Avanee Gokhale-Tekale

Tragedy Others

2.0  

Avanee Gokhale-Tekale

Tragedy Others

त्यांच्या गौरी वाघाने नेल्या

त्यांच्या गौरी वाघाने नेल्या

3 mins
775


प्रत्येक वेळी ती आईला, आजीला विचारायची.. सगळ्यांच्या घरी गौरी गणपती असतात.. आपल्या घरी का नाही येत गौरी.. आई सांगायची आपल्याकडे नसला सण म्हणून काय झालं.. गौरी आपल्या पाठीशी वर्षभर उभ्या असतात.. पण एवढ्या उत्तराने तिचे कधी समाधान झाले नाही.. एकदा आजीने बोलता बोलता सांगितले आपल्या गौराया वाघरू घेऊन गेला, म्हणून आपल्याकडे गौरी नसतात.. घरात असेच शिळोप्याच्या गप्पा चालू असताना तिला एक दिवस कळलीच ती गोष्ट.. काही पिढ्या आधी घडलेली गोष्ट.. 


कोकणातले वरच्या आळीमधले ते ऐसपैस घर.. माणसांच्या मनासारखेच मोकळे ढाकळे .. square foot च्या चौकटी नसलेले.. ओसरी पडवी ओलांडून गेल्यावर कौलारू घर.. मागे परसदार आणि परसातून मागे नजर पोचेल तिथपर्यंत वाडी.. वाडी मध्ये उंचीची स्पर्धा करणारी नारळी पोफळीची झाडं.. त्यामागे आमराई.. त्यात असणारी विहीर आणि तिला लावलेले रहाट गाडगे.. आणि वाडीतून मागे जाणारी पायवाट थेट समुद्रकाठी पोचणारी.. समुद्राची गाज माडाच्या सावलीत निवांत बसल्यावर पण यायची.. आणि नजर उचलल्यावर दिसायचे प्रदूषणाची झालर नसलेले निळेशार आकाश.. 

या निसर्गाच्या कुशीत असणारी माणसं तिथल्या मातीतल्या फणसासारखीच.. तिरकस काटेरी बोलणे पण मनातून गोडवा.. सहज म्हणून २०-२५ माणसं तरी असायचीच घरामध्ये.. त्यावेळी काही त्याला joint-family वगैरे म्हणायची पद्धत नव्हती.. परत माधुकरी साठी वारावर जेवायला येणारे वेगळेच.. आई वडील, त्यांची मुलं, आणि पुढच्या पिढीतले मुलं, सुना आणि नातवंड.. एखादी आलवणामधली आत्या आणि तिची मुलं.. मुली आपापल्या संसारात.. 

बयो हि या घरातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती.. वयाने, मानाने, अधिकाराने आणि कर्तव्याने थोर.. त्यांचं मूळ नाव सुलक्षणा.. त्यांचा उत्साह लहान पोराला लाजवेल असा…आणि त्यात आता तर काय.. गौरी गणपती चा सण म्हणजे उत्साहाला आलेलं उधाण.. गणपती तर रुबाबात बसलाच होता.. आणि गौराई यायचीच वाट बघत होता.. 

तो दिवस गौरी आवाहनाचा.. तिन्ही सांजेला समुद्राकाठी जाऊन खडे आणायचे आणि त्यांची मनोभावे पूजा करायची .. घरात एकीकडे नैवेद्याची तयारी चालू होती.. एकीकडे सजावट चालू होती.. बयो अष्टभुजा असल्यासारखी सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होती.. आणि सगळे मार्गी लागल्यावर तिने स्वतःचे आवरायला वेळ काढला.. 

आधीच दागिन्यांची भारी आवड आणि त्यात आज तर गौरी आवाहन करायचा मान त्यांना मिळाला होता.. त्यामुळे अजूनच दुधात साखर.. ठेंगण्या आणि काटक बयो निळीशार नऊवार नेसल्या होत्या.. गोऱ्यापान रंगावर अस्मानी रंग अजूनच खुलून दिसत होता.. नाकात मोठी नथ अर्धे ओठ झाकले जातील एवढी.. लांबसडक केसांचा खोपा घातलेला.. खोप्याच्या मध्यभागात अग्रफूल आणि भरपूर गजरे.. कानात डुलणारी कर्णफूले.. गळ्यात चिंचपेटी, त्याच्या खाली रुळणारा मोत्यांचा लफ्फा, त्याच्या खाली येणारा रायआवळे हार तर त्यांचा खास आवडीचा.. आणि या सगळ्यापेक्षा उठून दिसणारे ठसठशीत डोरले.. दंडात नागवाकी.. कंबरपट्टा आणि मेखला कंबरेवर शोभून दिसत होता.. कष्ट करून मजबूत झालेल्या हातांची शोभा वाढवायला गोठ, तोडे, पाटल्या, बांगड्या, बिल्वर होतेच तर पैंजण, जोडवीं, वीरवली पायाची शोभा वाढवत होते.. नखशिखांत सजलेल्या बयो साक्षात गौरी सारख्या दिसत होत्या.. 

तिन्ही सांजेची वेळ आणि बयो गौरी आवाहनासाठी निघाल्या.. त्यांच्या सोबत त्यांच्या, सासूबाई, जावा, सुना ही निघाल्या.. या वेळी गौरी हळदी कुंकवाच्या पावलांनी येणार का सोन्या चांदीच्या पावलांनी.. याचा विचार चालू होता सगळ्यांच्या मनात.. उखाणे आठवून ठेवा बयो.. घरात जाताना घ्यायला लागेल उखाणा.. वाडीच्या मागच्या पाऊलवाटेने सगळ्या निघाल्या होत्या.. 

इतक्यात बायोला वेगळीच शंका आली.. मगासपासून येत असलेला वास हा जनावराचा असावा असे त्यांना वाटले.. कानांनी देखील चाहूल घेतली पण तेवढ्यात उशीर झालेला होता.. दबा धरून बसलेले जनावर अचानक समोर आले.. आणि बयोच्या किंकाळीने सगळा गाव थरारला.. 

त्या दिवसानंतर बयो आणि गौरी घरासाठी एक आठवण बनून राहिल्या.. घराने परत गौरी आवाहन केले नाही.. कधीतरी घरावर मोठे संकट येते.. प्रयत्नांची शर्थ करूनही मार्ग सापडत नाही.. आणि अचानक फासे पलटतात आणि संकट टळते.. सगळे सुरळीत होते.. तेव्हा आजी आभाळाकडे पाहून हात जोडत म्हणते बयोच आहे बघ आपल्या घराच्या पाठीशी.. घराची आणि आपल्या सगळ्यांची काळजी अजूनही घेत राहते ती.. 




Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy