“व्हाईट कॉलर”
“व्हाईट कॉलर”
शुभा अजून घरी परतली नव्हती, तिची आई वसुधा काळजी करत सारखी पुढच्या दरवाजापर्यंत येऊन येरझाऱ्या घालत होती.
सुभाष ला घेऊन शुभा डॉक्टर कडे गेली होती, सुभाष ला हार्ट अटॅक येऊन आता दोन महिने झाले होते, त्याची प्रगती कशी आहे हे बघण्यासाठी सगळं चेकअप करण्यासाठी शुभा आईला म्हणाली होती," आई मी नेऊन आणले त्यांना, तू घरीच थांब. तुझी पण फार धडपड झाली आहे या दोन महिन्यांमध्ये."
आनंद दुबईला गेला होता तो परत आलाच नव्हता, सगळीकडे लोक डाऊन असल्यामुळे त्याला घरी येताच आलं नव्हतं. आणि अजुनही पुढचं वर्ष तो तिथेच अडकून पडणार होता. त्याच्या पण नोकरीचं सगळंच डळमळीत चालू होतं.
डॉक्टरकडे फार गर्दी होती, त्यातून करोना मुळे फारच कमी रुग्णांना डॉक्टर न भेटण्याची संधी मिळत होती.
शुभा बीएससीच्या तिसऱ्या वर्षाला होती, तीने स्कुटीवर ती बाबांना{ सुभाषला} हॉस्पिटल मध्ये आणले होते.
सध्या घरात पैशाची फारच अडचण होती, अँजिओप्लास्टी सांगितली तर पाच सहा लाख रुपये सहज लागणार होते, त्यातूनही डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिली नव्हती. ओपन हार्ट सर्जरी साठी सुभाष तयार नव्हता. कारण त्याच्या नंतरची जीवघेणी लढाई त्याचं मानसिक खच्चीकरण करत होती.
फंडातले बरेचसे पैसे आनंद आणि शुभाच्या शिक्षणवर्ती खर्च झाले होते, त्यातूनच दूरच्या उपनगरात घेतलेला वन बीएचके त्यांची गंगाजळी आटवून गेला होता. मेडिकल इन्शुरन्स वाले देखील 50 /60 टक्के रक्कम द्यायला तयार होते.
वसुधाच्या दारापर्यंत येरझाऱ्या चालूच होत्या. मनातल्या मनात विचार करत होती, त्याने पैशाची कशी जुळवणी करावी, दागिने विकावे, वन बीएचके विकून टाकावा. काय करावे?
नेहमीची भाजी वाली दारासमोर आली, सुभाष ला लागणारी मेथी पालक लाल माठ फरसबीच्या शेंगा घेवडा असं सगळं वसुधा नेहमीच तिच्याकडून घेत होती.
भाजीवाली गंगा म्हणाली," घे वहिनी बाई, तुझ्या हातून भवानी होऊ दे, तू भाजी घेतली ना की माझी भाजी पटापट संपते."
वसुधा विषण हसून म्हणाली," मी कसली ग लकी तुला, तसं असतं तर माझ्या घरात आज एवढी अडचण नसती."
गंगाला वसुधा ची स्थिती माहीत होती, वसुधा नोकरी करत नाही, , पण तिच्या हाताला चव आहे हे पण तिला माहित होतं. तिच्या हातचे पोहे ,सांजा, कधीकधी बिर्याणी गंगा ला देखील चाखायला मिळाली होती.
गंगा हळूच म्हणाली," डबा द्यायचा का नाही सुरू करत तुम्ही? जवळच्या कॉलेजमधले कितीतरी मुलं तिकडे राहतात, नाही तरी त्यांना जेवायला पाहिजे ना, तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवा नेऊन देण्याचे काम मी करीन."
" अगं माझ्या घरात तरणीताठी मुलगी आहे, अशी खानावळ चालवणं आमच्याकडे पटणार नाही." वसुधा म्हणाली
" वहिनी बाई पोरांना थोडी तुम्ही घरी बोलवणार आहात, डबा करायचा पोळ्या भाजी भात आमटी मी पोचवून देईन.
दहा मुले जरी मिळाले ना तरी तुमचं काम होईल, बघा विचार करा आणि सुरुवात करा. तुम्ही पांढरपेशे लोक घाबरतच फार. आपल्याला जेव्हा गरज असते ना ते मग कोणी मदतीला येत नाही. पहा तुम्ही सुरुवात करा."
" बघू हो गंगा, जरा एक-दोन दिवसात सांगते." वसुधा म्हणाली आणि विचारात पडलि.
शुभा सुभाष ला घेऊन घरी आली, यांच्या दोघांच्या पडलेल्या चेहऱ्यावरून वसुधाला कळले की अँजिओप्लास्टी अटळ आहे.
सुभाष ने मनाशी पैशाची जुळवाजुळव सुरू केली. वसुधाला कळले त्याला सांगण्यात काही अर्थ नाही. तिने गंगा ला फोन करून सांगितले की सोमवार पासून ती डब्बा द्यायला तयार आहे.
शंभर रुपये डबा ठरला, चार पोळ्या दोनशे ग्रॅम भाजी वरण-भात चटणी नाहीतर लोणचं.
नाश्ता तीस रुपये, थालीपीठ, जा सांजा, इडल्या, वडे,.
वसुधाने मनाशी विचार केला, पाच मुले मिळाली तर रोजचे पाचशे रुपये येतील, सर्व खर्च वजा जाऊन निदान दोनशे रुपये तरी प्रॉफिट होईल. घराची बिलं दिलं तरी भागवता येतील.
संध्याकाळी औषध आणायच्या निमीत्ताने वसुधा शुभा ला घेऊन बाजारात गेली, ॲल्युमिनियम चा फाईल, प्लास्टिकच्या पिशव्या, असं सगळं पॅकिंगचे सामान तिने विकत घेतलं, गंगा ला निरोप धाडला की सकाळी अकरा वाजता येऊन डबा घेऊन जा.
सुरुवातीला दोनच मुले मिळाली. आठवड्याभराच्या आत दोनाचे दहा झाले. सकाळच्या जेवणाबरोबर संध्याकाळचा पण जेवणाच्या ऑर्डर तिच्याकडे येऊ लागल्या. गंगा च्या ओळखीने पोळ्या लाटायला म्हणून तिने एका गरजू बाईला आपल्याकडे ठेवून घेतले.
सुभाष अंथरूणवरून पडल्यापडल्या तिची धडपड बघत होता, " अरे हे सगळं तात्पुरता आहे, तुझी एकदा एन्जोप्लास्टी होऊन तू आराम करून नोकरीवर ते रुजू झाल्यास ना की मी हे सगळे थांबवून देईन." वसुधा त्याला धीर देत म्हणत होती.
" अगं तू पण फार जिवाचा आटापिटा करू नकोस, आपण दोघेही आजारी पडलो तर मुलांकडे कोण बघणार?" सुभाषला ती काळजी होती.
वसुधाने मनाशी ठरवले काहीही करून ही संकटाची वेळ निभावून न्यायची.
या दिवशी अरुण घरी आला होता. खरं म्हणजे कुठल्याही मुलांनी तिच्या घरी यायचं नाही असं तिने गंगा ला सांगितलं होतं पण गंगा ला भाजी आणायला मेन मार्केट ला जायचं असल्यामुळे तिने अरुण ला घेऊन डबा न्यायला सांगितले होते.
अरुण कंप्यूटर इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता, त्याने आल्यानंतर वसुधा मावशीला नेटवर्क, किंवा कम्प्युटर बद्दल काही अडचण असेल किंवा काही काम करायचं असेल तर तो मदत करेल असे आश्वासन दिले. या महामारी च्या काळात पण मुलं अडकलेली असताना त्यांना व्यवस्थित घरगुती जेवण मिळत असल्यामुळे अरुण आणि त्याचे मित्र वसुधा मावशीच्या स्वयंपाकIवर्ती अतिशय खुश होते.
होता करता सुभाष ची अँजिओप्लास्टी ची तारीख ठरली. तारखेपर्यंत सुभाषने हॉस्पिटल चे पैसे जमा केले होते. एन्जोप्लास्टी नंतर त्याला तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून परत घरी पाठवणार होते. एन्जोप्लास्टी चा एक बरं असतं शरीरावर कुठेही जखम होत नाही आणि रुग्ण पटपट बरा होतो. व त्याच मुळे अँजिओप्लास्टी चे चार्जेस पण भक्कम मोठे असतात. त्याचं डॉक्टर म्हणाले होते की स्टेंट किती टाकावे लागतील हे त्यांना ऑपरेशनच्या टेबलवरती कळेल. आणि त्याप्रमाणे बिलाची रक्कम वाढेल.
आयुष्यI पुढे पैसे, बिल आणि बाकीच्यांची काय बरं महत्ता?
वसुधाने पण गेल्या पंधरवड्यामध्ये जवळजवळ तीस हजार रुपये जमा केले होते.
सुभाष एन्जोप्लास्टी असतानादेखील तिने मुलांच्या जेवणात खाडा केला नाही.
सुभाष हॉस्पिटल मध्ये असताना, वसुधाला मुलांना तर डबा द्यायचा होता त्यामुळे अरुण ने सुचवल्याप्रमाणे मुलांना पावभाजी, न्युडल्स, भाज्या घालून केलेली बिर्याणी, असा एकच पदार्थ पण भरपूर पाठवला त्यामुळे मुलांची पण ओढाताण झाली नाही आणि उपासमार ही झाली नाही.
घर हॉस्पिटल दोन्ही सांभाळून एखाद्या रणरागिणी सारखी ठाम उभी राहिली.
सगळ्यात जमेची बाजू म्हणजे तिच्यासोबत गंगा, अरुण आणि त्याचे मित्र पण उभे राहिले. आनंद ची कमतरता अरुण ने भासू दिली नाही.
व्यायामाचा शरीर, त्यामुळे सुभाष चे काम एकाच स्टेंट वरती भागल.
अरुण च्या मित्रांनी जेनेरिक दुकानांमधून स्वस्त औषधे कुठे मिळतात याची माहिती काढली होती, त्यामुळे शुभाची ताणाताण कमी झाली.
सुभाष च्या ऑपरेशन ला आता दोन महिने झाले होते, वसुधा चे घर आता बऱ्यापैकी सावरलं होतं. मुलांच्या आग्रहाखातर तिने डब्बा द्यायचं कबूल केलं होतं. आता दहा मुलांचे वीस मुलं झाली होती. वसुधा आनंदाने सगळ्यांना अन्न पुरवत होती.
एक दिवशी वसुधाच्या बऱ्याच मैत्रिणी तिच्या घरी आल्या," काय ग तू खानावळ सुरू केली म्हणे?" रुपाने कुत्सितपणे वसुधाला टोमणा मारला. तिच्या या प्रश्नावर ती सगळ्या मैत्रिणी फिदीफिदी हसल्या.
" मग त्यात काय वाईट आहे? जेवायला तर सगळ्यांनाच लागतं ना! आणि मी मुलांना डबा करून देते मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही कमीपणा आहे". वसुधाने ताठ मानेने त्यांना उत्तर दिले.
" अग मग आम्हाला सांगायचे ना तुला पैशाची गरज होती तर," अंजली मानभावी प्रमाणे म्हणाली.
" गरज पैशाचीच असते असं नाही ग, गरजा आधाराची असते, आणि त्या वेळेला तुम्ही सर्व कुठे होतात ग?" वसुधा खेदाने म्हणाली.
" सगळ्या मैत्रिणी मध्ये तुझ्या खानावळीची चर्चा आहे." मयुरी म्हणाली.
" पण त्यात वाईट काय आहे? मी सचोटीने काम सुरू केलेले आहे. आणि कुठलेही काम वाईट नाही. लहान कामापासून मोठी काम तयार होतात. ऑफिस मध्ये जाऊन टेबलावरती कम्प्युटर बडवून काम करणं म्हणजेच काम असतं का ग?"
" आपल्या पांढरपेशा लोकांचं हे च तर आहे, स्वतः काही करायचं नाही, विनाकारण ताठा बाळगायचा, आणि दुसऱ्याचे पाय ओढत बसायचे, सगळ्यांना नाव ठेवायची. वसुधा तू कर ग. तुला काही मदत लागली तर मला सांग.
मी माझ्या ऑफिस मध्ये पण डब्यासाठी विचारीन." सुजाता समजदारी ने म्हणाली.
" मी पण एक आईस्क्रीम चा स्टॉल टाकायचा विचार करत आहे." मीना एकदम म्हणून गेली. "तुम्हाला म्हणून सांगते मी पण वाढदिवसाच्या केक ची ऑर्डर घेते. मला आवडतं केक बनवायला, सजवायला, जेवढे डेकोरेशन जास्त तेवढे पैसे जास्त. माझा नवरा मला सगळी मदत करतो." " माझ्या लहानपणी मला माझ्या आईची धडपड आठवते, अगं वेळ आल्यानंतर विहीर खोदणे पेक्षा आधीपासूनच आपल्या पायावर आपण उभे राहिलो तर काय हरकत आहे? आपल्याला शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही पण आपल्या हातात कला तर आहे." मीना एकदम मनातलं बोलत होती.
" मला तर वाटतं शालेय आणि कॉलेजचे शिक्षण क्रमामध्ये स्वयंपाक करणे किंवा एखादा छोटासा बिझनेस कसा करणे याचा मूलभूत शिक्षण सगळ्या मुलांना दिले पाहिजे, म्हणजे वेळ आली तर ते स्वतःचा व्यवसायदेखील सुरू करतील नाहीतर निदान स्वतः करून चार घास स्वतःच्या पोटात ढकलतील. “चित्राने पहिल्यांदाच तोंड उघडले, एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होती आणि सध्या ऑनलाईनच काम करत होती.
"आपण फ्लॅट संस्कृतीत मधल्या, त्यामुळे आपली खरं म्हणजे गळचेपी झाली आहे. भाजीवाली च्या लेव्हल खाली उतरता येत नाही, आणि पैशाचं सोंग आणता येत नाही. आपणच आपली व्हाईट कॉलर आता बदलली पाहिजे ना! मी ठरवले आहे हा व्यवसाय काही वाईट नाही, नाहीतरी कोपऱ्या-कोपऱ्यावरती पोळी भाजी केंद्र जोरदार चालू आहेत. परवडणाऱ्या दरात चांगले सकस अन्न आपण तरुण पिढीला देऊ शकलो तर काहीच हरकत नाही." वसुधा हसत हसत म्हणाली.
“आनंद सांगत होता अमेरिकेत म्हणे फळांचा बहर झाल्यानंतर फळ तोडण्यासाठी कॉलेजचे मुलं जातात, तिथे त्यांना रोजंदारी वरती पैसे पण मिळतात म्हणजे त्यांचा पॉकेटमनी पण वाढतो. खरं म्हणजे या सुमारास मला बाहेर जाऊन बिल भरणे, सामान आणणे यासाठी मदतीची फार अपेक्षा होती.. बिल भरून किंवा वाण सामान आणून किंवा भाजी आणण्याचं काम अरुणच्या कुठल्याही मित्रांनी केलं तर मी त्याला त्या दिवशीचा नाश्ता फुकट द्यायचं ठरवलं आणि बघता बघता माझी फुटकळ काम फटाफट होऊ लागली." वसुधाच्या चेहऱ्यावरती काही तरी वेगळेच तेज आले होते.
" खरं म्हणजे भिशी निमित्त एकत्र येऊन उखाळ्यापाखाळ्या काढण्या पेक्षा कुठल्यातरी व्यवसायाची चर्चा जर आपण केली तर ती जास्त उपयुक्त ठरेल." मीना म्हणाली.
" वसुधा आता मी तुला बिझनेसवुमन म्हणणार !" हसत हसत सुजाता म्हणाली.
सगळ्या मैत्रिणींनी सुभाषला " लवकरात लवकर बरा हो" अशा शुभेच्छा दिल्या.
तेवढ्यात शुभाने कॉफीचे वाफाळलेले मग आणि मुगाची भजी आणली, सगळ्या मैत्रिणींनी हसत-खेळत त्याचा आस्वाद घेतला,आपल्या मनावर आलेला ताण काढून टाकला आणि एकमेकांना सहाय्य करायचे वचन देऊनच त्या तिथून बाहेर पडल्या.
