वाईट मुलाची गोष्ट !
वाईट मुलाची गोष्ट !
तो एक वाईट मुलगा होता. 'आदर्श कथा' मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच. गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते, पण याचे नाव शाम होते. गोष्टीतल्या गोष्टीसारखी याची परिस्थिती कधीच नव्हती. म्हणजे गोष्टीतल्या रामची आई, म्हातारी, थकलेली, अंथरुणाला खिळलेली.' आता माझं मरण जवळ आलंय! माझ्या माघारी तुझं कसं होणार? तुला कोण पहाणार? तुझे लाड कोण करणार? तू शाळेतून आल्यावर तुला गाजर का हलवा कोण करून देणार? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार?' असं म्हणून घळाघळा रडणारी असते. (तशी ती लवकर मरत नाही म्हणा!)
पण आमच्या शामच्या बाबतीत ही असली आशा फोलच होती. त्याची आई धडधाकट अन टुणटुणीत होती. 'माझ्या माघारी....' असला काही प्रकार अजिबात नव्हता. उलट "मूडद्या, लै ऊंडेगिरी केलीस तर, तुझ्या बापासारखा तुला पन गांडीवर लात मारून घराभाईर हाकलून दिन!" असली धमकी द्यायची! ( धमकी नाय , ती खरी करण्याची जिगर तीन त्याच्या पेताड बापाला घराबाहेर काढून सिद्धच केली होती !)
शाम वाईट मुलाच्या रिवाजाप्रमाणे भगवान दादाच्या आमराईत घुसला. बिनधास्तपणे झाडावरचे आंबे चोरले. त्या गोष्टीतला रामा पण असाच आमराईत घुसतो. त्याची सद्सदविवेक बुद्धी 'चोरी करू नये, देव पहातोय, तो तुला शिक्षा करेल!' असे बजावत असते. तरी तो झाडावर चढतो. तो झाडावर चढला की देव शिक्षा म्हणून तो ज्या फांदीवर उभा असतो ती फांदी मोडतो. रामा भदेलकन खाली पडतो. त्याचा पाय मुरगळतो. मग त्याला पश्चाताप होतो. 'देवा मी चुकलो. पुन्हा मी कधी-कधी चोरी करणार नाही. मला माफ कर.' अशी मनापासून प्रार्थना करतो. त्याचे मन हलके होते व तो आनंदी होतो किंवा मग त्या माळ्याचा कमरेएवढा दांडगा (हो लांडग्यासारखा पण )कुत्रा मागे लागतो. रामाला पळता भुई थोडी होते.
पण शामूच्या बाबतीत असले काहीच घडले नाही. तो झाडावर माकडासारखा चढला. भरपूर आंबे खाल्ले, त्यापेक्षा जास्त नासले. पिशवी भरून घेतली. तो झाडाच्या ज्या फांदीवर चढला, त्या फांदीने त्याला दणकट आधार दिला. ती मोडली नाही. उलट शामूनेच चार सहा फांद्या लटकू -लटकू मोडून टाकल्या. हा नाही म्हणायला ते माळ्याचं दांडगं कुत्र मात्र भो-भो करत आलं होतं. पण शामूने जवळची एक गाठाळ विटकर त्याच्या पेकाटात फेकून मारली. ते लांडग्यासारखं थोरलं कुत्र शेपूट पायात घालून पळून गेलं. शामूच त्याच्या मागे लागला, कुत्र्याला पळता भुई थोडी झाली!
दिवसभर उनाडक्या करणे हा शामूचे डेली रुटीन. गोष्टीतला रामापण हेच करतो ना. पण त्याचे गुरुजी (जे पांढऱ्या धोट केसाचे अन मायाळू असतात. शाळेतलेच नाही तर जगातले आदर्श शिक्षक ! ) त्याला एकदा नीट समजावून सांगतात.
'अरे बाळा, असे उनाडक्या करत, शाळा बुडवून हिंडत जाऊ नकोस! नियमित शाळेत यावे. विद्या हीच खरी आणि अक्षय 'संपत्ती' आहे. जी दिल्याने कधी कमी होत नाही आणि हो तू कोणालाही शिव्या देतोस. ते योग्य नाही. तसे करू नये. वडीलधाऱ्यास आदराने बोलावे, त्यांना मान द्यावा. सहकारी आणि मित्रांशी प्रेमाने वागावे. माणसाने विनम्र असावे. तू खूप शहाणा आणि चांगला मुलगा हो! ऐकणार ना माझे?' इतक्या प्रेमळ (आणि लांबलचक) उपदेशाने रामा गहिवरून येणे साहजिक असते. आपण वागतोय ते चुकीचे आहे. आपण इतरांना जो त्रास देतो तो देव पहात असतो. मग तो आपल्याला शिक्षा करतो. पोलीस धरून नेतात. जेल पण होऊ शकते! बाप रे किती भयानक! हे सगळे त्याच्या मनाला पटते. तो पटकन त्या गुरुजींच्या पायावर मस्तक ठेवतो. रामाच्या अश्रुने गुरुजींचे पाय ओले होतात. ते त्याला पोटाशी धरून (पायाला नाही हो, रामाला) मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवतात.
'गुरुजी, आजपासून, नव्हे आत्तापासून मी एका चांगल्या मुलाप्रमाणे वागेन. सर्वाना मदत करीन. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागेन! आजवर जे मी वाईट वागलोय त्याचा मला पश्चाताप होतोय! मला देव माफ करेल का?' <
/p>
'का नाही? पश्चातापाने सर्व पापांचे परिमार्जन होते! तू निर्धाराने चांगला वागलास तर देव नक्कीच तुला क्षमा करेल! शुभम भवतु!'
पण आमच्या शामूची 'बातच कुछ और !' या डांबिस शाम्याला लाईनीत आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे पतळ्या शेणावर दगड मारून शिंतोडे उडवून घेण्यासारखेच होते. हा गुरुजनांचा ग्रह शामूने आपल्या चुणूकदार कारनाम्याने खडकासारखा मजबूत केलाय. त्याचा मासला.
"शामू अरे, अश्या घाणेरड्या. अश्लील शिव्या का देतोस? देऊ नये. ते वाईट असते!"
"मग तुम्ही का देता?"
"मी? केव्हा? आणि कोणाला?"
"तुम्ही आणि शिंदे मास्तर त्या दारूच्या दुकानातून पिऊन आला होतात. सॉलिड मारामारी केलीत सर तुम्ही! पण शिंदे मास्तरनं चांगलाच धुतला तुम्हाला! पण तुमच्या शिव्या भन्नाट होत्या!"
" आ ---अन तू ---"
"मी अन तुमचा किसना समुरल्या टपरीतून बिड्या घेत होतो. आमचं नेहमीचच हाय. वडा माग जाऊन दोघंजण मिळून धूर काढताव!"
मास्तराने विषय बदलला.
"अरे, अशी रोज रोज शाळा बुडवू नये. शिकून मोठं व्हावं. मोठा डॉक्टर, इंजिनियर नाहीतर कलेक्टर व्हावं. चांगला माणूस व्हावं. खूप पैसा कमवावा!"
"हॅट, मोठं होण्याचा अन शाळा शिकण्याच काय पण कनेक्शन नाय. आमचा बा शाळेत कुठं गेला. पर तो मोठा मोठा होतोय! आज पचास सालाचा झालाय! मन परीक्षा द्यावी, कलेक्टर व्हावं. पैसा कमवावा! तेंडुलकर कुठं शिकलाय? पण त्याचा पाशी कलेक्टरपेक्षा भारी गाड्या हैत अन दांडगा पैसा हाय!"
मास्तरला कोड्यात टाकून शामू नदीवर पोहायला पळाला.
नदीवर पोहताना तो गोष्टीतल्या रामासारखा बुडाला नाही की 'वाचवा ! वाचवा !!' म्हणून बोंबला नाही. उलट सोबत आलेल्या शिवाला मागून ढुशी देऊन नदीत ढकलून दिले. 'अरे, असे बेसावध माणसाला नदीत ढकलणे वाईट काम आहे!' असे त्याची सद्सदविवेक बुद्धी विव्हळी नव्हती. शिवा डुबुक डुबुक आवाज करत बुडू लागला. त्याला पोहता कुठं येतंय? चल शिकवतो म्हणालो होतो. 'नग, शाळा बुडती' म्हणाला. आता कुठं येती 'शाळा' वाचवायला? लोक शिवाला वाचवायला धावले आणि शामू घराकडे धावला! आजवर देवाने शामूला कधीच शिक्षा केली नाही!
शामूचे वय वाढत गेले. लहानपणची उंडेगिरी तारुण्यात वासूगिरीत आणि दादागिरीत बदललीय! छोटेमोठे पंगे रोजचेच झालेत. आईकडे तक्रारी करणारे आता पोलिसात जाऊ लागलेत! धमक्यासरशी लोक पैशाच्या राशी त्याच्या पायाशी ओतायत! भल्या भल्यानी त्याची कर्तबगारी पाहून तोंडात बोट घातली आहेत!
गोष्टीतला पश्चातापदग्ध रामा सुधारलाय! बी.ए., एम.ए., पीएचडी झालाय! मोठ्या कॉलेजात छोटासा प्रोफेसर आहे!
आणि शेवटी व्हायचे तेच झालं! आज शाम्या काय आणि कसा आहे?
तो आज एक सन्माननीय नागरिक आहे! हत्तीसारख्या गाड्याचा ताफा तो बाळगतो! राजवाड्याला लाजवील असे बंगले आहेत! कायद्याचे एक पुस्तक ही न वाचता तो 'तंटे' मिटवतोय! कमिशन घेतोय! त्याच्या शब्दाला समाजात मान आणि वजन आहे आणि तो झेलण्यासाठी सर्व स्थरातील लोक ही आहेत ! ज्याचे पोस्टर पोलीस स्टेशनच्या 'वॉन्टेड ' बोर्डावर असायला हवेत, त्याचे भव्य कटआउट्स चौकाचौकात दिमाखात झळकताहेत ! तो आता लोकांचा लाडका 'नेता ' झालाय ! भूगोलाच्या पुस्तकात त्याला भलेही लंडन, स्विझर्लंड सापडणार नाहीत, पण तो तेथे हवे तेवढे दिवस वास्तव्य तेही स्वतःच्या मालकीच्या भव्य बंगल्यात करतोय !
गोष्टीतला रामा, पश्चातापदग्ध, सन्मार्गाला लागलेला, आपल्या तुटपुंजा सरकारी पगारावर, आईचे आजारपण आणि बायकोचे लाड करतोय ! कर्जावर कर्ज काढून 'इज्जत कि जिंदगी ' जगतोय आणि ' मेहनत की रोटी' खातोय !
"तुम्हारे पास क्या है ?"
या प्रश्नाला
"मेरे पास, सच्चाई, मेहनत, इज्जत और मा है !" आजही हेच उत्तर देतोय. एकांतात त्याला या उत्तरातील पोकळपणा हल्ली प्रखरतेने जाणवतोय !