डोरलं
डोरलं


करूणाने आई-बाबांचा विरोध पत्करून सांगलीच्या फार्मसी कॉलेजमध्ये एॅडमिशन घेतलंसुद्धा. आणि सख्खे मोठे काका सांगलीतंच राहतात, हे माहीत असतानाही तिने कॉलेजच्याच हॉस्टेलवर राहण्याचा निर्णयही घेतला. तिचं हे असं वागणं कोणालाच आवडलं नाही. पण तरीही दोन वर्षांनी लहान असलेल्या भावेशने सगळ्यांना समजावले. 'शिकण्यासच चालली आहे ना!' असं म्हणत आई-बाबांची समजूत काढली. शेवटी सर्वांनी उसने हसून का होईना तिला निरोप दिला. पहिलं वर्ष जरा जडच गेलं करूणाचं. परंतु अभ्यास वाढला. तसंही ती अभ्यासाखेरीज कसलाच विचार करत नव्हती. फिरणं वगैरेही नव्हतं. मैत्रीणींचा गोतावळाही कमीच होता. आपण शिकण्यासाठी आलोय याची सतत करूणा जाणीव ठेवत होती. तिच्या अभ्यासातली प्रगती पाहून आई-बाबा व इतर सर्व चांगलेच नरमले होते. सेकंड इयरची परीक्षा देऊन ती सुट्ट्यांमध्ये मुंबईला आली. ती आली म्हणून आई-बाबाही खुश होते.
समोरच्या रूममध्ये एका खाजगी कंपनीत काम करणारा प्रीतेश डिमेल्लो बायको विनिता व दहा वर्षांच्या डेविडसोबत रहायला आला. सेक्रेटरीची भेट घ्यावी म्हणून प्रीतेशने करूणाच्या घराची म्हणजेच वसंतराव साने यांच्या घराची बेल वाजवली. करूणानेच दार उघडलं तसा प्रीतेश तिला बघतंच राहिला. तिनेही त्याचं निरीक्षण केल. ऊंच, सडपातळ, खूप गोरा, भरपूर केस आणि घारे डोळे असलेला कोणाच्याही नजरेत भरेल असा! त्याने ओळख करून दिली. तिनेही मग संकोच न करता स्वतःची ओळख, नाव वगैरे सांगितलं. घरात कोणीच नसल्याच सांगून तिने सेक्रेटरीचा नंबर दिला व संध्याकाळी बाबा आल्यावर भेट घ्या, असंही म्हणाली. त्यानेही तिला घरी येण्याचं आमंत्रण दिलं. दोघांनीही हसून एकमेकांचा निरोप घेतला.
ठरल्याप्रमाणे प्रीतेशने वसंतरांवाची ओळख करून घेतली आणि करूणाही त्याच्या बायको-मुलाला भेटली. तिला त्यांच्या घरातलं वातावरण आवडलं. एकमेकांची ओळख झाली. कुठलंही निमित्त काढून ती प्रीतेशच्या घरी जाऊ लागली. तासन् तास दोघे गप्पा मारत बसायचे. कधीकधी विनिताचाही सहभाग असायचा. त्याच्या गोड बोलण्याची करूणाला चांगलीच भुरळ पडली. कधीकधी पिक्चरला जाताना तो करूणालाही सोबत न्यायचा तीही निःसंकोच जायची, त्याच्या कुटुंबाबरोबर मजा करायची. दोघांची मैत्री घट्ट झाली होती. सुट्टी संपली करूणाला सांगलीला परतावं लागलं. आता थर्ड इयर सुरू झालं होतं. तिने अभ्यासात लक्ष केंद्रित केलं. रोज संध्याकाळी ती प्रीतेशशी फोनवर तासन् तास बोलायची. जेवायचंही भान रहायचं नाही. आईला तिचा फोन कायम एंगेज लागायचा. विचारल्यावर ती काहीही थातूरमातूर कारणं द्यायची. आई
च्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि एक दिवस अचानक कोणालाही न कळू देता विनिताला कामाचं निमित्त सांगून प्रीतेश करूणाला भेटायला तिच्या होस्टेलवर पोहोचला. त्याला पाहताच करूणाने प्रीतेशला करकचून मिठी मारली. बराच वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत रमले. पुढे कितीतरी दिवस करूणा या आठवणीतच रमत होती. तिचं अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं. ती आता फक्त सुट्ट्यांची वाट पाहात होती. कशीबशी परीक्षा देऊन ती मुंबईला पोहोचली. पहिल्या प्रथम प्रीतेशची भेट घेतली व नंतर आई-बाबांची. तिचं नेहमीप्रमाणे प्रीतेशच्या घरी जाणं- येणं वाढल. आईला जरा संशयही आला. परंतु करूणाने त्याच्या 'मुलाला गणित शिकवण्यास मदत करते' म्हणत वेळ मारून नेली. मात्र हे खोटं फार दिवस टिकू शकलं नाही. वीस वर्षांची करूणा तिच्या धेय्याकडे पाठ फिरवत प्रीतेशच्या प्रेमात आकंठ बुडालेली. पाणी सोडण्याच्या निमित्ताने टेरेसवर आलेल्या वॉचमनने पाहिली अन्... "बच्चीने इज्जत मिट्टी में मिला दी साब!" चा संदेश सानेंच्या घरात पोहोचताच हाहाकार झाला. त्याच रात्री करूणाची सुजलेल्या डोळ्यांसह सांगलीला काकांकडे आईसह रवानगी झाली.
दुसऱ्याच दिवशी भावेश व वसंतरावही सांगलीला निघुन गेले. विनिताने समोरच्या दाराला कुलूप लागलेलं पाहून प्रीतेशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. जणू काही घडलंच नाही या आविर्भावाने तिच्याकडे पाहात प्रीतेश ऑफिसला निघुन गेला. तिकडे सांगलीत करूणाचं एका खेड्यातल्या शेतकऱ्याबरोबर भरगच्च हुंडा देऊन लग्न ठरवण्यात आलं. त्याचं वय किंवा शिक्षण काहीही महत्वाचं नव्हतं. तसंच तिचा होकार अथवा नकारही कोणी गृहीत धरला नव्हता. साखरपुडाही उरकून घेण्यात आला. येत्या चार दिवसांनंतरची तारीख ठरवून साने कुटुंब परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. थोड्या फार फरकाने सगळ्यांना सारखाच मार लागला. करूणा मात्र आधी हृदयाने आणि आता शरीरानेही जबर जखमी झाली. कानापासून मानेपर्यंत तिची चामडी फाटली. पूर्ण खांदा रक्ताने माखला. तिला तशीच हॉस्पिटलमध्ये नेली. तिच्यावर उपचार करून दोन दिवसांत तिला लग्नाला उभी केली. लग्नाचा मंडप हळहळला पण वसंतरावांचं कठोर काळिज काही फाटलं नाही किंवा पालटलं नाही! आई सतत डोळ्याला पदर लावत होती. करूणाला धड उभंही राहता येत नव्हतं. तिला कळ सोसवत नव्हती तरीही तिच्या केसांमध्ये कंगवा फिरवला जात होता. डोळ्यांची धार काही केल्या थांबत नव्हती.
भटजींनी हाक मारताच करूणा धडपडत मांडवात पोहोचली आणि सावध होण्याआधीच तिच्या चुकीची शिक्षा "डोरलं" म्हणून कायमचं तिच्या गळ्यात अडकवलं गेलं. तिने केलेल्या चुकीचा पश्चाताप तिला हमसून हमसून रडवतच होता.....!