टरांनी प्रेस्क्राईब केलेल्या मेडिसिन्स अनुची आणि इतर सर्वांसाठी घेऊन आला. अनुला समजावल्याप्रमाणे तिने अगदी धीराने स्वाईन फ्लूचा सामना केला. कुणाला आणि विशेषतः "बाबप, बाबप" असं तिला म्हणत तिच्याभोवती सदैव गोंडा घोळणाऱ्या छोट्या वेदांतला ती कटाक्षाने जवळ येऊ देत नसे. सर्वाना "जेवणाच्या आधी हात धुतले का" ह्याची आठवण करून देत असे. कुठून इतकी समज दिली आहे ह्या मुलीला देवाने, कुणास ठाऊक! काही दिवसातच अनुचा ताप उतरला आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.


वेदांतच्या जन्मानंतर अडीच-तीन वर्षांनी वासंती आणि निलने पुण्याला मोठं घर घेऊन शिफ्ट व्हायचं ठरवलं. अनुला तिच्या मैत्रिणींपासून दूर जाणार ह्याचं खूप वाईट वाटत होतं. तिच्या आणि तिच्या मैत्रिणींच्या आई-वडिलांबरोबर वासंती-निलचाही एव्हाना छान ग्रुप जमलेला होता. तसेच आई- अण्णांचाही सिनियर सिटिझन्स बरोबर छान ग्रुप जमलेला होता. सगळ्यांचा निरोप घेऊन निल आणि कुटुंबीय ठाणे सोडून पुण्याला शिफ्ट झाले.


पुण्यातील फ्लॅट ऐसपैस परंतु दोनच बिल्डिंग्जचा कॉम्प्लेक्स होता आणि त्यातही एक बिल्डिंगचं बान्धकाम सुरू होतं. अगदी तीन-चार कुटुंबच राहायला आलेले होते. अनुच्या वयाचं तर कुणीही नव्हतं. हळू-हळू इतर कुटुंब यायला सुरुवात झाली आणि एक-दोन वर्षात दोन्ही बिल्डिंगमधे बरीच कुटुंबं राहायला आली. वेदांतचे बरेच मित्र-मैत्रिणी झाले, परंतु अनुच्या वयाचं मात्र कुणी नव्हतं. सुरुवातीचे तीन-चार दिवस वगळता अनुची काहीही तक्रार नसे. ती शाळा-अभ्यास, ड्रॉईंग-पेंटिंग, सणावाराच्यावेळी आईबरोबर रांगोळी काढणे वगैरे ह्यात स्वतःला आनंदाने बिझी करून घेत असे. अनु आयुष्याबद्दल खूप पॉजिटीव्ह आहे. नेहेमी हसरा चेहरा, कुतूहल असते तिच्या वागण्या-बोलण्यात!


पुण्याला आल्यानंतर वासंती एक-दोनदा सहज "भारताबाहेर जायला मिळालं तर किती छान होईल" असं निलला म्हंटली आणि मग निल देखील योग्य अपॉर्च्युनिटीसाठी लक्ष ठेवून होता. काही महिन्यातच लंडनची असाइनमेंट निलला मिळाली. सगळं कुटुंब परत उत्साहित झालं. अनु आठवीत असल्यामुळे ३ वर्ष (तिच्या दहावीपर्यंत) नाहीतर एकच वर्ष राहायचं असं ठरलं. लंडनला जाण्याआधी महाबळेश्वरची छान छोटीशी ट्रिप झाली. त्यावर्षीच्या पहिल्या पावसाचे उल्हसित वातावरण आणि काही आठवड्यात लंडनला जायचे ह्याने सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. सुरुवातीला निल लंडनला जाणार असं ठरतं. जाताना आई- अण्णांचा एक ते तीन वर्षं सहवास राहणार नाही ह्या विचाराने निलचे डोळे पाणावतात.


तीन आठवड्यातच निलने अनु-वेदांतची स्कुल, अपार्टमेंट बघून वासंती आणि मुलांना लंडनला बोलावून घेतले. निलला अनुची चांगली स्कुल, घराजवळ मिळेल की नाही ह्याचे जरा टेन्शन होते. वेदांत तर नर्सरीतच होता तेव्हा त्याला अगदी कुठे ऍडमिशन नाही मिळाली तर चर्च स्कुल मधे सुरुवातीला घालता येईल अशी माहिती त्याने काढली होती. अनुची ऍडमिशन झाल्यावर निलला हायसं वाटलं.


लंडनला जाताना निलसह सर्वाना बिझिनेस क्लासने ट्रॅव्हलचा छान अनुभव मिळाला होता. सुरुवातीचे काही आठवडे सेटल होणे, दर वीकेंडला थेम्स रिव्हर, लंडन आय, बिग बेन इत्यादी ठिकाणी फिरणे. नंतर जवळपासच्या इतर पिकनिकच्या ठिकाणी जाणे, असे खूप मजेत दिवस गेले सगळ्यांचे. वेदांतच्या मित्र-मैत्रिणींच्या पॅरेंट्सबरोबर ग्रुप जमला. वीकेंड्सला एकमेकांच्या घरी धमाल करणे,पॉटलक करणे असा छान वेळ जात असे. वीकडेजमधे मात्र निल कामात खूप बिझी असायचा. रात्री एक-दीड वाजेपर्यंत त्याचे काम चाललेले असे व परत सकाळी सहाला उठून तयार होऊन तो आठ वाजेला सगळ्यांच्या आधी ऑफिसमधे पोहोचून काम सुरु करत असे!


फिरायला जाताना आता निल अनुला वेगवेगळ्या जागा कशा शोधून काढायच्या, त्यांचे मेट्रो रूट्स कसे बघायचे असं सगळं शिकवत असे. नंतर अनु ट्रिप्स स्वतः प्लॅन करू लागली. वासंती आणि निल दोघेही, अनु त्यांच्याबरोबर शाळेतील गोष्टी शेअर करेल असं वातावरण कटाक्षाने ठेवत. अनुला लंडनमधील प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षणाची पद्धत आवडली होती. तिला नववीत मॅथ्स, सायन्स व्यतिरिक्त "बिझिनेस अँड मीडिया" पासून अगदी "कार्पेंटरी (सुतारकाम)" असे विविध विषय होते! तीन-साडेतीन वर्षाच्या नर्सरीत जाणाऱ्या वेदांतला देखील सँडविच स्वतःचे स्वतः कसे बनवायचे हे शिकवले गेले होते! पाश्चिमात्य देशातील काही गोष्टी मनाला न पटणाऱ्या असल्या तरी अनेक गोष्टींमधे ते आपल्या काही दशकं कसे पुढे आहेत, आणि त्यांच्या अनेक गोष्टी आपण आचरणात कशा आणायला हव्या हे नक्कीच जाणवते. फक्त ह्या चांगल्या गोष्टी हेरून त्या आत्मसात करायची तयारी ठेवायला हवी!


निलची असाइनमेंट एक वर्षाच्या आतच संपणार असे कळले. मग निल आणि कुटूंबीयांनी "आयल ऑफ वायीट" ह्या प्रेक्षणीय आयलंडवर आठवडाभर आणि “लेक डिस्ट्रिक्ट” ह्या दुसऱ्या सुंदर ठिकाणी आठवडाभर अशा छान लिजर ट्रिप करून घेतल्या. आयल ऑफ वायीट मधे मोट्ठ्या caravan मध्ये टुमदार कोझी-कोझी २ bhk मधे आठ दिवस राहण्याचा व आयलंडवर भरपूर फिरण्याचा आनंद चौघांना घेता आला. एकदा हौशी अनुने सगळ्यांसाठी "इंग्लिश ब्रेकफास्ट" स्वतः बनवला होता! तसेच लेक डिस्ट्रिक्टलाही निलने फर्निश्ड बंगलो आठ दिवसासाठी बुक केला होता. तिथेही त्यांनी धमाल केली. त्याआधी त्यांचे स्कॉटलंडला निलच्या भाच्या पल्लवी आणि केतकीकडे जाऊन झालेले असते. एकंदर लंडनची छान शॉर्ट आणि स्वीट ट्रिप झकास झाली होती.


निलने रिस्क नको म्हणून अनुची पुण्यातल्या शाळेतली ऍडमिशन ठेवलेली होती. वेदांतची मात्र ऍडमिशन ठेवलेली नव्हती. नशिबाने त्याच्या आधीच्याच DAV स्कुलमधे त्यालाही ऍडमिशन मिळून गेली. परत आल्यावर दोन वर्ष अनुचे नववी-दहावीत निघून गेले. अनुने दहावीला चांगले मार्क्स मिळवल्याने खूष झालेल्या निलने अनु आणि कुटुंबियांना "बार्बेक्यू नेशन्स" मधे पार्टी दिली होती. पुढे ११-१२वी साठी निलने अनुला “महेश ट्युटोरियल्स” ह्या नामांकित क्लासेसमधे घातले. १२ वीचा आणि १२वी नंतरच्या अनेक एंट्रन्स एकजाम्सचा अभ्यास अनुला जरा जड गेला, आणि तिला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाले. तिच्यावर जास्त लोड नको ह्या दृष्टीने तिला कशात रस वाटतो हे बघून अनुची ऍडमिशन BCA ला घेतली. तो निर्णय अनुने सार्थकी लावला. कम्प्युटर सायन्समधे ती चांगली प्रगती करत होती. निलचा तिला वेळोवेळी गायडन्स मिळत असे. तिच्या BMCC कॉलेजमधेही चांगले इनिशिएटिव्हज असत. अनु उत्साहाने कॉलेजला जात असे. कॉलेजमधून आल्यावर सगळ्यात आधी येऊन पपांबरोबर आज कॉलेजमध्ये काय झालं, काय शिकवत आहेत, तिला ते कसं इंटरेस्टिंग वाटतं आहे, कॉलेज मधील गमती-जमती शेअर करत असे. तिच्या स्वतंत्र लॅपटॉपवर ती प्रोग्रामिंगची प्रॅक्टिस करत असे, परंतु टिपिकल बाबांप्रमाणे पप्पाना तिने सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमधे अजून खूप कौशल्य प्राप्त करावे अशी अपेक्षा असे. अनुला BCA च्या पहिल्या वर्षीच्या सुट्टीत निलने तिला तिच्या मावस बहिणीच्या - अश्विनीच्या - कंपनीत अश्विनीच्या मदतीने अप्रेंटिसशिपसाठी महिना-दीड महिना पाठवले. त्याचा अनुला डेटा ऍनालिटिक्सचे एक-दोन टूल्स शिकायला झाला. तिला त्या कंपनीतल्या सरानी प्रेझेन्टेशनही देण्यास सांगितले. ते अनुने उत्तमरीत्या दिले व तिचा आत्मविश्वास आशूताईनेही अँप्रिशिएट केला


अनु ९वी पासूनच क्लासला जाण्यासाठी स्कुटर चालवायला निलकडून शिकली होती. खरं तर सोसाटीचा अर्धा राउंडच निलला तिच्या मागे धावायला लागलं आणि नंतर अनु हळू-हळू छान स्कुटर चालवू देखील लागली. काही महिन्यातच ती वासंतीला डबलसीट घेऊन फिरू लागली! अनु हेल्मेट वगैरे वापरते की नाही फास्ट तर चालवत नाही ना ह्याकडे निलचे लक्ष असे. निलचे लेकीबरोबर अनेक विषयांवर डिस्कशन्स होत असे. सॉफ्टवेअर फिल्ड मधील निलचे अनुभव, काय चांगले - काय वाईट, नेटवर्किंग कसे इम्पॉर्टन्ट असते, इथपासून ते आई-आजी, अण्णा बाबांच्या, भावा-बहिणींच्या गमती-जमती निल तिच्याबरोबर शेअर करत असे. एव्हाना "नीट गाडी चालव, हे कर, ते करू नकोस" अशा पप्पांच्या सूचनांना अनु हसून त्यांच्या खांद्यावर हात ठेवून "अहो पप्पा, मी आता मोठी झालीये, नका काळजी करत जाऊ" असं सांगत असे. तेव्हा निलला आता हळू-हळू ‘फादरली प्रोटेक्शन मोड’ मधून बाहेर यावे लागेल असं निलला जाणवायला लागलं.


एकदा निलला त्याच्या एका नातेवाईकाकडून त्याच्या आधीच्या लग्नाच्या मुलीचा - श्रद्धाचा - फोटो मिळाला होता. तो बघत असताना गालावरून ओघळणाऱ्या अश्रुना निलने वाट मोकळी करून दिली. अचानक अनु पप्पांच्या रूममधे नेहेमीप्रमाणे बोलायला आली आणि पप्पांची अवस्था बघून हळूच "काय झालं पप्पा?" म्हणून तिनं विचारलं. तेव्हा फोटो कुणाचा हे कळल्यावर अनु आपल्या पप्पांच्या खांद्यावर हात ठेवत आणि स्वतःच्या अश्रुना प्रयासाने सांभाळत पप्पांना "नका रडू पप्पा, श्रद्धा भेटेल तुम्हाला कधीतरी नक्कीच! मी शोधून काढीन तिला!" असा धीर दिला. लेकीचा हात हातात घेत दुसरी लेक कुठे आणि कशी असेल ह्या विचाराने निलला अजूनच भावुक व्हायला झाले होते. अनुची ती माया त्याला कायमची लक्षात स्मरणात राहणार होती. काही हट्टी मुलं-मुली बघितल्यानंतर निल आणि वासंतीला आपण मुलांच्याबाबतीत किती निश्चिन्त आणि नशीबवान आहोत हे वेळोवेळी जाणवत असे! निलला तर अनुने एकदाही कसला हट्ट केलेला आठवत नव्हता. वासंतीला अनुची खूप मदत होत असे. वासंतीला स्कुटर खूप चांगली चालवायला येत नसल्यामुळे अनुला 'हे आण, ते आण' सांगणे, तिच्याबरोबर डबलसीट बसून आपल्या कामांसाठी तिला घेऊन जाणे अशी वासंतीला तिची मदत होत असे. अनुही कॉलेजमधून निघताना "आई काही आणायचंय का गं" असं फोन करून विचारी, कारण अनेकदा वासंती तिला सर्व वस्तूंची यादी न देता हेलपाटा घालायला लावत असे. मग आईसाठी किंवा आजीसाठी हव्या असलेल्या वस्तू अनु घेऊन येत असे. तसेच पाहुणे येत असल्यास अनु आणि वेदांतकडे आवराआवरीचे, निलकडे चिरचार करण्याचे आणि मेन स्वयंपाकाचे काम वासंतीकडे असे!

BCA ला असताना अनुला "सायबर सिक्योरिटी" ह्या विषयावर एका कंपनीकडून ट्रेनिंग मिळाले होते आणि "सायबर सिक्योरिटी" चा अवेअरनेस शाळेतील मुलांमध्ये वाढावा ह्यासाठी कॉलेजने अनु आणि तिच्या मैत्रिणीला - नेहाला - वेगवेगळ्या ५-६ शाळेतील मुलांना एक-दीड तासाचे लेक्चर द्यायला पाठवले. २००-३०० मुलं आणि त्यांचे टीचर्स ह्यांच्यासमोर लेक्चर द्यायचे अनुला पहिल्यांदा थोडे टेन्शन आले होते. पप्पानी तिला तयारीसाठी मदत केली होती आणि अशी संधी सगळ्यांना मिळत नाही हे पटवून तिचा कॉन्फिडन्स बूस्ट केला होता. दोन-तीन लेक्चर्स नंतर अनुचा कॉन्फिडन्स आणखीनच दुणावला आणि सगळ्या स्कुल्समधील लेक्चर्स छान झाली. तिच्या ह्या कामगिरीबद्दल त्या कंपनीकडून तिला आणि नेहाला प्रेत्येकी चार-चार हजार रुपये मिळाले होते. त्यात अनुने पप्पा “नको” म्हणत असताना तिच्या पहिल्या कमाईतून त्यांच्यासाठी शर्ट घेतला! निलला पोरगी मोठी झाल्याच्या अनुभवाची पहिली अनुभूती झाली! अनुच्या आणि नेहाच्या ह्या कामगिरीबद्दल “टाइम्स ऑफ इंडिया” मधे छोटीशी बातमी देखील आली होती. लेकीचं नाव छोट्याशा बातमीत का होईना एवढ्या नामांकित पेपरमधे झळकले आहे ह्याबद्दल निलला अतिशय आनंद आणि सार्थ अभिमान वाटला होता.


निलने सोसायटीत देखील अनुला हे लेक्चर द्यायला प्रेरणा दिली. अनेकजण अनुने कमी वयात दिलेल्या छान माहितीबद्दल आणि आत्मविश्वासाबद्दल तिचं अभिनंदन आणि कौतुक केलं होतं. सोसायटीत गणेशोत्सवात देखील अनु गेम्ससाठी वगैरे छान अँकरिंग करीत असे. तसेच तिने सोसायटीच्या एका मोठ्या भिंतीवर काही लहान मुलं आणि निलच्या मदतीने काढलेल्या वारली पेंटिंगचंही सर्वानी खूप कौतुक केलं होतं. अनुच्या हाती चित्रकला छान आहे आणि ती तिने कायम जोपासावी ह्याची निल तिला मधे-मधे आठवण करून देत असे.  


BCA च्या शेवटच्या वर्षाला असताना निलने अनुला "MCA करायचे असल्यास कॅम्पस इंटरव्ह्यूजना ऍपिअर होऊ नकोस, सिलेक्ट झालीस तर द्विधा मनस्थिती होईल” असे सजेस्ट केले होते. पण अनु एका चांगल्या मोठ्या MNC कंपनीच्या इंटरव्यूचा अनुभव यावा म्हणू "पप्पा मी एक्सपीरियन्स साठी देऊन बघते" असं म्हणाली. ६००-७०० मुला-मुलींमधून टेस्ट ७० मुलं-मुली पास झाले होते. त्यातून २० मुलं मुली इंटरव्ह्यूजच्या राऊंड्समधून सिलेक्ट झाले होते. त्यात अनु एक होती! ह्या यशामुळे खूष झालेली अनु सर्वात आधी स्वामी समर्थांच्या गोगावले मठात जाऊन, स्वामींसमोर मनोभावे डोकं टेकवून उड्या मारत घरी आली व तिची एका मोठ्या MNCत कॅम्पस सिलेक्शन झाले ही बातमी तिने आई-पप्पाना दिली. कंपनी चांगली असल्यामुळे आणि MCAच्या दोन वर्षांचा सिलॅबस BCAच्या जवळपास सारखाच असल्याने निललाही तिने ही कंपनी जॉईन केलेलं योग्य राहील असं वाटलं. घर अनुच्या यशाच्या आनंदाने खुलून गेलं. परंतु अनु आता रोज आपल्याबरोबर नसणार ह्या विचाराने सगळे जरा उदास देखील होत. जसजसे अनुचे जॉइनिंग जवळ येत होते तसतसे वासंतीने आणि निलने छोटी-छोटी कामं वेदांतला सांगायला सुरुवात केली. लबाड वेदांत मात्र वस्तूंबरोबर आपला खाऊही घेऊन येत असे. 😊 दुकानदाराला किती पैसे दिले, बील किती झालं, किती पैसे परत यायला हवे ते तपासणे ह्या गोष्टी आता वेदांत चोख करायला लागला होता. मुलांना व्यवहारी ज्ञान लहानपणापासून आलेले योग्यच. निल अनुबरोबर बिझिनेस आयडीयाज आवर्जून डिस्कस करत असे, जेणेकरून अनुलाही त्यातले बारकावे कळावे. काही वेळी वेदांत जवळ असला तर निगोशिएट कसे करता येईल हे त्याच्या बालसुलभ मनाला वाटेल तसे सांगत असे! त्याचे बरेच सजेशन्स निलला योग्य वाटल्याने तो वेदांतचेही कौतुक करी.


निल अनुला वेळोवेळी पोस्ट ग्रॅज्युएशन करिअर ग्रोथसाठी कसं आवश्यक आहे ह्याची आठवण करून देत असे. अनुनेही ते करायचं ठरवलं होतं. निलचं स्वप्न खरं तर अनु (आणि नंतर वेदांतनेही) ग्रॅज्युएशन करून न थांबता पुढे MS वगैरे करावं असं होतं. १२वीत जरी अनु मोठे यश कमावू शकली नव्हती, तरी पुढे BCA करताना तिच्यात कॅपॅबिलिटीज नक्कीच आहेत हे हेरून निलने तिला MS करायचं टार्गेट ठेव असं वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. त्यासाठी गुगलवर इन्फॉरमेशन काढ, जे MS करताहेत / झाले आहेत त्यांच्याशी बोल आणि MS कर, हे तो अनुच्या मनावर ठसवत आला होता. त्याबरोबरच आरोग्य जपणे किती महत्वाचे आहे हेही निल अनुला वारंवार सांगत असे. अनुला सेल्फ-डिफेन्सचे ट्रेनिंग द्यायला हवे होते असे आता अनु एकटी राहायला जाणार असताना निलला जाणवते. आजच्या युगात तेही खूप महत्वाचे झालेय. आई-वडिलांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही हे प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे.


निलच्या मते मुलांच्या लग्ना वगैरेंवर अमाप पैसे उधळण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त चांगल्या शिक्षणासाठी झेपेल तेव्हढे आर्थिक पाठबळ द्यावे. मुलांना गरज पडल्यास एजुकेशन लोन घेऊ द्यावे म्हणजे त्यांना आर्थिक शिस्तही लागते, शिक्षणही छान होते. त्याने करियरदेखील सुरुवातीपासून जोमाने काम करत चांगले करून करियरचा उत्तरार्ध जास्त धावपळीचा न ठेवता आयुष्य निरोगी, आनंदी आणि आपल्या लोकांबरोबर घालवताना समाजसेवेचीही संधी मिळू शकते! ह्याबरोबरच अनुने काही वर्षं अनुभव घेतल्यानंतर शक्यतो बिझिनेस मधे यावे, entrepreneur व्हावे ह्याबद्दल निलचे अनुला वेळोवेळी मार्गदर्शन होत असे.


….दरम्यान वासंतीने मेहनत घेऊन बनवलेल्या टेरेस गार्डनमधल्या ख्रिसमस ट्रीवर बुलबुल पक्षिणीची तीन बाळंतपणं झालेली असतात. अनु आणि वेदांत कुतूहलाने त्या पिल्लांकडे तासंतास बघत असत, फोटो, व्हिडिओ क्लिप्स. काढत असत आणि प्रत्येकवेळी साधारण १५ दिवसात त्या पिलांची वाढ होऊन ते हळू-हळू एक-दोन दिवस उडायची प्रॅक्टिस करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी इतर झाडांच्या फांदीवर उडून, तेथून थेट मोठी उडाण घेत उडून जात! प्रत्येकवेळी ते उडून गेल्यावर अनु आणि वेदांतची रडारड ठरलेली असे. आणि आता १५ वर्षांच्या सहवासानंतर आपली लेकही अशीच स्वतःच्या पंखांच्या बळावर सुरुवातीला हळू-हळू उडत नंतर मोठी भरारी घेणार ह्या विचाराने निलचे मन आनंद आणि ती हळू-हळू आपल्याला दुरावणार ह्याची उदासी, अशा मिश्र भावांनी भरून येत असे….


….आता लेकीला मुंबईला सोडून परत पुण्याला घरी येताना ह्या भावनांचे द्वंद्व निलच्या मनात जास्तच जोर धरत होते. तेवढ्यात अनुच्या फोनच्या रिंगने निल भानावर आला. "पप्पा पोहोचलात ना व्यवस्थित?".

"हो बाळा. आणि तुझा पहिला दिवस कसा जातोय?". निलने विचारलं.

"छान जातोय पप्पा. इंडक्शनमधे बरेच सिनियर सर करियरबद्दल त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करताहेत, मस्तच वाटते आहे ऐकून. बऱ्याच गोहस्ती ऐकताना 'पप्पानी आपल्याला हे सांगितले होते' अशी सारखी तुमची आठवण येतेय पप्पा". अनु उत्तरली.

“छान!” असं म्हणत निल "अनु, अगं तुझ्यासाठी एक पत्र ठेवलं आहे बघ तुझ्या डॉक्युमेंट्सच्या बॅग मधे, वेळ मिळाला की वाच ".     

"कुणाचे पत्र आहे हो पप्पा?".

"अगं मीच लिहिलंय तुला!" निलचं हसून उत्तर.

"खरंच?” सुखद आश्चर्याने अनु उद्गारली. तिचा आनंदी चेहरा इमॅजिन करून निललाही छान वाटले. “हॉटेलला गेल्या-गेल्या वाचते मग".


हॉटेलला गेल्यावर उतावीळ झालेल्या अनुने बॅग उघडली. त्यात तिला एक मोठठं ग्रीटिंग कार्ड एन्व्हलप दिसलं.. वेदांतच्या हस्ताक्षरात "Open With Smile" लिहिलेले व शेजारी एक Smiley असलेले! अनुच्या चेहऱ्यावर हसू फुलू लागलं. तिने एन्व्हलप उघडून बघितलं… त्यात एक सुंदर, रंगबिरंगी फुलांचे "Congratulations!" चे ग्रीटिंग कार्ड होते. मेसेज होता "Hard Work and Dedication go Hand-in-Hand. Your efforts have paid off!! Congratulations on your success!! Celebrations to follow..". अनुने आतले पण उघडून बघितले त्यात दोन फॅमिली फोटोज होते आणि कुटूंबियांनी विशेसच्या मेसेज खाली आपापल्या हस्ताक्षरात सह्या केल्या होत्या. ग्रीटिंग खाली एक gift wrap केलेले पॅकेट देखील होते. ते उघडून बघितले असता, अनुला एक कॅडबरी सेलिब्रेशन पॅक, तिच्या आवडीचे स्विस रोल आणि कॉफी बाईट चॉकलेट्स आढळले. ग्रीटिंग, त्याबरोबर फॅमिली फोटोज, ताईसाठी तिचा आवडता खाऊ ही सर्व वेदान्तची शक्कल होती हे अनुने लगेच ओळखलं. सगळं बघत असताना अनु सुखावत होती, आणि घरच्यांच्या आठवणीने डोळे थोडे पाणावले देखील तिचे! सर्वात खाली पप्पांचे पत्र होते. बाकी सगळं बाजूला ठेवून आपल्या पप्पांचे पत्र अनुने वाचायला सुरुवात केली….


“ऑल द बेस्ट बेटा!........” आणि पुढे जशी ती वाचत गेली तसे तिला हसायला येत होते, अश्रू अनावर होत होते, त्यामुळे नाकाचा शेंडा लाल होत होता आणि मधेच उदास, मधेच आनंद अशा विविध भावनांची सफर अनु करत होती......

(समाप्ती की सुरुवात?)


Rate this content
Log in