वाचनाचे महत्व आणि "सक्षम" समाज
वाचनाचे महत्व आणि "सक्षम" समाज
सक्षम हा लाजाळू परंतु, अतिशय लाघवी मुलगा. तो आणि त्याचे कुटुंब ज्या चाळीत राहायचे त्या चाळीतला हा हक्काचा कामगार. कामगार या अर्थाने की, जसे प्रत्येक चाळीत अगदी आपल्या आजूबाजूला एखादा लहान मुलगा असतो ज्याला जो तो हक्काने आपली कामं सांगतो आणि तो मुलगाही एका चॉकलेटीसाठी किंवा कधी कधी अगदी आनंदाने उड्या मारत ते काम करून देतो. कामं म्हणजे तरी कसली हो अगदी छोटीशीच जसं चहा पावडर संपली बारक्या जा घेऊन ये, दादांचे इस्त्रीचे कपडे घेऊन ये वगैरे वगैरे..(असो आता कळलेच असेल याची फार काही प्रस्तवाना नको.)तर असा हा सक्षम दहावी मध्ये शिकत होता घरची परिस्थिती अगदी बेताची असल्याने तो रोज सकाळी शेजारीच असलेल्या उच्चभ्रू सोसायटी मध्ये पेपर टाकण्याचे काम करायचा त्याचे त्याला रोजचे चांगले 30-40 रु. मिळायचे. यातूनच घराला हातभार लागायचा. सक्षम मोठा होईल आणि आपल्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढेल अशी त्याच्या आई वडिलांची फार मोठी अपेक्षा होती. अगदी लहान वयात खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येणार हे कदाचित त्याच्या आई वडिलांना माहिती असावं म्हणूच त्याचं नाव त्यांनी सक्षम ठेवलं असावं. असो, तर सक्षम हा मेहनती आणि कष्टाळू वृत्तीचा होता परंतू, अभ्यासात देखील तो अतिशय हुशार आणि नेहमीच नंबरात येणारा असा होता.तर ज्या सोसायटी मध्ये तो पेपर टाकायला जायचा तिथे एक वयाने तिशीत असलेले एक सदगृहस्थ रहात होते त्यांचे नाव विनूभाई कांबळे असे होते. हे विनूभाई कांबळे अतिशय ज्ञानी आणि विद्वान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी अगदी त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षीपासूनच वाचन आणि त्याचे महत्व लोकांना खासकरून आजकालच्या मोबाईल मध्ये गुरफटलेल्या पिढीला कळावं यासाठी एक चळवळ उभी केलेली त्याचाच भाग म्हणून त्यांनी स्वतःच्या घरात एक टूमदार असं ग्रंथालय उभारलं होतं. तसं तर त्या सोसायटीमधली नाही म्हणायला चार दोन टाळकी आणि काही मोजके ज्येष्ठ नागरिक सोडले तर तिथे कोणी फिरकत नसे परंतु तरीही परिस्थिती समोर हार न मानता, न डगमगता विनूभाई लढत होते.
तर, याच सोसायटी मद्ये सक्षम रोज पेपर टाकायला यायचा तेव्हा विनूभाईंची नजर या पोरावर पडायची ते पाहायचे की ह्या इवल्याश्या खांद्यावर किती मोठं ओझं असेल म्हणून हा मुलगा हे कष्ट करतोय. शिवाय अधून मधून पेपर टाकून झालं की त्याला सोसायटी च्या मैदानात एका झाडाखाली पुस्तक घेऊन बसलेलं देखील एकदा दोनदा विनूभाईंनी पाहिलं होतं. जसं जसं परीक्षा जवळ आल्या हा मुलगा तिथे कधी सकाळी तर रात्री एका कोपऱ्यात त्याच मैदानातील दिव्याखाली देखील दिसायचा. का कोणास ठाऊक पण ते नेहमी त्याला पाहिलं की कसल्याश्या विचारात गुंग व्ह्याचे. कदाचित त्यांना तो आपलासा वाटत असावा किंवा विनूभाईंचा भूतकाळ आणि या पोराचा वर्तमानकाळ यात काही साम्य असावं.. की हे इवलेशे खांदे आणि निरागस डोळे यांनी अजून पूर्ण दुनिया पहिली देखील नाही तो स्वतः मात्र एखादी जीवनाची फिलोसोफी वगैरे उगळून पिला आहे असं काही जीवन जगतोय हे पाहून त्यांना आश्चर्य वाटत असेल की आपल्याच सोसायटी मधील काही मुलं जी त्याच्या वयाची आहेत त्यांच्यातील असणारे कल्पनाविलास आणि सगळं काही मिळत असताना देखील असलेलं नैराश्य याबद्दल ते विचार करत असतील.. परंतू नक्कीच कोणती न कोणती गोष्ट किंवा धागा होता जो यांना एकत्र आणत होता.
खूप दिवस त्याचं निरीक्षण केल्यानंतर एकदा विनूभाईंनी ठरवलं देखील होतं की त्याला आपण प्रत्यक्ष भेटून बघू. त्याच्याशी एकदा बोलून बघू नक्की त्याच्या मनात काय आहे? नक्की तो कोण आहे? आणि शक्य होईल ती मदत त्याला करायची या निर्धाराने ते तडक उठून तो जिथे अभ्यासाला बसतो तिथे जाऊन त्याची वाट पाहू लागले.. काही वेळानंतर सक्षम तिथे आला आणि एकदा त्याने भाईंना पहिल आणि दुसऱ्याच क्षणी तो त्याच्या कामाला लागला.. भाईंना आश्चर्य वाटलं तसं त्यांनी त्याला प्रश्न विचारला की, अरे बाबा कोण तु? आणि इथे कसं काय बसतोस अभ्यास करत? तुला दुसरी जागा नाहीका? तसा सक्षम थोडा बावरला त्याला मनातून कदाचित असंही वाटलं असावं की आता आपली ही जागा गेली.. तो शून्यात नजर लावून बसलेला त्यावरुन असं जाणवलं की तो दुसरी जागा कुठे मिळते का याचा विचार करत असावा बहुदा... तितक्यात पुन्हा भाई ओरडले काय बघतोस वेंधळ्यासारखा मी तुलाच बोललो.. तसा तो रडवेला चेहरा करून बोलू लागला साहेब माफ करा पण इथं मोकळी जागा असते आणि घरी माझा अभ्यास होत नाही म्हणून मी इथे येऊन बसतो. त्याला वाटलं भाई आता मारून हाकलून देतात की काय? तसं तो स्वतःच पुस्तक उचलून त्याच्या पिशवीत भरू लागला आणि जायची तयारी करू लागला तितक्यात भाई बोलले अरे बाळा अभ्यास करायचा तर चल माझ्या घरी तिथे शांत निवांत ग्रंथालय देखील आहे तिथे बसून कर अभ्यास शिवाय मला माझ्या ग्रंथालयाची देखभाल करायला कोणी तरी व्यक्ती हवीच आहे आणि तुला रोजचे 100 रु देईल मी.. हे ऐकताच त्याचे डोळे चमकले.
एकतर त्याला जागा देखील मिळणार होती आणि काम देखील. तसंच, आता पेपर टाकून आणि हे काम मिळून त्याला साधारण दीडशे रुपये दिवसाला मिळणार होते. त्याने हरकून लगेच होकार दिला आणि भाईंसोबत तो त्यांच्या घरी आला. बरेच दिवस उलटून गेले त्याचं कामं आणि अभ्यास अतिशय उत्तम रित्या पार पडत होते त्याची बोर्डाची परीक्षा देखील उत्तमरित्या पार पडलेली.. भाई आणि तो ग्रंथालयाच्या बाहेर पायरीवर बसून बोलत होते.. बोलताना सक्षम ला इथे आल्यापासून एक प्रश्न सारखा सतावत होता की जर लोकं येतच नाहीत तर साहेब (भाई )एवढा खटाटोप का करत असतील? का बरं मला तरी उगाचच पगार द्या? आणि त्यादिवशी त्याने हे प्रश्न त्याच्या साहेबांना ( भाईंना ) विचारले. भाई अगदी स्मित हास्य करत बोलले की हे बघ बाळा आयुष्यात अपयश येतं आहे म्हणजे यश कधी मिळणारच नाही असं नाही. आज अंधार असेलही कदाचित परंतू, उद्या लक्ख सूर्यप्रकाश पडलेला असेल. सक्षम ला यातला काही समजलं नाही तो म्हणाला म्हणजे काय? भाई बोलले की, हे बघ बाळा आजच्या या जगात वाचन संस्कृती जपणे ही काळाची गरज आहे.. वाचनाने माणूस समृद्ध होतो पुस्तकं ही माणसाला जगणं शिकवतात तसं ती बुडत्या काळात आधार देतात. पुस्तकं ही तुमच्याशी संवाद साधत असतात तुझ्या माझ्या भावनांना ती साद देतात जखमेवर फुंकर घालणारा सखा बनतात आणि आयुष्यभर सोबत करतात. भाई बोललेलं सगळंच त्याला समजत होतं असं नाही पण त्याला कळत होतं की पुस्तकं आपली सोबती असतात..भाई पुढे बोलू लागले, एक वैचारिक समाज असणं ही काळाची गरज आहे वैचारिक समाजच एका चांगल्या, सुदृढ अशा राष्ट्राची निर्मिती करतो.
परंतु, आजच्या ह्या टेकनॉलॉजिच्या जगात हे आपले खरे मार्गदर्शक कुठे तरी मागेच सोडून आपण पुढे आलो आहोत आणि हे अत्यन्त वेदनादायी आहे." टेकनॉलॉजि ला माझा विरोध नाही पण त्याला आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवताना आपण कुठे तरी पुस्तकरूपी मेंदू बाजूला काढून ठेवला आहे हे आपल्याला अजूनही कळत नाही हे खरे आपले दुर्देव". यातलं फारस किंबहुना काही एक सक्षम ला समजत नव्हतं परंतू भाईंचा उद्दात हेतू यामागे आहे हे मात्र त्याला समजत होतं. एका चांगल्या,सक्षम, सुदृढ, वैचारिक, तात्विक समाजासाठी वाचन गरजेचं आहे हे त्रिकाळबाधित सत्य सक्षम ला समजलं होतं तेही या अवघ्या पोरकट वयात. भाईं त्याच्या पुढच्या प्रश्नाचं म्हणजेच मला कशाला पगार द्यायचा विनाकारण? याचं उत्तर देताना त्याला म्हणाले की, मला तुझ्यासारखे सक्षम मनं घडवायची आहेत जी उद्या आणखी सक्षम निर्माण करतील आणि त्यातून एक आदर्श समाज निर्माण करतील.. हे ऐकताच तो त्वेशाने भाईंना म्हणाला साहेब मी निर्धार करतो की तुमच्या या कार्याला मी माझ्या परीने नेहमीच पुढे नेत राहील आणि लवकरच तो सूर्य देखील उगवेल ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत आहात हे ऐकून भाईंचे डोळे भरून आले.. जगण्याच गमक या इवल्याशा जीवाला कसं बरं कळत असावं याचं त्यांना पुन्हा एकदा नवल वाटत होतं... परंतु, त्याच्या डोळ्यात त्यांना एक सक्षम समाज दिसत होता एवढं नक्की...
#चला तर मग आपणही असे एक ना अनेक सक्षम घडवूयात... त्यांना आपण प्रवाहात आणूयात आणि एका चांगल्या राष्ट्राला आणखी प्रगतशील बनवूयात .. देणार ना साथ.. तर, एक काम करा आपल्या आजूबाजूला लोकांना प्रोता्साहित करा वाचनास प्रवृत्त करा.. लहान मुलांमध्ये आतापासून वाचनाची आवड लावा.. मग बघा कसा समाज आणि आमच्यासारखा तरुणवर्ग सक्षम होतो.....
