Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

3  

Sandhya Ganesh Bhagat

Inspirational

वारकऱ्यांचा कृष्ण

वारकऱ्यांचा कृष्ण

6 mins
147


वृंदावनातला कृष्ण सामान्यांचा होता. गोपगोपींचा सवंगडी होता. एकदा मथुरेला गेल्यावर तो कधीच परतला नाही. पण माझा आणि अखंड वारकरी परिवाराचा कृष्ण आपल्या बालमित्राप्रमाणं आहे. त्याच्या घरी आपण केव्हाही जाऊ शकतो, तो आपल्या घरी केव्हाही येऊ शकतो, त्याच्या गळयात गळा घालून आपण मजेत भटकू शकतो,आपल्या अगदी मनाच्या खोल कप्प्यातलं गूजही फक्त त्याच्याशीच बोलू, तोही आपल्यालाच सांगेल, असा आपला बालपणापासूनचा सवंगडी असावा अशी भावना मनात निर्माण होते. जनाबाईचं दळणही दळणारा आहे नि दामाजीकरता महाराचं रूप घेणारा आहे. निवृत्तीला खांद्यावर घेणारा, सोपानाचा हात धरणारा, बंकाला कडेवर घेणारा, जनाबाईला दिसणारा लेकुरवाळा विठू आहे. आणि मुख्य म्हणजे, भक्तांच्या भेटीकरता सदैव आसुसलेला आहे.


माऊलींचा श्रोतृवर्ग अगदी सामान्यांतून आलेला, शेतकरी, कामकरी, हातावर पोट असलेला, गाई-गोप-गोपींत वावरणारा गवळी आणि बराचसा अशिक्षित होता. परिणामी त्यांना समजेल, रुचेल अशा भाषेत, त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांनी समजावून सांगणं भाग होतं. ते एक प्रकारच एकतर्फी प्रवचन होतं. प्रश्नांना बंदी नसली तरी तितकी प्रगल्भताही कुणा श्रोत्यांत असण्याचा संभवही नव्हता. हे जरी खरं असलं तरी माऊलींच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर पडणं अस्वाभाविक नाही. तसा तो आढळतोही. शिवाय, त्या श्रोत्यांना कोठल्याही युद्धाला प्रवृत्त करायचं नसून सर्वांना वेदांतील गहन तत्त्वज्ञान सुलभ करून सांगणं, त्यांना भक्तिमार्गाला लावणं आणि त्यातून अक्षय्य सुखाचा मार्ग दाखवणं, हा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर जातीजातींत सुसंवाद प्रस्थापित करणं, हाही त्यांचा उद्देश असावा. असं वाटण्याचं कारण ज्ञानेश्वरांनंतर कित्येक जातीत महान संत निपजले, गोरा कुंभार, सेना न्हावी, सांवता माळी, नरहरी सोनार, जनाबाई, इत्यादी, हे तर सर्वांना माहीत आहे.


नंतरच्या काळात एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या नाना प्रती मिळवून संशोधन करून शुद्ध पाठ प्रस्थापित केला हेही सर्वांना माहीत आहे. इतकी ती लोकप्रिय झाली होती. तुकाराम महाराजांनी किमान सहस्र वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं, असं अभ्यासक सांगतात. समर्थ-वाङ्मयावरही ज्ञानेश्वरीची छाया आहेच. थोडक्यात ज्ञानेश्वर माऊलीचा, म्हणजेच त्यांच्या कृष्णाचाही उद्देश सफल झाला आहे.


माऊलींच्या सामान्य श्रोत्यांना भगवद्गीता माहिती असण्याचासुद्धा संभव नव्हता. कारण ती संस्कृतात. आणि तोवर संस्कृताचे गहन काठ तोडून मऱ्हाटी पायऱ्या कुणी बांधल्याच नव्हत्या, त्या ज्ञानेश्वरांनी बांधल्या (श्रेय निवृत्तिनाथांना दिलं!) आणि “आता कुणीही (भलतेणे) ह्या प्रयागात स्नान करावं आणि संसारातून म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त व्हावं,” असं त्यांनी म्हटलं आहे.


गीतेत कृष्ण सांगतो“अंतकाळी मनात जो भाव असतो, त्याप्रमाणं त्याला गती मिळते.” म्हणजे देहांतानंतर आपल्याकडे यायचं असेल तर देहांताच्या समयी भक्तानं आपलं स्मरण करावं, अशी त्या श्रीकृष्णाची अप्रत्यक्ष तरी अपेक्षा आहे.


यं यं वाऽपि स्मरन्भावं त्यजत्यंते कलेवरम्।

तं तमेवैति कौंतेय सदा तद्भावभावितः॥


पण कृष्णाची तशी अपेक्षा तर नाहीच. उलट, तशी अपेक्षा ठेवण्याच्या कल्पनेमुळं त्याला स्वतःलाच अपराधी वाटतं. तो म्हणतो, “ त्यानं जन्मभर माझी भक्ती केली आहे ना ? तेव्हा, अंतकाली त्यानं माझं स्मरण केलं तरच मी त्याला भेटावं, पावावं, हे मला शोभतं का ?” अशी शंका तो स्वतःच उपस्थित करतो. “आणि तसं असेल तर त्यानं माझी उपासना करायची तरी कशाला ?एकादा बापुडवाणा सामान्य माणूस संकटांत माझं स्मरण करतो, तेव्हा मी धावून जातो ना ? मग भक्ताकडूनही मी वेगळी अपेक्षा का ठेवू ? आणि ठेवायची तर मग (त्यानं) उपासनेचा सोस तरी का करावा ? भक्त जेव्हा माझं स्मरण करतो, तेव्हा त्याचा भार माझ्या जीवाला सोसवत नाही. मग माझ्यावर असलेल्या, त्याच्या त्या ऋणातून उतराई होण्याकरता मी अंतकाळी त्याची सेवा करतो. कुणाही व्यक्तीला मृत्यूची भीती वाटते. पण, त्यातही मृत्त्यूपूर्वी देह विकल होतो, कुणाला ऐकू येत नाही, कुणाची वाचा जाते, कुणाला हृद्रोगाचा झटका येतो, कुणाचे अवयव काढावे लागतात. याची सर्वांना भीती वाटते. पण, कृष्ण म्हणतो, “अंतकाली आपला देह विकल होईल, अशा भावनेचा स्पर्शही त्या सुकुमाराला मी होऊ देत नाही. नव्हे, त्यासाठी मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवून देहवैकल्याचा वारासुद्धा लागू देत नाही. म्हणजे मी त्याला देहभावनेतूनच मुक्त करतो.” सुकुमार ! भक्ताकरता काय शब्द योजला आहे! पण, अशी तरी शंका कशाला ? त्या सगळया तापातून त्याला वाचवण्याकरता माझ्या समरणाची हिमासारखी थंडगार, प्रशस्त, सावली त्याच्यावर धरतो आणि त्याला आपल्याकडे सुखाने घेऊन येतो. असं केलं की मग त्याला देहांताचं किंवा देहवैकल्याचं दुःख किंवा संकट बाधूच शकत नाही.”


एवढयानंही ह्या भक्तवेडया गोपाळाला, आपण ऋणमुक्त झालो, असं समाधान झाल्यासारखं वाटत नाही. म्हणून तो म्हणतो, “ खरं तर, देहांत झाल्यावर मी यावं आणि त्याला घेऊन जावं, असं मुळी काही नाहीच. तो मला येऊन मिळालेलाच असतो.”


माझ्या ठायी जे नित्य जडलेले असतात, त्यांना मी सदा जवळच असतो. म्हणून ते देहांत झाल्यावर ते निश्चयाने मद्रूप होतात. तितका हा योग साधा सोपा नाही, याची माऊलींच्या कृष्णाला पुरेपूर कल्पना आहे. सामान्यांकरता योगमार्ग अत्यंत कठिण असल्याची त्यांना जाणीव आहे. त्यांचा कृष्ण म्हणतो, “योग म्हणजे, थंडीच वेढून घ्यावी, उष्णच पांघरावे, पावसातच घर बांधावं. योग म्हणजे भ्रताराविण करायचा प्रतिदिनाचा अग्निप्रवेशच जणु. धड स्वामिकार्यही नाही आणि धड पितृऋणाची फेडही नाही. मृत्यूपेक्षाही तिखट घोटासारखं. अहो, डोंगर गिळायचा म्हणजे तोंड फाटायचं नाही का ? लोखंडाचे चणे खाल्ले तर पोट भरेल की प्राणावरच बेतेल ?”


म्हणून तू योगाच्या वाटेला जाऊच नकोस.. दुःखाविना काहीसुद्धा प्राप्त होणार नाही.उलट, भक्तिमार्गाचा जे अवलंब करतात त्यांना असला काहीसुद्धा त्रास होतच नाही.पुन्हा योगमागानं अधिक काही साधतं म्हणावं, तर तसंही नाही. उलट, कष्टच सोसावे लागतात. संपूर्ण दिवसातला अगदी एक क्षणभर दिलास तरी पुरे आहे. तेवढ्या क्षणामुळंसुद्धा तुझं काम होऊन जाईल. तू म्हणजे मीच होशील, इतका विश्वास कृष्ण देतो.


अर्जुन जेव्हा श्रीकृष्णाला सांगतो, अरे बाबा, हे तू इतकं व्यवस्थित सांगितलंस ते काय सोपं आहे ? का मन म्हणजे वाऱ्यासारखं चंचल आहे. त्याचा निग्रह करणं कसं शक्य आहे ? कृष्ण भक्तांना संयमसुद्धा करायला सांगत नाही. तो म्हणतो, अभ्यास करायची क्षमता तुझ्या अंगी नाही ना ? नसू देत. आहेस तसाच राहा । इंद्रियांचा कोंडमारा करू नकोस. कुळधर्म पाळायचे असतील तर तेही पाळ. तरी तुला सर्व सुखं मिळतील. पण, सर्व कार्यांतला कर्तृत्वभाव टाकून दे. कारण, कर्ता करविता तो जगाचा नियंताच आहे.किंवा पाटाचं पाणी, माळी जसा नेईल, तसं मुकाट्यानं जातं की नाही? तसं ईश्वर तुझ्याकडून जे आणि जसं कार्य करवून घेईल, तसं होऊ दे.प्रवृत्तिनिवृत्तीचे ओझे तरी मनावर कशाला वागवतोस ? अखंड माझंच स्मरण कर ना. पण जे जे लहान किंवा मोठं कर्म करशील ते मात्र, मलाच अर्पण कर. अशी तुझी भावना झाली की तुला सायुज्यमुक्तीच लाभेल.


साधूंच्या रक्षणाकरता आणि दुष्टांच्या विनाशाकरता, मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, असं व्यास आपल्याला सांगतत. 


परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।


याउलट, पसायदान मागताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, दुष्टांचा विनाश इच्छीत नाहीत. तर त्यांचा दुष्टपणा, वाकडेपणा, तेवढा नाहीसा व्हावा, त्यांची बुद्धी सत्कर्माकडे लागावी आणि सर्व प्राणिमात्रांत सख्य वाढावं, इतकीच मागणी करतात.


ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात ह्या मैत्रीचा कळसच गाठला आहे. ह्या कृष्णाला भक्त किती प्रिय असावेत, त्याला काही सीमांच दिसत नाही. तो म्हणतो, “ माझ्या भक्तांना संसाराची चिंता करायचं काय कारण आणि काय समर्थांची कांता कोरान्न मागे,” असा प्रश्न वर विचारतो. ते मला भार्येसारखेच असल्यामुळं त्यांचं कोणतंही काम करायला मला लाज वाटत नाही, असंही सांगून टाकतो.इतकंच नव्हे, तर भक्ताला आपण कलत्रच मानीत असल्याचं तो पुन्हा पुन्हा सांगत राहतो. त्या भक्ताचं मला इतकं आकर्षण आहे की बोलल्यावाचून मला राहवत नाही. म्हणूनच मला ही उपमा झटक्यात सुचली. नाहीतर प्रेमाला काय कुठं उपमा असते का ? प्रेम असं वर्णन करून सांगता येतं का ?


भक्ताबद्दल, त्यातही अर्जुनाबद्दल किती सांगू आणि किती नाही, असं ह्या भक्तवेड्या कृष्णाला झालं आहे. एखाद्याबद्दल कितीही प्रेम असलं तरी आपण चारचौघांत त्याचं प्रदर्शन करायचं धाडस करीत नाही. पण, त्याचंही भान कृष्णाला राहलेलं नाही. तो म्हणतो, “माझ्या भक्ताचं लक्षण कसं आहे ? तर मी त्याच्याकरता आपलं अंतःकरणच बसायला घालतो.” आणि बोलता बोलता डोलायलाही लागले


प्रेम वेडं असतं, असं म्हणतात. पण, ह्या कृष्णाला भक्तावाचून चैनच पडत नाही. तो म्हणतो, “ हे भक्तिसुख लाभावं, म्हणून मी स्वतःचेच दोन भाग करतो आणि दुसऱ्या भागाला भक्त असं नाव देतो. पुढं त्याचंच मला इतकं व्यसन होतं की तो माझं निजध्यान होऊन जातो. किंबहुना तो भेटेपर्यंत माझं समाधानच होत नाही,” असंही सांगतो.


भक्तांचं तर त्याला वेड आहेच. पण, त्या भक्तांचं चरित्रगान करणारेही त्याला प्राणाहून प्रिय आहेत. कृष्ण म्हणतो, “ भक्तांचं आणि आमचं मैत्र आहे, यात काय विशेष ? ते तर स्वाभाविकच आहे. पण, त्या भक्तांचं चरित्र गाणारेही आम्हाला प्राणाहून प्रिय होऊन जातात.”

पण हे बोलणं इतक्यावरच थांबतं असंही नाही. त्याला भक्तांची इतकी आवड आहे की म्हणतो, “मी ह्याला डोक्यावरच घेईन, त्याचे पायसुद्धा मी मोठ्या आनंदानं छातीशी धरीन.”


त्याच्या गुणांची लेणी आम्ही आपल्या वाणीनं वर्णन करू. त्याची कीर्ती आम्ही (अभिमानाने) मिरवू. त्याचं दर्शन घ्यावं ह्या तीव्र डोहाळ्यांमुळंच मला अचक्षूला डोळे आले. हातातल्या लीलाकमळांनी त्याची आम्ही पूजा करू. त्याला (कडकडून) भेटण्याच्या इच्छेनंच मी मूळच्या दोन हातांबरोबर आणखी दोन हात घेऊन आलो आहे. त्याच्या संगतीच्या इच्छेमुळंच मला विदेह्याला देह धारण करावा लागला. किंबहुना मला तो किती प्रिय आहे, हे सांगायला मजजवळ उपमाच नाही.


असा भक्तांचा, भक्तिमय सावळा 

किती त्याचे गुण , किती भक्ती आवळा

गुणांची महती त्याची, गाती जन सकळा 

ऐसा कान्हा माझा , सांब असे भोळा !!!


🚩🚩!!बोला जय जय राम कृष्ण हरी...!! 🚩🚩

🚩🚩!!जय जय राम कृष्ण हरी..!! 🚩🚩

🚩🚩!!जय जय राम कृष्ण हरी..!!🚩🚩


पुंडलिक वदे हरी विठ्ठल..! श्री ज्ञानदेव तुकाराम..!! 

पंढरीनाथ महाराज की जय...!!! 🙏🚩🚩🚩


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational