अमृतमहोत्सव
अमृतमहोत्सव
आज संपूर्ण जगात भारत आशेचा किरण बनून सूर्यासम आकाशात चमकत आहे, हे सर्व फक्त स्वातंत्र्य भारतात शक्य आहे. पण आपल्याला हे स्वातंत्र्य सहजच मिळाले नाही, या साठी देशातील शूरवीर आणि स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले आहे, त्याचे आपण नेहमीच आभार मानायला हव.
आज आपण या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, हे आपल्याला भारतमाताच्या वीर सपूतांची आठवण करून देते ज्यांनी आपल्या स्वतःला पूर्णपणे या देशासाठी अर्पण केले होते. भारतातील प्रख्यात विद्वान, कवी, इतिहासकार किंवा लेखकांनी भारताची सामाजिक उन्नती करून भारताच्या स्वातंत्र्यात चार पट वाढ केली.
15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला, पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता-बघता स्वातंत्र्याचा प्रवास 75 वर्षांचा होत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवत आहोत. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात 75 वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्वाचे आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या, ? आज सत्य "काय आहे? कुठे होती आपण आणि आता कुठे आहोत ? उणिवा काय राहिल्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील ? याचा विचार आपल्याला करायला लागेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण काय कमावलं आणि काय गमावलं ? याचे विचार करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचली आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घाळत आहेत. देशातून गंगा-गोदावरी, ब्रह्मपुत्रा सारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहेत. आपल्या देशाला शिमला, कुलु, मनाली, उटी सारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारत "देश" सुजलाम सुफलाम आहे.
आपल्या देशाला पैराणिक आणि ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांच्यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्मात आणि विज्ञानातही अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केळी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गेली 15 वर्ष साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखक, साहित्यिक व कलावंतांनी आपला न मिटणारा ठसा उमटवला आहे.
पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. स्वातंत्र्यासाठी अनेक शूर वीरांनी ऐन तारुण्यात बलिदान दिले. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले. स्वातंत्र्यासाठी त्यांनी रक्ताचा सडा सांडला.पण आपण मात्र रक्ताचा धाऊक बाजार मांडला, असं कधीकधी उगाचच वाटते. आज चीन-पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात. देशांमध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी, पुलवामा सारख्या रक्ताळलेल्या आठवणी आपल्याला दुःख देतात. या देशातल्या शेतकऱ्याला आपल्या हक्कांसाठी आंदोलन करावे लागते. अनेक गरिबांना एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. स्वर्गासारखा काश्मीर गुलाबाच्या सुगंधाने दरवळत रहाण्याऐवजी रक्तात रंगताना पाहायला मिळतो. धर्माच्या नावावरून जातीय दंगली होतात, तेव्हा स्वातंत्र्याच्या ठिकऱ्या उडतात. भारत मातेच्या हृदयाचे शेकडों तुकडे होतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील तर...... त्या आईची काय अवस्था होत असेल... ...? या सा-या आक्रमणांमध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त मात्र भारतीयच आहे..... हे आपण का विसरतो ? हा खरा प्रश्न आहे.
भ्रष्टाचाररूपी यंत्रणेमुळे मोठी व्यवस्था बिखरली जाते. मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते, तेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे... तेच भ्रष्टाचाराने बरबटलेले पाहून असंख्य वेदना होतात. तुरूंगात असताना अनेक गुन्हेगार निवडणुका जिंकतात दरवर्षी मोठमोठे घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाच्या हक्काची भाकरी गिळंकृत करणारी मंडळी या देशाचे मारेकरी आहेत.
सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आपल्या देशाची शान आहे परंतु अशा दृष्ट प्रवृत्तींमुळे देश शोकग्रस्त होतो. कधीकधी देशासाठी फासावर चढणारे तरुण पाहिले तर आजच्या या तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल का? असा प्रश्न पडतो.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की, भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले आहे. परंतु जी असमाधानाचा, असंतोषाचा सूर निघत आहे... त्याला आपणच जबाबदार आहोत आपली आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक प्रगती झाली.. पण पण मूल्यांचा -हास होत गेला. म्हणूनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गान झपाट्याने परिवर्तन करीत आहोत. परंतु त्याच वेळी दुसन्या बाजूने वेगाने वाढणाऱ्या भौतिक व अभौतिक समस्यांच्या दृष्ट विळख्यात आपण अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास गुदमरतोय, अशी अवस्था झाली आहे, म्हणूनच स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित देशातील जनतेला एवढेच आव्हान करत आहे.
आज भारत संपूर्ण जगात अविश्वसनीय आहे. कोविड काळात भारतातील संस्कृती ही सर्वोच्च संस्कृती आहे हें सगळ्या जगाने मान्य केले आहे. सामाजिक कु-रीती नाहीश्या झाल्या, गरिबांचे आर्थिक शोषण संपले आणि खेड्यागावांच्या स्थितीमध्ये देखील सुधारणा झाली. आज भारतासोबतच संपूर्ण जग दहशतवाद्यांशी झुंज देतं आहे. हा मात्र स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्वात मोठा डाग आहे.
हे तर आपणा सर्वांना ठाऊक आहे की दहशतवादाला काहीच धर्म नसतो. काही लोकं दहशवादाच्या नावाखाली अनेक निर्दोष लोकांना ठार मारतात, देशाच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. याचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये सरकारी धोरण आणि देशाच्या संरक्षण यंत्रणेबद्दल संभ्रम होतो. आपल्या सर्वांनी मिळून या दहशतवादाच्या विरुद्ध एकमताने आणि एकत्रितपणे मिळून सरकारला सहयोग करावं.
खरं तर हे आपल सौभाग्य आहे की आपण ह्या भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलो आणि स्वातंत्र्याच्या सुंदर वातावरणात श्वास घेतला. देशप्रेम एक पवित्र भावना आहे जी प्रत्येक नागरिकांमध्ये असणं आवश्यक आहे. काही लोकं निव्वळ स्वतःच्या स्वार्थापोटी आपल्या देशाला भ्रष्टाचारात व्यापून देशातील भोळी भाबडी जनतेला दिशाभूल करीत आहे. आपल्याला एकत्र होऊन अश्या भ्रष्ट लोकांपासून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आणि या भ्रष्टाचार रुपी रावणाचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
भारतवर्षाला पूर्वी सारखे सुवर्ण पक्ष्यासारखे बनवायचे आहे आणि स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजायचा आहे, प्रत्येक भारतीयाला आपल्या अधिकारांपेक्षा आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवं, तरच आपले देश संपूर्ण जगात एक महासत्ता म्हणून समोर येईल.
जय हिंद! जय भारत!!
