सुटका......?
सुटका......?
सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडून शाम पटकन त्याच्या शहरातील तहसील कचेरीत पोहचायच्या लगबगीत होता. शामच्या गावाकडच्या जमिनीबाबत काहीतरी नोंद चुकली आणि म्हणून त्याला दोन दिवसापूर्वी नोटीस आल्याने तो थोडा घाबरलेला होता. शाम एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता पण आज ह्या महत्वाच्या कामासाठी त्याने अर्धा दिवसाची सुट्टी टाकलेली. खरंतर या गावातल्या लोकांसाठी शहरात गेल्यावर जमिनीची किंमत शून्य वाटू लागते पण शाम चं नेमकं याच्या उलट होतं. त्याला शेतीबद्दल नेहमीच कुतूहल वाटायचं आणि म्हणून ही जमीन उगाचच आपल्या हातून जाऊ नये म्हणून हा धडपडत होता. घरातला एकुलता एक मुलगा आणि नुकतेच वडील गेल्याने त्यालाचं हे सगळं सांभाळावं लागणार होतं. सरकारी कार्यालयात जायचं म्हटलं की आजही प्रयत्येकाच्या अंगावर काटा येतो जग पुढे गेलं सगळं काही हातांच्या बोटावर आलं तरी कागदी घोडी नाचवण हा मूळ स्वभाव अजून तरी म्हणावा तितका कमी झालेल्या नसल्याने कदाचित ही परिस्थिती असावी. शाम लगबगीनं त्या कार्यालया जवळ पोहचला. अगदी जुनी मळकट आणि मरनासन्न अवस्थेत पोहचलेली ही इमारतीवर कसलं तरी रंगकाम करून ती इमारत थोडी चकचकित करण्याचे काम चालू होतं एखादा बडा नेता किंवा कोणतातरी कार्यक्रम असावा बहुदा त्याचीच तिथे बाहेरून तयारी चालली होती. आजूबाजूला चार पाच घोळकी उभी होती. काही कळकटल्या धोतर आणि जांगी घालून उभारलेले शेतकरी काही उन्ह चढत असल्याने त्रासलेले लोकं आणि शेजारीच काही बडेजावं मारणारी पुढारी मंडळी बसलेली होती. शाम ने आजूबाजूला एक कटाक्ष टाकला आणि तो आपल्या पिशवीतुन आलेला सरकारी कागद घेऊन कार्यालयच्या दरवाजाकडे निघाला तोच त्याला एक लहानग मुलं १२-१४ वर्षाचं असेल ते दिसलं त्याची आई आणि ते मुल बाहेरच्या ध्वजवंदन करतात त्या कट्ट्यावर कोणाची तरी वाट पाहत असावेत बहुदा. ते लहान मुलं त्याच्या आईला सारखी गळ घालत होते भूक लागली आई चल ना खाऊ दे असा आर्जव करत होते आणि त्याची आई त्या मुलाला बाळा नग रं हट् करू माझ्यापाशी नाही तेवढा पैका म्हणून केविलवाणा आवाजात त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होती. शाम ने हा सारा प्रकार पाहिला आणि तो बाजूच्या दुकानात गेला तिथून दोन बिस्कीट पुढे घेऊन आला आणि त्या माय लेकरापाशी गेला त्याने त्या बाईला आवाज दिला मावशी हे घ्या हे द्या त्याला. तशी ती बाई थोडी हबकली आणि बोलली साहेब मी भिकारी नाह्य. शामला तिची अस्वस्थता लक्षात घेतली आणि तो बोलला की नाही मावशी आहो मी हे आपुलकीने देतोय तसा तो मुलगा त्याच्या आईकडे आशेने बघू लागला. त्याची आई त्याला परवानगी देते कां किंवा आईने ती द्यावीचं असं त्याला वाटत असावं. त्याची आई त्याला बघून म्हणाली ठीक आहे द्या साहेब पण एकच द्या. तसा शामने दोन्ही पुढे त्याच्या हातात कोंबले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला काय नाव तुझं... गुण्या तो उत्तरला आणि दिलेला खाऊ खाण्यात व्यस्त झाला. तेव्हड्यात ज्या साहेबांची वाट ते इतका वेळ पाहत होते ते तिथे आले हे तिने पाहिले आणि ताडकन उठून ती त्यांच्याकडे धावली. तिच्या फाटक्या पिशवीतुन तिने काही कागद बाहेर काढले आणि ती हात जोडून काही तरी विनवण्या करू लागली. पुसटसा आवाज शाम ने ऐकला की साहेब आता तरी हे काम करून द्या वं.. म्या हातावरलं काम धंदा सोडून रोज हिथं नाही येऊ शकतं. त्यावर त्या पांढरपेश्या साहेबानं फक्त हुंकार भरला आणि पुढे निघून गेला. ती बाई सुद्धा त्यांच्या मागे आतमध्ये जाणार इतक्यात तिथल्या शिपायाने तिला मागे ढकलून सांगितलं की आता थोड्या वेळानी भेटा साहेबांची कसली तरी मिटिंग आहे. सरकारी कार्यालयात एवढ्या मिटींगा होतात तरी कार्यक्षमता अजूनही कमीच कशी असते हा तसा संशोधनाचा विषय आहे. असो, ती बाई हताश होऊन पुन्हा त्याच कट्टयावर आली आणि बसली. शाम ने तिला थबकत विचारलं की मावशी काय काम आहे तुमचं. तिने हातातला कागद पुढे सरकावला आणि पुटपुटली की आम्ही गरिबी रेषा कां काय असतंय त्याच्या वरती हाय म्हणून अमास्नी सरकार कडन मिळणार धान मिळणार नाही. कायतर गफलत झालीया साहेब मागच्या दोन महिन्या पावतूर अमास्नी धान मिळत हुतं पण अचानक ते बंद झालं म्हणून इथं इचराया आलू तर हित कोणास्नी ईळ सुधीक नाही आमचं म्हणणं ऐकायला. माझ्या घरात मी एकटीच कमवती हाय धुनी भांडी करून, लोकांच्या रानस्नी खुरपत जाऊन कसं बस गुजरान कारतीया. या माझ्या लेकाला मोठा साहेब बनवीन म्हणून सपान बघत होते पण हे साहेब झाल्यावर असं हुणार अस्तील तरी माझं पोरग न्हाय बनलं साहेब तरी चालल. मागच्या दोन महिन्यापासून एक चूक जिच्यामुळे आज दोनवेळच जेवण मुश्किल झालं त्यासाठी ही बाई जीवचा आटापिटा करतेय आणि प्रशासन झोपेचं सोंग घेऊन बसलंय याची शाम ला खंत वाटू लागली. या बाईसारखी अवस्था खरंतरं आज प्रत्येक नागरिकांची झालीय हे त्याला जाणवू लागलं बहुदा. समोर बसलेली ती बाई डोळे पुसत पुढचा विचार करत असावी. शाम मनाशी पुटपुटला की आपण तरी यात काय करू शकतो आणि त्या बाईंना सांत्वन देऊन त्याच्या कामासाठी आत मध्ये गेला. त्याला तिथे गेल्यावर समजलं की संबंधित अधिकारी आज रजेवर आहेत त्यामुळे आता आठवडाभरानंतर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे पाहून तोही तसाच बाहेर आला. बाहेर येऊन तो आजूबाजूला पाहू लागला की ती माय लेकरं कुठे दिसतात कां पण तोवर तिथे कोणीच नव्हतं. तो देखील मग तिथून कामासाठी निघून गेला. आठ दिवसांनी पुन्हा एकदा तो कार्यालयात येण्यासाठी निघाला पुन्हा एकदा लगबग आणि घाई करून तो तिथे पोहचला थंडीचे दिवस नुकतेच सुरु झालेले असल्याने प्रचंड गारवा पसरलेला होता अगदी १० च्या सुमारास सुद्धा अजूनही लोकं थंडीचे गरम कपडे घालून फिरताना दिसत होते. जवळपास अर्ध्या एक तासात तो कार्यालया बाहेर पोहचला आणि सहज कटाक्ष टाकला तोच त्याच ठिकाणी जिथे आधी त्याला ती आई आणि मुल दिसलें होते तिथेचं खूप गर्दी जमलेली दिसली. घोळक्यातून एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत होता त्या दिशेने शाम धावत गेला आणि घोळक्यातून पुढे आला पाहतो तर समोर तीच माऊली निपचित पडलेली त्याला दिसली तिच्या बाजूला जमलेली ही संवेदनाहीन गर्दी तिच्या मृत्यूचं गूढ शोधण्यात व्यस्त होती इतकी की त्यांना त्या लहानग्या जीवाचं काही भान नव्हतं. शाम स्तब्ध झाला डोळ्यासमोर अंधारी आली आणि त्या दिवशीच त्या माऊलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून गेला. तिचे बोल त्याला ऐकू येऊ लागले. मनात तो म्हणाला की त्या दिवशी मी काही मदत करू शकलो असतो कां? आणि माझी काही मदत झाली असती तर आज जे घडलं ते घडलं असतं कां? बाजूने एक भली मोठी गाडी गेली तिच्या आवाजाने तो भानावर आला. त्याने चटकन त्या मुलाला उचलून घेतले. तो मुलगाही यांचे काही बंध असल्यासारखे याच्या गळ्यात पडून रडायला लागला. तितक्यात तेच साहेब तिथे आले आणि हळहळत म्हणाले अरे रे आजच ह्या बाईंच काम मी करणार होतो आणि आपन कर्तव्यनिष्ठ असल्याच्या अविर्भावात निघून गेला. थोड्याच वेळात तिचं कोणी आहेका हे सगळं तपासणी करून झाल्यावर समजलं की सद्या ती एकटीच राहते आणि गुजराण करते. संवेदनशीलतेचा आव आणनाऱ्या नोकरशाहिने मग आपले कर्तव्य पार पाडले आणि त्या बाईचा अंत्यविधी उरकून त्या मुलाची जबाबदारी शामने घेण्याचे कबूल केल्याने त्याच्याकडे सोपवून पुन्हा एकदा आपल्या आपल्या कामात व्यस्त झाली...उरला होता तो फक्त आर्त आवाज त्या स्त्रीचा जिने अन्न न मिळाल्याने शेवटी जीव सोडला जे काही उरलं सुरलं होतं ते आपल्या मुलाला देऊन ती त्याठिकाणी मोठ्या आशेने आलेली की आज तरी माझं काम होईल आणि मला पोटभर अन्न मिळेल... या विवंचनेतून तिची कायमचीच सुटका होईल हे कदाचित तिने कधी कल्पिले देखील नसेल....
