Anil Sonar

Horror Others

4  

Anil Sonar

Horror Others

रक्ताळलेला हात (भाग-२)

रक्ताळलेला हात (भाग-२)

25 mins
963


सानवीच्या हॉस्टेलच्या आवारातील पार्किंगपर्यंत शीतल जवळ जवळ धावतच कारपर्यंत आली आणि स्वतःला तीने मागच्या सीटवर झोकून दिले व डोळे मिटून कपाळावर हात उलटा ठेवून बसली. तिला धडधडल्यासारखे वाटायला लागले होते. एव्हाना लेकीला जरा शांत करून आपल्या शेजारी बसवून तिला "झोप बाळा आता" असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवत असलेल्या रोहनला शीतलची धावपळ का झाली ते कळेना. थकलेली सानू शांतपणे झोपी गेलेली होती.


"काय गं.. एवढी धावपळ कसली आणि अशी घाबरलेली का दिसतेहेस?".

"काही नाही! चल, निघू या. लौकर नाशिकला पोहोचलेलं बरं" शीतल उत्तरली.

तिच्या वागण्याचं कारण न कळलेला रोहन मान डावीकडून उजवीकडे दोनदा हलवत गाडी रिव्हर्स करून सरळ करत होस्टेलच्या गेट मधून काढतो आणि नाशिकच्या दिशेने गाडीने प्रस्थान ठेवले.


शीतलच्या बंद डोळ्यासमोर रक्ताळलेल्या हाताने मान तिरकी करत, भेदक नजरेने बघत, विचित्र हसून "बाय" करणारी मंजुषा येते. मंजुषाने "बाय" करून झाल्यावर आपल्या रक्ताळलेल्या हाताचं रक्त लांब जीभ काढून चाटलेलं शीतलच्या डोळ्यासमोर आल्यावर तिला भय आणि किळस ह्याने ओकारीची उबळ येते.

"काय गं? उलटी होतेय का? थांब एक मिनिट गाडी साईडला घेतो". असं म्हणत रोहनने गाडी पटकन रस्त्याच्या कडेला घेतली व उतरून धावत मागचा दरवाजा उघडून शीतलला बाहेर पडायला मदत केली. तिच्या पाठीवर हात फिरवत उलटी झाल्यावर तिला पाण्याची बाटली देत "गुळण्या कर आणि थोडं पाणी पी बघू". असं त्यानं सुचवलं. पाण्याचा सपकारा थोडा तोंडावर मारत आणि घोटभर पाणी पिऊन शीतलला थोडं बरं वाटलं. थोड्यावेळाने तिचा डोळा लागला आणि तिच्या डोळ्यासमोर बालपणीचे, कॉलेजचे, लग्नानंतरचे असंख्य प्रसंगांची गर्दी झाली आणि थोड्या वेळाने एकेक प्रसंग स्पष्टपणे उभे राहायला लागले... 


… शीतल ११-१२वीत असतांना राजपूतसाहेब नोकरीनिमित्त तालुक्याच्या ठिकाणी असतात आणि मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ते कुटुंबसाठी जिल्ह्याच्या गावी एक बंगला त्यांना राहायला म्हणून बांधला होता. शीतल अभ्यासाव्यतिरिक्त कॉलेजमधे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पोर्ट्स (हॉकी) वगैरे मधेही आवडीने भाग घेत असे. मोकळ्या आणि स्वच्छ मनाची शीतल मुलांबरोबर देखील सहजपणे बोलणे, मुलं-मुलींच्या ग्रुपमधे सहलीला जाण्यात भाग घेणे, किंबहुना, तशा सहली घडवून आणणे वगैरेमधे अग्रभागी असते. जीवनाचा निखळ आनंद लुटणाऱ्या शीतलच्या मोकळेपणामुळे काही मुलांचा उगीचच ती आपल्यात इंटरेस्टेड आहे असा गैरसमज होत असतो. उगीच काहीबाही कारण काढून बोलायला आलेल्या मुलांना शीतल बरोबर सौम्य शाब्दिक फटक्यांनी समजावत परतवून लावत असते.


तिच्या ह्या स्वभावाच्या देखील चर्चा मुलांमधे होत असतात आणि आणि तिच्याकडे कुणी सहसा विनाकारण बोलायला, किंवा तिच्या मनाविरुद्ध मैत्री करायला धजावत नसते. उगीच कुणी वायफळ बडबड, नो सेन्स जोक्स वगैरे केले तर शीतल त्यांना आपली हॉकी स्टिक दाखवत " ही बरीच मजबूत आहे बरं का, म्हणून जरा लिमिटमधेच राहा!" असा दम द्यायला मागे-पुढे बघत नसते. तरी शीतलचा सावळा रंग पण ठेवणीदार हसरा चेहरा, कमनीय बांधा, डॅशिंग आणि मनमोकळे नेचर हे कॉलेज मधील बऱ्याच तरुणांना भावते. आणि तिच्यावर जीव टाकणाऱ्या मुलांमधे ती आल्यावर "बघ तुझी वहिनी आली!" असं तिच्याकडे हळूच कटाक्ष टाकत हलक्या आवाजात बोलणं हमखास होतच असतं. कॉलेजची पोरं म्हणल्यावर ती पिढ्यानपिढ्या ह्या बाबतीत सुधारण्याची शक्यता विरळच! 😊


शंतनू हा शरदचा कॉलेज मित्र. त्याचे शरदच्या घरी येणे जाणे असते. तो जरा अबोल, शांत असा होता. कधी-कधी खोलवर विचारात गढलेला असे. शरद, शीतल आणि शंतनूची विविध विषयांवर चर्चा होत असे - अगदी कॉलेजचे वातावरण, स्पोर्ट्स, राजकारण इथपासून सामाजिक प्रश्न ते त्यावर आपण कसा तोडगा काढू शकतो वगैरे इथपर्यंत. ह्या चर्चाना त्यांना कुठली अशी बंधनं नसत. खूप जास्त न बोलणारा शंतनू ह्या चर्चांमध्ये मात्र सहभागी होत असे. परंतु चर्चा सुरु असताना सुद्धा अनेकदा त्याची काहीतरी तंद्री लागत असे. तो मधेच शून्यात बघतोय असे लक्षात आल्यावर कधी शरद तर कधी शीतल त्याच्या चेहऱ्यासमोर हात हलवत "काय रे, कुठे हरवलास?" विचारत त्याला भानावर आणित.


राजपूतसाहेबाना आणि सुनंदावहिनींना आपल्या मुलांवर विश्वास होता, त्यामुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे दिवसा आणि रात्री-अपरात्री येणे-जाणे, गप्पा मारणे त्यांना खटकत नसे. काही मित्र-मैत्रिणी रात्री अभ्यास-गप्पांमुळे उशीर झाल्यास त्यांच्या घरी रात्रभर राहत देखील असत. ह्याबाबतीत मात्र सुनंदाबाईंनी मुलांना मुलं आणि मुलींनी वेगवेगळ्या रुममधेच झोपावे हे कटाक्षाने बजावत. आणि शरद-शीतलदेखील नो-नॉन्सेन्स मित्र/मैत्रिणींनाच अशी आपल्या घरी राहण्याची मुभा देत. शंतनू त्यापैकी एक निरूपद्रवी मित्र होता.


एकदा रात्री उशिरा शंतनू-शरद-शीतलची राजपूतसाहेबांच्या घरी त्याकाळी गाजलेल्या एका प्रकरणावर चर्चा सुरु होती. भास्कर सिंग ह्या सरकारी अधिकाऱ्याने सरकारी योजनांच्या व्हेंडर पेमेंटसाठीच्या चेक्सवर मूळ आकड्याच्या आधी एखादा अंक लिहून (उदा. १०,०००/- ऐवजी १,१०,०००/-) लाखो रुपये सरकारी तिजोरीतून काढून हडपले होते! भास्करने आणि त्याचा "काळी टोपी" म्हणून ओळखला जाणारा मुख्य हस्तक शिपाई ह्यांनी इतर अधिकारी, वेंडर्स, राजकीय व्यक्ती ह्यांना त्यांचा वाटा पोहोचवून करोडो रुपयांची काळी माया बिनबोभाट कशी जमवली होती, त्यांची ही चर्चा सुरु होती. आणि आपल्या देशवासीयांच्या करातून मार्गी लागत असलेल्या सरकारी योजनांना अशा काही अप्रामाणिक गुन्हेगारी वृत्तीच्या सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेते ह्यांच्या साट्या-लोटयामुळे देशाच्या प्रगतीला खीळ बसते, ह्या विचारांनी त्या सळसळत्या रक्ताच्या तरुणांना अतिशय संताप होत असतो. तावातावाने ह्यावर काय उपाययोजना असायला हव्यात असा चर्चेचा ओघ वळत असतानाच अचानक शीतलला लिविंग रूममधून वरच्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याखाली काहीतरी हालचाल झाल्याचा भास होतो. सुरुवातीला भासच असावा म्हणून ती दुर्लक्ष करते परंतु पुन्हा हालचाल जाणवल्यावर ती जरा तिकडे लक्ष देते तेव्हा तिला एक केस मोकळे सोडलेली स्त्रीची, पाठमोरी, गुढग्यावर बसलेली आकृती आहे असे जाणवते. शीतलचे लक्ष गप्पांमधून त्या आकृतीवर केंद्रीत होते. ती स्त्री कंबरेपासून डोक्यापर्यंत हळू-हळू डावीकडून उजवीकडे गोल-गोल हलते आहे असं शीतलला दिसतं. आता मात्र शीतलला नक्कीच तिथे कुणीतरी आहे, ह्याची खात्री झाल्याने शब्द घशातच अडकतात. अचानक बोलायची थांबलेली शीतल, चेहऱ्यावरचे भीतीचे भाव हे बघून शरद तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवून म्हणतो "शीतल, काय गं, तुला काय झालं अचानक?". परंतु शीतल च्या कानापर्यंत जणू त्याचे शब्द पोहोचतच नाही. ती तशीच आ वासून भीतीने जिन्याखाली बघत राहते. आणि नंतर जेव्हा ती तंद्रीतून बाहेर येत नाहीये असं शरद आणि शंतनूला जाणवतं. जोरजोरात तिच्या चेहऱ्यासमोर टाळ्या वाजवत, शरद तिच्या खांद्याला धरून हलवतो "शीतल, अगं ए शीतल, काय चाललंय तुझं?" असं जवळपास ओरडतात तेव्हा मात्र जरा भानावर येत शीतल दोन्ही पाय पोटाशी दुमडून, प्रचंड भीतीने जिन्याकडे हात करत "ती बघ.. ती बघ.. जिन्याखाली घुमतेय!!" असं बरळते. शरद आणि शंतनू जिन्याच्या दिशेने मान वाळवून बघतात, त्यांना मात्र तिथे काहीही आढळत नाही. "कुठं काय आहे.. अशी काय घाबरलीस गं तू. हे घे, पाणी पी बघू आधी" असे म्हणत शरद शीतलला पाण्याचा ग्लास देतो. घटाघटा पाणी पिणाऱ्या शीतलकडे गूढपणे बघत असलेल्या शंतनूच्या चेहऱ्यावर मात्र एक विचित्र स्मितरेषा उमटली. शरद "चला, झोपू या मला वाटतं, रात्र खूप झालीये" असं म्हणत "शंतनू, तुझं काय आहे बाबा, थांबतो आहेस इथे की घरी जातोस?" शंतनूला विचारतो. "मी निघतो, घरी जातो" असं म्हणत शंतनू जायला उठतो. शरद शंतनूला जायला दार उघडून द्यावे म्हणून दाराकडे जातो, आणि क्षणभर तिथे घुटमळत शंतनू अजूनही घाबरलेल्या शीतलच्या नजरेत खोलवर बघत "मी आहे, इथेच असतो मी.. " असं त्याच गूढ, विचित्र स्मितहास्याने पुटपुटत दाराकडे जायला वळतो. त्याक्षणी शीतलला कधी-कधी विचित्र वागणाऱ्या शंतनूचीही पहिल्यांदाच भिती वाटली.


…. "हळू रे रोहन, आज जरा घाईत चालवतो आहेस तू गाडी!" क्षीण आवाजात शीतल रोहनला म्हणते. "सॉरी! अगं तुम्हा दोघीना जरा त्रास होत असल्याने, लवकर घरी पोहोचावे म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित आराम करता येईल इतकेच!" रोहन शांतपणे म्हणतो. आपल्यावर आणि आपल्या लेकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रोहनकडे शीतल प्रेमाने बघते. रोहनला ते मिररमधे दिसते, आणि "का गं अशी बघते आहेस शीतल, आता बरं वाटतंय का गं तुला?" असं विचारतो. "बरं वाटतंय रे पण आमच्यामुळे तुझ्या बिझनेस मधल्या कामात व्यत्यय येतो, ह्याचं वाईट वाटतं!". "अगं काहीतरीच काय. वी आर फॅमिली, सो एकमेकांना सपोर्ट आपण नाहीतर कोण करणार सांग बघू?". प्रेमळ नवऱ्याच्या ह्या उत्तराने शीतल त्याच्याकडे अजून "जीव ओवाळून टाकणाऱ्या" नजरेने बघते. मिररमधून तिच्याकडे बघत तिच्या प्रेमाने ओथंबलेल्या नजरेने सुखावलेल्या रोहनच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटते. गाडी चालवत डावा हात मागे शीतलकडे करत तो "लव्ह यू!" असं म्हणतो आणि शीतलही त्याचा हात हातात घेत समाधानाने "मी टू!" म्हणते. खरंच आपल्या माणसाचे केवळ दोन प्रेमळ शब्दं, एखादी प्रेमभरी नजर ह्यात किती शक्ती असते नाही? मोठमोठ्या संकटांवर मात करायला हे प्रेम यशस्वी ठरते!


….त्यादिवशीच्या प्रसंगाने भ्यायलेल्या शीतलची शरद "तो भासच असावा" अशी समजूत काढतो आणि काही आठवड्यातच शीतल तो प्रसंग जवळपास विसरून जाते आणि तिचे नेहेमीचे रुटीन सुरु होते. शंतनूचे त्यादिवशीचे बोलणे, वागणेही ती "तो काय, असाही बऱ्याचदा गूढ वागतो, आहे स्वभाव त्याचा" असं मनाला समजावत त्याकडे दुर्लक्ष करते.


टर्म एक्झाम जवळ आलेली असल्याने शरद आणि शीतल नेहेमीप्रमाणे त्याच लिविंगरूममधे अभ्यास करत असतात. शरदला कुठलेसे पुस्तक हवे असते, ते वरील मजल्यावरील त्याच्या रूममधून आणावे म्हणून वर जातो. अभ्यासात गर्क असलेल्या शीतलला अचानक दारावर जोरजोरात थापांचा आवाज ऐकायला येतो. कोण एवढे दार वाजवत असावे आणि बेल न वाजवता मुर्खासारखे असे रात्री दार कोण वाजवतय असा विचार करीत धीट स्वभावाची शीतल शरदच्या येण्याची वाट न बघता त्वरित उठते आणि "कोण दार वाजवताय रे, डोअर बेल आहे ना!" असं म्हणत जरा रागानेच दार उघडते. बाहेर काळामिट्ट अंधार, भयाण शांतता चिरत जाणारा रातकिड्यांचा किर्रर्र आवाज होता. शीतलने दार उघडायच्या काही क्षण आधी दार वाजायचे बंद झालं होतं. शीतलला चांदण्याच्या थोड्याशा प्रकाशात बाहेर सर्व दिशांना नजर टाकूनही कुणी दिसलं नाही. ती पायऱ्या उतरून खाली येऊन आजूबाजूला कुणी दिसतंय का ते बघायचा प्रयत्न करते. पण कुणी न दिसल्याने "कोण असावं.. " असा विचार करत पायऱ्या चढून परत वर येते व दार जरा हाताने ढकलून आत जात असतांना तिच्या हाताला ओलसर स्पर्श जाणवला. चमकून शीतल आपल्या तळव्याकडे आणि लगेच दाराकडे बघते.. दारावर तिला रक्ताचे पंजे उमटलेले आणि त्यातून रक्ताचे थेंब ओघळत असताना दिसतात. हे बघून घाबरलेली शीतल किंचाळत दारातच कानाला हात लावून मटकन खाली बसते. शरद शीतलची किंचाळी ऐकून घाईघाईत पळत जिना उतरून खाली येतो "शीतल, शीतल ... काय झालं.. का ओरडते आहेस.." असं तिला विचारतो. शीतल फक्त दारावर उमटलेल्या रक्ताच्या पंज्यांकडे बोट दाखवते, तिची हालत मात्र खूपच खराब झालेली असते. एव्हाना सुनंदाबाईही खाली येतात आणि शीतलला कवेत घेत, तिच्या डोक्यावरून हात फिरवत "शांत हो, शांत हो.." असं तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याही दरवाज्यावरील ते रक्ताळलेले पंजे आणि ओघळणारे रक्त बघून घाबरलेल्या असतात. शरद जरा स्वतःला सावरतो आणि हा काय प्रकार आहे, कुणी केला असावा म्हणून खाली उतरून थोडे पुढे जाऊन काही संशयास्पद आढळते का बघावे म्हणून पुढे चालत जातो. थोडे पुढे गेल्यावर त्याला एक उपडी पडलेली चप्पल दिसते. ती सरळ करून बघितल्यावर त्याला ती चप्पल शंतनूची आहे हे लक्षात येते. तो ती चप्पल उचलून घेतो आणि शंतनूबद्दल संशयाला जागा नसली तरी उद्या ह्याचा छडा लावू असा विचार करत चप्पल घेऊन घरी परततो. तोपर्यंत सुनंदाबाई शीतलला आपल्याबरोबर घेऊन गेलेल्या असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी जरा लवकरच शरद एकट्या राहणाऱ्या शंतनूच्या रूमवर जाऊन दाराची कडी वाजवत "शंतनू, ए शंतनू... दार उघड रे!" असा आवाज देतो. शंतनू झोपेतून जागा होतो आणि शरदचा आवाज ऐकून जांभई देतच "काय रे, आज भल्या पहाटे इकडे?" असं विचारत दार उघडतो. "अरे बाबांच्या बदलीच्या गावी जायचंय, थोडं काम आहे. म्हंटलं तू फ्री असलास तर येतो का म्हणून विचारावं" असं लवकर यायचं काय कारण द्यावं हे ठरवून आलेला शरद म्हणतो. त्याची नजर शंतनूच्या रूमच्या दरवाज्याजवळ दुसरी चप्पल दिसते का बघायला भिरभिरत होती. "एक मिनिट, आलो.. मग बोलू या" म्हणत शंतनू बाथरूममधे जातो. तेवढ्या वेळात शरद शंतनूच्या रूमची तपासणी करतो आणि त्याला शंतनूच्या दोन्ही चपला - कालच्या सापडलेल्या एका चपलेसारख्या दिसणाऱ्या - आढळतात! ते बघून शरद ओशाळतो आणि एकसारख्या दिसणाऱ्या चपला दोन वेगळ्या व्यक्तींच्या असू शकतात, आपण उगीच आपल्या मित्रावर संशय घेतला असा विचार त्याच्या मनात येऊन जातो. तेवढ्यात शंतनू येतो आणि "चल, जायचंय का काकांच्या गावी?" असं म्हणतो. मग शरद जरा चाचरत "ऍक्च्युअली ना.. मी जस्ट विचार करत होतो एवढा २ तास जायला २ तास यायला प्रवास करायचा त्यापेक्षा अजून थोड्यावेळाने बाबा ऑफिसात येतील तेव्हा त्यांना ऑफिसात फोन लावूनही त्यांच्याशी बोलता येईल". शंतनू मान डोलावत "ते ही बरोबर!" असं म्हणतो आणि त्याच्या गूढ नजरेने शरदच्या डोळ्यात बघत "खरंच जायचं होतं ना काकांच्या गावी?" असं पुटपुटतो. शरद त्याच्या भेदक डोळ्यात बघायचे टाळतो.


… मागच्या सीटवर झोपलेल्या शीतलच्या अंगात आता हळू-हळू ताप चढत होता. गाडी चालवत असलेल्या रोहनच्या हे लक्षात येणे शक्य नसते. शीतलच्या डोळ्यासमोर मात्र ग्लानीत अजूनही भूतकाळ तरळत होता.


… शीतलचे शिक्षण झाल्यावर राजपूतसाहेब रीतसर तिच्यासाठी वरसंशोधन करतात आणि सर्वदृष्टीने योग्य अशा रोहनबरोबर शीतलचे लग्न दोघांच्या संमतीने लावून देतात. लग्नसोहळा छान पार पडतो. नववधू शीतल डोळ्यात खूप सारी स्वप्नं घेऊन रोहनच्या घरी राहायला जाते. सुरुवातीला तिला रोहनच्या कुटुंबाच्या रीतीभाती समजाव्या म्हणून तिचे सासू-सासरे शीतलला काही महिने सुरुवातीला गावी त्यांच्याबरोबर राहू द्यावे असे रोहनला सुचवतात. रोहन जरा नापसंतीनेच ते मान्य करतो आणि सुनंदाबाईंच्या संस्कारात वाढलेली शीतल "अरे, असं काय करतोस. तू येत जाशील की दार शनिवार-रविवारी भेटायला मला. आणि काही महिन्यांचा तर प्रश्न आहे". असं समजूतदारपणे घेत रोहनचंही मन तयार करण्याच्या उद्देशाने त्याच्या केसातून हात फिरवत प्रेमाने सांगते. आपल्या पत्नीचा हा समजूतदारपणा रोहनला भावतो आणि तो तिच्या गालावर प्रेमाने थोपटून "ओके" ह्या अर्थाने स्मितहास्य करीत मान हलवतो.   


एकदा रोहनचे बाबा सुनेला आपली द्राक्षाची बाग दाखवावी ह्या उद्देशाने आपल्या पत्नीबरोबर घेऊन जातात. त्यांची ती मोट्ठी, हिरवीगार, असंख्य द्राक्षांच्या घडानी लगडलेली बाग बघून शीतल हरखून जाते. सासूबाई तिला कामगाराकरवी त्यातून उत्तम, रसाळ आणि गोड द्राक्ष बघून धुवून देतात. शीतल क्षणाचाही विलंब न करता सुमधुर द्राक्षांचा पुरेपूर आस्वाद घेते. पोटभर द्राक्ष खाऊन झाल्यावर शीतल मळ्यात फेरफटका मारायला जाते. फेरफटका मारून झाल्यावर एका गोडाऊनमधे जाऊन बघावे म्हणून ती तिथे जाते आणि द्राक्षाने भरलेले असंख्य बॉक्सेस बघून इतकी द्राक्षं निर्यातीसाठी काढूनही बाग द्राक्षांनी कशी लगडलेली आहे ह्या विचाराने अचंबित होते. गोडावून मध्ये फिरत असताना सहज एका उघड्या बॉक्सकडे तिचे लक्ष जाते. त्यातील वरचा घड बघावा म्हणून ती उचलते. त्या घडाकडे कौतुकाने बघत असताना काही क्षणात तिला आपल्या तळव्याला काहीतरी ओलसर लागल्याचे जाणवते, काही केमिकल वगैरे तर नाही लागले हाताला असा विचार करत शीतल घड डाव्या हातात घेत उजव्या तळव्याकडे नजर टाकते आणि आपल्या तळव्याला लागलेले रक्त बघून घाबरून ओरडायला सुरुवात करते. तिच्या डाव्या हातातला घड धाडदिशी खाली पडतो. शीतलचे सासू-सासरे आणि एक-दोन शेतमजूर काय झाले म्हणून धावत गोडाऊन मधे पोहोचतात. आणि "शीतल बेटा, काय झाले, का ओरडलीस?" असं सासू सासरे विचारत असतानाच त्यांना तिच्या हाताला लागलेले रक्त दिसते. "अगं काय लागलं पोरी तुला?" असं काळजीने सासरे विचारतात तेव्हा "नाही बाबा, अहो लागलं नाही मला काही, पण ह्या बॉक्स मधले द्राक्षं सहज उचलून बघितले तर माझ्या हाताला हे रक्त लागले". हे ऐकून सासरेबुवा पडलेल्या घडातुन वाहणाऱ्या रक्ताकडे विस्मयाने बघत असतात. तेवढ्यात तिथे असलेला शेतमजूर राम्या शांतपणे म्हणतो "मालक, तुमी कायबी म्हना, मला तर हा भानामतीचाच प्रकार दिसतोय बघा!". हे म्हणत असताना राम्याची नजर शीतलच्या चेहऱ्यावर असते. शीतल हे ऐकून राम्याकडे बघते तेव्हा हलकेसे बिकट हास्य तिला त्याच्या चेहऱ्यावर जाणवते. "ए राम्या, गुमान जातोस का लेका हिथून.. जा ती द्राक्षं काढून भर बॉक्स मधी..उगा घाबरावतोय शिकल्या-सवरलेल्या पोरीला.. " असं गरजत सासरेबुवा राम्याला बाहेर पिटाळतात. बाहेर पडतानादेखील राम्याची तीक्ष्ण नजर शीतलच्या काळजाचा ठाव घेते. "पोरी तू घाबरू नकोस, आपण बघू काय प्रकार आहे हा. मंडळी, तुम्हीं जावा बरं ड्रायवर बरोबर शीतलला घेऊन!" असं सासरेबुवा आपल्या पत्नीला सुचवतात.


… रोहन आल्यावर ह्या गोष्टीची चर्चा होते आणि त्याला मात्र हे भानामती वगैरे काही नसून कुणाचा तरी खोडसाळपणा असावा असं ठामपणे वाटते. गावाकडे राहणाऱ्या रोहनच्या आई-वडिलांना जरी रोहनचे मत फारसे पटत नसले तरी काही दिवसांनंतर सगळे तो प्रसंग विसरतात. काही आठवडयांनी दुसऱ्या शेतावर जाणाऱ्या सासू-सासऱ्यांना, घरात फारसा वेळ न जाणारी शीतल "तुमच्याबरोबर येऊ का शेतात बाबा?" असं विचारते. मागचा द्राक्षाच्या मळ्यातील प्रसंग आठवून हो म्हणायला जरी सासरेबुवांना इतकं योग्य वाटत नसलं तरी पोरीचं मन लागत नसावं आणि आपण आहोत की बरोबर असा विचार करीत ते "चल पोरी" म्हणतात. शीतल आनंदाने तयार होऊन सासूबाईंबरोबर मागे गाडीत बसते. अर्ध्या तासातच ते शेतात पोहोचतात. शेतातील हिरव्यागार पालेभाज्या, फ्रेश वांगी, आताच काढून ठेवलेले कांदा, मुळे बघून शीतलला छान वाटतं. सासूबाई विचारतात "कसं वाटलं शीतल आपलं शेत?". "खूपच छान आई!" हरखून गेलेली शीतल उद्गाराते. त्यावर आई म्हणतात, "आता शिवा गड्याच्या कारभारणीला छान दाण्याचं कूट लावून चमचमीत भरली वांगी, भाकरी, ताज्या मिरच्यांचा खर्डा, पिठलं आणि भात असा बेत सांगते. सईबाईंच्या हाताला कशी चव आहे तू बघच आज. आणि त्यानंतर ताजे-ताजे गोड-रसाळ कलिंगड खायचेत बरं काय.. आवडेल ना?". सासूबाई कौतुकाने आपल्या सुनेचा चेहरा निरखत विचारतात. आणि त्यांनी सांगितलेल्या बेताने तोंडाला सुटलेल्या पाण्याचा आवंढा गिळत शीतल "हो-हो, नक्की!" अशा अर्थाने हसून मान डोलावते. तोपर्यंत एका गड्याने मालक आणि कुटुंबियाला हलकी न्याहारी म्हणून कुरमुऱ्याच्या चिवड्यात फरसाण कालवून वर ताजे टोमॅटो, कोथिंबीर कापून ताटल्यांमध्ये आणून दिलेले असते व नंतर लगोलग शेतातल्याच ताज्या रसरशीत लिंबूचे सरबत सुद्धा तो आणून देतो. एव्हाना सर्वांना थोडी भूक लागलेली असतेच, तेव्हा गप्पा मारत त्या हलक्या न्याहारीचा समाचार घेतला जातो. शीतलला त्या हिरव्यागार शेतातले प्रसन्न वातावरण खूप भावते. तिथे लावलेली वड-पिंपळ, कडूलिंब, कदंब ह्यांची भरपूर झाडे, झाडांवर बांधलेले झोके, एका कोपऱ्यातल्या पट्ट्यात लावलेली झिनिया, झेंडू, ऍस्टर, लिली, तेरडा पासून असंख्य फुलझाडे आणि त्यांना आलेली रंगबिरंगी फुलं बघून तिचे मन मोहरून जाते. तिला प्रकर्षाने रोहनची आठवण येते. पुढच्यावेळी रोहन आल्यावर आपण दोघेच नक्की इथे यायचे आणि ह्या रोमँटिक वातावरणाचा आपल्या सख्याबरोबर यथेच्छ आस्वाद घेत नंतर त्याच्या कुशीत शिरून जायचे असं चित्र तिच्या डोळ्यासमोर येतं आणि तिचं मन त्या विचारांनीच सैरभैर झालं. "ये ना रे लौकर, रोहन" अशी ती मनातच रोहनला साद घालत एक मोठ्ठा उसासा देते. "काय गं, थकलीस का?" असं सासूबाईंच्या विचारण्याने ती वर्तमानात येते आणि "नाही" म्हणून हसत मान डोलावते. २-३ तासात फिरून, गप्पा मारून झाल्यावर, शेतातील एका मोट्ठ्या झाडाखालीच चटई वगैरे टाकून शिवा गड्याची जेवणाच्या तयारीची लगबग सुरु असते. तेवढ्यात शिवाची कारभारीण भरल्या वांग्याची चमचमीत रस्सा भाजी आणते, तिच्या खमंग वासाने सगळ्यांची भूक उफाळून येते आणि "वाढा लेको लवकर" ह्या भावाने सर्व शिवा गडी आणि त्याच्या कारभारणीकडे बघू लागतात. ताटं वाढली जात असताना, सासरेबुवा २-३ ताजे कांदे मुठीने फोडून सर्वाना देतात, तर सासूबाई, ताजा-ताजा मुळा, कांद्याची कोवळी पात कापून त्यात तेल, तिखट, मीठ टाकून, मिरचीच्या खर्ड्याशेजारी वाढतात. गरमा-गरम भाकरी येतात आणि सर्वजण प्रभूला वंदन करून त्या अस्सल, लज्जतदार, गावरान जेवणावर अक्षरशः तुटून पडतात. त्यानंतर गरम भात आणि पिठले येते, व त्याचाही आस्वाद सर्व घेतात. भरपूर जेवण झाल्यावर शीतल आणि सासू-सासरे जरा शतपावली करतात. आणि थोड्यावेळाने परत झाडाखाली येऊन बसल्यावर शिवागडी ताज्या, रसदार कलिंगडाच्या लालेलाल तुकड्यानी भरलेल्या प्लेट्स घेऊन येतो. पोटभर जेवण झालेले असताना सुद्धा शीतलला ते ताजे, सुमधुर कलिंगड खायची इच्छा होतेच. आणि त्याचाही यथेच्छ आस्वाद घेतला जातो. ह्यापरिस सुख ते काय, असा विचार शीतलच्या मनात तरळून जातो.


थोडा वेळ आराम केल्यावर "चल, जरा तुला खालच्या बाजूचंही शेत दाखवतो, आवडेल तेही तुला. ते बघून, चहा घेऊन घरी जाऊ या". सासूबाई मात्र सासरेबुवांना जराशा चिंतेनेच "अहो, जाऊ द्या. कशाला तिला तिकडे न्यायचं, त्यापेक्षा जरा वेळ इथेच थांबू आणि चहा घेऊन जाऊ घरी". "अगं नाही, आली आहे पोर पहिल्यांदा तर दावू या की तिला तिकडली बाजू बी.. चला,निघू या!". असं म्हणत सासरेबुवा चालायलाही लागतात आणि त्यांच्यामागे सासूबाई आणि शीतल जातात. त्या मोट्ठ्या शेतात चालत खालच्या बाजूला जायला त्यांना १५-२० मिनिटं लागतात. तिथे फळ झाडांची बाग असते. पेरू, डाळिंब, पपई, सीताफळ असे नानाविध फळ झाडं तिथे लावलेली आणि त्यावर आलेले ताजे फळं बघून शीतलचे मन पुन्हा हरखून जाते. "कित्ती छान आहे आपले शेत बाबा", असं ती लहानमुलीसारखं आनंदाने म्हणते. त्यावर "आहे की नाही छान बाळा?" असं बाबा समाधानाने आपल्या पोरीगत सुनेला विचारतात. "अगदी खरंच!" असं शीतल उत्तरते, आणि थोड्यावेळाने ते परत जायला फिरतात. ते येतात तेव्हा एका झोपडीजवळून जात असताना सासूबाई, "अहो, जरा तिकडून लांबून नेऊ या की तिला, अगदी इकडूनच न्यायला हवं का.." असं काळजीने आपल्या नवऱ्याला म्हणतात. "अगं काही नाही गं, उगा घाबरतेस!" असं म्हणत सासरेबुवा दुर्लक्ष करतात. त्याचा अर्थ तेव्हा न कळलेल्या शीतलला परत जाताना ती झोपडी आणि त्यातून लांबून अस्पष्ट आणि नंतर अगदी स्पष्ट येणाऱ्या "हू .. हू.. हू...हू.. " अशा येणाऱ्या आवाजाने थोडा अंदाज येतो सासरेबुवा आणि सासूबाई सावध होतात, सासरेबुवा हातात जवळ पडलेला एक मोठा बांबू घेतात. "मी म्हणले होते, नका इकडून जाऊ म्हणून" चिडक्या आणि काळजीयुक्त स्वरात सासूबाई सासरेबुवांना उद्देशून म्हणतात. ह्या सगळ्याने शीतल जरा धस्तावते आणि त्या झोपडीकडे बघत पुढे-पुढे जाते, सासूबाईंनी तिचा हात हातात घट्ट धरलेला असतो. जसे ते झोपडीजवळ पोहोचतात, त्यातून अचानक एक बाई बाहेर धावत येऊन त्यांचा रास्ता अडवते, तिचे रूप भेसूर असते, ती स्वतः काळी असते, दातही काळपट असतात, कपाळाला भले मोट्ठे कुंकू तिने लावलेलं असतं, भेसूर हसत ती शीतलकडे एकटक बघत असते, तिच्या तोंडातून लाळ गळत असते. आणि ती तिघांच्या समोर बसून, जोरजोरात "हू .. हू.. हू...हू.." असा आवाज करत घुमायला लागते. "काय चाललंय हे आई?" असं भीतीने कावरीबावरी झालेली शीतल आईंना घट्ट बिलगून विचारते. "काही नाही गं.. हिच्या अंगात येते.. ". असं सासरे म्हणतात. आणि त्या बाईला "मंडी, शुद्धीवर ये आणि जातेस का हाणू आता बांबूने" म्हणत तिच्यावर बांबू उगारतात. त्यांच्या त्या पवित्र्याने मंडीला जणू अजूनच चेव येतो आणि ती शीतलजवळ सरकत "तुझं मूल दे मला.. दे... मला द्यावं लागेल तुझं मूल.. " असं काहीबाही बोलायला लागते. शीतलच्या अंगावर नखशिखांत काटा येतो आणि ती प्रचंड घाबरून मूर्च्छित पडते. "शीतल.. शीतल, सांभाळ बेटा", सासूबाई असं म्हणत शीतलला सावरायचा प्रयत्न करतात, पण ती जमिनीवर आडवी होते. ते बघून सासरेबुवा "तुझ्या मायला!" असं ओरडत मंडीच्या अंगावर धावून जात तिला बांबूचे फटके देतात. त्यावर काहीच फरक न पडलेली मंडी, त्यांच्याकडे बघत खदाखदा हसत " तुजा वारस म्या देणार देवीला... देवी आईचं मागणं हाय.. मी पुरवणार…" असं बरळते. "तुम्ही आधी पोरीकडे बघा, ती बेशुद्ध झालीय", सासूबाई चिंतेने ओरडतात. तोपर्यंत तिथल्या आवाजाने शिवागडी आणि एक-दोन शेत मजूर तिथे येतात. सासू-सासरे आणि शिवा शीतलला पाणी तोंडावर मारून शुद्धीवर आणतात आणि तिला त्वरित गाडीमध्ये बसवून घरी घेऊन जातात. ह्या प्रसंगाचा मात्र शीतल धसका घेते. तिची तब्येत खालावते. रोहन नको म्हणत असतानाही त्याचे आई-वडील शीतलला मांत्रिकाकडे "झाडा मारून आणायला" म्हणून नेतात. मंग्या मांत्रिक डोळे बंद करून काही मिनिटांनी सासू-सासऱ्यांना "तुम्ही बाहेर जा" असे खुणावतो. आणि नंतर कसलेसे मंत्र तंत्र जपत उदाचा खूप धूर करतो, आणि शीतलच्या डोक्यावर मोरपंखाच्या झाडूने मारायला सुरुवात करतो. त्या फटक्यांनी आणि धुराने शीतलचे डोके सुन्न होते. नंतर मांत्रिक "आपल्याला एकत्र देवी आईची पूजा करायला लागणार, बोल.. तयार आहेस ना?" असं म्हणत तिच्याशी शारीरिक लगट करायला लागतो. त्या परिस्थितीतही आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत असलेली शीतल उठते, मांत्रिकाच्या इंद्रियांवर जोरदार लाथ घालते आणि खोलीची कडी उघडून बाहेर येते. सासू-सासऱ्यांना घडलेला प्रकार सांगते तेव्हा रागाने लालबुंद झालेले सासरेबुवा, मंग्या मांत्रिकाच्या केसांना धरून बाहेर ओढतात आणि गावकऱ्यांसमोर त्याला लाथेने तुडवतात. "चुकी झाली मालक, क्षमा करा!" असं विनवणाऱ्या रक्तबंबाळ झालेल्या मंग्याला सासरेबुवा पोलिसांच्या ताब्यात देतात आणि "परत इथे दिसशील तर कोथळा बाहेर काढीन" असा सज्जड दम देतात.


दोन दिवसांनी रोहन घरी आल्यावर शीतल त्याच्या छातीवर डोकं ठेवून बिलगते आणि ओकसाबोक्षी रडायला सुरुवात करते. अचानक हिला काय झालं न कळल्याने रोहन आईला विचारतो, आणि ती त्याला सगळा प्रसंग इथंभूत सांगते. रोहन जाम चिडतो, मी नाही म्हंटलो असताना तुम्ही तिला मांत्रिकाकडे नेलंच का, ह्या त्याच्या रास्त प्रश्नाचे बाबांकडे उत्तर नसते. रोहन ताबडतोब शीतलला आवरायला सांगतो आणि तातडीने तिला घेऊन त्याच्या नोकरीच्या शहराच्या ठिकाणी जायला निघतो. जाताना थोडा शांत झालेला रोहन "बाबा-आई, आम्ही जातोय, पण मधे-मधे भेटायला येऊ, आणि तुम्हीही येत जा" असं सांगतो. "हो बेटा, आणि आम्हाला माफ कर" असं बाबा म्हणतात, त्यांचे हात हातात घेत, "असं नका बोलू" ह्या अर्थाने रोहन मान डोलावतो. रोहन आणि शीतल आई-बाबांचे आशीर्वाद घेऊन शहराकडे रवाना होतात.


शहरात स्थिरस्थावर झाल्यावर शीतल-रोहनच्या प्रेमाला बहर येतो. एरव्ही ८-१५ दिवस वाट बघून एकमेकांचा सहवास लाभणारे प्रेमी-युगुल एकत्र राहण्याचा पुरेपूर आनंद घेतात. रोहनला ऑफिसातील मित्रमंडळी "हल्ली रोहनचे डोळे लाल दिसतात बुवा, काय कारण असावे.." असं चिडवतात. त्यांना "काय उत्तर देणार" असे भाव चेहऱ्यावर येत रोहन फक्त स्मितहास्य करतो. योग्य समयी शीतल आणि रोहनच्या प्रेमवेलीवर एक कळी बहरल्याची जाणीव शीतलला होते, आणि "डॉक्टरकडे जाऊन कन्फर्म करायला हवे रे" असं ती रोहनला सुचवते. ह्या बातमीने उत्साहात आलेला रोहन त्वरित शीतलला गायनॅककडे नेतो आणि डॉक्टर दोघांचं अभिनंदन करतात. घरी येऊन अतिशय खुश झालेला रोहन तेवढीच खुश झालेल्या शीतलला अधीरपणे कवेत घेतो आणि "मी बाबा होणार, आणि तू आई!" असं म्हणतो. दोघांच्या आनंदाला पारावर उरात नाही. रोहन त्याच्या आणि शीतल तिच्याआई-वडिलांना ही गोड बातमी देतात. सुनंदाबाई आणि सासूबाई शीतलला अनेक स्त्रीसुलभ आणि महत्वाच्या सूचना करतात. आणि लवकरच त्यांना दोघांचे आई-बाबा भेटायला येऊन जातात. रोहन शीतलचे बाळंतपण शहरातच करायचे ठरवतो, त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नसते. त्याप्रमाणे सुनंदाबाई सातव्या महिन्यापासून लेकीकडे येऊन राहतात. आईच्या मायेने आणि रोहनच्या प्रेमवर्षावामुळे शीतलचे दिवस छान जात असतात आणि योग्यवेळी ती एका गुटगुटीत बाळसेदार मुलाला जन्म देते. सगळ्यांना खूप आनंद होतो. रोहनचे आई-बाबा आणि राजपूतसाहेबही शीतलला ऍडमिट केल्यापासून आलेले असतात. बाळाच्या जन्माने आणि बाळ-बाळंतिणीची तब्येत उत्तम असल्याचे डॉक्टरकडून ऐकून त्यांना हायसे वाटते. रोहनच्या आनंदाला पारावारच नसतो. २-३ दिवसात मात्र बाळाला ताप यायला सुरुवात होते. औषधं देऊनही ताप उतरायचं नाव घेत नाही. बाळाला नेओनॅनोलॉजिस्टकडून ट्रीटमेंट सुरु केली जाते, आणि त्याला NICU मध्ये शिफ्ट केले जाते. सगळेजण ह्यामुळे धास्तावतात. रोहनला अस्वस्थ व्हायला होतं पण शीतलसमोर तो ते व्यक्त करत नाही. "आता जरा बाळाची तब्येत सुधारलीय असं डॉक्टर म्हणताहेत" असं दर दोन दिवसांनी तो शीतलला खोटं सांगत असतो, पण इकडे बाळाची तब्येत मात्र खालावत जाते. अखेर नवव्या दिवशी अनेक उपचार करूनही डॉक्टर बाळाला वाचवू शकत नाही. रोहन आणि शीतलवर आभाळ कोसळतं. त्यांच्या स्वप्नांचा, आनंदाचा चक्काचूर होतो. एकमेकांना ते कसेबसे धीर देतात. शीतल आणि रोहनचे आई-बाबाही काही दिवस त्यांच्याजवळ थांबून त्यांना धीर देतात आणि नंतर नाईलाजाने आपापल्या गावी परततात. शीतलला शेतातल्या खालच्या बाजूच्या घुमणाऱ्या मंडीबाईचे "तुझ्या बाळाला मी देवीला देईन.. " हे बोल अनेक दिवस आठवतात, तिचे ते भयंकर रूप आणि घुमणे आठवून अनेकदा शीतल रात्री-दिवसा झोपेतून ओरडून उठते आणि "तिनेच नेले रे आपले बाळ" असे हुंदके देत रोहनला सांगते. रोहन तिला अनेकरित्या समजावतो. आई-वडिलांच्या अनेकदा सांगण्यावरून विश्वास नसूनही रोहन शीतलला भगत-बुवा ह्यांच्याकडे दाखव असे प्रकार करून बघतो, पण त्याने अर्थातच शीतलला काही फायदा होत नाही. नंतर स्वतःच शीतलला ह्यातून बाहेर काढावे ह्या विचाराने रोहन तिला हळू-हळू अनेक प्रेक्षणीय स्थळी घेऊन फिरायला जाणे, तिला आल्हाददायक वातावरणात ठेवणे असे प्रयत्न करतो व काही महिन्यांनी शीतल जरा शांत होते.

काही महिन्यांनी रोहन तिला घेऊन आणखी दूरच्या गावी शिफ्ट होतो, जेणेकरून शीतलला जरा घडलेल्या प्रसंगाचा विसर पडून ती पुन्हा उभी राहावी. हा उपाय मात्र लागू पडतो आणि शीतल नवीन गावी, नवीन संसार थाटण्यात जरा रमते. तिचे जवळपासच्या बायकांबरोबर छान मैत्रीचे संबंध जुळतात आणि मुळातच सामाजिक जाण असल्याने आणि जमेल तसे सामाजिक कार्य करायची सवय असल्याने शीतल त्यात रुळते व दोन वर्षं कशी निघून जातात तिला कळतही नाही. रोहनही शीतलमधे झालेल्या बदलाने आपण इथे शिफ्ट व्हायचा निर्णय यीग्य होता ह्या विचाराने सुखावतो. यथावकाश शीतलला पुन्हा दिवस राहतात. ह्यावेळी मागच्या वेळच्या अनुभवामुळे जरी दोघे शीतलची योग्य काळजी घेत असले, तरी कठीण प्रसंगाला घाबरून जायचे नाही हे त्यांना कठीण प्रसंगानेच शिकवलेले असते! डॉक्टरांनी दिलेल्या तारखेनुसार एक गोंडस, कुरळ्या केसांचं छान बाळसं असलेल्या मुलीला शीतल जन्म देते आणि शीतल आणि रोहन दोघांचे आई-वडील एकमेकांना "लक्ष्मी घरात आली!" असं म्हणत एकमेकांचं अभिनंदन करतात. रोहनच्या खुशीला पारावर राहत नाही, पण तितकच त्याचं बाळ आणि बाळंतिणीच्या तब्येतीकडे चोख लक्ष असतं. डॉक्टरांनाही मागच्यावेळेची कल्पना असल्याने ते ज्यास्त काळजी घेऊन बाळाला आणि शीतलला जपतात. काही दिवसातच डिस्चार्ज दिला जातो. घरी आल्यावर शीतलला रोहनने पूर्ण घर गुलाबी रंगाचे बलून्स, सॉफ्ट टॉईज, इतर छान खेळणी, छानसा पाळणा ह्यांनी सज्ज केलेलं दिसतं. नवऱ्याच्या उत्साह आणि प्रेमाचं शीतलला अतिशय कौतुक वाटतं. "किती रे प्रेम देत राहशील रोहन.." ह्या नजरेने ती रोहनचा चेहरा न्याहाळत असते, तर तिच्या चेहऱ्या-डोळ्यामधला आनंद रोहन आपल्या मनात कायमच्या आठवणींच्या रूपाने साठवून घेत असतो. बाळाचे "सानिका" असे छान नाव ठेवले जाते. चंद्रकोराप्रमाणे दिवसेंदिवस सानिका वाढत जाते. नर्सरी ते स्कुल, स्कुल ते जुनियर कॉलेज आणि मग इंजिनीरिंगला पुण्याला ऍडमिशन असे अनेक वर्षं बघता-बघता निघून जातात. आई-वडिलांप्रमाणे सानिका डॅशिंग आणि हुशार असते…


… “हुश्श्य! गर्ल्स, चला उतरा बघू, बघा आपलं घर आलय”. रोहन गाढ झोपेत असलेल्या शीतल आणि सानिकाला उठवत म्हणतो. दोघी आळोखे-पिळोखे देत डोळे किलकिले करत आणि नंतर पूर्ण उघडून बघतात. रोहन पटकन सानिकाची बॅग व इतर सामान काढतो आणि घराचे दार उघडतो. आणि दोघीना बेडरूममधे पाठवून स्वतः लिविंगरूम मधे जरा सोफ्यावर कलंडतो.


सकाळी उठल्यावर रोहन फ्रेश होऊन सानवी आणि शीतलला आता कसे वाटतेय बघावे म्हणून बेडरूममधे जातो. सानवी फ्रेश होऊन कॉफी घेत असते, शीतल मात्र अजून झोपलेली असते. रोहन तिच्या कपाळावर हात ठेवतो तेव्हा ती तापाने फणफणलेली त्याला जाणवते. थोड्या वेळाने तिला डॉक्टरकडे न्यावे म्हणून रोहन फ्रेश झाल्यावर शीतलला उठवतो, कॉफी देतो आणि "चल, तुला ताप आहे डॉक्टर कडे जायला हवं" असं म्हणतो. सानवीच्या फोनची रिंग होते "बोल मंजुषा" ती म्हणते. "हो अगं, पोहोचलो आम्ही नीट, मी ठीक आहे. पण आईची दगदग झाल्याने तिला जरा ताप आलेला आहे". शीतल सानवी आणि मंजुषा मधला संवाद लक्षपूर्वक ऐकत असते. आणि कालचा प्रसंग आठवून भीतीची एक लहर तिच्या मनात येऊन जाते. रोहन शीतलला डॉक्टरकडे घेऊन जात असताना शारदचा फोन येतो आणि रोहन त्याला काल रात्रीपासूनचा प्रसंग आणि शीतलला बरं नसल्याचं सांगतो. शरदला काळजी वाटते आणि तो त्यांना भेटायला येतोय असं कळवतो. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा हळू-हळू परिणाम होत शीतलचा ताप उतरतो. दरम्यान मंजुषाचा पुन्हा फोन येतो आणि ती सानवी आणि शीतलची चौकशी करते. त्यानंतर मात्र शीतल सानवीला "तू मंजुषापासून जरा लांबच राहा" असं निक्षून सांगते. तिच्या ह्या सांगण्याचा अर्थ न कळल्याने सानवी "का? असं का म्हंतेहेस तू आई? ती तर नेहेमी मला मदत करते आणि परवाही ती नसती तर मला अजून त्रास झाला असता ना" असं म्हणते. त्यावर "मला ह्यावर चर्चा नकोय सानवी, मी सांगतेय ना तुला, ते एक.. ओके?" असं शीतल बजावते. त्यांच्यातील हा संवाद ऐकत असलेले रोहन आणि शरद एकमेकांकडे बघत शीतल असं का सांगतेय सानवीला ह्या अर्थाने बघतात.


थोड्यावेळाने सानवी तिच्यासाठी काही वस्तू आणायला गेली असताना "शीतल, अगं मगाशी सानवीशी अशी का बोलत होतीस. आणि मंजुषाचं काय आता, तिने तर मदतच केली बिचारीने सानवीला परवा? आणि आता मला सांग आपण सानूच्या हॉस्टेलमधून निघालो तेव्हा इतकी का घाबरली होतीस?" रोहन नेमकं काय घडलं ह्याचा अंदाज घ्यावा म्हणून विचारतो. त्या प्रश्नाने शीतल जरा विचारात पडते, पण राहुलबरोबर तिलाही ते शेअर करायचेच असते. म्हणून ती सानूच्या रूमवरून निघाल्यावर रोहन आणि सानू पुढे गेल्यावर मंजुषाचा हात हातात घेऊन निरोप घेतल्यापासून, पुढे जाऊन आपल्या हातावर ओलसर स्पर्श कसा जाणवतो आणि तळव्यांना रक्त कसे लागलेले दिसते, आपण घाबरून मागे वळून बघितल्यावर मंजुषाची ती भेदक नजर, रक्ताळलेल्या हाताने बाय करणे आणि नंतर तो रक्ताळलेला हात लांब जीभ काढून चाटणे हे सगळं शीतल रोहनला सांगते. शीतल हे सांगत असताना वरवर शांत दिसणाऱ्या रोहनच्या मनातही "हे आता काय असावे" ह्या विचारांचे काहूर माजलेले असते. शरदही हे ऐकून चकित होतो. ‘सानुला आपण येईपर्यंत सांभाळणारी,आपण असताना जराही वेगळी न जाणवलेली मंजुषा असं वागू शकते? त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा आत्मा तर मंजुषामधे नसतो ना?’ असा विचार रोहनच्या मनात डोकावून जातो आणि त्याच्या अंगावर आपली मुलगी त्या आत्म्याच्या ताब्यात इतके तास होती, ह्या विचाराने काटा येतो. पण आत्मा रक्ताळलेल्या स्वतःच्या हाताचे रक्त चाटतो हे जरा त्याच्या मनाला खटकते आणि तो विचारात गढून जातो.. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु असते - बोलता-बोलता मंजुषाचे आडनाव कुलकर्णी आहे हे त्याला कळते. रोहन शरदशी काहीतरी डिसकस करतो आणि दोघे तात्काळ फेसबुकवर सानवीच्या फ्रेंड लिस्टवर मंजुषाची प्रोफाइल चेक करतात. मंजुषाच्या फॅमिली मेम्बर्समधे "फादर" म्हणून शंतनू कुलकर्णीचं नाव बघून शरद उडतोच. रोहननेही शंतनू कुलकर्णी हे नाव शीतलकडून ऐकलेले असते. रोहन आणि शरदला आता अजून माहिती काढायला हवी ह्याची गरज जाणवते. ते ह्याबाबतीत अजून बोलत असताना रोहन त्यांच्या द्राक्षाच्या मळ्यातील, शेतातील प्रसंग शंतनूला सांगत असताना "द्राक्षाच्या मळ्यात कोणता गडी म्हणालास?" असं शरद रोहनला विचारतो. तेव्हा "राम्या गडी" असं रोहन म्हंटल्यावर "शंतनूच्या बाबांकडेही राम्या नावाचा गडी होता" हे शरद नमूद करतो. आणि तिथून काही सुगावा लागतोय का हे बघावे म्हणून दोघेही रोहनच्या गावी जायला तडक निघतात. रोहन गाडी सरळ मळ्याकडे घेतो आणि "राम्याला बोलव रे" असं दुसऱ्या एका गड्याला सांगतो. राम्या छोटे मालक अचानक येऊन का बोलावताहेत बघावे म्हणून लगबगीने येतो. रोहन त्याला "त्यादिवशी द्राक्षात रक्त कसे आले होते, पटकन सांग" असं शांतपणे विचारतो. राम्या जमिनीकडे बघत "मला काय ठाव मालक", "मला माहिती नाही" असं एक-दोनदा म्हटल्यावर रोहन सरळ त्याच्या कानाखाली जोरात आवाज काढतो. आणखी एक-दोन फटके पडल्यावर राम्या बोलता होतो. "मालक मी नोकर माणूस, माझे जुने मालक नंदकुमार कुलकर्णींच्या मुलाने - शंतनू कुलकर्णीने मला हे करावयास सांगितले आणि नाही केलस तर जीवानिशी मारीन म्हणून दम दिला होता. माफ करा मालक, चुकी झाली" म्हणत राम्या रोहनच्या पायावर लोळण घेतो. रोहन शरदकडे बघत "आता शंतनूला गाठायला हवे" असं म्हणतो आणि दोघे आधी शीतल व सानवीलाही आपल्याबरोबर घ्यावे म्हणून घरी येतात.


दरम्यान शरद आपल्या फ्रेंडलिस्टमधील शंतनूची माहिती बघत असताना त्याचे बाबा ‘नंदकुमार कुलकर्णी’ नांदूरला असतात हे त्याला कळते. पूर्वी घडलेल्या शीतलच्या आणि आपल्या पप्पांच्या आयुष्यातील पॅरानॉर्मल घटनातील व्यक्तीत देशमाने ह्यांच्या मानस पुत्राचे नाव नंदकुमार कुलकर्णी असते हे त्याला आठवते. तसेच शंतनूचे विचित्र, गूढ वागणे, त्यांच्या घराच्या दारावर उमटलेल्या रक्ताच्या पंज्यांनंतर शंतनूची चप्पल तिथे सापडणे... हे सर्व योगायोग समजावे असं त्याचं मन मानत नसतं आणि ते तो रोहनलाही बोलून दाखवतो.


दुसऱ्या दिवशी रोहन फ्रेश होऊन छान गरम गरम कॉफी पिऊन ताजातवाना होतो आणि शीतलला "आपल्याला ताबडतोब नांदूर गाठायला हवं" असं म्हणतो. "काय? नंदूरला आता आपलं काय काम??" असं शीतल साधारण किंचाळतच रोहनला विचारते. रोहन शीतलला आणि तोपर्यंत तिथे येऊन बसलेल्या सानवीला शरद आणि त्याने जोडलेल्या साखळ्या उलगडून सांगतो. चौघे पटकन तयार होऊन नांदूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतात. तिथे पोहोचल्यावर "नंदकुमार कुलकर्णी कुठं राहतात?" असं विचारत कुलकर्ण्यांच्या घरी जाऊन पोहोचतात. त्यांच्याशी गप्पा मारत हळू-हळू रोहन देशमानेंचा विषय काढतो आणि नंदूकाका देशमानेनी अनाथ असलेल्या आपल्याला कशी लहानपणापासून पालन-पोषण-शिक्षणाला मदत केली, आपला त्यांच्यावर वडीलांपेक्षाही कसं जास्त प्रेम होतं हे सांगत नंदूकाका भूतकाळात जातात. आणि मग "राजपूतसाहेबाना ओळखता का?" असे रोहनने विचारल्यावर नंदुकाकाच्या डोळ्यात खुनशी भाव डोळ्यात येतात. "नाव नका काढू त्याचं, त्याच्यामुळे मी माझे बाबा गमावले". "काय? असं कसं झालं?" ह्या रोहनच्या प्रश्नाने नांदुकाका सांगतात "अहो,बाबांची पूर्ण प्रॉपर्टी आईच्या उपचारात गेली. शेवटी एक उपाय डॉक्टरना करून बघायचा होता ज्यात त्यांना आईचे प्राण हमखास वाचतील ही शाश्वती होती. बाबानी अनेकांकडे उसने पैसे मागून बघितले पण कुणीच मदत केले नाही, तेव्हा बाबानी आपली शेतजमीन पडेल किमतीत विकावी म्हणून प्रयत्न करायचे ठरवले. तसे एक गिर्हाइकदेखील मिळाले बाबाना. आता फक्त कागदपत्रांची जुळवाजुळव पटकन करायची आणि झाले. ह्या विचाराने बाबा त्या राजपूतकडे गेले. त्याने हे कागद आणा, ते कागद आणा, असे करत अनेक महीने लावले आणि शेवटी आई दगावली. आणि तिच्या दुःखात बाबानी आत्महत्या केली."


"मग?" रोहन पुढे विचारता झाला.


"मग काय, त्या राजपूमुळे गेलेल्या माझ्या आई-वडिलांच्या जीवाचा सूड घायचं मी ठरवलं. तो तर वाचला माझ्या तावडीतून पण त्याची पोरं माझ्या शंतनूच्या तावडीत आली, त्याने बराच प्रयत्न केला राजपूतच्या पोरांना धडा शिकवायचा, आणि थोडाफार यशस्वी देखील झाला". "जाऊ दे, झाले ते झाले. पण तुम्ही हे सर्व का विचारता आहात?".


"काका, मी रोहन, ही माझी बायको आणि राजपूतसाहेंबांची कन्या शीतल, ही माझी कन्या सानवी आणि हा शीतलचा भाऊ शरद". असं म्हणत रोहन शरद-शीतल-शंतनूच्या कॉलेजच्या दिवसापासून घडलेले प्रसंग ते मंजुषाने - शंतनूच्या मुलीने - आजोबांच्या मनातले सुडाचे विष आपल्या मनात बाळगत केलेला अघोरी प्रकार इथपर्यंत तपशीलवार माहिती नांदुकाकाना देतो. म्हातारे झालेले नंदूकाका आता त्या सुडात काही अर्थ नाही इतपत त्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत झालेली असतेच. "शंतनूला आणि मंजुषाला बोलावून तुमच्यासमोरच समज देतो" असं वचन ते रोहनला देतात.


नंदूकाका शंतनू आणि मंजुषाला फोन करून "मिळेल त्या गाडीने तातडीने नांदूरला निघून या" असं कळवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत दोघे नंदू काकांकडे हजर होतात. नंदूकाका त्यांना रोहन काल भेटल्यापासून घडलेले सगळे डिस्कशन सांगतात आणि ही सुडाची भावना मनातून आता काढून टाकावी असं त्यांना समजावतात. प्रौढ आणि जबाबदार झालेल्या शंतनुलाही ते पटतं. मंजुषाला समजवायला मात्र थोडा वेळ लागतो दोघांना, पण तीही समजते. तेवढ्यात, रोहन-शीतल-सानवी आणि त्यांच्याबरोबर शरदही नंदूकाकांकडे येतात. शंतनू स्वतः उठून आपल्या मित्र-मैत्रिणीची आधी माफी मागतो. त्यानंतर मंजूषाही सर्वांची माफी मागते. आपण कसं फेसबुक वर सानवीच्या अकाउंटवर फोटो पाहताना आपल्या बाबानी शीतलला ओळखले व पुढचा प्लॅन बनवला. हाताला केचप लावून शीतलला कसे घाबरवले वगैरे ती सांगते. त्यानंतर शीतल उठून नांदुकाकाना नमस्कार करीत "माझ्या बाबांची अनावधानाने काही चूक झाली असल्यास त्यांच्यावतीने मी क्षमा मागते काका!" असं म्हणते, त्यावर "नाही पोरी आमच्या तिन्ही पिढ्या उलट विनाकारण सूडाच्या आगीत होरपळत होत्या आणि तुझ्या नवऱ्याने मोठ्या हिमतीने सर्वाना एकत्र आणून ही तेढ कायमची मिटवली, म्हणून त्याचे आणि तुम्हा सर्वांचे आभार!".


आणि मग, अनेक वर्षांनंतर भेटलेले शंतनू-शरद-शीतल आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी काढत हसत-खेळत गप्पा मारतात, मंजुषा देखील सानवीला आजोबांचे घर वगैरे दाखवते. हे सर्व रोहन आणि नंदूकाका समाधानाने बघत असतात….



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror