टॉम बॉय... भैरवी
टॉम बॉय... भैरवी


भैरवी अगदी एकोणीस वीस वर्षांची असेल,तिला बघितले तर एकदम टॉम बॉय, मध्यम बांधा आणि केसांचा बॉबकट असलेली डोळ्यावर गॉगल असलेली ती आणि तिचा पेहराव म्हणजे मुलांसारखाच जीन्स आणि टी शर्ट ... येता जाता कुणीतरी विक्षिप्त मुलगी आपल्या आजूबाजूने जात आहे असे वाटत असे.... तिची बोली भाषा देखील एकदम रफ आणि टफ प्रकारातली होती... तिला पाहून मुलं देखील तिच्यापासून चार हात दूर रहात असत.... त्यांना कधी ती फटकन काय बोलेल याची भीती वाटत असे...
गावातील लोकं तिला तिच्या अश्या राहणीमानामुळे खूप नावे ठेवत असत... म्हणत असत असे कुठे असतं का?? मुलीने कसं अगदी मुलीसारखं राहायला हवं.... मुलांसारखे कपडे आमच्या मुली पण घालतात... पण भैरवी सारख्या रफ अँड टफ आहेत का?? मला देखील गावातील लोकांची ही गोष्ट पटत असे... पण का कुणास ठाऊक मला तिच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती... आणि योगायोगाने तो दिवस आला...
माझी ईमरजंसी विभागात ड्युटी चालू असताना भैरवी एका पंचवीस वर्ष वय असणाऱ्या रुग्णाला घेऊन आली... रुग्ण बेशुद्ध होता....त्या रुग्णाला आमच्या दवाखान्यातील सिस्टर ने लागलीच ओळखले.... तो नियमित ऍडमिट होणारा रुग्ण होता.... त्याला झटक्यांचा आजार होता.... आजार माहिती असल्याने लागलीच उपचार सुरु केले... ऍडमिशन पेपर वर त्या रुग्णाची नातेवाईक म्हणून भैरवी ने स्वतः चे नाव दिले... नंतर तो रुग्ण शुद्धीवर आल्यावर त्या रुग्णाने आपल्या नातेवाईकांना फोन करून तो दवाखान्यात ऍडमिट असल्याचे कळवले...
नंतर मला सिस्टर ने सांगितले की भैरवी कुणी त्याची नातेवाईक नाही.... मला खूप आश्चर्य वाटले.... नातेवाईक नसतानाही जीला एकीकडे सगळा गाव नाव ठेवतो ती भैरवी काहीतरी वेगळीच आहे असे वाटून गेले.... आता मात्र मला तिला जाणण्याची उत्सुकता शिगेला गेली होती.... पण तेव्हा तो रुग्ण बेशुद्ध असल्याने मी त्याच्या उपचारात गर्क झाले होते....
या घटनेच्या दोन दिवसांनी परत भैरवी एका म्हाताऱ्या आजोबांना सोबत घेऊन आली.... त्या आजोबांना दमा होता..... इथे देखील तीने सोबत आणणाऱ्या नातेवाइकामध्ये स्वतः चे नाव लिहिले.... या वेळेस मात्र मला तिला तिच्या विषयी जाणून घेण्याचा चान्स मिळाला.....
भैरवी सांगत होती.... माझे वडील पोलीस खात्यात होते.... आणि माझी आई घरीच असायची... आई दिसायला खूप सुंदर होती पण शिक्षण मात्र फक्त दहावी पास.....आम्ही खूप समाधानी आयुष्य जगत होतो..... पण अचानक माझ्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला आणि आमचे दिवस पालटले.... खाऊन पिऊन सुखी असणारे कुटुंब उध्वस्त झाले.... माझी आई तर पूर्ण कोलमडून पडली.... मी त्यावेळी अगदीच नऊ दहा वर्षांची असेल....
आईला अनुकंपा तत्वावर फक्त सेवकाची नोकरी मिळू शकत होती.... पण आमच्या नातेवाईकांनी ती करू दिली नाही...म्हणून मग..... आईला टेलर काम येत होते..... तिने सुरुवातीला ब्लाउज शिवायला सुरु केले आणि नंतर ड्रेस शिवायला लागली...
आई सुंदर असल्याने आणि आता विधवा असल्याने आजूबाजूला असणारे पुरुष जाणूनबुजून त्रास देत असत.... त्यांच्या घाणेरड्या नजरा, घाणेरडे comments सतत तिच्यावर ह्या असल्या लोकांचं दडपण येत असे....आणि हेच बघत मी मोठी झाले... मी एकुलती एक होते.... काळाची गरज होते मला असे रफ आणि टफ होणे.. आणि मीच स्वतः मध्ये असा टॉम बॉय सारखा लूक आणलाय.... बघितलं ना मुलं कसे चार हात दूर राहतात ते.... कुणाची वाकडी नजर करण्याची हिम्मत होत नाही....
मी ते सगळं ऐकून स्तब्ध झाले.... मग भैरवीला विचारले?? .... हे आजोबा तुझे आजोबा का? त्यावर भैरवी म्हणाली... तसं पहायला गेलं तर हे माझे कुणी नातेवाईक नाही..... पण येताना रस्त्यामध्ये बसलेले दिसले.... दम्यामुळे त्यांना बोलता देखील येत नव्हते... म्हणून त्यांना दवाखान्यात घेऊन आले... मग मी भैरवी ला विचारले?? तू काय काम करतेस?? कुठले ngo वगैरे चालवतेस की समाजकार्य करतेस.... भैरवी म्हणाली नाही हो माझी नुकतीच बी.एस. सी ची पहिल्या वर्षाची परीक्षा संपली... आणि सुट्ट्या आहेत म्हणून मी घरी आहे... आणि ह्या रुग्णाचं म्हणाल तर मी त्या दोघांना इथे घेऊन आले म्हणून ते वाचले ना.... मला तेवढाच थोरा मोठ्यांचा आशीर्वाद....
मी : मग पुढे काय व्हायचंय
भैरवी :मला PSI व्हायचंय आणि देशाची सेवा करायची आहे आणि माझ्या बाबांचं स्वप्न देखील होतं मी PSI व्हावे म्हणून....
आता मात्र मला देखील भैरवी बद्दल आपण गावकऱ्या सारखा विचार केला म्हणून वाईट वाटले... मनातून भैरवीचे स्वप्न पूर्ण व्हावे या साठी प्रार्थना करायला लागले...
मला या क्षणाला माननीय सुधा मूर्ती mam चे ते प्रसिद्ध वाक्य आठवले...." DON'T JUDGE A PERSON BECAUSE OF THEIR EXTERNAL APPEARANCE "