विहिर
विहिर
किर्तीवेशला नविनच कंस्ट्रक्शनच काम भेटलं होतं. परंतु ते शहरापासून लांब एका गावात होतं. म्हणून गावातच बस्तान बांधल त्याने. एक महिण्यासाठी खोली भाड्यावर घेतली. एका पायपीटीत गावाला वळसा घालून गाव बघून घेतलं. गाव तस हिरव आणि शांत व छान होतं. गावाच्या मधोमध एक तूडुंब पाण्याने भरलेली विहिर होती. विहिर लोखंडी जाळीने झाकलेली व एकच कोपरा पोहऱ्याने पाणी काढण्यासाठी ठेवला होता. तसेच विहिरीला लागूनच चिंचेच भल मोठ फांद्यांनी भरलेल झाड होतं. विहिरीपासून खोली जवळच होती. किर्तीवेशला गाव खूपच आवडलं. घरमालक रघुरावांनी आणलेल्या गावरान चिकनवर त्याने आडवा हात मारला. सकाळी साईट पहायची म्हणून लवकरच झोपला. विहीरीवरच बकेटभर थंड पाण्याने आंघोळ केली व तांबड फुटण्याधिच साईटवर पोहोचला. तो कामाच्या गराड्यात इतका बुडाला की त्याला रात्र कधि झाली हेच कळलं नाही. त्याने घाई घईतच कामं आवरली व सगळ्यांना जायला सांगून तोही निघाला. झपझप चालत गावात पोहोचला. सगळ गाव झोपेत होत. मात्र चिंचेच्या झाडाखाली पिवळ्या नक्षीदार साडित एक बाई चिंचेच्या झाडाला टक लावून बघत होती. आजूबाजूला कोणीही नव्हत. ती एकटीच उभी होती.
किर्तीवेश जवळ गेला व त्याने विचारपूस करताच त्याच्यावर एक कटाक्ष टाकून ती पुन्हा चिंचेच्या झाडाला बघून हसू लागली. काहीतरी विचित्र वाटल्याने किर्तीवेश खोलीत आला. खिडकी उघडून पाहीलं तर बाई नाहीशी झाली होती. भास समजून रघुरावांनी ठेवलेल जेवन जेऊन तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही पुन्हा ऊशीरानेच गावात आला. पुन्हा तीच पिवळ्या साडितील बाई विहिरीच्या कडेला मान गुडघ्यात घालून रडत बसलेली त्याला दिसली. त्याने अजिबात तीला हटकल नाही तर आडोशाला उभा राहुन तीला पहात होता. त्याच्या पाठून अजून एक माणूस गावात गेला पण त्याने तीच्याकडे बघितलही नाही. तो झपझप पावल टाकून निघून गेला. काही मींट ती तशीच रडत बसली व नंतर उठून गावात शिरली. किर्तीवेश तसाच वर खोलीत पळाला, व विचार केला की गावातीलच कोणीतरी असावी. आज पुन्हा ती दिसली तशीच विहिरीच्या कडेला! किर्तीवेशने धिर एकवटला आणि हळूवार पावलाने तीच्याकडे गेला. तीच्याशी बोलणार इतक्यात दोन पुरूष मोठ मोठ्याने वाद घालत येताना दिसले. त्यांच्याकडे वळुन बघण्याच्या नादात किर्तीवेश ठेचाळला. त्या दोघांनीच त्याला सावरलं. ते दोघे गेल्यावर तो पुन्हा विहिरी जवळ जाणार तोच ती बाई तीथे नव्हती. बहुतेक घरी गेली असेल म्हणून तोही खोलीवर गेला.
हे अस आठवडाभर चालू होत. सारखा त्या बाईचाच विचार डोक्यात फिरत होता. दिवसा ती त्याला कधिही दिसली नव्हती. घरमालकाकडे विचारण्याची हिम्मतही नव्हती. म्हणून मग तीच्यावर पाळत ठेवण्याच त्याने मनोमन ठरवलं. नेहमीप्रमाणेच तो ऊशीरा आला. गावात शिरताच त्याने कानोसा घेतला. दबकत दबकत चालत विहिरीजवळ पोहोचला. ती तीथेच विहिरीच्या कडेला बसलेली आढळली. त्याने एका घराच्या भिंतीचा आडोसा घेतला, व ती काय करते ते पहात उभा राहिला. पाऊनेएकची वेळ होती गावात स्मशान शांतता. कुठुन तरी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज वाऱ्यात विरत होता. ती मात्र तशीच मान गुडघ्यात घालून हमसून हमसून रडत होती. बराच वेळ रडून झाल्यावर तीने डोळे पुसले, चिंचेकडे पाहिलं आणि थेट गावात शिरली. तोही दबकतच तीच्या मागे मागे गेला. ती वळून वळून पहायची तसा तो लपायचा. पुन्हा मागे चालायचा. एका बंगल्या वजा घरासमोर ती थांबली. गेट उघडून आत गेली. दाराबाहेरच बांधलेला कुत्रा जोरजोरात हिस्के देत होता. मोठ मोठ्याने गुरकावत भुंकतच होता. ती त्याच्या जवळ जवळ जात होती आणी तो मागे मागे जात घाब्रत भुंकत होता. त्याच्या जवळ जाऊन त्याचा कान तीने खासकन् पिरगाळला. ती कळ त्याच्या डोक्यापर्यंत पोहोचली, तो तीथेच कुंईડડ कुंईડડ करत ओरडू लागला. त्या बाईच असं विचित्र वागणं किर्तीवेश गेटच्या बाहेरच उभा राहून पहात होता. बराच वेळ ती पाळण्यावर बसून आजू बाजूचा परिसर डोळ
े गरा गरा फिरवत न्याहाळत होती. किर्तीवेश गपकन् खाली बसला व काय करते ते पहात होता. ती उठली व तीने दारावरची बेल वाजवायला सुरूवात केली. खूप वेळ तीने बेल वाजवली. जोरजोरात दारावर हात आपटले पण कोणीही आतून दार उघडल नाही. शरीराच बोचकं करून बसलेला कुत्रा व बाहेरून किर्तीवेश हे सगळ उघड्या डोळ्यांनी पहात होते. तीचे केस भुरभुरायला लागले. तीला खूप राग आला तीने चार पाच दगड दरवाजावर भिरकावले व धायमोकलून रडतच पळत सुटली. किर्तीवेश कसाबसा झुडुपात लपला. व ती बाहेर पळताच तीच्या मागे धावत गेला. तीने धावतच विहिर गाठली व सरळ विहिरीच्या आत सुर मारला. हे पाहून किर्तीवेश सुन्न झाला, व तीला वाचवण्यासाठी म्हणून त्यानेही आत उडी घेतली अन् मात्र त्याचा कपाळ मोक्षच झाला!
तांबड फुठताच गाव जागं झाल, जो तो आपापल्या काम धंद्यावर जायला निघाला. काही जणी पाणी भरायला घागरी घेऊन विहिरीवर आल्या अन् मात्र किंचाळतच घरी पळाल्या. समोरच्या दुकाणवाल्याने काय भानगड आहे ती बघायला म्हणून विहिरीवर आला. किर्तीवेशला पाहताच त्याने रघुरावांना हाक मारून खाली बोलावत विहिरीकडे बोट दाखवलं, अन् रघुरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. हळू हळू गाव विहिरी भोवती गोळा झालं. दोघा तीघांच्या सहाय्याने किर्तीवेशला विहिरीवरून खाली उतरवण्यात आलं. तो जीवंत आहे हे पाहून घरमालकाच्या जीवात जीव आला. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला उठवण्यात आलं. व तातडीने गावातल्याच दवाखान्यात मलम पट्टी केली. गावात चर्चेला उधान आलेलं. दुपारपर्यंत किर्तीवेशला घरी आणलं. थोडा वेळ तो झोपला असेल नसेल तोच चौकशीला अख्खा गाव लोटला. कसंबस रघुरावांनी त्यांना घालवल. संध्याकाळचा चहा देण्यासाठी म्हणून रघुराव वर खोलीत गेले व चहा देत किर्तीवेशला उठवत तो विहिरीवर कसा पोहोचला ते विचारल. किर्तीवेशने मग घडलेला सर्व प्रकार त्यांना कथन केला. तसेच ती बाई कोण व अशी विहिरीजवळ का बसते असा उलट सवालही केला. तेव्हा त्यांनीही मग काहीही न लपवता 'केतकीची' कथाच त्याला ऐकवली. केतकीचे आई- बाबा वारल्यावर तीच्या तीन भावडींनीच तीला वाढवलं. मात्र ते त्यांच्या संसारात इतके गुरफटले की त्यांची एकुलती एक भहिण लग्नाची बाकी आहे ह्याचाच त्यांना विसर पडला. तीने कधि चाळीशी पार केली हे ही त्यांना कळल नाही. वाढत्या वयामुळे तीला स्थळही येईनाशी झाली. ती गप्प गप्पच असायची. एकातांत रडायची. साळसुदपणे घरातलं सगळ काम करायची. हो ना करत करत एक स्थळ तीला पहायला म्हणून आलं. ते येणार म्हणून छान पिवळी नक्षीदार साडी व त्यावर काही साजेशे दागीने घालून त्यांची वाट बघत बसली होती. तीच्या दारातच त्यांच्या गाडीला एक किरकोळ अपघात झाला अन् मुलगी अपशकूनी म्हणून गाडीतून न उतारताच ते तसेच निघून गेले. पूर्ण दिवस तीने स्वता: ला कोंडून घेतलं. संबध दिवस तीने रडून काढला. व रात्री बारा च्या सुमारास सगळ्यांचा डोळा चुकवून तीने हीच विहिर जवळ केली. तू ज्या दिवशी ह्या गावात आलास त्याच दिवशी तीला जाऊन दोन वर्ष पूर्ण झाले. त्या नंतर आम्ही लगेच विहिरीवर लोखंडी जाळी टाकली. विणाकारण ही विहिर एखाद्याच्या मरण्याच कारण झाली होती. पूर्ण एक वर्ष कोणीही विहिरीकडे फिरकलं नव्हत. ती अधूनमधून दिसत असते कोणाकोणाला. जो तीच्या जवळ जातो त्यालाच ती खुणावत असते. तूझ्यासारखाच एक मुलगा तीच्यामागे गेला व असाच विहिरीवर आम्हाला सापडला. त्याला आता वेड लागलय.
एक ऊसासा सोडत त्यांनी किर्तीवेशला गाव सोडून जाण्याचा सल्ला दिला. कारण ती पुन्हा पुन्हा त्याला खुणावणार अशी त्यांना शंका होती. व त्यालाही आता गावात रस वाटत नव्हता. घर मालकाचे पैसे चुकते करत त्याने पसारा आवरला, व त्या गावातून काढता पाय घेतला. दिवेलागनीच्या वेळीसच तो जायला निघाला. त्याने वळून पाहिलं घरमालकासकट दोन चार माणसं व इतर आजूबाजूच्या घरातील बायाबापडे त्याला पहात ऊभी होती. त्याने नीट निरखून पाहिल. त्यातली एक पिवळ्यासाडीतील नजर विहिरीला खेटून त्यालाच रोखून पहात होती.