मन मंदिरा.. तेजाने उजळून घेई..
मन मंदिरा.. तेजाने उजळून घेई..
दीपकच्या नजरेला म्हणलं तर रोज अमावस्या आणि म्हणलं तर रोज पौर्णिमा.. प्रत्येक गोष्ट स्पर्शातून, कानातून मनात उतरवणारा हा मुलगा..
दीप अमावास्येला रात्री त्याच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.. त्यांनी संगीताकडे फक्त आवड म्हणून नाही तर आपलं पायावर उभं राहायचं म्हणूनही पाहिलं होतं.. सभागृहाबाहेर "houseful" चा बोर्ड लागलेला आणि त्याचा पहिला षड्ज लागला.. सात वर्ष सुरांवर घेतलेली मेहनत आज व्यासपीठावर त्याच्या गळ्यातून प्रेक्षकांच्या मनात उतरत होती.. स्पष्ट, गहिरा, ठेहराव असणारा त्याचा आवाज आणि त्याच्या नजरेसमोर असलेली मुक्तछंद, निर्बंध प्रतिमा या सगळयांनी तो क्षण बांधून ठेवला तसाच.. लोकांच्या टाळ्यांच्या गजराने भानावर आलेल्या त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात आज अभिमानाचे दीप तेवत होते..