** विधिचे विधान **
** विधिचे विधान **
" दिसते मजला सुखचित्र नवे,
मी संसार माझा रेखिते"
'हात तुझा हाती असावा,
साथ तुझी जन्मांतरी,
मी तुझिया मागून यावे
आस ही माझ्या उरी
तुझ्या संगती ,क्षण रंगती
निमिषात मी युग पाहते'
रेडीओवर गाणं सुरू होतं. वर्षाच्या ही मनात अशीच चलबिचल होत होती. तिचं मन ही अधीर झालं होतं, सुखी संसाराची स्वप्न पाहण्यात मग्न झालं होतं. आणि नैसर्गिकच होते ते. त्याला ती तरी कशी अपवाद असणार? मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. त्यामुळे आता नंबर वर्षाचाच होता. घरात ही त्याविषयी चर्चा सुरुच होती आणि कारणही तसेच घडले.
वर्षाची मैत्रीण सुषमा हिचे लग्न ठरले. ग्रुपमध्ये पहिला नंबर तिनेच लावला. साखरपुडा ठरला. वर्षाचा सात जणींचा ग्रुप, अगदी नटून-थटून मैत्रिणीच्या साखरपुड्याला हजर झाला. सुषमा बारामतीला एका बिझनेस मॅन च्या मोठ्या घरामध्ये दिली होती. दिसायला सुंदर होती. ती जेवढी सुंदर होती , त्या मानाने तिचा नवरा नव्हता. पण पैसा सुंदर होता ना. शेवटी पैशाचं ही आयुष्यात अनन्यसाधारण असे महत्त्व आहेच ना.तो साखरपुड्याचा थाट पाहून त्यांच्या श्रीमंतीचा बऱ्यापैकी अंदाज आला होता. आधीच सुंदर असलेली सुषमा, त्यादिवशी पिवळ्या कांजीवरम मध्ये अजूनच सुंदर दिसत होती. ती पाहुण्यांची वर्दळ , सनईचे सूर वातावरणात अजूनच रंग भरत होते. साखरपुडा थाटातच पार पडला. सुषमाने ही सर्व मैत्रिणींची आपल्या नवऱ्याशी ओळख करून दिली. तेवढ्यात सुषमाच्या वडिलांनी वर्षाला हाक मारली.
'अगं वर्षा ' हातानेच जवळ येण्याची खूण केली.
'बोला काका, काय?
'तुझी जन्मपत्रिका तयार केलेली आहे का?'
'हो आहे , पण.....'
'अगं सुषमाच्या सासूबाईंनी मागितली आहे. त्या तुझी चौकशी करत होत्या. त्यांच्या नातेवाईकांच्यात कोणीतरी लग्नाचे आहे.'
'बरं काका. मी बाबांना सांगते.'
वर्षा एक क्षणभर आनंदून गेली. कोणत्याही मुलीला हे ऐकून आनंदच झाला असता. घरी येऊन आई बाबांना ही गोष्ट तिने सांगितली. बाबांनाही आपण होऊन विचारणा झाली याचा आनंद झाला. हे लग्न जमले तर किती छान होईल, वेड मन लगेच आशा करू लागलं. पण लगेच मनासारखं थोडेच घडून येतं? लगेचच पत्रिका जुळते किंवा नाही, याची खातरजमा झाली. सुषमाकडे त्यांचाच निरोप आला की पत्रिका जुळत नाही. मुलीच्या पत्रिकेत मृत्यूखडाष्टक योग आहे. आणि तो विषय तिथेच थांबला. आणि तो योग काय असतो, एवढा विचार करण्याचे तिचे वय पण नव्हते. त्यानंतर एक-एक करून ग्रुपमध्ये मैत्रिणींचे लग्न होत राहिले. आता ग्रुप मध्ये फक्त दोघीच लग्नाच्या राहिल्या होत्या. वर्षा आणि सुवर्णा. आता मात्र मनापासून दोघी लग्न जमण्याची वाट पाहत होत्या. कारण सोबत च्या मैत्रिणी, संसाराला लागल्या होत्या. आणि साहजिकच दोघींनाही तसेच वाटत होते.
आतापर्यंतचे वर्षाचं आयुष्य अगदी फुलात गेलं होतं. काटे कसे ते माहीतच नव्हते. आई ,बाबा आणि ती धरून चौघ भावंड. बाबा बँकेत हेड कॅशियर या पदावर नियुक्त. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती. काळजी , विवंचना याचा लवलेशही नसायचा. बरोबरच वडिलांची शिस्त, धाक ,संस्कार या वातावरणात चौघा भावंडांची जडणघडण झालेली. बाबांचा फक्त नजरेचा धाक असायचा.
'शिस्त' एवढे की त्यांच्यासमोर पाय पसरून बसलेले चालत नसे.
'धाक' एवढा की, ऐन वेळेस पैसे मागितलेले कधीही आवडत नसे.
आणि 'संस्कार' एवढे जबरदस्त की, चुकल्यावर खालची मान वर होत नसे.
त्यामुळे त्या चाकोरी बाहेर जाऊन वागायची भावंडांची हिम्मत होत नसे. अगदी ऐष ,आराम यामध्ये सर्व कुटुंबाचा जीवन व्यतीत होत होतं. गावी मोठा वाडा असल्यामुळे बाबांनी तेथे स्वतःची जागा घेतली नव्हती. रेंट वरच्या त्या छोट्या घरात, वर्षा आणि तिची चार भावंड लहानाची मोठी झाली. बाबांची बँकेत जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ फिक्स असायची. आल्यावर फ्रेश होऊन बाहेर छान बसायला कट्टा असायचा त्यावर सर्वजण एकत्र बसायचे. आजूबाजूचे लोकही गप्पा मारायला यायचे. सोबतीला रेडिओ असायचा. मग कधी सुगम संगीत ,नभोनाट्य ,बिनाका गीतमाला, किर्तन, या कार्यक्रमांचा आस्वाद घेणे सुरू असायचे. वर्षाची गाणे ऐकण्याची आवड तर, अफलातून होती. प्रत्येक गाणं तिला पाठ असायचं. त्यात त्याचबरोबर नाचणंही तिला खूप आवडायचं. अशी मनमौजी ,आनंदी होती लहानपणापासून .चौघा भावंडांमध्ये दिसायला थोडी उजवी होती वर्षा. त्यामुळे बाबांची लाडकी. बाबा जेवढा धाक आणि शिस्त लावायचे तेवढेच लाडही करायचे. कधी ,कोणती गोष्ट पाहिजे म्हणून मागावी लागली नाही, किंवा रडावे लागले नाही. अगदी स्वयंपाक घरातली किंवा इतरही गोष्ट न सांगता हजर व्हायची. कोणत्याही कामाचे अगदी परफेक्ट नियोजन असायचे बाबांचे.
बाबांनाही गावामध्ये एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांची शिस्त, दरारा सर्वांच्या परिचयाचा होता.गाव म्हणजे तालुक्याचे ठिकाण होते ते. व्यापारी मंडळी तिथे जास्त होती. व्यापारासाठी ते तालुक्याचे ठिकाण प्रसिद्ध होते.अगदी प्राथमिक सोयी सर्व होत्या. दोन हायस्कूल एक कॉलेज. बँका ,सरकारी ऑफिसेस. गावात छोटे-मोठे उत्सव नेहमीच चालू असायचे गावामध्ये. गावाबाहेर दोन किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून कमला देवीचे मंदिर नयनरम्य अशा परिसरात होते. नवरात्रामध्ये मोठा उत्सव असायचा मंदिराचा. आणि गाव छोटे असल्यामुळे बऱ्यापैकी सर्वांशी ओळख होती. अशा त्या तालुकावजा गावात, वर्षा आणि तिची भावंडे लहानाची मोठी झाली.
आणि वर्षाची आई म्हणजे तर, एक दिलखुलास, हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं. आपल्या स्वभावाने तिने अनेक माणसे जोडली होती. कला कौशल्य ,पाककला यात तर तिचा हात कोणीच धरत नसे प्रत्येक नवीन गोष्ट शिकायची तिची धडपड तर वाखाणण्यासारखीच होती. आणि हेच गुण वर्षाने ही उचलेले होते. दिसायला अगदी आईसारखीच असणारी वर्षा तिची मूर्तिमंत छबी होती.
वर्षाच्या मोठ्या बहिणीचे लग्न जमले. ती जिथे जॉब करत होती, तिथल्या सरांच्या मुलाचे स्थळ तिला सांगून आले होते. बाबांना खूपच आनंद झाला.आणि सर्वकाही पाहून, तिचे लग्न जमविण्यात आले होते.त्या दरम्यान अजून एक चांगला योग जुळून आला होता. वर्षासाठीही एक ओळखीतले स्थळ चालून आले होते. अगदी फॅमिली रिलेशन मधले होते. पत्रिका वगैरे छान जुळत होती. मुलगा पुण्याला वेल सेटल होता. स्थळ माहिती मधले होते. त्यामुळे नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. पहिलेच स्थळ होते वर्षाचे ते. बाबांच्या आनंदाला तर पारावार राहिला नाही. दोघी मुलींचे लग्न एकाच मांडवात उरकायचे, असेच त्यांनी ठरवले. मुलाला पाहण्यासाठी वर्षा सहित सर्व मंडळी पुण्याला गेली. आई-बाबांना तर सर्वच पसंत पडले. वर्षा ही अगदी सहजपणे त्या घरात वावरत होती. तिला जराही टेंशन आले नव्हते. इतके खेळीमेळीचे आणि आपुलकी चे वातावरण तेथे होते. वर्षाने छान छान रांगोळ्या काढल्या, सर्वांना जेवायला वाढले. मग काय !!! मंडळी एकदम खुश झाली.
"आम्हाला मुलगी पसंत आहे" मुलाचे वडील बाबांना बोलले. मुलाला आई नव्हती. मोठी बहीण होती. मुलाचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा बिजनेस होता.
"मग काय वर्षा ,उडवायचा का बार? "त्यांनी वर्षाला उद्देशून म्हटले. वर्षाने खाली मान घातली. ती काय बोलणार होती.
'असू दे ,नंतर निवांत सांगा' ते हसून बोलले. आणि मनात सकारात्मक विचार घेऊनच, सगळी मंडळी आपापल्या घरी गेली.
घरी आल्यावर दोन दिवसांनी, बाबांनी विषय काढला.
'वर्षा ,अग काय कळवायचे त्या पाहुण्यांना?'
सुरुवातीला वर्षा गप्पच बसत होती. बाबांसमोर बोलायची तिची हिम्मतच होत नव्हती. पण कधीतरी उत्तर देणे भागच होते. शेवटी बोललीच.
'बाबा ,मला एवढे ते स्थळ पसंत नाही.'
' का ,काय झाले?'
' मुलाचा बिझनेस मला पसंत नाही. आणि तो मुलगा मला दिसायला आवडला नाही.' त्याची फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग, फक्त सीझन पुरतेच चालणार. इतर वेळेस काय?आणि तो तब्येतीने ही बारीक आहे.'
वर्षा बाबांशी स्पष्टपणे बोलली. आणि मनातील भीती व्यक्त केली. बाबा समजावणीच्या सुरात बोलले.
'तुझं बरोबर आहे,वर्षा. पण तो एकुलता एक आहे.
आणि पुरुषांचे सौंदर्य त्याच्या कर्तुत्वात पाहायचे असते. आणि माणसे आपल्या माहितीतली आहेत. त्यांना तू पसंत पडली आहेस. मग परत एकदा शांतपणे विचार करून मला सांग.'
परतही जेव्हा बाबांनी विचारले तेव्हा ही वर्षाचे उत्तर हेच होते. आता मात्र बाबा थोडेसे चिडून बोलत होते. कारण एवढ्या चांगल्या माणसांना नाही म्हणायचे त्यांच्या जीवावर आले होते. आणि मुख्य म्हणजे ते लोक वर्षाच्या होकाराची वाट पाहत होते. असे करता करता दोन महिने होत आले. शेवटी एक दिवस मुलाच्या वडिलांचे पत्र आले. पत्रातला विषय लग्नाचाच होता. आणि त्यांनी ते पत्र वर्षाला उद्देशून लिहिले होते.
' वर्षा ,आम्ही तुझ्या होकाराची वाट पाहत आहोत. होकार देऊन हे योग जुळून यावे ही इच्छा' बाकी निर्णय तुझ्या हातात आहे. तू आम्हाला नाराज करणार नाही याची खात्री वाटते.'
पण वर्षाचे हे पहिलेच स्थळ होते. आणि नुकतेच शिक्षण पूर्ण होत होते. त्यामुळे अंगात मस्ती होती. पहिल्याच स्थळाला लगेच काय होकार द्यायचा? अजून छान स्थळे येतील. या सारख्या वेगळ्या विचारांनी ती चालत होती. त्यामुळे शेवटपर्यंत होकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने बाबांनी त्यांची माफी मागून हा विषय संपवला. कदाचित वर्षाने होकार दिला असता तर, सगळं मनासारख सुरळीत पार पडलं असतं. पण नियतीच्या मनात जे असतं तेच होत. आणि तशीच बुद्धी होते. तसं तर फार कमी वेळेला, तिची पत्रिका दुसऱ्या पत्रिकेशी जुळत होती. कारण मृत्यू खडाष्टक योग होता ना.
यथावकाश वर्षाची मोठी बहीण, आशु चे लग्न ठरल्याप्रमाणे व्यवस्थित थाटामाटात पार पडले. आईबाबांनी थाटात तिचे कन्यादान केले. तसा थाट बाकीच्या भावंडांच्या नशिबी नव्हताच. आई-बाबांना अजून दोन मुली होत्या पण एकीचेच कन्यादान करण्याचे त्यांच्या नशिबात होते.एवढाच काय तो नियतीने दिलेला आनंद होता वर्षाच्या कुटुंबाचा. त्यानंतर सुखी कुटुंबाला कोणाची तरी दृष्ट लागावी, अचानक रंगाचा बेरंग व्हावा. असेच काहीतरी घडले.
वर्षा त्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून बारा वाजता घरी आली. घरी आली की, आईचा तगादा सुरू व्हायचा.
"वर्षा कपडे बदल ,मी जेवायची थांबली आहे, चल लवकर"
असे म्हणून, ती किचन मध्ये ताटे घेण्यासाठी निघून जायची. हे रोजचे रुटीन होते. पण त्यादिवशी, अशी आईची हाक तिच्या कानी आलीच नाही. वर्षाला वाटले आई किचनमध्ये काहीतरी काम करत असेल. ती आल्यावर फ्रेश झाली. कपडे बदलले. तरीही आई आवाज देत नव्हती. वर्षाने किचनमध्ये डोकावले. आई गॅस पाशी बसून होती. समोर सर्व जेवणाचे सामान दिसत होते. वर्षा ने हाक मारली
"आई!"
"ऊं ऊं,"
वर्षांने परत हाक मारली , 'आई!!'
'अं हं, आई बोलतच नव्हती.
'काय होतय तुला?'
वर्षाने जवळ जाऊन पाहिले. तिचे तोंड वाकडे झाले होते. डावा हातही वाकडा झाला होता. तोंडातून फेस येत होता.तिला काहीतरी सांगायचे होते ,बोलायचे होते, पण तिला बोलता येत नव्हते. आणि तेवढ्यात ती जमिनीवर पडली. वर्षा पळतच शेजारच्या काकांकडे गेली. त्यांचे किराण्याचे दुकान होते.
" काका अहो काका, घरी चला ना लवकर, आई कसे तरी करत आहे"
बरोबर काकूही आल्या. सर्वांनी मिळून उचलून तिला दिवान वर झोपवले. पूर्ण बेशुद्ध झाली होती. काकांनी लगेच बाबांना बँकेत फोन लावला. व झालेला सगळा प्रकार सांगितला. बाबा ही ताबडतोब घरी आले. येताना फॅमिली डॉक्टरांना घेऊनच आले. आणि डॉक्टर आणि निदान केले की, 'आईला पॅरालीसीस चा अटॅक आला आहे. आणि बी पी खूप हाय आहे. ताबडतोब ॲडमिट करावं लागेल.'
सर्वांना खूपच धक्का बसला. कारण हा आजार म्हणजे, परस्वाधीन आयुष्य असते. कारण वर्षाच्या आजोबांनाही हाच आजार होता. त्यामुळे हा आजार सर्वांनी जवळून पाहिला होता. ताबडतोब ऍम्ब्युलन्स बोलावून आईला दवाखान्यात ऍडमिट केले. वर्षाची अवस्था तर पाहवत नव्हती. घरात आता तीच मोठी होती. सगळी जबाबदारी तिच्यावरच होती. या कल्पनेने, आईच्या अवस्थेने तिला खूप रडायला येत होते. लहान भाऊ , बहीण यांना सांभाळायचे होते. कारण वर्षाला एवढी कामाची सवय नव्हतीच. अगदी जेवण झाल्यावर समोरचे ताट सुद्धा आई उचलायची. आईची ट्रीटमेंट सुरू झाली होती. '48 तास काळजीचे आहेत 'असे डॉक्टरांनी सांगितले होते. कारण तिचे बीपी कमी होत नव्हते.
आणि त्या तालुक्याच्या गावी एवढी अद्ययावत हॉस्पिटले नव्हती. दरम्यान मोठ्या बहिणीला ही बाबांनी कळवले. तिच्या सासर्यांनी लगेच बाबांना फोन केला.
'वहिनी ची तब्येत कशी आहे?'
"बीपी कमी होत नाही त्यामुळे काळजी आहे."
'एक सुचवू का बापूसाहेब?
'बोला ना'
'वहिनींना घेऊन तुम्ही इकडे बार्शीला ताबडतोब या तिथे आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट घेऊ'
"पण......."
"पण नाही आणि बीन नाही. डॉक्टरांना विचारून तुम्ही लगेच ठरवा. दीड ते दोन तासाचा तर प्रवास आहे."
बाबांच्या मनात असंख्य विचारांनी काहूर केले. कारण एक तर ते अजून नवीन व्याही होते. आणि आपण गेलो म्हणजे त्यांना आपला त्रास होणार. आणि नाही तरी कसे म्हणणार? आईला चांगली ट्रीटमेंट मिळणेही गरजेचे होते. शेवटी डॉक्टरांना बाबांनी विचारले.
' त्यांची कंडीशन पाहता, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर नेत असाल तर नेऊ शकता.'
शेवटी देवावर भरोसा ठेवून आईला बार्शीला हलविण्याचे ठरवले. आणि त्याप्रमाणे तिथे ट्रीटमेंट सुरू झाली. वेळ पडली तर रक्त ,पुढच्या तपासण्या, यासाठी तेथील हॉस्पिटले खूपच चांगली होती. आणि हळू हळू आईचे बीपी नॉर्मल येऊ लागले. ती थोडी थोडी सावध होऊ लागली होती. सर्वांनाच हायसे वाटले. पण त्या दहा दिवसात नवीन पाहुण्यांना जो त्रास झाला, त्यामुळे बाबांना खूप अपराधी वाटत होते. बाबांनी त्यांना तसे बोलूनही दाखवले.त्यानंतर डिस्चार्ज मिळाला आई घरी आली.
पण एकदा घडी विस्कटली की विस्कटली. मग ती संसाराची असो अथवा स्वतःच्या आयुष्याची. परत रुळावर येणे कठीणच असते. पण आईच्या त्या प्रसंगापासून, सर्वांचीच वेळ कशी बदलून गेली. घरातले रुटीन बदलून गेले. चैतन्य जिवंत होतं पण झोपलेलं होतं.
सतत मस्ती करणारी हसणारी, खेळणारी वर्षा एकदम शांत होऊन गेली होती. जणूकाही अकाली प्रौढत्व आलं होतं तिला. सगळ्या संसाराची धुरा तिच्या खांद्यावर आली होती. निमूट पणे घरातील कामे करत होती. लहान भावंडांना सांभाळत होती. बाबांच्या वेळेत त्यांचे जेवण तयार करत होती. बरोबरीने आईचेही सर्व करत होती. पॅरालीसीस मुळे तिची एक साइड कामातूनच गेली होती. त्यामुळे तिला उठवण्यापासून सर्व कामे करावी लागत होती. जणू काही तिची आईच झाली होती.भावंडांची मदतही घेत होती अधून-मधून. आईला होणारा त्रास , मनस्ताप तिला सहन होत नव्हता. खूप रडायला यायचं तिला. आई कधी एकदा खडखडीत बरी होते आणि पहिल्यासारखी घरात वावरते असे तिला झाले होते. 'असं का झालं' असा सारखा विचार करत होती. पण तिला वाटून काय होणार होतं. नियतीच्या मनात जे आहे तेच होणार होतं.
नंतर फिजिओथेरपीच्या मदतीने घरच्या घरी आईला व्यायाम सुरू झाला. त्यामुळे ती थोडी थोडी हालचाल करत होती. बोलतही होती पण अस्पष्ट. धरून धरून का होईना थोडी चालायला शिकत होती. हळूहळू सुधारणा होत होती पण तेवढ्यापुरती. तशातच वर्षाच्या मोठ्या बहिणीला आशूला दिवस राहिले. परंतु आईच्या अशा परिस्थितीमुळे, त्यांनी तिकडेच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. पण तिच्या सासूबाईंच्या मदतीसाठी म्हणून वर्षाला त्यावेळेस यायला सांगितले. जेव्हा आशुची डिलिव्हरी झाली , तेव्हा वर्षाला जावे लागले. कारण आता आईची जागा वर्षा भरून काढणार होती. आणि मदतीची गरज तर असतेच अशावेळी. रोज दहा दिवस हॉस्पिटलमध्ये बहिणीच्या सोबत झोपायला जावे लागले. तिच्या सासूबाई एकही दिवस आल्या नाहीत. वर्षा थोडीच अनुभवी होती? पण तिला याही अनुभवातून जावे लागले. त्यादरम्यान बहिणीची मावस नणंद बाळाला बघायला आली होती. तिच्या आईबरोबर. लग्नाची होती पण अजून लग्न ठरले नव्हते. दिसायला खूप सुंदर ,हुशार. पण तिच्या लग्नाचा योग काही येत नव्हता. खूप ठिकाणी प्रयत्न सुरू होते. वर्षाला ही वाटायचे, हिच्यात काहीच कमी नाही, का बर हिचे लग्न जमत नाही?
वर्षाने त्याविषयी आशूला विचारले.
मग आशूने सांगितले की तिच्या पत्रिकेत मृत्यूखडाष्टक योग आहे. त्यामुळे पत्रिका सहजासहजी कुठे जमत नाही.वर्षाला लगेच आठवण झाली. स्वतःच्या पत्रिकेची. तिने लगेच आशूला विचारले,
' ताई,म्हणजे काय असतं ग'?
अगं म्हणजे मरणप्राय यातना असतात. सतत मानसिक त्रास. मग चुक असो अथवा नसो. '
वर्षाचे आता रोजचे रुटीन बदलले होते. पुर्णवेळ तिचा घरच्या आणि आई च्या कामात निघून जायचा. परिस्थिती तशीच होती पण आईच्या तब्येतीचे टेन्शन कमी झाले होते. आईच्या तब्येतीत सुधारणा होत होती पण स्वतंत्रपणे ती काहीच करु शकत नव्हती. दुसरीकडे वर्षाच्या लग्नाचे पाहणे सुरू होते. तशातच एक ठिकाणी वर्षाची पत्रिका जमली. मुलगा इंजिनीअर होता. स्थळ गावातले होते पण मुलगा पुण्याला सर्विसला होता. गावातलेच पाहुणे होते त्यामुळे बर्यापैकी ओळख होती. आता पत्रिका जमली म्हणजे दाखवण्याचा कार्यक्रम. आई आजारी असल्यामुळे सगळी जबाबदारी काका-काकू वर आली होती. पाहण्याचा कार्यक्रम झाला आणि त्या लोकांनी वर्षाला पसंती दिली. वर्षाच्या घरच्यांनाही मुलाचे स्थळ पसंत होते. पण वर्षाला मनापासून मुलगा आवडला नव्हता. तिने बाबांना तसे भीत-भीत सांगितले. बाबांनी रुद्रावतार धारण केला.
" इथून पुढे आम्ही स्थळे पाहणार नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्यायचे" या शब्दात वर्षाची कान उघाडणी झाली. आणि त्याच दरम्यान वर्षाची मैत्रीण सुवर्णा हिचे लग्न ठरल्याचे तिला पत्र आले. तिने साखरपुड्याचे आमंत्रण दिले होते. वर्षाच्या मनात चलबिचल सुरू झाली. कारण दोघीच लग्नाच्या राहिल्या होत्या. आणि त्यातही सुवर्णा चे ही लग्न जमले होते.
काही काही वेळेस निर्णय घ्यायला, अशी छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मानसिक आधार देऊन जाते. सुवर्णाचे ही लग्न जमले हे कळल्यावर, वर्षाचे मन त्या स्थळाला होकार देण्यासाठी तयार झाले. आणि तिने बाबांना तसेच सांगून टाकले. आणि साखरपुड्याची तारीख ठरली. घराच्या समोरच मंदिरात साखरपुडा ठरला. सर्व तयारी झाली. पाहुण्यांना आमंत्रणे गेली. आणि साखरपुड्याच्या आदल्या दिवशी एक विचित्र घटना घडली. मंदिराच्या मालकाच्या सुनेने आत्महत्या केली. आणि सहाजिकच ठरलेला साखरपुडा रद्द करावा लागला. सर्वच गोष्टींवर परिणाम झाला. आलेले पाहुणे ,केलेली तयारी, एक उत्साह ,आनंदाचे वातावरण, सर्वांवरच पाणी पडले. तरीपण अशा गोष्टींना नाईलाज नसतो म्हणून सर्वांनी सोडून दिले .समजून घेतले.
साखरपुड्याची दुसरी तारीख ठरली. मागच्या प्रमाणे सर्व तयारी झाली. परत पाहुणे आले. आमंत्रणे गेली. आणि ऐन वेळेस भावकीमधील एक जण मरण पावले. त्यामुळे घरातून सुतक. कसा होणार साखरपुडा?
दुसऱ्या ही वेळेस असेच विघ्न आले होते. फक्त सर्वजण एकमेकाकडे स्तब्धपणे पाहत होते. काय चालले आहे कोणालाच कळत नव्हते. अशा घटना कोणाच्याच हातात नसतात. म्हणून परत सोडून दिले.
तिसरी तारीख ठरली साखरपुड्याची. आता मात्र प्रत्येकाचेच मन साशंक होते. ठरवायचे की नाही, होईल की नाही या भीतीने घाबरत होते. पण नियतीच्या हातात जे असते तेच होणार त्याला पर्याय नसतो. तिसर्या ही वेळेस असेच विघ्न आले. आता तर सर्वांचेच धाबे दणाणले. ठरलाच होता म्हणून घरच्या घरी साखरपुडा उरकून घेतला. आता मात्र या गोष्टीवर गंभीर विचार आवश्यक होता. आणि एवढे ठरलेले लग्न कॅन्सल तरी कसे करणार? दोन्ही घरांच्या संमतीने दोघांच्याही पत्रिका परत एकदा निष्णात अशा गुरुजींना दाखवण्याचे ठरले. आणि त्याप्रमाणे परत एकदा दोघांच्या पत्रिका तपासून पाहिल्या. परंतु गुरुजींनी असे सांगितले की," घडणाऱ्या गोष्टी आणि या लग्नाचा काहीही संबंध नाही. तुम्ही पुढे जायला हरकत नाही" असे आश्वासन मिळाल्यावर सगळ्यांचे चित्त स्थिर झाले. या सगळ्या गडबडीत वर्षा तर अगदी हतबल झाली होती. मोठ्या माणसांसमोर ती बोलणार तरी काय होती? फक्त रडणे आणि रडणे, एवढेच चालू होते.
' मला लग्नच करायचे नाही. मला हे स्थळ नको.अशी ती सारखी म्हणत होती. नारायण, वर्षाचा भाऊ तिच्या पेक्षा दोन वर्षांनी लहान होता. पण त्यावेळेस त्याने मोठा होऊन तिची समजूत काढली.
' ठीक आहे .अडचणी येत आहे. पण आज जगात कुठल्या ना कुठल्या कारणाने हजारो माणसे मरतात, ते काय तुझ्यामुळे का?' हा एक योगायोगही असू शकतो. पण म्हणून लग्नच कॅन्सल करायचे हा पर्याय होऊ शकत नाही.' असे ऐकल्यावर थोडी कुठेतरी शांत झाली होती वर्षा.
त्यानंतर बरोबर पावणेदोन महिन्यांनी लग्नाची तारीख पक्की झाली. लगेच लग्नाची तयारी ही सुरू झाली. पण नियती नावाचा ससेमिरा मागे फिरतच होता.
लग्न एक महिन्यावर आले होते. आणि परत एकदा नियतीची वक्रदृष्टी झाली आणि तो प्रसंग घडला. वर्षाची आतेबहीण, अमळनेर वरून आईला भेटण्यासाठी आली होती. गप्पाटप्पा झाल्या आणि ती जाण्यास निघाली. कोणी पाहुणे आले की आपण दारापर्यंत सोडवायला जातोच. आईलाही धरून धरून बाहेरच्या रूमपर्यंत नेले. आणि तिथल्या घराच्या उंबऱ्या ची उंची नेहमीपेक्षा थोडीशी जास्त होती. आणि आईला नॉर्मल माणसासारखे चालता येत नव्हते. डावा पाय खरडून चालायची. असे काही उंच आले की तिचा पाय उचलून टाकावा लागायचा. बहिण निघून गेली आणि परत जागेवर जाताना, कसे काय कोण जाणे, धरले होते तरी तिचा उंबरा ओलांडताना तोल गेला. आणि ती धाडकन तिथेच पडली. कट् असा आवाज झाला.
वेदनेने जोर-जोरात ती रडू लागली. काका काकू सर्वजण धावत आले. वर्षाने तिच्या पायाकडे पाहिले. खूप भयानक दिसत होते ते. तिचा पॅरालीसीस चा तळपाय जॉईंट पासून असा वेगळा हालत होता. म्हणजे तेथीलच हाड मोडले होते. प्रचंड अशा वेदना होत होत्या. सर्वांनी उचलून कसेतरी तिला बेडवर झोपवले.
परत एकदा सर्वांचीच परीक्षा होती. दवाखान्याची धावपळ सुरू झाली. डोळ्याला दिसत होते, पायाचे हाड मोडलेले त्यामुळे ऑपरेशन तर शंभर टक्के निश्चित होते. परत तिथे चांगली हॉस्पिटले नाहीत म्हणून सोलापूरला न्यावे लागले. किती आघात होत होते त्या माऊली वर. किती वेदना सहन करायच्या याला लिमिटच नव्हते. अंदाजाप्रमाणे ऑपरेशन झाले. पायात राॅड घातला. दीर्घ मुदतीचे प्लास्टर घातले.जवळजवळ 12 दिवस दवाखान्यात काढावे लागले.
एकीकडे लग्नाची तारीख जवळ जवळ येत होती. ते मानसिक टेंशन वेगळेच होते.घरी गेल्या शिवाय काहीच करता येत नव्हते. बाबांचे विचार तर जणू स्तब्ध झाले होते. निर्विकारपणे सगळे पाहत होते. कारण पैशाचे बजेट पूर्णपणे कोलमडले होते. कारण अचानक आलेल्या या संकटाने, शारीरिक-मानसिक आर्थिक सर्वच बाजूने त्रास होत होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर 10 फेब्रुवारीला सर्वजण आईला घेऊन घरी आले. आणि लग्नाची तारीख 19 फेब्रुवारी होती. त्यादरम्यान अनेक नातेवाईकांचा फुकटचा सल्ला मिळाला. की लग्न पुढे ढकला. अशा वेळेस तर कळतं आपलं कोण, परकं कोण. नेहमीचेच चेहरे पण वेगळे भासू लागतात . सगळे प्रश्न शेवटी पैशापाशी येऊन थांबत होते. "सुखके सब साथी , दुःख में ना कोई " .पण अंधारातही आशेचा किरण असतो त्याप्रमाणे, आशु चे सासरे देवदूत बनूनच आले. त्यांनी बाबांना धीर दिला.
' बापूसाहेब, लग्न ठरलेल्या वेळीच होईल. काहीही बदल करू नका. मी आहे.'
किती आधाराचे आणि प्रेरणेचे शब्द होते ते. जेव्हा समोर फक्त अंधार दिसतो, तेव्हा हे आधाराचे शब्द ज्योतीच्या रुपाने जणू मार्गच दाखवतात. संजीवनी देतात. त्यांच्या या शब्दाने बाबांना कितीतरी धीरआला होता. आणि बोलल्याप्रमाणे त्यांनी सोनं आणि कपडे ही खर्चाची बाजू उचलून धरली. आणि घरी आल्यानंतर अकरा तारखेपासून, घरात जे होम-हवन ,शांती ,विघ्न टाळण्यासाठी पूजापाठ चालू होते ते सतत आठ दिवस चालू होते. वर्षाला तर काहीच कळत नव्हते, काय चालले आहे. निर्विकार मनाने ती हो ला हो म्हणत होती. एकटीच रडत होती. कोणाला काही बोलूही शकत नव्हती. आठ दिवसावर लग्न आलेल्या नववधूची अवस्था तर तिच्या आसपास ही नव्हती. सुखी संसाराचे स्वप्न जणू धूसर झाले होते. तिचे मन तो विचार करू शकत नव्हते. घरातल्या प्रत्येकाच मन साशंक होतं. आता तरी हे लग्न व्यवस्थित पार पडते का नाही? हीच सर्वांच्या मनात अनामिक भीती होती. कोणाचे, कुठे ,काय चुकले काहीच कळत नव्हते. घ्यायची ती सर्व काळजी घेऊनही असे प्रसंग घडत होते. कदाचित आशूच्या सासऱ्यांच्या रूपाने, मदत मिळाली नसती तर, लग्न थांबवावेच लागले असते. पण नियतीने संकट आणूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवला होता. त्यामुळे माघारही घेता येत नव्हती.
आणि अजून काहीही विघ्न न येता, 19 फेब्रुवारीला लग्न सोहळा पार पडला. जणू एका वादळाची शांतता झाली होती. नियती कोणालाच चुकत नाही. हेच खरे होते. प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात. एका बरोबर सगळ्यांच्याच प्रारब्धाचे भोग होते ते. जिथे देवादिकांना प्रारब्धाचे भोग चुकले नाहीत तिथे सामान्य माणसांची काय कथा?
"खेळ कुणाला दैवाचा कळला?
मी असो ,तू असो, हा असो, कुणी असो,
दैव लेखला कधी कुणा टळला?
"दैव जाणिले कुणी हो दैव जाणिले कुणी,
लवकुशांचा हलवी पाळणा वनी वाल्मिकी मुनी"
