आंतरिक संघर्ष
आंतरिक संघर्ष
अमेय नुकताच गावाकडून शहरात नोकरीच्या शोधात आलेला होता . गावाकडची माणसं, पावसात भिजलेली माती आणि तासनतास गप्पा हिरव्यागर्द झाडांच्या सावलीत या झाडांच्या मायेत बिनधास्त संवाद साधत बसणारा अमेय वयाने नुकताच एकवीशीत पदार्पण केलेला उमेदीचा तरुण असणारा असा अमेय आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर आता आपल्याला नोकरी मिळेल आणि आपण सुद्धा आपलं आयुष्य सुधारून आपल्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवू शकू या भाबड्या आशेवर दिवसरात्र कष्ट करून मेहनत करून शिक्षण घेणाऱ्या तरुणांपैकी एक अमेय देखील होता. मोठी स्वप्न पहिली पाहिजेत त्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा केली पाहिजे तरच तुमची स्वप्न पूर्ण होतात असं मनात ठासून सांगणाऱ्या आणि कष्ट घेण्याऱ्या अमेयला कदाचित येणाऱ्या कठीण प्रसंगाची जाणीव नसावी आणि ती बहुतांशी तरुण पिढीत नसते. कारण, लाथ मारेल तिथं पानी काढील अशा या उत्साहाच्या काळात ही कल्पना अजिबात मनाला शिवत सुद्धा नाही. अमेयला शहरात येऊन जवळ जवळ २-३ आठवडे उलटून गेले होते आपला बायोडाटा घेऊन तो सगळीकडे कामासाठी विचारपूस करत फिरत होता. एक दोन ठिकाणी मुलाखत झालेली पण तिथूनही अजून काही सकारात्मक हाती आलेलं नव्हत. त्याचा धीर खचत चाललंय असं वाटत होतं. तो दिवसेंदिवस नोकरीची चिंता करू लागला कदाचित त्याला या प्रॅक्टिकल जगात चालणाऱ्या घोडेबाजाराची जाणीव झालेली असावी आणि त्यात तुम्हाला जिंकायचं असेल तर असंच प्रॅक्टिकल वगैरे व्हावं लागेल यावर त्याचा विश्वास दृढ होतं चालला होता. याच दुष्टचक्रात जवळ जवळ दोन महिने उलटून गेले आणि आता त्याला नोकरीची चिंता अधिकाधिक तीव्रतेने सतवू लागली.
त्यात भर म्हणून त्याला अचानक एक दिवशी घरून फोन आला की त्याच्या वडिलांचे शेतीत काम करताना सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला.क्षणार्धात याच्या पायाखालची जमीन सरकली आणि डोक्यावरच छप्पर उडून गेल्याची भावना अगदी त्याला पूर्णपणे हादरवून टाकणारी होती. वडिलांचे अंत्यविधी उरकून आता त्याला त्याचे कुटुंब शहरात आणावे लागणार होते. खरंतर गावातील मोठ्या लोकांनी त्याला पर्याय म्हणून शेती करण्याचा सल्ला दिला मात्र तो शेतीचं नाव ऐकून थोडा हबकला आणि चिडला उदविग्न होऊन तो बोलू लागला की, शेतकरी हा असाच मरतो बांधावर त्याला कोणी कैवारी नाही आरामात बसून हे साहेब लोकं सांगतात की तरुणांनी शेती करावी, जोडधंदा करावा पण हाय कां लाईट वेळेवर, कधी लाईट हाय तर पानी न्हाय पानी ह्यय तर लाईट न्हाय आणि संमद असलं तर निसर्ग कोपतोय. उगा नग मला शिकवू हे संमद. मनातील राग बाहेर काढून तो रडत रडत दरातील बाजावर बसला आणि एकटक शून्यात पाहू लागला कदाचित त्याला आता भविष्य आणि भूतकाळ एक साथ त्याच्या डोळ्यासमोरून जात असावा आपली अडाणी आई आणि लहान बहीण यांची ही जबाबदारी त्याला कशी पेलवणार याचा विचार त्याला अस्वस्थ करत असावा. मनातील हा संघर्ष त्याला आणखीन पेचात टाकत होता. त्याला हेच समजतं नव्हतं की, सिमेंट च्या संवेदनाहीन जगात आपल्या आई आणि बहिणीला न्यावं की नको आणि जर नेलं नाही तर गावातला समाज काय म्हणलं? जबाबदारी झटकली की लेकान म्हणून हिनवलं कां? पण नेलं तरी यांना कसं जगवू? या वयात आईला कुठं ठेवू मी कुठं राहतोय हे आईला कळालं तर ती अर्धमेली होईल मग काय करावं हे त्याला समजतं नव्हतं. पण शेवटी मनाशी निर्धार करून त्याने ठरवलं आणि तो आई आणि बहिणीला घेऊन शहराकडं आला. कदाचित मनात त्याने निर्धार केला असावा की काही काम करून यांना जगवेल. शहरात आल्यावर जितक्या लवकर तुम्ही चांगल्या प्रववृत्तीच्या संपर्कात येणार नाही तितक्या वेगाने वाईट प्रवृत्ती मात्र एखादा साथीच्या रोगाप्रमाणे तुमच्या संपर्कात येतात.
निराश तरुण आणि होतकरू हुशार तरुण हे त्यांचं मुख्य लक्ष असतं. अमेय ला देखील जमेल ते पडेल ते काम करावं लागतं असल्याने तो हळू हळू वाईट संगतीत जाऊ लागला. त्यात त्याची चूक होती की परिस्थितीची चूक हे सांगणे कठीणच पण, हळू हळू शहरात राहून त्याला मिळणारा पैसा कमी पडू लागला अन तो जास्तीचे पैसे आणि झटपट कमवण्याच्या मागे लागला. यातूनच तो ड्रग आणि अवैध गोष्टींची तस्करी यामध्ये गुंतू लागला. एक दिवशी त्याला एका मोठ्या व्यक्तीने बोलवून घेतलं आणि अमेयला म्हणाला की, मी तुझ्यावर खूप खूष आहे त्यामुळे हे पैसे मी तुला देतो आहे. पण येत्या काळात त्याने याच्याकडून एक जोखमीचे काम करवून घेतले आणि त्यात अमेयला पूर्त अडकवून त्याला वाचवण्याची हमी दिली आणि आपल्यासाठी काम करण्यास प्रवृत्त केले त्याची आई या सगळ्यापासून अनभिज्ञ होती ती भाबडी विचार करत असे की माझं मुलगा हाफिसात साहेबच झालंय जणू. अमेय या सगळ्या गर्तेत पुर्ता अडकलेला होता. काम मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा हा तरुण आज अट्टल गुन्हेगार बनून स्वतःला आरशात पाहताना त्याला स्वतःची लाज वाटे. पण, माझा नाईलाज आहे असं तो स्वतःशी पुटपुटून हे काम करत होता. खरंतर आजच्या युगात आपल्या चुकीबद्दल जाणीव असणं हेच त्याला कदाचित मोठं वाटत असावं जे तसं नाही हे त्याला कळण्यास अजून अवकाश होता. काहीच दिवसात अमेयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि भ्रमाचा भोपळा फुटतो तसं काहीस झालं. पैसा आता त्याला वाचवेल असं काही दिसत नव्हतं. त्याच्या आजूबाजूच आभासी जग जणू त्याच्याच मस्तकवार कोसळल होतं आणि त्याला पुन्हा एकदा परिस्थितीची जाणीव करून देत होतं. त्याची आई अडाणी असली तरी स्वाभिमानी आहे हे त्याला माहिती होतं आणि म्हणून त्याचा पैसा आता त्याच्या आई आणि बहिणीला सुख देऊ शकणार नाही याची जाणीव त्याला झाली.. तो गहिवरून आला आणि पुन्हा एकदा जमिनीवर कोसळून रडू लागला. ह्या जमिनीने त्याला तिच्या कुशीत घ्यावं अशी आर्त हाक त्याचं अंतर्मन मारत होतं. त्याची आई आणि बहीण त्याला शेवटचं भेटल्या कारण यानंतर त्या कायमच्या गावाकडं जाऊन राहणार होत्या. या अशा शहरात जिथे माणसाला किंमत नाही तिथे आम्हाला राहायचं नाही असा निर्धार करून त्या तिथून निघाल्या.काही दिवस, महिने,वर्ष उलटून गेले आणि अमेयची जन्मठेप संपवून तो पुन्हा गावी परतला. त्याचं झाडाखाली पुन्हा एकदा पहुडला सिमेंटच्या जंगलात आणि त्याच्या आभासी जगात घुसमटलेला त्याचा श्वास त्याने इथं येऊन सोडला... चूक नेमकी कोणाची याचा परामर्ष घेण्याचा तो प्रयत्न करू लागला शेवटी हा अस्तित्वचा संघर्ष होता की नुसताच हव्यास? हा संघर्ष त्याच्या मनात कायमचाच राहिला....
